“सारे तुझ्यात आहे”…..९
एप्रिल 8, 2008 at 8:41 सकाळी | In मराठी, सारे तुझ्यात आहे | Leave a Commentकांतिभाईंनी अल्बमचं नाव काय ठेवायचं असं विचारलं……. तेव्हा श्यामलीने सुचवलेलं नाव ओठावर आलं…”सारे तुझ्यात आहे” ब-याच जणांना छळलं होतं मी यासाठी. पण जेव्हा श्यामलीने सुचवलं……तेव्हा मनापासून आवडलं
कांतिभाईंशी भेट झाल्यानंतर दुस-या दिवशी पुण्यात “शाकाहारी रविवार” ह्या मायबोलीच्या गेट टू गेदर ला “वैशाली” मधे ब-याच मायबोलीकरांशी भेट झाली. मी पहिल्यांदाच सगळ्यांना भेटत होते. इतक्या दिवसांच्या रुजलेल्या नात्याचं असं मूर्त स्वरुप…… खूप खूप आनंद झाला.
पुणं सोडून मुंबईला जाणा-या बसमधे मनात गोड आठवणी जागवत मी प्रवास करत होते. देवाने तुला जे काय हवं ते मिळो असं जणू काही वरदानच दिलं होतं मला ! जे जे मी इच्छित होते त्या सगळ्या मागण्या देव पुरवत होता. आजचा दिवस अगदी परिपूर्ण वाटत होता. अवीची खूपच आठवण येत होती. आज त्यांच्या भरवशावरच मी इतकं सगळं करु शकले होते. इतका चांगला नवरा दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा देवाचे आभार मानले
मुंबईत पोचले. आता माझ्याकडे पुढच्या हालचाली करायला फ़क्त २ दिवस होते. कांतिभाई एका महिन्यात सीडी काढणार होते. म्हणजे साधारण १० मार्च पर्यंत सीडी हातात येणार होती. मी २ दिवसांनी म्हणजे १५ फ़ेब्रुवारीला कुवेतला परत जाणार होते. त्या दिवसातच हॉल वगैरे बघून सीडी प्रकाशनासाठी नक्की करावा लागणार होता. तिकडे माझ्या अद्वैतची वार्षिक परिक्षा १६ मार्चला संपणार होती म्हणजे प्रकाशनाची तारीख त्यानंतरच ठरवावी लागणार होती. माझे सगळे नातेवाईक मुंबईला कार्यक्रमाला येणार म्हणजे त्यांच्या सोयीनेच तारीख ठरवावी लागणार होती.
अभिजीत होताच सोबत. ह्या अभिजीतची पण कमालच म्हणायला हवी. हा मुलगा……इतका मोठा संगीतकार…… माझ्या प्रत्येक कठीण वेळेला माझ्या सोबत होता. प्रत्येक ठिकाणी अगदी जातीने बरोबर होता. आतापर्यंत त्याला कुठल्याही गीतकाराने किंवा निर्मात्याने इतका त्रास दिला नसेल इतकं छळलं मी त्याला. तोसुद्धा अगदी तेवढ्याच आपुलकीने माझी सोबत करत होता…. अगदी प्रत्येक ठिकाणी…..प्रत्येक कामात. आम्ही ठरवलं की उद्या आपण सगळे हॉल बघायला जायचं. पण कसचं काय…. राज ठाकरेंच्या अटक प्रकरणामुळे मुंबईत इकडे तिकडे प्रवास करणं धोक्याचं होतं. तो दिवस घरीच नुस्ता चुळबुळत काढला. दुस-या दिवशी मात्र अगदी अट्टाहासाने बाहेर पडलो. ४-५ हॉल बघितले….. पण तारखांचा भरपूर घोळ होता. त्यामुळे दादर-माटुंगा कल्चरल सेंटर निश्चित केला. मी त्याच रात्री कुवेतला वापस आले. जातांना कांतिभाईंना पुन्हा एकदा फ़ोन केला. त्यांनी निश्चिंत रहायला सांगितले. त्यामुळे जरा शांत मनाने कुवेतला परतले.
कुवेतला सुद्धा नुस्तं बसून रहायचं नव्हतं तर प्रकाशनाची सगळी तयारी करायची होती. इकडे अद्वैतची वार्षिक परिक्षा पण सुरु होणार होती. पाहुण्यांची यादी, हॉलवर न्यायच्या सामानाची यादी, निवेदक हेमंत बर्वे शी बोलणं, कार्यक्रमाची क्रमवार आखणी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गायकांशी बोलून तारीख पक्की करणे. ते सगळं अभिजीतनेच केलं. एकदा गायकांच्या तारखा मिळाल्यावर प्रमुख पाहुणे अशोक पत्की ह्यांची तारीख ही पक्की केली. सगळ्यांच्या मते २० मार्च ही तारीख ठरली. नंतरचे दोन दिवसही सुट्ट्या असल्यामुळे हाच दिवस निश्चित केला. तसा प्रकाश ने हॉलही बुक केला. एक मोठ्ठं काम झालं होतं.
मी तिकडे रेकॉर्डिंगला काढलेले फ़ोटो अभिजीत धर्माधिकारी (माझा अजून एक ऑर्कुटवरचा मित्र) ला पाठवले आणि त्याने ते चांगले सुधारुन परत पाठवले. त्यांचे प्रिंट घेतले. ते सगळे फ़ोटो मला प्रकाशनाच्या वेळी छानपैकी क्रमवार चार्ट पेपरवर लावायचे होते. शिवाय माझ्या कविता सुद्धा. त्याचे सगळे प्रिंट आऊट्स, अल्बमचं राईट-अप, टिव्ही चॅनेल्स ना पत्रं….अशी बरीच कामं होती. माझ्या ऑर्कुटवरच्या ब-याच मित्र मैत्रिणींची फ़ार मदत झाली. तुषार शेटे हा झी २४ तास मधला रिपोर्टर. त्याने त्याच्या चॅनेल शी बोलून ठेवलं होतं. कधीही न भेटलेले हे मित्र अतिशय आपुलकीने आपल्या परीने जी मदत होईल ती करत होते.
एका आठवड्यात कांतिभाईंची कव्हर डिझाईनची मेल आली. त्यात काही करेक्शन्स करुन कव्हर डिझाईन फ़ायनल केलं. अगदी मनासारखं, फ़्रेश डिझाईन झालं होतं. आता आमंत्रण ! छानसा मजकूर तयार केला आमंत्रणाचा आणि कांतिभाईच्या आर्टीस्ट ने आमंत्रण पत्रिका ही अगदी छान बनवली. सगळ्यांना आमंत्रणं पाठवली. सगळ्यांच्या भरभरुन शुभेच्छा आल्या. माझी इकडे स्वत:ची तयारीही सुरु होती. कुठली साडी, कुठली ज्वेलरी…….
बॅगा आठवडा आधीच भरुन ठेवल्या होत्या. मी १० मार्चला जाणार होते आणि अवी आणि अद्वैत त्याची परिक्षा संपल्यावर १८ ला सकाळी पोचणार होते. मी तिकडे बाकीची सगळी तयारी करुन ठेवणार होते. अगदी आठवणीने सगळं सामान, सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन मी मुंबईत पोचले.
Blog at WordPress.com. | Theme: Pool by Borja Fernandez.
Entries and comments feeds.


