विश्वास……. लेकीचा !

जानेवारी 31, 2007 at 2:32 pm | In छकुलीच्या कविता, मराठी | 1 Comment

कवितांमधून उलगडत जाणारी अदिती अनुभवायला मला खूप आवडतं.   तिचे विचार, मतं एका त्रयस्थाच्या भूमिकेतून वाचायला मजा वाटते.  मनात आलेले सगळे विचार असे शब्दामधे बांधलेले वाचताना खरंच छान वाटतं.  ही तिची आणखी एक कविता……….

BELIEF

When your heart is left in sorrow
And you look for happiness to borrow,
Somewhere you want to go
But your heart says ‘No’….
You try to deliver a smile
But find…it is away by a thousand miles.
To a friend you want to talk
But on her gate, you find a lock.
You feel like crying
But your tears are also drying.
You have nothing to do
And you even feel the cool breeze like a loo….
If this situation brews,
Don’t do something new…..
Just believe in yourself and in God,
For flowers do bloom through the dried up pods.

 Aditi

हमारा बजाज…..!

जानेवारी 30, 2007 at 7:35 सकाळी | In मराठी, माझी थोडीशी मुंबई | 4 Comments

तब्बल वर्षभर लोकलचा प्रवास केल्यानंतर मला चेंबूरलाच जॉब मिळाला तेव्हा मात्र आधीच्या चौकोनी प्रवासाऐवजी माझा प्रवास अगदी सरळ रेषेत व्हायला लागला.  तसा तो ही प्रवास  Adventurous होता….पण लोकांसाठी !  कारण मी माझ्या चेतकवर स्वार होऊन जायचे.  चेतक प्रवास पण खूप Enjoy केला.  एकतर geared two wheelers चं लायसेन्स मिळालं होतं आणि माझी हक्काची चेतक !

एकदा अशीच गंमत झाली.  मी भरपूर भाज्या,  किराणासामान वगैरे घेऊन चेतकवर स्वार होऊन घरी यायला निघाले होते.  घरी जाताना आर.सी.एफ़ चं पोलीस स्टेशन लागायचं.  आता लायसन्स असल्यामुळे मी मस्तपैकी बिनधास्त चालवायची.  आमच्या वासी नाक्याचा ट्रॅफ़िक इतका खतरनाक असायचा ना की लोक म्हणतात जो वासी नाक्याला गाडी चालवू शकतो तो जगात कुठेही गाडी चालवू शकेल.  तर अशा  त्या खतरा गर्दीतून मी छानपैकी चेतकने मार्ग काढत होते.  तेवढ्यात बस-स्टॉपवर मला माझी एक मैत्रिण भेटली.  मी एकदम स्टाईलमधे गाडी थांबवून तिला लिफ़्ट दिली.  खरं म्हणजे माझ्या जवळ इतकं सामान होतं ना……. लेकिन impression मारनेका कोई भी chance छोडनेका नही ना….!  थोडी सर्कसच करत आम्ही निघालो. 

मला नेहेमी वाटायचं की एकदातरी ट्रॅफ़िक हवालदारानी मला लायसन्स बद्दल विचारावं आणि मग मी झोकात त्याला लायसन्स दाखवून त्याच्या चेहेर्‍यावरची मजा बघावी.  आणि त्या दिवशी नेमका तो क्षण आला…. पण विचित्र तर्‍हेने!  आमची सर्कस पोलीस स्टेशन पार करुन पुढे निघाली.  मला मागून पोलीसच्या शिट्टीचा आवाज आला.  पण मला ती शिट्टी माझ्यासाठी असेल असं काही वाटलं नाही.  म्हणून मी आपली आपल्याच धुंदीत.  तसंही सामान, मी, माझी मैत्रिण, चेतक हे सगळं सांभाळत जायचं म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती !!  और अपुन जब गड्डी चलाता है ना……. तो एकदम स्टाईल मे…..क्या…..!!

मी ऐकत नाही हे पाहून त्या पोलीसालाही जोर चढला.  पण स्कूटरच्या मागे धावता येईना म्हणून त्याने चक्क एका माणसाची लिफ़्ट घेतली आणि माझ्या मागे आला शिट्ट्या वाजवत.  हे सगळं माझ्या मागे घडत असल्यामुळे मला ह्याची काहीच कल्पना नव्हती.  मी आपल्याच नादात…! शेवटी त्यांनी मला ओव्हरटेक करुन माझी गाडी थांबवली……..तेव्हा मला कळलं की हा सगळा खटाटोप अस्मादिकांसाठी आहे. 

