नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

डिसेंबर 29, 2006 at 10:49 सकाळी | In अशी मी, मराठी | 4 Comments

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!, originally uploaded by Jayashree Ambaskar.

ह्या वर्षीची सुरवात तरुणाईनं करुया :)

नवरस – ऐकणार का?

डिसेंबर 25, 2006 at 11:49 सकाळी | In कुवेत, मराठी | 7 Comments

आमच्या महाराष्ट्र मंडळाचं वार्षिक संमेलन २२ तारखेला अगदी धूमधडाक्यात पार पडलं.  मस्तपैकी भरगच्च कार्यक्रम होता.  सकाळी ९ पासून तर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत.  पूर्ण दिवसभर नुसती धम्माल.

ह्यावर्षी कार्यक्रमाची थीम होती ‘नवरस’.  त्यामुळे खूप वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होणार हे जाणवले होते.  लेकीची बारावी असल्यामुळे ठरवलं होतं की ह्यावर्षी काही कशात भाग घ्यायचा नाही.  मुलगा (अद्वैत) मात्र भाग घेणार होता.  पण म्हणतात ना…… काही लोक शांत बसूच शकत नाहीत.  तसंच आहे आमचं.  कोणी ‘कार्यक्रम करणार नाही का ह्या वर्षी’ असं विचारलं की नाही म्हणायला अगदी जीवावर यायचं.  मी का काम करणार नाहीये हे त्यांना सांगतांना ते त्यांना पटवण्यापेक्षा मी मला स्वत:लाच जास्त पटवत होते.  तिकडून आईची पण तंबी होतीच…… तुझं पुरे झालं कौतुक…………आता जरा लेकीकडे लक्ष दे.  सगळं सगळं कळत होतं …पण वळत काही नव्हतं.  तगमग सुरु होती अगदी. 

एक दिवस अदिती जुवेकर (आमच्या मंडळाची सेक्रेटरी) चा फ़ोन आला.  म्हणाली ‘तू निवेदन करणार का ?’ होऽऽऽऽऽऽऽऽ करेन की’ असे अगदी ओठांवर आलेले शब्द महत्प्रयासानं आतच ठेवून तिला म्हटलं’ ए नाही गं जमणार मला’ ……. ‘ए, मग निवेदन लिहून तरी देशील का?’ …….हं……..हे जमू शकेल………. म्हणजे एकदा का निवेदन लिहून झालं की मग काही काम नाही.  तिला लग्गेच होकार दिला.  एकीकडे नवरस पण मनात चुळबूळ करत होते.  मग घेतलाच कागद हातात आणि जे काय मनात होतं….. ते उतरवलं.  काहीही लिखाण ……मग ते काव्य असो की गद्य ते कुणाला तरी दाखवल्याशिवाय चैन कसं पडणार?  ह्यांना माझ्या  मनात काही तरी चाललंय हे कळलं होतं आणि ते सगळं बाहेर आल्याशिवाय मी मोकळी होणार नव्हते हे ही  त्यांनी जाणलं होतं.  शेवटी ते म्हणाले…… कर……. तुला जे काय करायचंय ते कर.

लहान मूल कसं आवडीची गोष्ट करायला मिळाली की हरखतं……..अगदी तस्सं झालं मला.  प्रत्येक रसावर काहीतरी लिहित गेली.  २-३ रस झाल्यावर विवेकला दाखवलं आणि मनातली कल्पना पण बोलली.  त्याला पण ती कल्पना आवडली.  मग हळूच म्हटलं….. ए, तू कंपोझ करशील?  खरं तर मंडळात अध्यक्ष असल्यामुळे तो फ़ारच बिझी होता…… पण संगीत हा त्याचा स्ट्रॉंग वीक पॉईंट.  म्हणून तो ही लगेच तयार झाला.  आमच्या कुवेत मधली एक जबरदस्त कलाकार म्हणजे प्रेरणा वलीवडेकर.  जयपूर घराण्यातून नृत्य शिकलेली.  तिच्यावर भिस्त टाकली.  म्हटलं…. आम्ही गाणं करतोय नवरसावर……..तू ते कोरीओग्राफ़ करशील का…….. ती सुद्धा लग्गेच तयार झाली. मग काय…….. अजून स्फ़ुरण चढलं. माझी सगळी कविता तयार झाली.   चाल देण्याच्या दृष्टीने जे काय बदल करायचे होते ते होऊन विवेकनं त्याला संगीतबद्ध केलं.  आणि जेव्हा ते आम्ही ऐकलं तेव्हा त्या गाण्याच्या प्रेमातच पडलो.

