कुवेतचा गणेशोत्सव २००६

सप्टेंबर 11, 2006 at 5:01 pm | In कुवेत, मराठी | 5 Comments

गणेशोत्सव २००६

श्रावण संपला आणि गणपतीच्या आगमनाचे वेध लागले.  दरवर्षीप्रमाणेच मंडळाच्या गणपतीचं छानसं आमंत्रण सुद्धा आलं.  मंडळाचा गणपती दिड दिवसाचा असतो.  ह्या गणपतीचं विसर्जन झालं की सगळा उत्सवच संपतो.  हे दोन दिवस जरी धामधूम असली तरी मग राहिलेले ८ दिवस फ़क्त टिव्हीवरचे गणपती बघून मनाचं समाधान करावं लागतं.  आमच्या घरी ह्या गणपतीच्या दहा दिवसात आम्ही विक एन्डला आमच्या सगळ्या दोस्त मंडळींना बोलावून मस्त भजनाचा कार्यक्रम करतो.  प्रत्येक वर्षी ह्या मित्रपरिवारात भरच पडत असते. खरं तर खूप मज्जा यायची ……पण ह्या सगळ्या लोकांना एकाच दिवशी बोलावणं थोडं कठीण होत होतं.  जागेचा प्रॉब्लेम ………. दुसरं काय! माझं जे ड्रीम हाऊस आहे ना, त्यात एक मस्त प्रशस्त देखणा हॉल आहे.  जेणेकरून आमच्या ह्या ज्या पूजा (आम्ही दर महिन्यात एकेकाकडे संकष्टी चतुर्थीची पूजा करतो), मैफ़िली (ह्याच्याबद्दल नंतर निवांत सांगेन) होतात ना……….. त्याच्यासाठी अजिबात अडचण व्हायला नको.  बाकी घराचा पण छानसा प्लॅन तयार आहे मनात, पण हॉल मात्र मस्त एल शेप मधे हवाय.  तर काय सांगत होते मी……..मधेच असं भरकटायला होतं जेव्हा मनातलं खूप काही सांगायचं असतं :) .  तर………. एकीकडे असा हा प्रॉब्लेम होता आणि दुसरीकडे मनापासून आपण आपल्या घरी गणपती बसवावा असं वाटत होतं.  शेवटी १० दिवसांचा गणपती घरी बसवायचं ठरलं.  इथे विसर्जनाला थोडा प्रॉब्लेम होतो म्हणून सुपारीची प्रतिष्ठापना करतात आणि त्याचंच विसर्जन करतात.  म्हणजे गणपतीची मूर्ती ठेवायची पण प्रतिष्ठापना सुपारीचीच करायची.

जेव्हा गणपती बसवायचा असं ठरलं तेव्हा मग आमचं प्लॅनिंग सुरु झालं.    आमच्या घरी गणपती देव्हाऱ्यातच बसवतात, पण आमचे देव आमच्या बेडरुममधे आहेत.  तिथे तर रोजच्या आरत्या शक्यच नव्हत्या. मग सगळ्या देवांनाच बाहेर आणायचं ठरलं.  हॉलमधे दिशा बघून जागा ठरवली.  आता डेकोरेशन………! आतापर्यंत मी फ़क्त एक दिवसाचं डेकोरेशन करायचे, भजनासाठी.  त्यामुळे ते बहुतेक फ़ुलांचंच असायचं.  पण आता हे डेकोरेशन १० दिवस राहणारं हवं होतं.  इथल्या मॉल्समधे फिरतांना मग एकेक वस्तू दिसायला लागल्या आणि मग डेकोरेशन मनातल्या मनात आकार घ्यायला लागलं……….. बरोबर तशी खरेदीही सुरु झाली. 

२४-२५ ऑगस्टच्या सुट्टीत मनासारखं डेकोरेशन झालं.  गणपती ज्या दिवशी बसणार होता त्या दिवशी अवीला सुट्टी नव्हती त्यामुळे ते ऑफिस मधून १२ वाजता येणार होते.  आदल्या दिवशी सगळी तयारी झाली.  मोदक, खिरापत, मिठाया, फळफळावळ, फुलं, दुर्वा……… सगळं सगळं साहित्य सजलं.  गणेश चतुर्थीचा दिवस उजाडला.  मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्या सुरुच होत्या, पण अवी मात्र सकाळी ऑफिसला गेले आणि माझी तयारी सुरु झाली.  दारासमोर रांगोळी, पूजेची मांडामांड, नैवेद्याची तयारी………! माझ्या ३-४ मैत्रिणीही येणार होत्या.  अवी येईपर्यंत सगळी तयारी झाली. अवी आल्यावर ते पण सोहळं, टोपी घालून तयार झाले.  मुलं, अवी, त्यांचे २-३ मित्र असे सगळे सुपारीचा गणपती घेऊन (लिफ्टमधून खाली जाऊन वर आले :) ) झांजा वगैरे वाजवत दाराशी आले.  मग मी त्या सगळ्यांच्या पायावर दूध घातलं आणि औक्षवण केलं.  वाजत गाजत गणरायाचं आगमन झालं. 

