महाराष्ट्र मंडळ आणि आमची समिती
ऑगस्ट 23, 2006 at 12:55 pm | In कुवेत, मराठी | Leave a Commentमाणूस हा जात्याच समूहात रमणारा प्राणी आहे. त्यामुळेच इतका मोठा समाज तयार झाला. खरं तर महाराष्ट्रात अशा महाराष्ट्र मंडळाची तितकीशी गरज भासत नाही. पण तुम्ही जेव्हा भारताबाहेर येता तेव्हा मात्र आपल्या लोकांची कमी फ़ार प्रकर्षाने जाणवते. घवघवीत व्यावसायिक, आर्थिक यश जरी मिळत असलं तरी आपल्या माणसांच्या प्रेमाची भूक सगळ्यांनाच असते. आपल्या देशात आपली माणसं आपल्या आजूबाजूलाच असतात पण परदेशात मात्र ती शोधावी लागतात अन एकदा का अशी माणसं मिळाली की तयार होतं महाराष्ट्र मंडळ !
कुवेतमधे पण असंच सगळ्या मराठी कुवेतकरांची ही भावनिक भूक भागवणारं महाराष्ट्र मंडळ आहे. खूप जिवंत! छोट्या मुलांपासून तर जेष्ठांपर्यंत सगळ्यांना एकमेकांमधे गुंतवून ठेवणारं ! वर्ष सुरु होतं तिळाच्या पौष्टिकतेनं आणि गुळाच्या गोडव्यानं तर समापन होतं वार्षिक स्नेहसंमेलनानं. “प्रेम” ह्या गाण्याच्या कार्यक्रमानंतर मंडळाशी जरा जास्तच बांधल्या गेलो आम्ही. प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून हजेरी लावायची आणि जास्तीत जास्त कार्यक्रमात भाग घ्यायचा हे ध्येय. खूप खूप ओळखी झाल्या. आपल्या अंगच्या कलागुणांना वाव देणारं व्यासपीठ पुन्हा एकदा मिळालं होतं.
लेकीची (अदिती) १० वी पार पडली. १२ वीत तिच्यासोबत आम्ही पण बिझी होणार होतो आणि त्यानंतर तिला जिथे admission मिळणार तिथे कदाचित जावं लागणार म्हणून तिच्या ११वीच्या वर्षीच मंडळाच्या कार्यकारी समितीत पाऊल टाकायचं ठरवलं.
अतिशय Active members असलेली समिती होती आमची. प्रत्येक जण उत्साहाने भरलेला आणि कल्पक. अध्यक्ष होते नवीन कल्पनांना भरपूर प्रोत्साहन देणारे विजय कुळकर्णी, सचिव होत्या उसळत्या उत्साहाच्या हरहुन्नरी अल्काताई केतकर, सांस्कृतिक सचिव होता माझा गुरु आणि संगीतकार विवेक आणि बाकी आम्ही सगळे शिलेदार म्हणजे अतिशय सुरेख पदलालित्य आणि बोटांमधे कला असलेली निलिमा दिवेकर, भक्कम आधारस्तंभ अंजू जवाहिरे, हजरजवाबी पाठीराखा बॅंकर सुजीत रोंघे, गाढे अभ्यासक आणि सामान्य ज्ञानाचा खजिना असलेले कुमठेकर, आमचे गायक ऑडिटर दीपक जुवेकर, वास्तुशास्त्राचे ज्ञाते रमेश गाडगीळ आणि मी
आमच्याही समितीचा पहिला कार्यक्रम होता मकरसंक्रांतीचा. अतिशय दिमाखात सुरवात झाली. काहीतरी नवीन हवंच हे जणूकाही आमचं ब्रीदवाक्य होतं. अगदी आमंत्रणापासून नाविन्याचा श्रीगणेशा झाला. सगळ्या सभासदांना मराठी भाषेतून आमंत्रणं गेलीत. माझे शब्द आणि विवेकचं सुशोभीकरण. पुढे पुढे तर अगदी नशा चढायला लागली. तऱ्हेतऱ्हेची कल्पक आमंत्रणं आम्ही बनवली. मंडळाची वेबसाईट बनवली (विवेकनं). मग त्याचा साजशृंगार. मंडळाच्या सभासदांचं लिखाण, त्यांच्या कलाकृती, रेखाटन…. सगळ्याला वाव मिळाला. प्रत्येक कार्यक्रम झाला की त्याचे फ़ोटो आणि कार्यक्रमाचा वृत्तांत लगेच वेबसाईटवर दिसायला लागला. सगळ्या सभासदांसोबत छानसा संवाद साधल्या जाऊ लागला.
