ओढ
ऑक्टोबर 19, 2006 at 8:07 सकाळी | In मनातलं...!, मराठी | 4 Commentsनिसर्गाच्या चक्राचं मला नेहेमीच कुतूहल वाटत आलंय. रोज सूर्य उगवतो, रोज चंद्र उगवतो. न चुकता ऋतूचक्र सुद्धा अखंड सुरु असतं. पण रोजची सकाळ कधीच सारखी नसते. प्रत्येक सकाळ वेगळीच उगवते. कदाचित आपल्या मनाची जी अवस्था असते त्याप्रमाणे आपल्याला ती तशी भासत असेल ! पण प्रत्येक दिवस, प्रत्येक रात्र आपलं वेगळंच रुप दाखवते. एकदा सकाळी समुद्रातून सूर्य उगवताना बघून एक मजेशीर कल्पना आली डोक्यात…..!
ओढ
गहि-या पाण्यात उतरलेली
आकाशाची निळाई
वाटत असेल का सागराला
नित्य त्याची नव्हाळी…..
उगवतीच्या सूर्याचा रक्तिमा
झेपत असेल का पहाटेला
दवात भिजलेली ओलेती प्रतिक्षा
असेल का सुखावत त्या भास्कराला
रजनीच्या कुशीतलं चंद्राचं खट्याळ हसू
ढगातून हळूच डोकावताना
आणत असेल का तश्शीच शिरशिरी…..
असंख्य आतूर तारकांना
पावसाच्या आगमनानी रुजलेलं
धरतीचं हिरवं गर्भारपण…..
स्विकारुन पितृत्व त्याचं
मोहरत असेल का तो बावरा नीलघन
अनामिक ओढ….. त्या सागरातली,
जीवघेणी प्रतिक्षा त्या पहाटेची,
तारकांचा शहारा, अन मोहर ढगातला,
शिकवतो रीत मनाला, प्रीत पुन्हा जगण्याची.
जयश्री
छकुलीचं पुढचं पाऊल
ऑक्टोबर 12, 2006 at 10:56 pm | In छकुलीच्या कविता, मराठी | 1 Commentआपल्याला उगाचंच वाटतं की मुलं लहान आहेत. अहो, आजकालची पिढी फ़ार लवकर सज्ञान होते. आमच्या पिढीतल्या लोकांना इतका संघर्ष नव्हता. पण ह्या पिढीला मात्र जबरदस्त competition ला सामोरं जायचंय. त्यांना साधारण राहून अजिबात चालणार नाहीये. They have to be above average. They have to excell. आता इतकं tension असल्यावर मुलांना भविष्याची काळजी असणारच. आता काय करायचं……? हा गोंधळ त्यांच्या डोक्यात नक्कीच तयार होत असणार आणि त्याचं उत्तर सुद्धा ते आपापल्या परीनं शोधत असणार. ही अदितीची आणखी एक कविता……
Destiny
On my shoulders
Lay a heavy load
Holding me back
From my chosen road
But in a dream
I looked to the sky
Smiled, as I watched
A bird flying by
For that was my journey
The bird was me
Flying in search
Of my destiny.
Aditi
कलिका
ऑक्टोबर 11, 2006 at 1:36 pm | In मनातलं...!, मराठी | 3 Commentsएक छोटीशी कलिका
एका गेंदेदार शाखेवर अचानक उमलली
तिला पाहून शाखा मनोमन हरखली
इतकं गोजिरवाणं शिल्पं बघून ते तरु,
स्वत:वरच जाम खूष झालं
जीवापाड जपणं, कुरवाळत कुरवाळत गोंजारणं
मग आपसूकच सुरु झालं.
कलिका मात्र यातून अनभिज्ञ.
प्रात:काळचा सूर्य रोज काहीतरी नवीन घेऊन यायचा
काही न बोलता खूपसं सांगून जायचा.
जाता जाता त्या चंदामामाला बजावून जायचा
तोही आपल्या किरणांची सावली अलगद तिच्यावर पांघरायचा.
कलिका हळुहळु बाहेर डोकवायला लागली
आपली हिरवीगार पानं मागं सोडून आकाश बघायला लागली
सूर्य आता जरा जास्तच रेंगाळायला लागला
जाताना जरा चिंतित होऊ लागला
कलिका आता बहरु लागली होती
नकळत गाणी गुणगुणू लागली होती
कुठूनसा तो एक भ्रमर वाट चुकून आला
आणि मग स्वत:लाच हरवून बसला
काही काही सुचेना,
मनाचं मागणं कळेना
कलिकेची एक लकेर चुकवून गेली त्याच्या काळजाचा ठोका
राहू लागला तो मग मुका मुका
फुलून आलेली कलिका आता झाली होती परिपूर्ण
भ्रमराला म्हणाली, ‘तू केलेस माझे जीवन अर्थपूर्ण !’
दोघांना सवे डोलतांना बघून सूर्य ही हसला
आणि चंदामामाच्या निळ्या आकाशात आणखीन एक तारा फुलला.
बालपण देगा देवा……
ऑक्टोबर 6, 2006 at 4:04 pm | In अशी मी, मराठी | 10 Comments“वयाची चाळीशी आली आता…….. आता तरी थोडी गंभीर हो गं…………. सारखं काय ते खिदळणं! जरा मोठ्या लोकांसारखं वागायला शीक…..! ” इति माझी आई
पण माझं आपलं शेपूट वाकडं ते वाकडंच. आता नाही वागता येत पोक्तासारखं……… नाही सारखं गंभीर चेहेरा करुन बसता येत…….. काय करु? असतो एकेकाचा manufacturing defect! जे काय मनात चाललंय ते सगळं येतं आपोआप चेहे-यावर ओसंडून वहात…….काय करु? छोट्या छोट्या गोष्टीत खूप खूप आनंद मिळतो. पौर्णिमेचा चंद्र, रात्रीचा छानसा झुळझुळणारा वारा, पतीराजांचा चांगला मूड, मुलांच्या लहान सहान achievements…….. कुठलंही कारण पुरतं excite व्हायला! येवढंच काय तर टिव्हीवरच्या मुलांनी सारेगमप मधे म्हटलेलं एखादं गाणं सुद्धा मूड एकदम मस्त बनवतो.
खरं सांगायचं तर, सगळ्यांच्याच मनात एक लहान मूल दडलेलं असतं. पण जस्तीत जास्त लोक त्या मुलाला दमदाटी करून गपचूप बसवतात आणि मग चेहे-यावर आपोआपच गंभीर आणि पोक्त भाव येतो. मला तरी अजून तसं जमत नाही बुवा.
आज असंच अचानक लहान व्हावंसं वाटलं आणि चक्क झाले सुद्धा! माझ्या राज्यातल्या गमती जमती ऐकायच्या आहेत………….? मग चला माझ्यासोबत माझ्या राज्यात…….
माझ्या राज्यात
नको गं उठवू आई
रंगलेय मी स्वप्नात
मी आहे राणी
माझ्या छोट्याशा राज्यात
आईस्क्रिमची नदी
अन चॉकलेटची नाव
पेपरमिंटचे डोंगर
अन बिस्किटांचा गाव
नाही इथे शाळा
अन No Homework
फक्त आहे मज्जा
And no more work
दिवसभर खेळ फक्त
दिवसभर धम्माल
आम्हाला रागवायची
नाही कुणाची मजाल
रात्र होताच मात्र
संपली सारी खुषी
दुसरे काही नको आता
हवी तुझी कुशी
आई……… तुझी आठवण येतेय गं
Blog at WordPress.com. | Theme: Pool by Borja Fernandez.
Entries and comments feeds.


