अंतर
एप्रिल 29, 2008 at 12:27 pm | In मनातलं...!, मराठी | 4 Commentsकितीक हळवे…. कितीक सुंदर
किती शहाणे अपुले अंतर
आत्ताच ह्या गाण्याच्या ओळी ऐकल्या…..अगदी आत पर्यंत भिनत गेल्या. दोघांमधले हे अंतर कितीवेळा असे शहाणे असते….!! कधी हे अंतर अगदी आरपार छेदून जातं तर कधी युगं लोटून जातात पण पार करता येत नाही. कधी हे अंतर ..अंतर वाटतंच नाही. इतकी दोघं एकमेकांच्या जवळ येतात. एकदा ही जवळीक साधली की मात्र बाकीचे फार दूर वाटायला लागतात. कधी एकमेकांच्या जवळ पोचायला सुद्धा कोणी तरी बांधून दिलेल्या पुलाची….सेतूची गरज लागते. कित्येकदा तो बांधून दिलेला पूल मोडकळीस येतो….. त्याला गोंदण-शिंपण करुन नेटका करता करता जीव मेटाकुटीला येतो. सगळी धडपड त्या सेतूच्या डागडुजीसाठी. पण ती डागडुजी करताना ती पलीकडली व्यक्ती कितीतरी दूर निघून गेलेली असते. मग पुन्हा धडपड त्या कशाबशा सावरलेल्या पुलावरुन तोल सांभाळत “त्या”च्याजवळ पोचायची.
कधी हे अंतर हवंहवंसं वाटतं. थोडी दूरिया भी नजदीकिया लाती है असं म्हणतात ना…..! अंतर हे असतंच पण ते किती असावं म्हणजे ते शहाणं म्हणता येईल….! जेव्हा तो अनोळखी असतो तेव्हाचं अंतर….. जेव्हा तो थोडा कळायला लागतो तेव्हाचं अंतर….. जेव्हा तो आपला होतो तेव्हाचं अंतर ……जेव्हा तो कळूनही कळला नाहीये हे जाणवल्यानंतरचं अंतर…. तो जवळ असूनही ते फ़क्त एका कुशीचं जीवघेणं अंतर….. !!
तसं म्हटलं तर आपण सगळे हे अंतरच पार करत असतो. सगळी धडपड ह्या अंतरासाठीच तर असते. वेगवेगळ्या नात्यातल्या अंतरामधले वेगवेगळे पूल सतत बांधत असतो, त्याची डागडुजी करत असतो तर कधी स्वत:च्याच हाताने तो मोडून सुद्धा टाकत असतो. कधी काही पूल तुटत असतात तर कधी नवे सेतू तयार होत असतात. कधी पडझड तर कधी नवी उभारी. पण त्या प्रत्येक पडलेल्या पुलाची एक तरी वीट असतेच जपून ठेवलेली नव्या पुलाच्या उभारणीसाठी. त्या पडझडीतून वाचलेली एक तरी अशी भिंत असतेच तडा न गेलेली. ती कायमच तयार असते नव्या बांधासाठी. कदाचित त्या भिंतीचाच आसरा शोधत असतो एखादा नवा पूल…….!!
कधी एक अंतर पार केल्यावर असं लक्षात येतं की हे अंतर पार करायच्या नादात आपण बाकी अंतरं फ़ारच वाढवलीयेत. फारच ताणल्या गेलेत बाकीच्या पुलांचे दोर……!! तो ताण सैल करायला जावा तर जवळचा असलेला तो दूर जाणार….! कधी हा सगळाच ताण असह्य होतो….!! सगळी अंतरं राखून तोल सांभाळत जाणं प्रत्येकालाच शक्य होत नाही. काही मात्र मज्जेने जो भेटेल त्याला आपल्याशी बांधून ठेवून चालू शकतो…..चक्क गाणी गुणगुणत….! त्यांच्यात कसलंतरी जबरी संमोहन असतं जे सगळ्यांना त्याच्याशी चुंबकासारखं बांधून ठेवतं. मग धडपड सुरु रहाते ती बाकीच्यांची……त्याच्यासोबत चालत रहाण्याची. हे असं जगता यायला हवं….!! म्हणजे पूलही बांधायला नकोत…. त्याची डागडुजीही करायला नको.
अंतर अपुले असे निरंतर
जरा हसावे.. जरा रुसावे
कधी ओलावा कधी दुरावा
शोधत जावे… गवसत जावे
Blog at WordPress.com. | Theme: Pool by Borja Fernandez.
Entries and comments feeds.



