चलो एक बार फ़िरसे…..
नोव्हेंबर 26, 2007 at 2:08 pm | In अशी मी, मराठी | 6 Comments
चलो एक बार फ़िरसे अजनबी बन जाए हम दोनो….!
किती रोमॅंटिक कल्पना आहे ना….! आपलं प्रेमाचं माणूस….. गुंतलेली मनं….. हे सगळं अनोळखी करुन पुन्हा सगळं अनुभवायचं….! पुन्हा तीच हुरहुर, तीच ओढ, तशीच आतुरता….! किती मज्जा येईल ना….!
एकदा नातं मुरलं की त्याचे कितीतरी कंगोरे दिसायला लागतात, जाणवायला लागतात. काही कंगोरे असतात टोकदार तर काही मखमली ! काही हवेहवेसे तर काही खुपणारे….! पण हे सगळं explore करायला किती मज्जा येते ना…! एकदा आपलं म्हटल्यावर त्याचं सगळं आपलंच ! त्याचं प्रेम, त्याचा लोभ….. त्याचा राग, त्याचा क्षोभ …..! सब कुछ सर आखो पर
पण पुन्हा अजनबी बनायचं म्हटलं तर…. तो नवा…. आणि मी सुद्धा त्याला नवीच ! नव्याची नव्हाळी पुन्हा उपभोगायची…!! नवी ओळख असतानाची ती एकमेकाला खुष करण्याची धडपड…. तो दूर असताना त्याला लिहिलेली ती गुलाबी लेटरहेडवरची पत्रं, ते पांढ-या लिलीचे मिसिंग यू कार्ड्स….ते स्वत:शीच हसणं, उगाच लाजणं….. त्याच्यासाठी तयार होणं….. तो येणार हे कळल्यावर खुललेला चेहरा….. मग होणारी आत-बाहेर…. तो येऊ शकणार नाही म्हटल्यावर सा-या जगाचा येणारा राग…….ती धुसफ़ूस….! सारं काही पुन्हा……….!
आज आमच्या लग्नाचा एकविसावा वाढदिवस….! हे इतके दिवस असे एकमेकांना जाणून घेण्यातच भुर्रकन उडाले. इतके दिवस एकमेकांना जाणून घ्यायला खरं तर पुरेसे….! तरीही कधीतरी एक आगळाच तो समोर असतो…. जणू वेगळाच कुणीतरी….! अशा ह्या ओळखीच्या अनोळखी “त्या”ची सखी होणं…. खूप खूप सुखावून जातं. त्याचं हे नवेपण मीच जपायचं असतं, सांभाळायचं असतं आणि कधी कधी शोधायचं सुद्धा असतं. तो सुद्धा तेच करत असतो
असूनही जुनाच तू ….
वाटतो नवा नवा
खेळ हा जुना परी
डाव तो नवा नवा
मीत तूच अंतरी
प्रीत रे जुनीच ही
जीतही जुनीच ती
रीत ही नवी नवी
Blog at WordPress.com. | Theme: Pool by Borja Fernandez.
Entries and comments feeds.