मग पूजा सुरु झाली. मी पूजा सांगत होते आणि अवी करत होते.  गणपतीची यथासांग पूजा झाली.  गणपती अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र, अष्टोत्तरशतनामावली झाली आणि मग आरती.  मनासारखी पूजा झाली.  मग संध्याकाळची आरती आटोपून मंडळाच्या पूजेला गेलो.  ह्यावर्षीचं डेकोरेशन म्हणजे वाळवंटाचा देखावा होता.  अतिशय सुरेख सजावट झाली होती. दीपक जुवेकरांच्या प्रशस्त घरात गणेशाची स्थापना केली होती.  हळूहळू गर्दी वाढायला लागली.  मग आरतीची वेळ झाली.  ढोलकी, तबला, झांजा यांच्या साथीनं जवळजवळ एक तास आरत्या झाल्या. सगळे अगदी तल्लीन झाले होते.  नंतर प्रसाद वाटपानंतर  आम्ही भजनी मंडळी उरलो.  रात्री चक्क ११.३० पर्यंत भजनाचा गजर सुरु होता.  कीबोर्ड, पेटी, तबला ह्यांच्या साथीनं सगळेजण भक्तीरसात न्हाऊन निघालो. अतिशय तृप्त होऊन घरी आलो. 

हा झाला पहिला दिवस.  दुसऱ्या दिवशीपासून हे रोज ऑफ़िसमधे जायच्या आधी पूजा आटोपून घ्यायचे.  दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दिवकरांकडे जायचं होतं आरतीला.  तिथे पण मज्जा आली.  आम्ही भजनं म्हटली.  छाया आणि तिच्या लेकीनी दोन देवांची जुगलबंदी असलेलं एक मजेशीर भजन म्हटलं.  बाकी आम्ही होतोच जोडीला.  मस्त पोटभर प्रसाद खाऊन आलो :) .

गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी गणेशाच्याच आशीर्वादाने माझ्या हातून एक गणेश वंदना उतरली.

श्री गणेश वंदना

गजानना तुज वंदन करीतो
भरुनी अंजली सुमनांची
आशीर्वच दे अम्हा मोरया
चरणी प्रार्थना ही अमुची ॥

लडीवाळ हे रुप गोजिरे
प्रसन्न भासे सदा साजिरे
माता अंबा दृष्ट काढिते
सदैव अपुल्या पुत्राची
आशीर्वच दे अम्हा मोरया
चरणी प्रार्थना ही अमुची ॥

अपार लीला तुझ्या गणेशा
सवे रंगसी रिद्धी सिद्धीच्या
नाथ गणांचा तूच शोभतो
चिंता वाही जगताची
आशीर्वच दे अम्हा मोरया
चरणी प्रार्थना ही अमुची ॥

वरद विनायक, करुणागारा
सारी विघ्ने नेसी विलया
सिंदूरवदना, मयूरेश्वरा
करीसी दैना दु:खांची
आशीर्वच दे अम्हा मोरया
चरणी प्रार्थना ही अमुची ॥

पार्वतीनंदन, हे जगवंदन
तिन्ही लोकीचा त्राता भगवन
भवसागर हा तरण्या देवा
नाव हाक तू भक्तांची
आशीर्वच दे अम्हा मोरया
चरणी प्रार्थना ही अमुची ॥

२८.७.२००६

पुढचे चार दिवस आमच्या घरी धमाल होती. ४०-४० लोकांचे ग्रुप होते रोज.  थोडं भजन, मग अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र, अष्टोत्तरशतनामावली आणि मग ढोलकी, झांजांच्या सोबत आरत्या.  रोज कोणीतरी ढोलकी वाजवायला असायचाच.  विवेक, वैद्य, भाटीया……. धम्माल यायची. दारापुढे वेगवेगळ्य़ा प्रकारच्या रांगोळ्या, रोज वेगवेगळा प्रसाद……!  ह्यावर्षी चक्क २३० मोदक केलेत. 