आम्ही आयोजित केलेली ग्रीन-आयलंडची पिकनिक धमाल उडवून गेली. होळीच्या जवळपास असल्यामुळे रंग, गाणी, नृत्य, आगळे खेळ…… नुसती धमाल.
निलिमाच्या मनात एक सुरेख कल्पना साकारायला लागली होती. तिची गुणी लेक लंडनहून सुट्टी घालवायला इथे आली होती. तिच्या आणि रेवती कढेच्या साथीनं एक ७ दिवसांचं workshop तिनं घेतलं. प्रत्येक दिवस काहीतरी नवीन. त्यांच्यासोबतच नेरुरकर, मिलिंद कुळकर्णी, विवेक ह्यांनीसुद्धा या छोट्या शिबिरार्थींना मोलाचं मार्गदर्शन केलं. हस्तकला, नृत्य, गाणं, चित्रकला, नाट्यशात्र अशा विविध कलांचा आविष्कार ह्या मुलांकडून घडवून आणला.
होता होता १ मे…….महाराष्ट्र दिन जवळ आला. आपल्या सगळ्या मराठी भाषिकांचा मानाचा दिवस. ह्यादिवशी काहीतरी विशेष करायचं ठरलं. आम्ही आमंत्रणं खास खलित्याच्या स्वरुपात आणि भाषेत बनवली. संपूर्ण सोहळा फ़क्त मुलांकडूनच करुन घ्यायचा असं ठरलं. सगळी मुलं अतिशय उत्साहात होती. त्यांना पण आपलं मराठीपण मिरवून घ्यायचं होतं. कार्यक्रमाचं निवेदन मी मुलांकडूनच बसवून घेतलं. एक मावळा आणि एक मराठमोळी मुलगी ह्यांच्या हसतखेळत चाललेल्या गप्पांमधून कार्यक्रम खुलत गेला. आजच्या पिढीला आपल्या परंपरेची जी काही ओळख आहे ती वाढावी आणि आपण जे मराठीपण अभिमानानं मिरवतो ते मराठीपण त्यांनीही जपावं म्हणून आम्ही केलेली धडपड अगदी सार्थकी लागली
ह्यानंतरचा कार्यक्रम होता एक Study Tour. सगळ्या लहान मुलांना आम्ही नेलं KDD ची Icecream आणि Juice factory बघायला. ह्या टूर मधे लक्ष्याच्या ‘टूरटूर’इतकीच धमाल आली
आता ग्रीष्माचा उष्मा जाणवायला लागला तसे सगळ्यांना सुट्टय़ांचे वेध लागले. इथे जून पासून तर ऑगस्ट पर्यंत शाळॆला सुट्ट्या असतात. तेव्हा जवळपास अर्ध्यापेक्षाही जास्त कुवेत रिकामं होतं. अहो ५०-५२ अंश तापमान असताना भारतातला पावसाळा कोण सोडणार? पण काही कारणाने इथे राहणारी पण बरीच मंडळी असतात. अशातच डॉ.वसुधा गोखले हिने ‘रेकी’ ह्या विषयावर अतिशय सुरेख व्याख्यान दिलं. मी स्वत: वसुधाची खूप मोठी चाहती आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्व, कायम हसरी, दुसऱ्याना मदत करायला अगदी out of way जाणारी, अतिशय सुरेख गाणारी, छानसं लिहिणारी….. एक गोड व्यक्ती ! तर हिचं हे व्याख्यान होतं. सगळ्या उपस्थितांनी ह्या Audio-visual व्याख्यानाचा लाभ घेतला.
आता वाट होती गणरायाच्या आगमनाची. अल्काताईंच्या घरी हा कार्यक्रम झाला. अल्काताई म्हणजे उत्साहाचं कारंजं ! त्यांनी गणेशाची सुरेख मूर्ती घरीच तयार केली. आरास तर लाजवाब. रेशमी वस्त्रप्रवरणात, मोदकांच्या गोडव्यात आणि ढोलकीच्या थापांवरच्या आरतीत अगदी थाटात झाला उत्सव.
