“सारे तुझ्यात आहे”…..१०

एप्रिल 9, 2008 at 9:26 सकाळी | In मराठी, सारे तुझ्यात आहे | Leave a Comment

प्रकाश आणि अर्चना आले होते विमानतळावर घ्यायला.  ह्या दोघांमुळेच मी इतका मोठा उपद्व्याप करु शकले.  त्यांच्या मदतीबद्दल जितकं लिहावं तितकं कमी आहे.  पोचल्यावर थोडा आराम झाल्यावर डोळ्यासमोर सगळी कामं दिसायला लागलीत.  अभिजीत शी बोलून कशी सुरवात करायची ते ठरवलं.  देवकी ताई, स्वप्निल आणि अशोक पत्कींना घरी जाऊन आमंत्रण द्यायचं होतं.  २-३ दिवसात कांतिभाई त्यांच्या मुंबईच्या ऑफ़िसमधे सीडीज, पोस्टर्स आणि आमंत्रण पत्रिका पाठवणार होते.  त्या मिळाल्याशिवाय गायक मंडळींकडे जाता येणार नव्हते.  तोपर्यंत बाकीची तयारी सुरु होती.  सगळ्या गायक, तंत्रज्ञ आणि मदतनीसांचा सत्कार करणार होतो त्यामुळे त्याची तयारी.  भरपूर याद्या तयार होत होत्या ….सामान आणलं जात होतं.  पिशव्यांवर नावं घालून तयार पिशव्या घरात एका कोप-यात साठत होत्या.

कांतिभाईंनी कबूल केल्याप्रमाणे सगळं सामान पाठवलं.  मी आणि अभिजीत सगळं सामान तिकडे जाऊन घेऊन आलो.  आमच्या इतक्या दिवसांच्या धावपळीचं सार्थक झालं होतं.  अतिशय सुरेख पॅकिंग मधे आमचं स्वप्नं समोर दिसत होतं.  आम्ही दोघांनीही देवाचे आभार मानले.  ज्यांची ज्यांची मदत झाली त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद दिले मनात.  ते गोड ओझं घरी घेऊन आलो.  आज खूप थकलो होतो तरी थकवा अजिबात जाणवत नव्हता.

दुस-या दिवशी सकाळीच आम्ही निघालो.  सगळ्यात पहिले स्वप्निल बांदोडकरांकडे.  त्यांना आमंत्रण पत्रिका आणि ट्रॅक्स असलेली त्यांची गाणी त्यांना देऊन मग आलो अशोक पत्कींकडे.  अशोकजींनी फ़ारच छान केलं स्वागत.  आम्ही त्यांनाही आमंत्रण पत्रिका आणि सीडी देऊन आलो देवकी ताईंकडे.  आतापर्यंत आम्ही खूप मोकळे झालो होतो त्यांच्याशी.  दोनदा घरीही जाऊन आलो होतो. खूपच छान बोलतात त्या.  त्यांचं बोलणं अगदी ऐकत रहावसं वाटतं.  प्रत्येक वेळी त्यांना भेटून काहीतरी अजून करायला हवं अशी भावना तीव्रतेने जाणवली.  खूप कळकळीने बोलतात त्या संगीताविषयी.  त्यांच्याकडून आम्हाला खूपच उत्तेजन मिळालं. 

वैशाली मात्र मुंबईत नव्हती.  तिची भेट थेट १७ लाच होणार होती.  आमची बाकीची तयारी सुरुच होती.  आमचं बॅनर बनवलं अभिजीतच्याच अजून एका टॅलेन्टेड मित्रानं.  प्रणव धारगळकर नं.  आतापर्यंत अभिजीतने ज्या ज्या कुणाला मला भेटवलं तो तो प्रत्येक मित्र जबरदस्त कलाकार होता आणि तरीही अतिशय साधा.  काय लाघवी गोतावळा होता अभिजीतचा.  मला पण त्यांनी त्यांच्यात लगेच सामावून घेतलं.  तर हा प्रणव सुद्धा एक उच्च कलाकार.  त्यानेसुद्धा अगदी धडपड करुन आम्हाला सुरेख, स्टेजला भारदस्तपणा आणणारं, अगदी आमच्या मनासारखं बॅनर बनवून दिलं.  ऑफ़िसमधून आल्या आल्या चक्क रात्री साडे-नऊ पर्यंत तो आमचं काम करत होता. 

जीवाला जीव देणारी माणसं जोडली आहेत ह्या अभिजीतनं.  ह्याला कारण त्याचे संस्कार.  त्याचे आई-बाबा सुद्धा इतके प्रेमळ आहेत ना…. मला तर त्यांनी अगदी स्वत:च्या मुलीसारखं प्रेम दिलं आणि मी ही मस्तपैकी हक्काने सगळे लाड करवून घेतले.  चिकन काय, फ़िश फ़्राय काय….. काकूंनी अतिशय प्रेमाने खाऊ घातलं.  काकांबद्दल काय बोलावं.  प्रचंड वाचन आहे त्यांचं.  शब्दप्रभू आहेत ते.  कायम त्यांचं काहीतरी लिखाण सुरु असतं.  अगदी मनापासून कौतुक करणारे, खूप खूप हळवे.  प्रत्येक आनंदाच्या क्षणी, टेन्शन्च्या वेळी काकू-काकूंचा आम्हाला खूपच आधार होता.  मी, अभिजीत, प्रकाश अर्चना, काका, काकू…… आम्ही सगळेच ह्या प्रोजेक्ट मधे आकंठ बुडालो होतो.

No Comments Yet »

RSS feed for comments on this post. TrackBack URI

यावर आपले मत नोंदवा

XHTML: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <pre> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>

Blog at WordPress.com. | Theme: Pool by Borja Fernandez.
Entries and comments feeds.