“सारे तुझ्यात आहे”…..११
एप्रिल 10, 2008 at 10:09 सकाळी | In मराठी, सारे तुझ्यात आहे | Leave a Commentरोजचा दिवस काहीतरी नवीन काम घेऊन उजाडत होता. आता पुन्हा एकदा हॉलची चक्कर करायची होती. काय काय कुठे कुठे आहे……..कुठे कुठे ठेवायचं….काय काय सोयी आहेत….काय करवून घ्याव्या लागणार आहेत हे सगळं ठरवायचं होतं. तिथल्या डेकोरेटरशी बोलून सगळं फ़ायनल करायचं होतं. मी आणि अभिजीत दुपारी पोचलो. सगळं नीट बघून पक्कं केलं. तिथल्या लोकांनी सुद्धा फ़ारच उपयुक्त सल्ले दिले. तिकडून आम्ही फुलमंडईत गेलो. मनासारखं ते ही काम झालं. तो हॉलवरच गुच्छ पोचवणार होता.
बाकी बरीचशी बारीक सारीक खरेदी करुन आम्ही हेमंत बर्वेला भेटायल गेलो. कार्यक्रमाबद्दल त्याच्याशी सविस्तर चर्चा केली. कार्यक्रमाचं स्वरुप काय असावं…… कसं असावं…..त्याला त्यासाठी जी काय माहिती हवी होती ती पुरवली. आता मन थोडं शांत झालं होतं. बरीचशी कामं आटोपली होती. शिवाजी पार्कच्या उद्यान गणेशाचं दर्शन घेतलं…. तिथे आमचं मोठं पोस्टर आणि आमंत्रण पत्रिका लावली नंतर आमच्या टिव्ही वाल्या दोस्तांची भेट झाली. ह्यात प्रणेश जाधव होता. ही मुलं शिकता शिकता बरंच काही करतात. त्यांनीच ईटिव्ही वाल्यांशी बोलून आमचं आमंत्रण त्यांच्यापर्यंत पोचवलं. कितीतरी लोकांची आम्हाला मदत झाली. सहारा चॅनेल साठी प्रकाशचा मित्र पांडा आणि त्याची बायको मदतीला आले. झी २४ तास चं काम तुषार शेटे ने केलं. वर्तमान पत्राचं काम श्रीकांतजी आंब्रेंनी अतिशय आपलेपणाने केलं. त्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन पण केलं. सगळ्यांचाच आपलेपणाचा, मोलाचा आणि प्रेमाचा वाटा होता आमच्या ह्या पूर्ण संकल्पात.
१७ तारीख उजाडली. मी आणि अभिजीतनं चार्ट पेपर्स वर आमच्या अल्बमचा जिवंत प्रवास रेखाटला. सोबत माझ्या काव्यरचना. सगळं सुबक रचून सजवलं. संपूर्ण दुपार त्यातच गेली. ते सगळे फ़ोटो बघताना आम्ही केलेल्या प्रवासातल्या गमती जमती आठवल्या….. मन पुन्हा एकदा ताजंतवानं झालं. आज आम्हाला अजून एक महत्वाचं काम करायचं होतं. आज वैशाली सामंत भेटणार होत्या. पण त्यांची भेट होऊ शकली नाही. पण त्यांचं आमंत्रण आणि सीडी मात्र आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे बझ-इन मधे पोचवली. तिथे सत्यजीत भेटले. पुन्हा एकदा रेकॉर्डिंगच्या सुखद आठवणींना उजाळा मिळाला. आम्ही खरंच खूप मज्जा केली होती. सत्यजीत आणि सौरभ सुद्धा अगदी मनापासून सगळ्यात सामील होते. त्यांनाही हे काम करण्यात खूप मज्जा आली असं ते बोलले……. खूप छान वाटलं.
तिकडून आम्ही माहिमला गेलो अभिजीत नार्वेकर आणि त्यांच्या पूर्ण गॅंगला आमंत्रण द्यायला. त्यांच्याशी पण घट्ट दोस्ती जमली होती. त्यांच्या नव्या कंपोझिशन्स आणि गप्पा करता करता मस्त वेळ गेला. घड्याळाकडे बघितल्यावर मात्र वेळेची जाणीव झाली.
Blog at WordPress.com. | Theme: Pool by Borja Fernandez.
Entries and comments feeds.