गौरी गणपती झाल्यावर येते कोजागिरी. दरवर्षी या पौर्णिमेच्या चांदण्यात मंडळाची सहल असते पण काहीतरी नवीन हवं ना……! म्हणून आम्ही एक आगळावेगळा कार्यक्रम करायचं ठरवलं. धमाकेदार दांडीयासोबत काही जबरदस्त स्पर्धा. मस्त response मिळाला सगळ्यांकडून. ह्या कार्यक्रमाच सूत्रसंचालन मी आणि उत्साही कलाकार मिलिंद देशमुख ह्यांनी केलं. हसतखेळत झालेल्या आणि तुफ़ान प्रतिसाद मिळालेल्या स्पर्धांमधे पहिली स्पर्धा होती ”आम्ही दोघं राजाराणी”. ह्यात भाग घेतलेल्या राजांना अंतरपाआटाच्या एका बाजूला तर राण्यांना दुसऱ्या बाजूला उभं करण्यात आलं. सगळ्यांना प्रश्नावल्या देण्यात आल्या. त्या सोडवायला त्यांना वेळ होता मंगलाष्टकं संपेपर्यंत. ही टिंगलाष्टकं रचली होती मी आणि गायली होती मी आणि विवेकनी.
मंगलाष्टकं
आता सावध सावधान घटीका, संपूर्ण आली भरून
राजा राणी कशी समोर बसती, हाती पेन धरुन ॥
प्रश्नांच्या झडती कशा नौबती, चिंता कशाचीपरी
अर्धांगी असूनी सखी तू मनी, राजा तुझ्या अंतरी
होती वाद जरी सदा तुजसवे, प्रीती मनी तुजवरी
गोडी त्या वादातही मज मिळे, प्रीती तुझी आगळी ॥
नाही ठाऊक कोण बॉस त्याचा, सदनी असे बॉस तो
त्याचा शब्द सदैव मी उचलते, पदरी किती त्रास तो
नाही काही इलाज आज उरला, गतजन्मीचे फ़ेडणे
नवरा हा मजलाच का लाभला, नशिबीच हे भोगणे ॥
भांडे राणी जरी घरी कचकचा, राजासवे कितीतरी
सांभाळे राजास ती परिणीता, दोषी किती तो जरी
राणी ती करते वसूल सगळे, व्याजासवे झडकरी
पुरवूनी त्या मागण्या नवनव्या, राजाच हफ़्ते भरी ॥
घरची सारी खुषी तुझ्यावर परी, जेव्हा तू येतो घरी
दुनियेचा सगळाच राग निघतो, माझ्यावरी का परी
मित्राच्या पत्नीवरीच मग का, असते फ़िदा ही स्वारी
पदरी ध्यान गजानना तू दिधले, आता निभावू कशी ॥
कामे आटपूनी कशी पसरते, राणी बिछान्यावरी
राजा येई घरी परतूनी, राणी असे फ़ोनवरी
थकलेल्या राजास जेवण मिळे, ते थंड बर्फ़ापरी
म्हणूनी त्या राजास नित्य वाटे, मित्राची पत्नी बरी ॥
गुरुवारी मज वाटते कधी हवी, स्वैपाकास सुटी
पण राजा म्हणतो सदैवच बरा, स्वैपाक तो घरगुती
फ़र्माईश करील तोच मजसी, कर तू घरी भाकरी
राजा हा असतोच मालक सदा, राणी करे नोकरी ॥
वाचूनी हे प्रश्न आज सगळे, कळले तया जीवनी
नव्हती ती जाणीव कशी मज परी, माझीच ती स्वामिनी
विसरुया मतभेद आज अपुले, कर घेऊनी हे करी
मिळूनी ही करु वाटचाल पुढची, बनूनी सखे सोबती ॥
अशा तऱ्हेने ५ जोड्या मिळाल्या. मग त्यांच्या धमाल फ़ेऱ्या…….. खूप मज्जा आली. असेच “जोडी तुझी माझी’ ही मुलांची स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा ही bachelors ची स्पर्धाही चांगल्याच दणाणल्या. शेवटी जबरदस्त दांडीया. अगदी लक्षात राहील सगळ्याच्या असा झाला हा सोहळा.
ह्यावर्षी भारतातून मराठी नाटक “सासू नंबर वन” हे तुफ़ान विनोदी नाटक इथे आणण्यात आम्ही यशस्वी झालो. नयनतारा, आशा साठे आणि नंदू गाडगीळ ह्या त्रयीनी मनमुराद हसवलं सगळ्यांना. पुढचे दोन दिवस ह्या कलाकारांचा आम्हा सगळ्याना सुरेख सहवास लाभला.
