“सारे तुझ्यात आहे”…..५

एप्रिल 3, 2008 at 2:50 pm | In मराठी, सारे तुझ्यात आहे | 3 Comments

आदल्या दिवशी मी माझे दोन्ही कॅमेरे तिथेच ठेवून गेले होते कारण दुस-या दिवशी पुन्हा सकाळीच यायचं होतं.  ती माझी मोठ्ठी चूक होती हे दुस-या दिवशी कळलं.  दुस-या दिवशी सगळ्यात पहिले प्रसिद्ध संतूर वादक पं. उल्हास बापट येणार होते.  म्हणून आम्ही जरा लवकरच निघालो.  त्या दिवशी नेमका ट्रॅफिक जॅम.  आम्ही साडे नऊच्या ऐवजी ११ ला पोचलो.  तोपर्यंत उल्हासजींचं बरचंसं रेकॉर्डींग आटोपलं होतं.  आम्हाला जेमतेम १५-२० मिनिट त्यांचं वाजवणं बघायला मिळालं.  इतकी चिडचिड झाली ना…..! मधे थोडा वेळ ब्रेक झाला तेव्हा मी माझे कॅमेरे कुठे आहे म्हणून विचारलं तर ते कुणालाच माहीत नव्हतं.  माझं तर धाबंच दणाणलं.  कालचं संपूर्ण रेकॉर्डींग आणि यापुढे होणारं सगळं……. कसं करणार मी………मला तर रडूच यायला लागलं.  माझी ती अवस्था बघून उल्हासजी म्हणाले….. “अगं, तू नंतर माझ्या घरी ये वाटल्यास…..आपण पुन्हा करुयात रेकॉर्ड”.  माझं मनच लागेना.  इथे सगळं घडत असताना रेकॉर्डींग करणं आणि नंतर बळेबळे केलेलं ह्यात खूपच फ़रक होता.  उल्हासजींचे संतूर वाजवताना होणारे आविर्भाव, आमच्या सगळ्यांचं ते साठवून घेणं….. हे नंतर कसं अनुभवणार?  मी माझ्यावरच चिडले.  शेवटी प्रशांतकडून कळलं की काल तालवाद्यांसोबत माझी कॅमेरा असलेली स्ट्रॉलर सुद्धा अभिजीतच्या माहीमच्या रुमवर गेली होती.  म्हणजे तिकडे जाऊन आम्ही ती आणेपर्यंत उल्हासजी निघून जाणार होते….मी अगदीच रडवेली झाले होते.  शेवटी उल्हासजी म्हणाले,” तुझ्या मोबाईल मधे करुयात रेकॉर्डींग”  त्यांनी पुन्हा बैठक घेतली आणि आमच्यासाठी पुन्हा एकदा सूरांची सफ़र घडवली.    ते गेल्यावर मात्र मी आणि अभिजीत लग्गेच माहीमला जाऊन कॅमेरे घेऊन आलोत. 

आज निरनिराळे वादक येणार होते त्यामुळे खूप उत्सुकता होती.  सुरवातीला आले संदीप कुळकर्णी,  प्रसिद्ध बासरी वादक.  आपल्या सूरांच्या भात्यामधून त्यांची स्वरनिर्मिती ऐकताना, बघताना……. एका वेगळ्याच दुनियेत गेल्यासारखं वाटलं.  प्रत्येक गाण्यावर एक वेगळाच रंग चढत गेला. 

त्यानंतर आले शुक्लाजी.  त्यांची सतार सगळ्यांवर कळस होती.  संदीपजी आणि शुक्लाजी ह्यांची जुगलबंदी अगदी दृष्ट लागण्यासारखी होती.  त्यांनी वाजवलेली हार्प तर अविस्मरणीय ! एकेका वाद्याच्या दालनात एकेक अद्भूत सफ़र घडत होती…… त्याची साक्षीदार होण्याचा मला सन्मान मिळाला होता.  हे सगळं माझ्या शब्दांसाठी घडत होतं…… ही जाणीवच फ़ार सुखद होती. 

त्यानंतर आले मंचेकर.  क्लॅरिनेट वादक.  हे वाद्य मी पहिल्यांदाच वाजवताना बघत होते.  लावणीच्या सूरात सूर मिसळून त्यांनी अगदी डोलायला लावलं.  संदीपजींसोबतचे त्यांचे लावणीतले पीसेस ऐकताना जाम धम्माल आली.

सगळ्यात शेवटी आलेत महेश खानोलकर.  हे सुद्धा अतिशय प्रसिद्ध व्हायोलीन आणि स्वरलीन वादक आहेत.  “हुंदका साधा तुझा” आणि “तुझा हळवा पाऊस” ह्या दोन गाण्यांमधे त्यांनी अक्षरश: बहार आणली.  अतिशय संवेदनशील अशा ह्या दोन वाद्यांनी एकाचवेळी डोळ्यात आसू आणि हसू आणले.

वेळेकडे कोणाचंच भान नव्हतं.  एकेक सुरांचा जादूगार येत होता आणि जादूची छडी फ़िरवून जात होता…. आम्ही त्या सूरांमधे नखशिखान्त न्हाऊन निघत होतो.  अतिशय तॄप्त दिवस संपला होता.