रोज वेगवेगळा मेनू होता.  पहिल्या दिवशी, पाव भाजी, दाल वडा आणि मोहन थाळ. दुसऱ्या दिवशी रगडा पॅटीस, कचोरी आणि गुलाबजाम, तिसऱ्या दिवशी पुरी भाजी, खांडवी आणि रसगुल्ले, चवथ्या दिवशी छोले पुरी, ढोकळा आणि रसमलाई.

नंतरचे ३ दिवस पुन्हा आम्हाला मैत्रिणींकडे जायचं होतं.  एक दिवस स्मिता कडे, मग खनकेंकडे आणि वैद्य.  विसर्जनाच्या दिवशी उत्तरपूजा झाली.  मोकळी डाळ, काकडी, मोदक, खिरापत, ड्राय फ़्रूट्‌स आणि समोसे.  शेवटची आरती पण दणक्यात झाली.  प्रसाद वगैरे खाणं झाल्यावर समुद्रावर सगळे जण विसर्जनाला गेलो.  मस्त भरती होती. निवांतपणे विसर्जन झालं.  येतांना मात्र फ़ारच उदास वाटत होतं.  इतके दिवस घरी आवडता पाहुणा होता.  बाप्पा गेल्यानंतर हॉलचा तो कोपरा फ़ारच केविलवाणा वाटतोय.  पण ‘पुढच्या वर्षी येणार आहे ना पुन्हा आमचा गणराया’ ह्याच आशेवर रोजचं रुटीन पुन्हा सुरु झालं.

5 प्रतिक्रिया »

RSS feed for comments on this post. TrackBack URI

  1. छान मजा आली वर्णन वाचायला. खरं तर तुम्ही इथल्या मंडळींपेक्षाही अधिक समरसतेने तिथे सगळे उत्सव साजरे करता. :-)

  2. saadhi, suTasuTit aNi sundar banavalayaas tu blog aNi nehamipramaaNe oghawat lihalyas!!!! ho paN kavita, photo aNI recipie sathii jaagaa thevaLiyas naa? te hi yeu det. good work keep it up.

  3. चांगलं लिहीलं आहेस.. पण एक सांग, घरी गणपती बसवलास ना? मग दुसर्‍यांकडे जाताना घर बंद करुन गेलीस? आपल्याकडे घर बंद करत नाहीत गणपती घरात असताना..

    हे आपलं सहज जाणवलं म्हणून..

    मिलिंद

  4. पुण्यात गणेशोत्सवाने आता कायदा व सुव्यव्स्थेचा प्रश्न निर्माण केला आहे.गणपती नुस्ता नावाला!
    चैन पाहिजे आम्हाला!
    पण तुमचा गण्पती उत्सव ही तुमची भावनिक गरज आहे
    वाचुन आनन्द झाला.जुने दिवस आठ्वले.गौरीची रांगोळीची पावल. घरगुती आरास.प्रसाद असच लिहित रहा

  5. मी स्वत: काही भाविक नाही पण आपले वर्णन वाचून मजा आली. लोकमान्यांनी ज्या कारणासाठी सार्वजनिक उत्सवाची स्थापना केली होती त्याला आज बाजारू स्वरुप प्राप्त झाले आहे;पण परदेशात आपल्या सारख्या मंडळींना एकत्र येण्यासाठी असा काही तरी उपक्रम हवाच .आपण तो अत्यंत भक्तिभावाने आणि दणक्यात साजरा केलात हे वाचून कौतुक वाटते.
    काही म्हणा माणूस हा घोळका करून राहणारा प्राणी आहे हेच खरे.असेच उत्सव साजरे करुन जमल्यास सचित्र सादरीकरण केल्यास आमच्यासारख्या दुरस्थ लोकांना देखिल त्यात प्रत्यक्ष सामील झाल्यासारखे वाटेल.
    जाता जाता दोन चूका: ‘सोहळं’ च्या ऐवजी ‘सोवळं’ आणि ‘औक्षवण’ च्या ऐवजी ‘औक्षण’ असे असायला हवे असे वाटते.(‘असे वाटते’ एव्हढ्यासाठी की कदाचित हे शब्द आपल्या नागपुरी बोली भाषेत असेच वापरत असावेत.चू.भू.द्या.घ्या.)


यावर आपले मत नोंदवा

XHTML: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <pre> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>

Blog at WordPress.com. | Theme: Pool by Borja Fernandez.
Entries and comments feeds.