आता होता संपूर्ण वर्षाचा कळसाध्याय, आमचं वार्षिक स्नेहसंमेलन. अगदी कळस शोभावा असाच झाला हा कार्यक्रम. पुर्वार्धात सगळ्या कलाकारांचे विविध कार्यक्रम आणि उत्तरार्धात स्थानिक कलाकारांचं नाटक असा पूर्ण दिवसभराचा कार्यक्रम होता. कधीही न झालेला फ़ॅशन शो आणि “पाऊस” हा Audio-Visual कार्यक्रम विशेष आकर्षण होतं. “पाऊस ” हा आमचा जिव्हाळ्याचा विषय. मी आणि विवेकनी तयार केलेला हा आगळावेगळा प्रोग्रॅम सगळ्यांना मनापासून आवडला. निवेदन लिहिलं होतं मी आणि निवेदक होतो मी आणि विवेक.
काव्यात्मक निवेदन, गाणी, नृत्य अशा विविधतेनी नटलेल्या कार्यक्रमातून सगळ्या प्रेक्षकांना चिंब भिजवलं. सोबत स्क्रीनवर पावसाच्या कार्यक्रमाला साजेशा slides पण दाखवत होतो. सगळ्या लोकांना भावलेला वेगवेगळा पाऊस, त्याची निरनिराळी रुपं, विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट…… अगदी सगळं सगळं अनुभवलं प्रेक्षकांनी. The show was just SUPERB! खूप खूप समाधान मिळालं. ह्यात कितीतरी सभासदांची अख्खी कुटूंबं गुंतली होती. जवळपास ५० च्या वर लोंकांनी ह्यात भाग घेतला होता.
हा सुद्धा आयुष्यातला एक खूप आनंदी दिवस !
उत्तरार्ध पण खूपच रंगला. अल्काताईंनी अगदी प्रोफ़ेशनल नाटकासारखा सेट बनवला होता. अनिलभाऊ केतकर, प्रसन्न देवस्थळी, स्वाती मराठे, सुरेश मराठे, मीलन शहा, रमेश गाडगीळ, राधिका साडेकर ह्या मंडळींनी नुसती धमाल उडवली.
तर ही आमच्या महाराष्ट्र मंडळाची कहाणी साठाउत्तरी सुफ़ळ संपूर्ण
मी आणि “स्पर्श चांदण्याचे”
ऑगस्ट 21, 2006 at 9:35 सकाळी | In कुवेत, मराठी | Leave a Comment“गोडवा” ही आमची मोठी achievement होती पण विवेकची भरारी मात्र अजून ऊंच होती. त्यानी अजून सुरेख गाणी बनवली. त्याच्यातला खरा संगीतकार आता जागा व्हायला लागला होता.
वैशाली आणि विवेकची स्वप्नं छोटी नव्हती. त्यांनी अल्बमची निर्मिती करायचं ठरवलं. मग काय….. सगळी तयारी जोरात सुरु झाली. सगळ्यात आधी गाण्यांचं सिलेक्शन, मग कलाकारांचं, मग music arrangers…. distributers…….! सगळे प्रयत्न अतिशय उत्साहाचे. आमची मात्र उगाचच लुडबुड सुरु होती. ह्या अल्बममधे माझ्याही ३ गाण्यांची वर्णी लागली. ही जमेची बाजू होती पण जरी माझं एकसुद्धा गाणं नसतं ना तरीसुद्धा आपला मित्र असं काही भन्नाट करतोय ही कल्पनाच खूप सुखावह होती.
व्हिनससारखी मोठी कंपनी वितरण करायला तयार झाली. सुरेश वाडकर आणि पद्मजा फ़ेणाणी ह्या मोठ्या कलाकारांनी गायली ह्यातली गाणी. २१ मे २००५ ला मुंबईत शांताराम नांदगावकर ह्यांच्या हस्ते ही ध्वनीमुद्रिका प्रकाशित झाली.
Again a milestone in our life!!
कुवेतायन
ऑगस्ट 20, 2006 at 10:20 सकाळी | In कुवेत, मराठी | 7 Commentsकुवेतला आम्ही आलो २००१ मधे. सौदी मधला महाराष्ट्र मंडळाचा खूप चांगला अनुभव जमेस होता. त्यामुळे कुवेत मधलं वास्तव्य पण तसंच सुखकर होणार अशी खात्री होती आणि झालं सुद्धा तसंच. इथे महाराष्ट्र मंडळाव्यतिरिक्त बाकीही ग्रुप्स खूप छान मिळाले. तसंही तुमचं कुठेही रुजणं जसं तिथल्या मातीवर अवलंबून असतं, तसंच तुमच्या बीजावर पण अवलंबून असतं. मुख्य म्हणजे माणसं आवडणा-या लोकांना कुठेही पटकन रुळता येतं.