अखेर तो क्षण आला…….!   पण तोपर्यंत त्या पोलीसाला इतक्या जोरजोरात शिट्ट्या वाजवताना बघून गर्दी जमा झाली होती.  मला थांबवल्यावर माझी मैत्रिण जाम घाबरली.  मी पण थोडीशी गांगरलेच होते.   पण जेव्हा त्याने मला लायसन्स विचारलं तेव्हा मी मनातल्या मनात excite झाले …..अहो ह्याच साठी केला होता अट्टाहास…..  :)    तरी हे साधं साधं विचारणं झालं नव्हतं ना……. जरा जास्तच गाजावाजा झाला होता.  लायसन्स  तर होतंच .   पण  मनातला आनंद मनातच   ठेवून   वरुन   मात्र   एकदम   cooool    भाव   दाखवत   म्हटलं………. “बाऽऽऽऽस…….इतकंच………….हे घ्या !”  त्याला जरा आश्चर्यच वाटलं…….. जरा जास्तच निरखून सगळ्या तारखा बघितल्यावर त्याला कळलं की सगळं काही ठीक ठाक आहे.  मग तो जरा वरमला.  पण सगळ्या लोकांसमोर त्याची फ़जिती झाली म्हणून तो नाही म्हटलं तरी थोडा खट्टू झाला.     माझ्यातली सहृदयता लगेच जागी झाली. मनात म्हटलं………. आपली इच्छा अगदी वाजत गाजत पूर्ण झाली…….. आणि ज्यानी पूर्ण केली त्याला कशाला नाराज करा……… म्हणून त्याला म्हणाले,” सॉरी हं…..मला कळलंच नाही की तुम्ही मला थांबवता आहात.  I am really sorry! ” मी असं म्हटल्यानंतर कुठे त्याला जरा बरं वाटलं.  मग तो पण……. “जरा लक्ष ठेवून गाडी चालवत जा मॅडम” असं म्हणून निघाला. 

इतकं सगळं रामायण घडल्यामुळे त्या दिवसापासून मला कोणीच कधीसुद्धा अडवलं नाही.  मी आणि माझी चेतक अगदी दिमाखात प्रवास करायचो.  त्यानंतर सुद्धा २-३ वेगवेगळे टू व्हीलर्स चालवले….चक्क मोटरसायकलसुद्धा! लेकिन मेरी चेतक की बात कुछ और ही थी !

बुलंद भारत की बुलंद तसवीर………हमारा बजाज……हमारी चेतक….  :)

संमोहनातून मन:शक्ती

जानेवारी 28, 2007 at 5:24 pm | In कुवेत, मराठी | 1 Comment

काल आमच्या महाराष्ट्र मंडळात एक अतिशय सुरेख कार्यक्रम झाला…. अगदी खिळवून ठेवणारा !  डॉ. प्रविण देवस्थळी ह्यांचं “संमोहनातून मन:शक्ती” ह्या विषयावर Lecture cum demonstration झालं.

संमोहन…… Hypnotism ह्याबद्दल फ़ारच कुतूहल होतं.  खरंच असं करता येत असेल का…..कोणावर करता येतं…….. किती वेळात करता येतं…….. त्याचा उपयोग कसा करता येतो…….अशा लोकांच्या मनात असलेल्या कितीतरी प्रश्नांची त्यांनी अगदी सुरेख उकल केली.  

बघता   बघता   स्टेजवर   बोलावलेल्या    आणि   श्रोत्यांमधल्या   लोकांना    त्यांनी   hypnotise केलं.  संमोहनात असलेल्या लोकांकडून त्यांनी कितीतरी गोष्टी करुन घेतल्या ज्या सामान्य माणूस करुच शकणार नाही.  आम्ही सगळे साक्ष होतो ह्या गोष्टीला.   त्यांनी माझ्या मैत्रिणीच्याच मुलाला संमोहनात तीन खुर्च्या जोडून त्यावर झोपवलं.  मग हळूच मधली खुर्ची काढून घेतली.  हे सगळं करत असताना ते त्याच्याशी सतत बोलत होते.   मग ते त्याला म्हणाले,” आता तुझं शरीर एकदम कडक झालंय.  त्यावर कितीही वजन ठेवलं तरी तू ते पेलू शकणार आहेस” असं म्हणून ते चक्क त्याच्या पोटावर बसले…….पाय हलवत ! आणि तरीसुद्धा हा अगदी निर्विकार……इतकं वजन त्याने सहज पेललं…….!