प्रत्येक रसावर  २-२ कडवी लिहिली होती.  खरं म्हणजे प्रत्येक रस हा संगीतातून वेगळा दाखवायचा म्हणजे एक मोठं चॅलेंज होतं.  फ़क्त ८ ओळींमधून तो रस व्यक्त करायचा म्हणजे सोपं नव्हतं.  पण विवेकनं ते सहज शक्य करुन दाखवलं.  एकीकडे नृत्याची सुद्धा प्रॅक्टीस सुरु झाली.  खरं तर प्रेरणा भारतातून परत बरीच उशीरा आली होती त्यामुळे फ़ारच कमी वेळ होता.  पण निलिमा दिवेकर आणि तिची लेक मृदुल ह्या पण कथ्थकच्या नृत्यांगना सोबत असल्यामुळे तिचा भार थोडा हलका झाला.  ह्या तिघींच्या मनापासून केलेल्या प्रयत्नातून एक सुरेख नृत्याविष्कार जन्मला.  माझ्या बाकीच्या पण मैत्रिणींनी त्यांना मनापासून साथ दिली. सुनीता जोशी, सुषमा श्रावगे, छाया आठवले, मंजू काळे, सुनिता झोडे आणि अद्‌भूत रसामधे शर्वरी पंडीत, रिचा राजगोलेकर, नियती देशमुख आणि उत्कर्षा कुळकर्णी ह्या चिमुरड्‌यानी या नृत्याला इतकं सुरेख साकारलं ना……! 

जेव्हा ह्या सगळ्या नर्तिका स्टेजवर आल्या ना (कथ्थकला साजेसे, लेमन रंगाचे आणि सोबत हिरवी ओढणी)  ……..तेव्हाच टाळ्या मिळाल्या.  एकेक रस साकारत होता…….सगळे त्या रसांमधे न्हाऊन निघत होते.  टाळ्यांच्या कडकडाटानेच नृत्य संपलं.  लोकांच्या खास आग्रहास्तव सगळ्या नर्तिकांना पुन्हा स्टेजवर बोलावल्या गेलं.  माझ्या आयुष्यातला आणखी एक अत्यंत समाधानाचा, आनंदाचा क्षण !

गाणं संगीतबद्ध केलं होतं विवेकनं………आणि गायलं होतं विवेक आणि मी  :)
गाण्याचे शब्द असे होते.

शृंगार रस
शृंगार मी प्रेमी जीवांचा
मीत हृदयी रुजवतो
स्पंदनातून इश्क पसरुन
मीलनी मी बरसतो

स्वप्नील मी, मदहोश मी
लाज-या प्रीतीत मी
प्रणयाची साक्ष मी अन्‌
चांदव्यातील आग मी

भयानक रस
उरी धडधड जागते अन्‌
कापते का ही तनू
प्राण का कंठास येतो
बोबडी वळते जणू

अस्तित्व माझे हे असूरी
जागवी भय अंतरी
उडे गाळण ही भल्यांची
दृष्टी टाकीन मी जरी

हास्य रस
तुषार माझे उडती जेथे
सुहास्य तेथे खळाळते
चैतन्याचे अल्लड वारे
मनी मानसी सळसळते

भेदभाव ना कोणासाठी
राजा रंका मी न वेगळा
दु:खाला तो नाही थारा
आनंदाचा सर्व सोहळा

बीभत्स रस
ओंगळवाणे रुप लाभले
बघुनी मला जन शहारती
नको वाटते दर्शन माझे
टाळून मज परी ते जाती

घृणाच सारी माझ्या पदरी
एकांताची साथ मला
तिरस्कार मी सदा झेलतो
बीभत्स म्हणती सर्व मला

करुण रस
नजर ओली, उरी हुंदका
मनात देवाचा धावा
दोन जीवांची विरही तगमग
तिथेच माझा जन्म नवा

दु:खाशी मी जरी जखडलो
मृत्यूशी झुंजतो सदा
कारुण्याचा सागर मी जरी
डोळे पुसतो मीच पुन्हा

वीर रस
शस्त्र शोभते माझ्या हाती
मीच शायरी वीरांची
रक्त उसळते,पेटून उठते
ऐकूनी गाथा शौर्याची

शूर शिपाई माझे साथी
नाही जागा दुबळ्याला
नको म्यान अन्‌ नको विसावा
रक्त हवे तलवारीला

अद्‌भूत रस
स्वप्नी रमविते, स्वप्नी नेते
बाग फुलविते स्वप्नी मी
झिम्मा खेळत सवे प-यांच्या
गीत गोजिरे गाते मी

जादू, राक्षस, भूत, चेटकी
दुनिया माझी ही न्यारी
भूल पाडते, चटक लाविते
या जगती मी राज्य करी

रौद्र रस
गुलाम माझी सारी दुनिया
सैतानाचा साथी मी
हाहाकार मी उडवून देतो
दिसेल ते ते तुडवून मी

आगमनाची नांदी माझ्या
देई दर्शन भयकारी
समोर येईल त्याला चिरडून
तांडव करितो उरावरी

शांत रस
अवनीवरचा दूत शांतीचा
आश्रय देतो सकल जना
हारुन दु:खे जगताची मी
सांत्वन देतो श्रांत मना

ओंकाराचे संजीवन मी
भक्तीरसाचा मी दाता
पखरण करतो वात्सल्याची
तिन्ही जगाचा मी त्राता

हे आमचे नवरस तुम्हाला ऐकताही येतील इथे …….