तर…. आम्ही इथे रुजलो, वाढलो आणि आता इथलेच झालो आहोत. जितकं भारतात रहायला आवडतं तितकंच इथेही खूप रमतो.
आपल्या देशातून दूर आल्यामुळे तसेही सगळेच नव्या नात्यांना शोधायला लागतात. आमचीसुद्धा अशीच कितीतरी नवी नाती रुजली आहेत अगदी जीवाभावाची. असंच एकदा गप्पागप्पात मायबोली नावाच्या संकेतस्थळाची ओळख झाली. मग काय….. एक खजिनाच सापडला. आखातात आल्यामुळे वाढलेली साहित्यिक आणि सांस्कृतिक भूक मिटवण्यात मायबोलीचा सिंहाचा वाटा आहे. कुठल्याही विषयाची असो…..सगळी माहीती इथे मिळाली. अजूनही हा प्रवास सुरुच आहे.
महाराष्ट्र मंडळात एकदा गाण्याचा कार्यक्रम करायचं ठरलं. “प्रेम” हा विषय निवडला गेला. हा कार्यक्रम माझ्या आयुष्यातला एक अतिशय महत्वाचा टप्पा म्हणता येईल. ह्या कार्यक्रमाने खूप काही दिलं. विवेक काजरेकरांनी हा कार्यक्रम बसवला होता आणि संकल्पना होती नेरुरकर ह्यांची. सगळ्या कार्यक्रमाची तयारी अगदी धडाक्यात सुरु होती. रोजचं एक रुटीन झालं होतं. संध्याकाळी ५ वाजले की सगळे रस्ते सालमियाकडे वळायचे. एक चांगला गुरु मिळाला की तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं. मलाही एक खूप चांगला गुरु मिळाला आणि तो म्हणजे विवेक. त्यानी गाणं कसं म्हणायचं हे तर शिकवलंच पण गाणं कसं खुलवावं ते ही शिकवलं.
कार्यक्रमाची सुरवात छाया आठवले ह्यांनी लिहिलेल्या गाण्याने करायची असं ठरलं. विवेकनी त्या गाण्याला अतिशय सुरेख चाल देऊन आपल्या संगीतकाराच्या कारकिर्दीला सुरवात केली. कार्यक्रम अतिशय सुरेख झाला सगळ्यांनी वाखाणला. हा कार्यक्रम झाल्यावर मात्र प्रचंड पोकळी निर्माण झाली. काहीतरी करायला हवं असं वाटायला लागलं. मायबोली लगेच तत्परतेनी धावून आली. मायबोलीवरच्या कवितांना चाली लावायचं विवेकनं सुरु केलं आणि मग ती गाणी तयार करायची असं ठरवलं. आम्ही तयारच होतो. मग प्रॅक्टीस सुरु झाली. होता होता गाण्यांना छानसं स्वरुप यायला लागलं. मग ती गाणी रेकॉर्ड करायचं ठरवलं. चाचपडत धडपडत पुढे जाताना काहीतरी नवीन शिकायला मिळत होतं. खरं तर तो इतका छान प्रवास होता ना. रणजीत, स्मिता कोतवाल, सुधीर जोशी, गुरु ,वैशाली आणि वैभव काजरेकर आणि आम्ही. नंतर वसुधा आणि विश्वास गोखले पण सामील झालेत. आता हळुहळु गाण्यांना आकार येत होता. पण रेकॉर्डींचं तंत्र काही जमत नव्हतं. मग भारतातून software आलं, नवीन प्रयोग सुरुच होते….. आणि finally गाण्याचं जे स्वरुप विवेकला अपेक्षित होतं ते जन्माला आलं. आम्ही सगळे इतके आनंदलो होतो ना…… तो आनंद शब्दात नाही व्यक्त करता येणार. मग काय….एकेक गाणं जन्मायला लागलं.
आमची ३-४ गाणी तयार झाली. एक दिवस अचानक अस्मादिकांना लिखाणाची स्फ़ूर्ती झाली आणि एका पाठोपाठ एक अशा ३ कविता उतरल्या. रात्री चक्क १.३० वाजता. अवीला झोपेतून उठवून दाखवल्या…..त्यांनी पण न कंटाळता अगदी मनापासून दाद दिली. अर्थात एक नवीन सुरवात म्हणूनही त्यांनी तसं म्हटलं असेल. सकाळी विवेकला दाखवल्यावर त्यालाही आवड्ल्या आणि त्यानी त्या मायबोलीवर टाकायला सांगितल्या. मायबोलीवर टाकल्यावर मला मिळालेला पहिला प्रतिसाद होता शमा चा. मायबोलीवरच्या एका अतिशय प्रतिभावान कवियित्रीचा. थोडं स्फुरण चढलं आणि मग एक दालनच उघडलं. काहीतरी नवीन प्रयत्न सुरु होता. मग विवेकनी कविता मीटरमधे कशी लिहायची ते शिकवलं. कवितेला जर मीटर असेल तर त्याला चाल देणं सोपं होऊ शकतं हे जेव्हा कळालं, तेव्हा आपण पण मीटरमधे लिहावं आणि आपल्या कवितेलासुद्धा विवेकनी चाल द्यावी असं वाटायला लागलं.