 नंतर    एकाला    त्यांनी    सांगितलं   की   आता   मी तुला ऍनास्थेशिया देतोय…… तुझा हात बधीर झालाय…. आणि त्याच्या हातात त्यांनी सुई खुपसली……. पण त्याच्या चेहेर्‍यावरची रेषही हलली नाही.

एकाला त्यांनी सांगितलं,” तू आता जंगलात गेला आहेस आणि तुझ्यासमोर ० ते ९ असे आकडे दिसताहेत.  त्यातला ६ हा आकडा हळूहळू दूर जातोय……..आणि आता तू तो विसरला आहेस….” त्यानंतर त्यांनी त्याला पाढे म्हणायला सांगितले, बेरीज वजाबाकी करायला सांगितली…… पण जिथे जिथे ६ हा नंबर येत होता….तिथे तिथे तो गप्प होता…… बाकी सगळ्या बेरजा, वजाबाक्या तो अगदी पटकन आणि व्यवस्थित करत होता.  नंतर पुन्हा त्याच्याशी बोलताना ते म्हणाले,” आता तो दूर गेलेला नंबर ६ तुझ्या हळुहळु जवळ येतोय…… आता तो पुन्हा तुला तो आठवणार आहे”  आणि नंतर चक्क त्याने अगदी normally सगळं counting केलं.  It was just amzing!!

 नंतर त्याला सांगितलं की तू Airport वर आहेस आणि सगळे अनोळखी लोक तुझ्या आजुबाजूला आहेत.  तुला कोणी हात लावला तर तू बोलायचं नाहीस आणि तिसर्‍यांदा कोणी हात लावला तर त्याच्या थोबाडीत मारायची.   जेव्हा त्याचे वडील त्याच्याजवळ आले आणि त्यांनी त्याला हात लावला……..तेव्हा त्याची नजर अगदी निर्विकार होती.   त्यांनी जेव्हा त्याला तिसर्‍यांदा हात लावला तेव्हा त्याने वडीलांना चक्क मारलं…….. !!

हे सगळं अगदी थक्क होऊन आम्ही बघत होतो….अनुभवत होतो.   संमोहनातून काय काय करता येतं हे सगळं बघून आम्ही तर literally zapped झालो.   ह्याच संमोहनाचा कितीतरी चांगल्या प्रकारे वापर करता येऊ शकतो ह्याची पण त्यांनी उदाहरणं दिलीत.  बरेच किस्से सांगितले.   खरंच एका वेगळ्याच विश्वाचा त्यांनी आम्हाला परिचय करुन दिला.   महाराष्ट्र मंडळाने इतक्या सुरेख कार्यक्रमाचा योग घडवून आणला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार !!

माझं पिल्लु….. !!

जानेवारी 27, 2007 at 12:39 pm | In अशी मी, मराठी | 10 Comments

माझं पिल्लु….. !!, originally uploaded by Jayashree Ambaskar.

माझं पिल्लु आज ११ वर्षाचं झालंय.   असं वाटतंय ही अकरा वर्ष किती पटकन गेली…..!  आत्ता आत्ता  रांगायला  लागलेला   माझा   अद्वैत   आता  माझ्या चक्क  खांद्याएवढा झालाय.   बोबडं बोलणारा ……      आता     शाळेत   भाषण   वगैरे   द्यायला   लागलाय.     पप्पासोबत   लुटुपुटूचं क्रिकेट खेळणारा….. आता चक्क लेग स्पीनर झालाय.  “मला Computer वर थोडा वेळ बसू दे ना…..” असा हट्ट   करणारा…… आता आम्हाला computer मधे काही प्रॉब्लेम आला तर अगदी  सहजपणे problem  solve करतो.    लहानपणी आम्हाला त्याच्या खेळण्यांच्या कर्कश्श आवाजाने irritate करणारा……. आता चक्क आमच्या गाण्याला आपल्या keyboard ने सुरेल साथ करतो.  आम्ही गाणं बरोबर बीटवर सुरु केलं नाही तर रागावतो. 

