“सारे तुझ्यात आहे”…..६

एप्रिल 5, 2008 at 7:04 सकाळी | In मराठी, सारे तुझ्यात आहे | 3 Comments

दोन दिवसांमधे जवळजवळ सगळे ट्रॅक्स तयार झाले होते.  फ़क्त मनिषचं मेंडोलीन, गिटार आणि बेस गिटारचं काम बाकी होतं.  आता वेध लागले होते वैशाली सामंत आणि स्वप्निल बांदोडकर ह्यांच्या रेकॉर्डींगचे.  ह्यावेळचं रेकॉर्डींग बझ-इनच्याच दुस-या स्टुडिओत होतं.  इथला रेकॉर्डीस्ट होता सौरभ काजरेकर.  अतिशय हसतमुख मुलगा.

 स्वप्निल सकाळी साडे नऊला पोचलेत.  आम्हाला प्रचंड कुतूहल होतं की स्वप्निल कसे गातात.  सगळ्यात पहिले अभिजीतने त्यांना गाणं ऐकवलं.  त्यांनी अगदी मनापासून दाद दिली…..शब्दांना आणि सुरावटीला.  गाण्याचं रेकॉर्डींग करताना त्यांचे असे काही आविर्भाव होत होते ना……… की मला रेकॉर्ड करु की त्यांना बघू की त्यांना ऐकू………काही सुचेनाच.  सगळे म्हणत होते, अगं जरा दमानं…. जरा बस आता….” पण मला दुसरं काहीच सुचणार नव्हतं.  समोर इतकं काही घडत असताना….. कोणाला कसं स्वस्थ बसवेल ?  स्वप्निलजींना ऐकणं जेवढं सुखद आहे त्यापेक्षाही जास्त ते गातांना बघणं हा एक जबरदस्त अनुभव आहे.  ते समोर गात असताना तुमची दृष्टी त्यांच्यावरुन हलूच शकत नाहीत.  आधी “ओला वारा” गाणं झालं.  त्याचे सूर मनात साठवून घेतो आहोत तोच दुस-या गाण्याची वेळ आली.  हे शिर्षक गीत ” सारे तुझ्यात आहे” ह्या गाण्याबद्दल काय लिहू मी…..इतकं अप्रतिम गायलेत ना स्वप्निलजी……. की माझे शब्द अगदी धन्य धन्य झालेत.  गाण्यात पूर्णपणे बुडून……स्वत:ला हरवून…… आई गं…. मी तर पारच हरवून गेले होते.  हसत खेळत रेकॉर्डींग करुन आम्हाला त्यांच्या सूरांवर रेंगाळत ठेवून ते निघूनही गेलेत.

वैशाली १ वाजता येणार होती.  तोपर्यंत आम्ही आमचं जेवण आटोपलं.  आपल्या आवाजाची मोहिनी जनमानसावर गाजवणारी वैशाली सामंत खूपच गोड आणि हसरं व्यक्तिमत्व आहे.  आल्यापासूनच तिने वातावरण अगदी हलकं-फुलकं केलं होतं.  हिची रेकॉर्डींगची पद्धत स्वप्निल पेक्षा वेगळी होती.  ही संपूर्ण गाणं शिकून मग एकाच टेकमधे गायली आणि नंतर करेक्शन्स केलेत.  पूर्ण गाणं ऐकून त्या गाण्याच्या मूडमधे जाऊन ती ते गात होती.  अतिशय तयार आवाज आणि लाघवी व्यक्तिमत्व :)

वैशालीची एकेक गाणी होत होती आणि सोबतच तिच्या अतिशय साध्या स्वभावाचं आम्हाला अगदी जवळून दर्शन होत होतं.  रेकॉर्डिंग झाल्यावर तिने इतक्या सहज पणे मला विचारलं की आता आपल्या अल्बम बद्दल तुझा काय प्लॅन आहे पुढचा….?  तिचं ते “आपला अल्बम” असा उल्लेख करणं मनाला अगदी स्पर्शून गेलं.  ही इतकी मोठी गायिका इतक्या साधेपणाने विचारत होती पुढचे प्लॅन.  मग मी तिलाच विचारलं की काय करायला हवंय.  तिने खूप चांगलं मार्गदर्शन केलं.  पुढे फ़ाऊंटन म्युझिक कंपनीच्या कांतिभाईंशी तिनेच माझी भेट घडवून आणली.  वैशालीसारख्या इतक्या मोठ्‍या पण अतिशय साध्या आणि गोड कलाकाराला भेटून खूप खूप आनंद झाला.

माझा प्रवास अगदी राजमार्गावरुन होत होता.  वाटेत भेटणारी सगळीच माणसं अगदी मनापासून मदत करत होती माझ्या पुढच्या प्रवासाला…… !

वैशालीचं रेकॉर्डिंग झाल्यावर प्रशांत म्हणाला की आपण कोरसचंही रेकॉर्डिंग आजच करुयात.  दीपा बर्वे आणि भाग्यश्री महाजन ह्या दोघी बहिणी कोरस गायला आल्या.  सोबत अभिजीत, प्रशांत आणि मी.  आम्ही पाच जणांनी मिळून कोरस गायला.  धम्माल आली अगदी…..!! कोरस का होईना…..मला स्टुडिओत गायला मिळालं……..ह्याचाच जास्त आनंद झाला.

दिवसभराचा शीण ते सगळं रेकॉर्डिंग ऐकताना कुठल्या कुठे पळाला. 

3 प्रतिक्रिया »

RSS feed for comments on this post. TrackBack URI

  1. योगायोग असा की दीपा बर्वे आणि भाग्यश्री महाजन ह्या दोघीजणी माझ्या बायकोच्या चुलतभावाच्या मेहुण्या.

  2. अरे वा….. क्या बात है :)

  3. सारे तुझ्यात आहे” ह्या गाण्याबद्दल काय लिहू मी…..इतकं अप्रतिम गायलेत ना स्वप्निलजी……. की माझे शब्द अगदी धन्य धन्य झालेत. गाण्यात पूर्णपणे बुडून……स्वत:ला हरवून…… >>>>वा हे सुद्धा काय मस्त लिहिलंयस….जसंच्या तसं पोचलं अगदी :)


यावर आपले मत नोंदवा

XHTML: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <pre> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>

Blog at WordPress.com. | Theme: Pool by Borja Fernandez.
Entries and comments feeds.