तो दिवस उजाडला हं! पावसावरच्या माझ्या कवितेला चाल देता येऊ शकते असं विवेक म्हणाला. चालीसाठी आवश्यक ते बदल करुन गाणं सजलं. मग रेकॉर्डींग सुरु झालं माझ्या आणि विवेकच्या आवाजात. माझ्या आयुष्यातल्या अनेक आनंदी दिवसांमधला हा एक दिवस होता.
असा सुरांसोबत सुरेख प्रवास सुरु होता…. त्यात इतकी छान वळणं आलीत ना…..! बरीचशी गाणी तयार झालीत. प्रत्येक नवीन गाण्याबरोबर काही तरी नवीन शिकायला मिळत होतं. त्याचबरोबर रेकॉर्डींगची quality ही सुधारत होती. नवीन software आलं…… विवेकनी नवा keyboard घेतला….. आणि मग एक वेगळं स्वरुप आलं गाण्यांना. रेकॉर्डींगची पद्धतही बदलली. नागपूरच्या प्रसन्न शेंबेकर आणि तुषार जोशी ह्यांच्याही कवितांची गाणी बनलीत आणि मग “गोडवा” ही CD बनली. ह्यात सुरेश भटांची पण दोन गाणी होती. विवेक, वैभव, मी आणि वसुधा…….आमचा आवाज आणि विवेक,जोशी ह्यांची arrangement.
ही एक अतिशय मोठी achievement होती आमच्या दृष्टीने.
दुसरा अध्याय
ऑगस्ट 19, 2006 at 11:24 सकाळी | In अशी मी, मराठी | Leave a Comment२२ एप्रिल १९८६. माझा २० वा वाढदिवस. आदल्या दिवशीच B.Sc. final ची परीक्षा संपली होती. म्हटलं आता मस्त मोकळा श्वास…… खूप मज्जा करायची. त्या दिवशी मज्जा केलीही पण दुसऱ्या दिवशी मात्र मी कायमची अडकली. चक्क संपूर्ण आयुष्यासाठी. जी हा…… मेरी शादी तय हो गयी
खरं सांगायचं तर सगळं इतक्या लवकर झालं ना, की मी ह्या गोष्टीचा seriously विचारसुद्धा केला नव्हता. म्हणजे स्वप्नात एक राजकुमार येतो……आणि मग तो मला घोड्यावर बसून घेऊन जातो….. अशी स्वप्नं पडायला सुरवात पण झाली नव्हती. पण हा पहिलाच (राज) कुमार मला भेटला आणि मग तोच माझा खराखुरा राजकुमार झाला. त्याच्या पहिल्या स्मितहास्याने मी पुरती घायाळ ! इतक्या गोड खळ्या पडतात ना माझ्या अवीच्या गालाला
!
माझ्या २०व्या वाढदिवशी माझं लग्न ठरलं. लग्न चक्क ७ महिन्यांनी झालं. ह्या ७ महिन्यांत माझं पुरं विश्वच बदललं. आम्हाला एकमेकांना समजून घ्यायला भरपूर वेळ मिळाला. माझ्या सगळ्या कलागुणांना अवीनी अगदी मनापासून जोपासलं. मग कॉलनीतलं मंडळ, त्यात निरनिराळ्या स्पर्धांचं आयोजन, नाटक, गाणं सुरुच राहिलं किंबहुना बहरलं. मुंबई दूरदर्शनवर सुद्धा संधी मिळाली. तिथे छोट्या छोट्या मुलाखती घेतल्या भगवान परब ह्यांच्या मार्गदर्शनाखाली. १२ वर्षांचं मुंबईतलं वास्तव्य खूप काही देऊन गेलं. आमच्या ह्या गोजिरवाण्या घरात दोन चिमणी पाखरं सुद्धा चिवचिवायला लागली. सुबक चौकोनी कुटूंब! खरी ऎश्चर्या होते मी.