नवरस

माझ्या शब्दांना जे मूर्त स्वरुप तुम्ही दिलंत ना……… त्यासाठी तहे दिल से शुक्रिया दोस्तो :)
 

रुजवू मराठी, फ़ुलवू मराठी

डिसेंबर 25, 2006 at 10:45 सकाळी | In कुवेत, मराठी | 2 Comments

काही काही गोष्टी अगदी वेळ ठरवून केल्यासारख्या होतात.  नाहीतर आमच्या कुवेतच्या महाराष्ट्र मंडळाचं अस्मिता गीत अचानक कसं काय जन्माला आलं असतं!

आमच्या महाराष्ट्र मंडळाच्या गणेशोत्सवात, पूजेनंतर एक छोटासा भजनाचा कार्यक्रम झाला.  भैरवीनंतर भजनाचा कार्यक्रम संपला…… सगळी वाद्यं आवरता आवरता विवेक सहज बोलला…. “आपल्या मंडळाचं गाणं तयार करायला हवं म्हणजे कुठलाही कार्यक्रम संपल्यानंतर ते राष्ट्रगीतासारखं वाजवता येईल” सगळ्यांना अगदी मनापासून ते पटलं.  तेव्हा सुरुची मला बोलली, जयश्री, “तू लिही ना गं”. खरं म्हणजे हेच बीज होतं.

गणपतीचे दिवस होते ते.  एकदा का डोक्यात किडा वळवळायला लागला की जे काय डोक्यात चाललंय ते कागदावर उतरवल्याशिवाय चैन पडत नाही.  मी एक छोटीशी महाराष्ट्राच्या गौरवाची एक कविता केली.  त्यात मराठी बाणा, शिवाजीचं शौर्य, जिजाऊची कूस…… असे शब्द  घेऊन एक टिपीकल महाराष्ट्र गीत लिहिलं.  नेहेमीप्रमाणे विवेकला ते दाखवलं.  पण त्याला काही ते फ़ारसं पटलं नाही.  तो म्हणाला,” हे असं नेहेमीचं नको गं ………काहीतरी वेगळं हवं.  आपण आपल्या देशापासून इतके दूर आलो आहोत आणि तरीही मराठी टिकवण्यासाठी आपण जी धडपड करतो आहोत……..ती येऊ दे कवितेतून.  आपलं जे घोषवाक्य आहे “रुजवू मराठी, फ़ुलवू मराठी” तीच पंच लाईन घे ना”

मग लक्षात आलं…… की हे काही फ़क्त महाराष्ट्र गीत नाहीये……तर परदेशी गेलेल्या आपल्यासारख्या लोकांच्या मनातल्या आपल्या मराठी भाषेचं प्रेम आहे…….आणि ते तसंच शब्दातून उतरायला हवं.  मग पुढच्या २ दिवसात हे सगळे भाव कवितेत उतरवून कविता विवेकला दाखवली.  त्याला ती मनापासून आवडली.  एकदा विवेकला कुठलीही कविता आवडली की त्याचं गाणं झालंच म्हणून समजायचं :) .

आणि मग असं तयार झालं आमचं अस्मिता गीत गणपती बाप्पाच्याच आशीर्वादानं.  अर्थात हा दर्जा आम्हाला मिळाला आमच्या वार्षिक संमेलनात.  सगळ्यांना खूप आवडलं.  विवेकच्या आणि माझ्या आवाजातलं हे गाणं ऐकता येईल इथे

 रुजवू मराठी, फ़ुलवू मराठी

हर दिलाची एक बोली
मी मराठी, मी मराठी
रुजवू मराठी, फ़ुलवू मराठी

या कुवेती वाळवंटी, रुजवू हिरवळ ही मराठी
आसमंती गर्द काळ्या, चांदणे फ़ुलवू मराठी
रुजवू मराठी, फ़ुलवू मराठी

सोडूनी आलो जरी प्रिय मातृभूमी आपुली
दूरदेशी तरीही आपण, जगवूया अपुली मराठी
रुजवू मराठी, फ़ुलवू मराठी

