“सारे तुझ्यात आहे”…..३
एप्रिल 2, 2008 at 8:06 सकाळी | In मराठी, सारे तुझ्यात आहे | 2 Commentsशेवटी मी ६ जानेवारीला कुवेतहून डोळ्यात खूप सारी स्वप्नं आणि प्रचंड कुतूहल घेऊन निघाले. माझ्या आयुष्यातल्या एका सुरेल प्रवासाला निघाले होते. ७ ला सकाळी पोचले. आता माझा मुक्काम होता माझ्या नणंदेकडे…..चेंबूरला. माझ्या ह्या प्रोजेक्ट मधे माझी नणंद अर्चना आणि तिचा नवरा प्रकाश माझ्याइतकेच उत्सुक होते. कारण सगळ्यांसाठीच हा एक वेगळाच अनुभव असणार होता.
थोडा आराम केला…… अभिजीतचा फ़ोन आलाच. ८ पासून स्टुडिओ बुक केला होता. आम्ही ८ आणि ९ तारखेला सगळे ट्रॅक्स तयार करणार होतो. प्रशांतने सगळी अगदी चोख तयारी करुन ठेवली होती. ७ ला रात्री माझी पण तयारी सुरु होती. माझा डिजीटल कॅमेरा आणि व्हिडिओ कॅमेरा दोन्ही चार्ज करुन ठेवलेत. पूजेसाठी नारळ, हार, पेढे…… !! सकाळी साडे दहाला स्टुडिओत पोचायचं होतं. मी नणंदेच्या सासूबाईंना नमस्कार करुन, त्यांचे आशीर्वाद घेऊन सकाळी साडे आठला निघाले. आभिजीतकडे ९ ला पोचले. तिकडून सरळ पार्ला…..बझ-इन !
छातीत धडधड होत होती…..कसा असेल स्टुडिओ….. कसं करत असतील काम….. एकीकडे खूप खूप आनंद आणि तितकीच उत्सुकता. ११ वाजेपर्यंत सगळे जमले. सगळ्यात पहिले प्रशांत आपले दोन कीबोर्ड्स घेऊन आला. त्याच्या पाठोपाठ अभिजीत नार्वेकर, विजय शिवलकर आणि भीमराव मोहिते ही ताल वाद्यांमधली दादा मंडळी आपापली आयुधं घेऊन पोचलीत. सगळ्यांशी ओळख झाली. पहिल्याच भेटीत सगळे मनापासून आवडलेत. आत गेल्यावर भेटले रेकॉर्डीस्ट सत्यजीत चिखले. त्यांनीही छान स्वागत केलं सगळ्यांचं. ह्या सगळ्या लोकांमधे फ़क्त मीच नवखी होते. फ़क्त अभिजीत ओळखीचा होता आणि प्रशांतशी ऑर्कुटवर जी काय थोडीफ़ार ओळख होती तीच. पण ह्या सगळ्या कलाकारांनी मला अजिबातच नवखेपणा जाणवू दिला नाही.
आल्या-आल्याच माझे शब्द त्यांना खूप आवडले आणि चालीही छान आहेत हे त्यांनी अगदी मनापासून सांगितलं त्यामुळे माझी भीड जरा कमी झाली. तशी मी बडबडीच म्हणायला हवी. कोणाशीही मी मस्तपैकी गप्पा हाणू शकते. पण इथे ही मंडळी फ़ारच वेगळी होती. पण फ़ार फ़ार तर १५-२० मिनिटांचंच होतं हे अवघडलेपण. मग मस्तपैकी हा हा-ही ही ….. खिदळणं सुरु झालं.
विजय शिवलकरांनी नारळ फ़ोडून मुहूर्त केला. मग पूजा करुन, सगळ्यांना पेढे वाटले. सुरवात तर गोड झाली

Blog at WordPress.com. | Theme: Pool by Borja Fernandez.
Entries and comments feeds.