खरंच किती पटकन मोठी होतात ना मुलं……! मला अजूनही माझ्या आईचे शब्द जसेच्या तसे आठवतात.    मी   जेव्हा  नोकरी   करायचे   तेव्हा   माझी मोठी मुलगी २ वर्षाची होती.  आई म्हणायची, ” अगं,  नोकरी काय कधीही करु शकशील पण मुलांचं लहानपण परत परत नाही येत गं!”  तेव्हा नोकरीची जरा जास्तच हौस होती म्हणून तिच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं.  पण आता मात्र जाणवतंय ते.  अद्वैतच्या वेळी मात्र तो २ वर्षाचा झाल्यानंतर आम्ही सौदीला गेलो त्यामुळे मला नोकरी सोडावीच लागली.  पण त्यामुळे त्याचं लहानपण अगदी मनसोक्त अनुभवता आलं.  त्याचं ते दोन खळ्यातलं पहिलं हसू,   त्याने टाकलेलं पहिलं पाऊल, त्याने उच्चारलेला पहिला शब्द….. तो सुद्धा “आई” होता हं :)    त्याच्या शाळेतल्या पहिल्या दिवसाची कावरी बावरी नजर,  त्याला जेव्हा त्याची सायकल चालवता आली, त्यावेळचा त्याच्या चेहेर्‍यावरचा आनंद,  त्याचं पहिलं बक्षीस,  त्याचा Graduation Ceremony…….! त्याच्या achievements……….सगळं सगळं मनापासून enjoy केलं.   

आता असं वाटतं…… त्याचं लहानपण संपूच नये.  त्याचं सारखं मागे मागे करणं,  छोट्या छोट्या गोष्टीतली त्याला लागणारी मदत,   शाळेतून आल्याबरोबर…..  “आई, ऐक ना माझं आधी” अशी त्याची भूणभूण.  आई-पप्पा रागावल्यावर त्यांचा राग जाण्यासाठी त्याने लिहिलेलं ” Oh Papa Bear…….” हे पत्रं…… अभ्यासाचं नाहीतर झोपेचं कारण सांगून आईच्याच हाताने जेवण……. झोपायच्या आधी लागणारी गोष्ट  (ती मात्र अजूनही पप्पाच सांगतात हं  ) ) …….असंच कितीतरी……!  असं वाटतं……. हे असंच चालू रहावं.   नकोच ते मोठेपण……!  ही निरागसता अशीच रहावी. 

 असं प्रत्येक आईलाच वाटत असावं…..! मी पण त्यातलीच.  पण जसं जसं आपलं बाळ मोठं होतं….त्याचं कर्तृत्व बघून…… आनंदच होत असतो.  तो आपला लेक आहे ह्याचा अभिमानही वाटत असतो.  म्हणजे दोन्हीकडे win-win situation !!

अव्दैत, तू माझा मुलगा आहेस….ह्याचा मला खूप खूप अभिमान आहे…….! तुला ११ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

गणतंत्र दिवस तेव्हा…….. आणि आता कुवेतमधे !!

जानेवारी 26, 2007 at 8:08 सकाळी | In कुवेत, मराठी | 1 Comment

तिरंगा

२६ जानेवारी असो किंवा १५ ऑगस्ट असो……. आम्ही शक्यतोवर फ़्लॅग होस्टींग कधीच चुकवत नाही.  आपल्या देशाचा ध्वज असा आपल्या डोळ्यासमोर उंच जात असतांना बघणं……… एक वेगळाच अनुभव असतो. 

शाळेत असताना पासूनच २६ जानेवारीचं विशेष आकर्षण असायचं.  कारण आमच्या शाळेत २६ जानेवारीला संध्याकाळी फ़ार सुरेख कार्यक्रम असायचा.  तर्‍हेतर्‍हेच्या कसरती बॅंडच्या वेगवेगळ्या सुरावटींवर केल्या जायच्या…..आणि अती हौस असल्यामुळे आमचा बर्‍याचशा कार्यक्रमात अगदी महत्वाचा सहभाग असायचा.  सकाळचं ध्वजारोहण आटॊपलं की घरी गेल्यावर पुन्हा एकदा युनिफ़ॉर्म ला कडक प्रेस आणि शूजला चकाचक पॉलीश करायचं……..सोबत अजूनही तयारी असायची वेगवेगळ्या कार्यक्रमाची.  सुरवातीला पाहुण्यांचं स्वागत,  त्यात सहभाग  मग ते आटोपलं की धावत पळत आपापल्या मार्चिंग ट्रुप्स मधे उभं रहायचं.  त्यात ७-८ ग्रुप्स असायचे.  त्यातल्या एका ग्रुपची मी असायची लीडर :)   ध्वजासमोर आलं की……….”परेड…..दहिने देख…..” असं म्हटत एक कडक सॅल्युट ठोकायचा.  इतकं मस्त वाटायचं ना. 