उच्च अपुल्या संस्कृतीचा, वारसा देऊ मुलांना
मिरवूया बाणा मराठी, घडवूया हे मन मराठी
रुजवू मराठी, फ़ुलवू मराठी

घे भरारी उंच नभी तू, बघ नवी स्वप्ने परी
विसरु नको तू रक्त अपुले, हे मराठी हे मराठी
रुजवू मराठी, फ़ुलवू मराठी

लीन होऊन आज वंदू, मायभूमी आपुली
पांग फ़ेडू याच जन्मी, जिंकवू अपुली मराठी
रुजवू मराठी, फ़ुलवू मराठी

बचके रहना रे बाबा……

डिसेंबर 17, 2006 at 1:14 pm | In मनातलं...!, मराठी | 2 Comments

ती आणि तो आधी एका बेसावध क्षणी भेटतात…. प्रेमात पडतात…… सगळं कसं स्व्प्नवत !  एखाद्या परीकथेसारखं !

नातं तुझं माझं

ह्या नात्याची मग कितीतरी रुपं आयुष्याला रंगीबेरंगी करतात.  तिचं आणि त्याचं द्वंद्व असंही….

तू आणि मी

हळुहळु एकमेकांशिवाय रहाणं अशक्य झाल्यावर आणि घरच्यांना कुण्कुण लागल्यावर सुरु होतात लग्नाची बोलणी.  मिया बिबी राजी असल्यावर अडथळा कोण करणार?   शुभमंगल तर अगदी साग्रसंगीत, धूमधडाक्यात पार पडतं. नव्याची नवलाई दोघांही जीवांना सुखावते.  सुरवातीला सगळं लई गोऽऽऽड वाटतं. 

पण नंतर, एकमेकांचे खरे रंग दिसायला लागतात. तिचा आधी वाटत असलेला मुखचंद्रमा आता रणचंडीकेचा अवतार वाटायला लागतो.   आधी शहारुख सारखा दिसणारा तो आता चक्क अमरीश पुरी दिसायला लागतो.  तिचा गोऽऽऽड आवाज चक्क कर्कश्श वाटायला लागतो ….. तर त्याचा  matured शांतपणा पण irritating वाटायला लागतो.   प्रत्येक सिच्युएशनला एकमेकांवर कुरघोडी करायचा प्रयत्न सुरु होतो  आणि मग त्यावेळी जो बाजी मारेल तो बनतो राजा ………. नाहीतर त्याचा वाजतो बाजा !!!

आता द्वंद्व त्याच दोघांचं सुरु होतं पण अगदी वेगळं….!! ह्यात “तो” ला काही बोलायलाच जागा नसते.  आता दोन्ही बाजूंनी फ़क्त तीच बोलत असते.   आणि या एकतर्फ़ी संभाषण कौशल्याचा अतिशय नेटका वापर करुन ती त्याला अगदी बिच्चारा करते.  त्यांच्या ह्या so called सुखी आयुष्याची किल्ली काय …….. असं जेव्हा लोक विचारतात…….. अहो लोक म्हणजे ज्या बायकांना हे अजूनपर्यंत जमलं नाहीये त्या बायका हं…… तेव्हा “ती” त्या तमाम बायकांना आपुलकीचा सल्ला देते….

मना सज्जना रोज उशीरा उठावे
येता परी जाग लोळत रहावे
बकाल्यात नव-या पिटाळा दुधाला
फ़र्मान सोडा चहाचे तयाला

पितांना चहा जीभ सोडावी सैल
दहादा म्हणावे नव-यास बैल
सदा सर्वदा त्यावरी खेकसावे
गुलामा कधी तोंड उघडू न द्यावे

पगारास त्याच्या हिसकून घ्यावे
थोडेच पैसे खर्चास द्यावे
दुस-याच दिवशी यादी करावी
तयाची त्वरेने खरेदी करावी

घरी पोचता तू खरेदी करूनी
बघावी खरेदी फिरुनी फिरुनी
शेजारच्या त्या हॉटेऽल मधूनी
मागवावे जेवण फ़ोनवरुनी

हे सगळं केल्यामुळे तिचा संसार कसा अगदी सुरळीत चाललाय.

कसा नेटका आज संसार माझा
कसा साजिरा तो पतीदेव माझा
म्हणूनी सदा पूजिते मी वडाला
मिळू दे पती हाच सावित्रीला ह्या.

मग काय………. ह्या तिच्या सल्ल्यामुळे तिच्या शहीद झालेल्या नव-याला अजून बरेच साथीदार मिळतात :)

बचके रहना रे बाबा……बचके रहना रे……….!!

Blog at WordPress.com. | Theme: Pool by Borja Fernandez.
Entries and comments feeds.