“सारे तुझ्यात आहे”…..४

एप्रिल 3, 2008 at 7:22 सकाळी | In मराठी, सारे तुझ्यात आहे | 3 Comments

मला इतकी उत्सुकता होती ना…. की गाणं बनतं कसं….?  माझ्या डोळ्यात इतके सारे प्रश्न बघून प्रशांत म्हणाला,” अगं, जरा धीर धर.  आता तुझ्याच समोर घडणार आहेत तुझी सगळी गाणी” मी माझा कॅमेरा घेऊन तयार झाले.  एका वेगळ्याच विश्वात मी पाऊल टाकलं होतं.  समोर जे काही घडणार होतं ते माझं एक स्वप्न…. प्रत्यक्षात उतरणार होतं.

प्रशांत ने “धुंद तेच चांदणे” पासून सुरवात केली.  त्याने त्याच्या कीबोर्डवर सिक्वेन्सिंग केलं होतं म्हणजे गाणं कसं सुरु होणार…. कुठे कुठे कोणची वाद्यं वाजणार…. मधले पीसेस…. आणि तो कॉर्ड्स देऊन त्यावर अभिजीत गाणार होता.  ह्याला “क्यु ट्रॅक” म्हणतात.  म्हणजे गाण्याचं बेसिक फ़्रेमवर्क. एका पाठोपाठ एक असे सगळ्या गाण्यांचे क्यु ट्रॅक्स बनलेत.  मग सुरु झाली ताल वाद्यांची करामत.  अभिजीत नार्वेकर हा आमचा ताल संयोजक होता.  एकेक गाणं घ्यायचं आणि त्यात तबला, ढोलक, डफ अशी मुख्य ताल वाद्यं टाकायची.  ह्यात प्रचंड मेहेनत असते.  प्रत्येक वाद्याचं नोटेशन असतं.  विजय ते लिहून घेत होता आणि भीमराव वाजवत होते.  असं करत करत प्रत्येक पीस ठरला.  तबला विजय आणि भीमराव दोघेही वाजवत होते.  म्हणजे थोडक्यात दोन तबले एकाच वेळी वाजणार होते.  ह्यात प्रचंड सिन्क्रोनायझेशन हवं.  ही जोडगळी एकदम जबरी होती.  एकाच फ़टक्यात त्यांचे टेक्स होत होते.  मधे मधे त्यांची चर्चा…… नेहेमी पेक्षा वेगळं काहीतरी करायचं होतं. 

अशी होती स्टुडिओतली बैठकअशी होती स्टुडिओतली बैठकअशी होती बैठक स्टुडिओतलीमग झाले मनिष कुळकर्णीचे आगमन.  मुंबईचा नंबर वन बेस गिटार वादक.  प्रत्येक गाण्याच्या आधी सगळे आम्ही असे गोल करुन बसायचो……अभिजीत गायचा…… प्रशांत मधले पीसेस तोंडानेच बोलून दाखवत होता आणि अभिजीत नार्वेकर, विजय आणि भीमराव……. त्यात आपापली भर टाकत होते.  मनिषचे गिटारचे वेस्टर्न सूरही होतेच साथीला  मला तर काय काय साठवून घेऊ आणि काय काय नको असं झालं होतं.  माझ्या कॅमे-यात जेवढं काही टिपता येईल तेव्हढं टिपून घेत होते.

अचानक एक खूप छान सरप्राईज मिळालं……. देवकाका मला भेटायला आले होते.  त्यांना असं अचानक बघून खूप आनंद झाला.  देवकाकांना पहिल्यांदाच भेटत होते.  मला भेटायला ते मुद्दाम इतक्या दुरुन आलेत…….खूप छान वाटलं.

दुपारचे ३ वाजले….तेव्हा सगळ्यांनाच भुकेची जाणीव झाली.  बझ-इन स्टुडियो मधला छोटा आणि चुणचुणीत मुकेश आमची खूप काळजी घेत होता.  चहा, खाणं सगळं तोच बघत होता.  आम्ही सगळ्यांनी जेवणावर मस्तपैकी ताव मारला.  हसत खेळत जेवणं झाली.  मला कुठेही मी इथे वेगळी आहे असं जाणवलं नाही किंबहुना कोणीच मला तसं जाणवू दिलं नाही.  कित्येक दिवसांची ओळख असल्यासारखे आम्ही वावरत होतो.  माझा कॅमेरा पण सुरुच होता.

जेवणानंतर पुन्हा एकदा उत्साहाने सगळे गाण्यात, वाद्यात बुडाले.  रात्रीचे ९ वाजले तशी माझी बॅटरी डाऊन व्हायला लागली.  पण बाकी लोकांच्या उत्साहात किंचितही फ़रक पडला नव्हता.  ते तितक्याच जोमाने काम करत होते.  मला माझीच लाज वाटली.  मला बसल्या बसल्या दमायला काय झालं….. ! असं करता करता रात्रीचे चक्क १२.३० झालेत.  मग मात्र माझी हालत बघून प्रशांत बोलला……. “तू निघ आता….. उद्या पुन्हा सकाळी ९ वाजेपासून यायचंय.  आम्हाला अजून वेळ लागेल.”  माझा खरं तर तिकडून पाय निघत नव्हता.  पण शरीर खरोखरच थकलं होतं.  प्रकाश चेंबूरहून मला घ्यायला आले होते.  मी माघार घेऊन घरी परतले.  जाताना एक प्रचंड मोठी चूक करुन बसले.  त्याची फळं भोगावी लागली दुस-या दिवशी. 

Blog at WordPress.com. | Theme: Pool by Borja Fernandez.
Entries and comments feeds.