मग वेगवेगळ्या कवायती सुरु व्हायच्या.  आमच्या शाळेत काळे आणि होरे सर होते.  ते दोघेही जवळ जवळ महिनाभरापासून सगळी प्रॅक्टीस घ्यायचे.  त्यात रिंग, जिमनास्टिक, लेझिम, डंबेल्स, वेताचा मलखांब, काचेच्या बाटल्यांवरचा मलखांब, लोकनृत्य, जळत्या रिंगवरच्या कसरती… आणि शेवटी असायचं टॉर्चेस मार्च.  शेवटी सगळ्या शाळॆच्या गाजलेल्या खेळाडूंना बक्षिसं वाटली जायची.  आपलं नाव उचारलं गेलं की मस्त धावत धावत स्टेजवर जायचं आणि प्रमुख पाहुण्यांकडून गळ्यात एक सुरेख पदक घालून घ्यायचं…….. तिकडे आई -बाबा पण कौतुकाने बघत असायचे……….!!  इतका सुरेख व्हायचा ना कार्यक्रम.  तेव्हापासूनच २६ जानेवारीचं आकर्षण असायचं.

कॉलेजमधेसुद्धा आम्ही नेहेमी जायचो.  अर्थात राष्ट्रगीत म्हणायला आम्ही असायचोच स्टेजवर :)   मग लग्न झाल्यावर मुंबईला गेलो तेव्हाही आमच्या एच.पी कॉलनीतसुद्धा सुरेख व्हायचा सोहळा.  तिथे ध्वजारोहणानंतर छानसा मनोरंजनाचा कार्यक्रम सुद्धा व्हायचा.  त्यात देशभक्तीची गाणी, नृत्य वगैरे बसवायचो आम्ही.  ती पण मजा वेगळीच असायची.

आता इथे कुवेतला सुद्धा आम्ही Indian Embassy त जातो Flag Hosting ला.  एका परक्या देशात आपला ध्वज आकाशात फ़डकताना बघताना ऊर अक्षरश: भरुन येतो………प्रत्येक वेळी.  राष्ट्रगीत म्हणताना तर शेवटी माझ्या डोळ्यात पाणीच येतं……. अगदी आतून उचंबळून येतं.  त्यानंतर  इथले Ambassdor भाषण देतात, मग राष्ट्रपतींचं  भाषण सुद्धा वाचून दाखवतात आणि त्यानंतर इथल्या १०-१५ भारतीय शाळांमधली मुलं देशभक्तीपर गीतं गातात.  नंतर बॅंड्च्या कवायती होतात आणि मग सगळ्यांना अल्पोपहार मिळतो.  त्यातही विविधता आपल्या देशाप्रमाणे.

आम्ही तर मस्त मोठ्ठी बस करुन जातो सगळे जण.  जाताना येताना मस्तपैकी देशभक्तीची गाणी गात गात.  मुलांना पण त्यामुळे ह्या दोन दिवसांचं आकर्षण वाटायला लागलंय.  माझी लेक तिच्या शाळेच्या गाण्याच्या ग्रुपमधे असल्यामुळे सुद्धा ह्या कार्यक्रमाबद्दल जास्त उत्सुकता असायची.  प्रत्येक शाळेचं काहीतरी वैशिष्ट्य असतं.  कोणी रंगीत फ़ुगे सोडतात……कोणी सुरेख जुगलबंदी सादर करतात….. नवीन नवीन प्रकार…..!

ह्यावर्षी मात्र जाता आलं नाही…म्हणून फ़ार हळहळ वाटतेय….. :(   पण आमच्या महाराष्ट्र मंडळानी संध्याकाळी एक मस्त कार्यक्रम आयोजीत केलाय….. त्यामुळे थोडी सल नक्कीच कमी झालीये. 

सगळ्यांना गणतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

भारतमाता की जय……….!!!

Next Page »

Blog at WordPress.com. | Theme: Pool by Borja Fernandez.
Entries and comments feeds.