सोपान चढता हे सुखाचे
आकाश मजला ठेंगणे
होतास तूची सोबतीला
नाही काही मज उणे
कुबेराचे गवसले धन
साथीने सखया तुझ्या
अमृताचा चषक ओठी
आज बघ रे माझिया
वादळी या यशपथावर
दीपस्तंभ होतास तू
अडखळे पाऊल जेव्हा
सावराया होतास तू
झोळी माझी तोकडी रे
सुमने सुखाची वेचण्या
चिंब झाले सुखसरींनी
आभाळ तू ये पेलण्या
मी जेव्हा अचानक लिहायला लागली तेव्हा माझं हे मनोगत मी शब्दबद्ध केलं. आता लग्नाला २० वर्ष झालीत. असं वाटतं की मी आणि अवी सोबतच मोठे झालोय. त्यामुळे काहीही enjoy करायचं झालं की मला तो लागतोच. इतक्या वर्षात खूपच सवय होऊन बसलीये. मग कधी कधी जेव्हा विचार करते ना त्याच्याबद्दल, तेव्हा आपसूकच शब्द बोलतात……
परीकथेतला राजकुमार
नसला तो जरी
घोड्यावर स्वार होऊन
आलाही नसला तरी
वाटतं त्याचं सारंच हवंहवंसं
त्याचा सहवास, त्याचा स्पर्श
देऊन जातं त्याचं प्रेम
एक आत्यंतिक हर्ष
त्याचं जवळ असणं
हेच असतं एक स्वर्गसुख
त्याचं भिनत जाणं नसानसातून
हे ही असतं अनोखं
त्याची साथ देते एक
अद्भूत उत्कट दाह
कधी ऊंची पर्वतशिखरं
तर कधी खोल खोल डोह
सारं काही विलक्षण त्याचं
असामान्य आहे तो
मला लाभलेलं अलौकिक
वरदान आहे तो
१९९८ मधे मुंबईला रामराम करुन सौदी अरेबियाला आलो. इथेही खूप मित्रमैत्रिणी मिळाल्या. ह्या संपत्तीला सोबत घेऊन २००० मधे कुवेतला आलो. आता कुवेतच आमचं घर बनलंय.
Jack of all
ऑगस्ट 16, 2006 at 8:59 सकाळी | In अशी मी, मराठी | 1 Commentआई स्पोर्ट्समन होती. खो-खो मधे कलर होल्डर होती. नागपूर युनिव्हर्सिटीच्या हॉकीच्या सिलेक्शन कमिटीत होती ती, मग लेकीनी काहीतरी खेळ खेळावा अशी तिची अपेक्षा चुकीची कशी असणार? मग अस्मादिकांनी टेबल-टेनिस खेळायला सुरवात केली. नागपूर डिस्ट्रीक्टचं प्रतिनिधित्व केलं.
आता बाबा. बाबांना गाणं खूप आवडायचं. मला सुद्धा. नागपूरच्या डॉ.चित्रा मोडकांकडे गाणं शिकायला सुरवात केली. खूप काही शिकायला मिळालं. मुख्य म्हणजे जेव्हा गुरु एक performing artist असतो तेव्हा गाणं कसं म्हणायचं ह्यापेक्षा आपलं गाणं श्रवणीय कसं होईल, दर्शनीय कसं होईल हे ही प्रात्यक्षिकासहीत कळतं. चित्राताई आकाशवाणीतल्या नाटकातून पण काम करायची. तिची रविवारची नाटकं ऐकल्यानंतर आकाशवाणीबद्दल काहीसं कुतूहल निर्माण झालं.
