“सारे तुझ्यात आहे”…..५
एप्रिल 3, 2008 at 2:50 pm | In मराठी, सारे तुझ्यात आहे | 3 Commentsआदल्या दिवशी मी माझे दोन्ही कॅमेरे तिथेच ठेवून गेले होते कारण दुस-या दिवशी पुन्हा सकाळीच यायचं होतं. ती माझी मोठ्ठी चूक होती हे दुस-या दिवशी कळलं. दुस-या दिवशी सगळ्यात पहिले प्रसिद्ध संतूर वादक पं. उल्हास बापट येणार होते. म्हणून आम्ही जरा लवकरच निघालो. त्या दिवशी नेमका ट्रॅफिक जॅम. आम्ही साडे नऊच्या ऐवजी ११ ला पोचलो. तोपर्यंत उल्हासजींचं बरचंसं रेकॉर्डींग आटोपलं होतं. आम्हाला जेमतेम १५-२० मिनिट त्यांचं वाजवणं बघायला मिळालं. इतकी चिडचिड झाली ना…..! मधे थोडा वेळ ब्रेक झाला तेव्हा मी माझे कॅमेरे कुठे आहे म्हणून विचारलं तर ते कुणालाच माहीत नव्हतं. माझं तर धाबंच दणाणलं. कालचं संपूर्ण रेकॉर्डींग आणि यापुढे होणारं सगळं……. कसं करणार मी………मला तर रडूच यायला लागलं. माझी ती अवस्था बघून उल्हासजी म्हणाले….. “अगं, तू नंतर माझ्या घरी ये वाटल्यास…..आपण पुन्हा करुयात रेकॉर्ड”. माझं मनच लागेना. इथे सगळं घडत असताना रेकॉर्डींग करणं आणि नंतर बळेबळे केलेलं ह्यात खूपच फ़रक होता. उल्हासजींचे संतूर वाजवताना होणारे आविर्भाव, आमच्या सगळ्यांचं ते साठवून घेणं….. हे नंतर कसं अनुभवणार? मी माझ्यावरच चिडले. शेवटी प्रशांतकडून कळलं की काल तालवाद्यांसोबत माझी कॅमेरा असलेली स्ट्रॉलर सुद्धा अभिजीतच्या माहीमच्या रुमवर गेली होती. म्हणजे तिकडे जाऊन आम्ही ती आणेपर्यंत उल्हासजी निघून जाणार होते….मी अगदीच रडवेली झाले होते. शेवटी उल्हासजी म्हणाले,” तुझ्या मोबाईल मधे करुयात रेकॉर्डींग” त्यांनी पुन्हा बैठक घेतली आणि आमच्यासाठी पुन्हा एकदा सूरांची सफ़र घडवली. ते गेल्यावर मात्र मी आणि अभिजीत लग्गेच माहीमला जाऊन कॅमेरे घेऊन आलोत.
आज निरनिराळे वादक येणार होते त्यामुळे खूप उत्सुकता होती. सुरवातीला आले संदीप कुळकर्णी, प्रसिद्ध बासरी वादक. आपल्या सूरांच्या भात्यामधून त्यांची स्वरनिर्मिती ऐकताना, बघताना……. एका वेगळ्याच दुनियेत गेल्यासारखं वाटलं. प्रत्येक गाण्यावर एक वेगळाच रंग चढत गेला.

त्यानंतर आले शुक्लाजी. त्यांची सतार सगळ्यांवर कळस होती. संदीपजी आणि शुक्लाजी ह्यांची जुगलबंदी अगदी दृष्ट लागण्यासारखी होती. त्यांनी वाजवलेली हार्प तर अविस्मरणीय ! एकेका वाद्याच्या दालनात एकेक अद्भूत सफ़र घडत होती…… त्याची साक्षीदार होण्याचा मला सन्मान मिळाला होता. हे सगळं माझ्या शब्दांसाठी घडत होतं…… ही जाणीवच फ़ार सुखद होती.

त्यानंतर आले मंचेकर. क्लॅरिनेट वादक. हे वाद्य मी पहिल्यांदाच वाजवताना बघत होते. लावणीच्या सूरात सूर मिसळून त्यांनी अगदी डोलायला लावलं. संदीपजींसोबतचे त्यांचे लावणीतले पीसेस ऐकताना जाम धम्माल आली.

सगळ्यात शेवटी आलेत महेश खानोलकर. हे सुद्धा अतिशय प्रसिद्ध व्हायोलीन आणि स्वरलीन वादक आहेत. “हुंदका साधा तुझा” आणि “तुझा हळवा पाऊस” ह्या दोन गाण्यांमधे त्यांनी अक्षरश: बहार आणली. अतिशय संवेदनशील अशा ह्या दोन वाद्यांनी एकाचवेळी डोळ्यात आसू आणि हसू आणले.

वेळेकडे कोणाचंच भान नव्हतं. एकेक सुरांचा जादूगार येत होता आणि जादूची छडी फ़िरवून जात होता…. आम्ही त्या सूरांमधे नखशिखान्त न्हाऊन निघत होतो. अतिशय तॄप्त दिवस संपला होता.
3 प्रतिक्रिया »
RSS feed for comments on this post. TrackBack URI
यावर आपले मत नोंदवा
Blog at WordPress.com. | Theme: Pool by Borja Fernandez.
Entries and comments feeds.



मस्तच
आणि फोटोंबरोबर वाचायला अजुन छान वाटतयं.
Comment by श्यामली — एप्रिल 4, 2008 #
या एका अल्बम मागची ही सारी मेहनत वाचली. You are great.
Comment by harekrishnaji — एप्रिल 5, 2008 #
श्यामली, हरेकृष्ण…. धन्यवाद…!!
मनापासून समाधान, खूप छान मित्र, मनसोक्त आनंद….. इतकं काही मिळालं ना ह्या प्रवासात !!
Comment by जयश्री — एप्रिल 5, 2008 #