नाच गं घुमा…!!
जानेवारी 3, 2008 at 5:03 pm | In नुकतंच वाचलेलं, मराठी | 3 CommentsTags: मराठी
“नाच गं घुमा” हे अतिशय सार्थ नाव आहे माधवी देसाईंच्या आत्मचरित्राचं ! मला अगदी मनापासून आवडलेलं पुस्तक.
“स्वामी” आणि “राधेय” वाचल्यानंतर रणजित देसाई ह्यांच्याबद्दल फ़ार कुतूहल निर्माण झालं होतं. त्या वयात ते सगळं लिखाण आणिकच आवडलं होतं आणि खरोखरच त्यातले सारे प्रसंग अक्षरश: डोळ्यापुढे उभे राहिले होते. तर अशा ह्या लेखकाची सहचारिणी कशी असेल….किंवा त्यांचा संसार कसा असेल….. ह्याची कल्पना केवळ कल्पनाच राहते. माधवीताईंचं लिखाण खरं मानायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण फ़ार पोटतिडीकीनं लिहिलंय त्यांनी येवढं मात्र नक्कीच जाणवतं. भालजी पेंढारकरांची लेक तसं म्हटलं तर भाग्याची म्हणायला हवी पण…….!!
एकाकी असतांना किंवा गरज असताना पुरुष स्वत:च्या सोयीनुसार कुणाला अगदी डॊक्यावर चढवतो, प्रेम (की प्रेमाचं नाटक) करतो, तिला भावनिक आधार मानतो, creativity मानतो आणि ती जर डॊईजड झाली तर तिच्यावरचं सगळं प्रेम विसरतो…..? इतक्या पटकन हे प्रेम ओसरतं…….? की ते प्रेम नसतंच नुसता दिखावा असतो. कारण तुम्ही जर इतकं मनापासून प्रेम करता त्या स्त्री वर, तर इतका दुस्वास कसा करु शकता तिचा जिच्यावर एकेकाळी इतकं मनोभावे, जीव तोडून प्रेम केलं होतं…!! इतके उत्कट प्रेमप्रसंग लिखाणातून साकारणारा कलावंत ख-या आयुष्यात इतका कठोर होऊ शकतो?
असे कितीतरी प्रश्न तुमच्या समोर येतात. त्याची उत्तरं मिळत नाही त्यामुळे पुस्तक संपल्यावर फ़ार हुरहुर वाटते. पुस्तकाचं शिर्षक अतिशय समर्पक आहे. एका स्त्री च्या दृष्टीने पुस्तक जेव्हा वाचतो तेव्हा स्त्री-पुरुष असा दुजाभाव करणा-या समाजाबद्दलची चीड मात्र नक्कीच येते.
Blog at WordPress.com. | Theme: Pool by Borja Fernandez.
Entries and comments feeds.