त्यावेळी नागपूरच्या आकाशवाणीवर लहान मुलांसाठी बाल-विहार नावाचा कार्यक्रम व्हायचा. अरविंद जागीरदार आणि अनुराधा जोशी सादर करायचे हा कार्यक्रम. तिथे माझी वर्णी लागली. तिथल्या छोट्या छोट्या नाटकांमधे कामं केलीत. गोविंद गोडबोले आणि अरविंदमामा, कुंदाताई(अनुराधा ताई) ह्यांच्यासोबत छान छान कार्यक्रम करायला मिळाले. आकाशवाणीचं attraction वाढतंच होतं. मग युवावाणी मधे यशपाल रामावत ह्यांच्यासोबत सुद्धा संधी मिळाली. युवावाणी मधे ७ दिवसांचा contract मिळायचा. म्हणजे सकाळी १० वाजता पासून तर ५.३० पर्यंत चक्क ऑफीससारखं आकाशवाणीमधे जायचं. युवावाणी हा कार्यक्रम रोज संध्याकाळी ५ ते ५.३० असायचा. मग संध्याकाळी ज्या topic वर कार्यक्रम असायचा त्यावर थोडी माहिती गोळा करायची, जी गाणी त्यावेळी लावायची असायची त्या गाण्यांची list बनवायची आणि आकाशवाणीच्या लायब्ररीत जायचं. तिथली लायब्ररी म्हणजे अक्षरश: एक खजिनाच होता. तिथे वेळ कसा जायचा कळायचंच नाही. कितीतरी महान कलाकारांच्या महान कलाकृती तिथे होत्या. तिथून मग आपल्याला हव्या असलेल्या रेकॉर्ड्स घेऊन यायचं. संध्याकाळाच्या कार्यक्रमाचं निवेदन लिहायचं. रामावत सरांकडून ते ओके करुन घ्यायचं. मग बरोबर ४.५० वाजता स्टुडियोत जायचं. ५ वाजता युवावाणी सुरु व्हायचं. सुरवातीचं मुझिक वाजल्यानंतर चक्क LIVE बोलायचं. It was so exciting! तेव्हापासून ते आजतागायत…. निवेदन करायला मनापासून आवडतं. तर असं माझं नातं होतं आकाशवाणीशी. अरविंदमामांना माझं आकाशवाणीचं वेड माहीत होतं. तेसुद्धा मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा स्टुडियोत न्यायचे. रेकॉर्डींग कसं होतं, ते कसं सुरु करायचं, गाणी कशी रेकॉर्ड होतात….. सगळं सगळं दाखवायचे. स्टुडीयोतलं वातावरण, तिथली शांतता, तिथला तो एक गंध……सगळं कसं exciting होतं. खूप रमायची मी तिथे.
एकदा मला आठवतं, मी मामाकडे बुलढाण्याला गेली होती दिवाळीत. अगदी ४-५ दिवस झाले असतील तिथे जाऊन. तेवढ्यात आईचा फोन आला की तुला नाटकाचा contract आलाय. तिकडली मज्जा अर्धवट सोडून मी लगेच परत आली होती. त्या नाटकात मी दुहेरी भूमिका केली होती. नाटक असंच छोटंसं होतं. पण माईकसमोर आपल्या आवाजापेक्षा वेगळ्या आवाजात बोलायचं हे खूप challenging होतं. शिवाय नाटकाची सुरवात मला थोडंसं गाणं येतं म्हणून अरविंदमामांनी माझ्या गाण्यानी करायची असं ठरवलं होतं. आता गाणं काय म्हणायचं……. मग मी भूपाली रागाचे आरोह, अवरोह, पकड असं सगळं म्हटलं होतं……. मागे तानपुऱ्याचे स्वर होते. आई गं………. किती छान दिवस होता तो! सगळं सगळं अगदी नीट आठवतंय आत्तासुद्धा.
एकदा असंच कुठलं तरी रेकॉर्डींग होतं आणि तेव्हाच कॉलेजमधे सकाळी भावगीत स्पर्धा होती. गॅदरींग सुरु होतं. नेहेमीप्रमाणेच माझी सगळीकडे लुडबुड सुरु होती. एकीकडे नाटकाची प्रॅक्टीस, एकीकडे ऑर्केस्ट्राची प्रॅक्टीस, टेबल-टेनिसच्या मॅचेस आणि त्यातच रेकॉर्डींगही. पण तो दिवसच इतका छान होता ना! आंतरमहाविद्यालयीन भावगीत स्पर्धेत मला दुसरं बक्षिस मिळालं. रेकॉर्डींगही पहिल्याच टेकमधे ओक होत गेलं. संध्याकाळी ऑर्केस्ट्रातली माझी गाणी पण मस्त झाली. दुसऱ्या दिवशी अजून काही surprises माझी वाट बघत होते. बक्षिस समारंभात मला भरपूर बक्षिसं मिळाली. टेबल-टेनिसमधे एकेरी मधे उपविजेती, mixed doubles मधे विजेती, Art exhibition मधे special prize, भावगीतात दुसरं, ऑर्केस्ट्रात पण special prize….. अशी सगळी बक्षिसं घेऊन मी जेव्हा घरी आली…… आई आणि बाबांच्या चेहेऱ्यावरचे ते कौतुकाचे भाव मी कधीच विसरु शकणार नाही. माझ्या आयुष्यात आलेल्या अनेक आनंदाच्या दिवसामधला तो एक दिवस होता.
Blog at WordPress.com. | Theme: Pool by Borja Fernandez.
Entries and comments feeds.


