एवढंसं आभाळ

सप्टेंबर 29, 2008 at 3:07 pm | In मनातलं...!, मराठी | Leave a Comment

कालच झी टिव्ही वर “एवढंसं आभाळ” हा सिनेमा बघितला.  दिग्दर्शकानं फार सुरेख हाताळलाय हा नाजूक विषय.  प्रतिक्षा लोणकर, आनंद शिंदे आणि ऋत्विक नाडकर्णी ह्यांच्या नैसर्गिक अभिनयाने अधिकच वास्तविक सुद्धा वाटतो.

आई वडिलांचा घटस्फोट झालाय म्हणजे नक्की काय झालंय हे सुद्धा न कळण्याइतका भाबडा मुलगा….जेव्हा ते सगळं आपल्या कुवतीप्रमाणे समजून घ्यायचा प्रयत्न करतो… तेव्हा त्याची होणारी चिडचिड, सोबत आई-वडिलांची अगतिकता……. आणि मग अचानक त्याला मिळालेला मार्ग… असं काहिसं कथानक.

प्रत्येक छोट्‍या मुलाचं आभाळ त्याच्या आई-वडिलांच्या आभाळातच असतं…..आणि तो तेच आभाळ आपलं समजत असतो.  पण जेव्हा ते आई-वडिल एकमेकांपासून दूर होतात….. ते आभाळ फाटतं.  त्याला कळतंच नाही की आता नक्की कुठलं आभाळ आपलं.  आईच्या आभाळात आता दुसराच कोणी “पप्पा” असतो आणि त्याच्यासोबत त्याची कुठलंच नातं नसलेली भावंडं सुद्धा.  त्याला गुदमरायला होतं.  तसा दुसरा पप्पा काही वाईट नसतो.  पण आईवरचा त्याचा एकाधिकार मात्र अगदीच संपतो.  संपूर्ण त्याची असलेली आई आता त्याला अजून तिघांसोबत वाटून घ्यायची असते.  इथेच तर सगळा घोळ होतो.  आपल्या हातातून काहितरी निसटून जातंय असं त्याला वाटतं… तो धडपड करतो…पण काही गोष्टी अशा घडतात की त्याचा स्वत:वरचा ताबा सुटतो.  आईची होणारी घालमेल त्याला कळत असते पण तरी मन काही आपला हक्क सोडायला तयार नसतं. 

ह्यातून आपल्या परीने तोच मार्ग सुचवतो…. पप्पांकडे जायची परवानगी मिळवतो.  त्याला वाटतं की आपलं हरवलेलं आभाळ आपल्याला आपल्या पप्पांकडे नक्कीच मिळणार.  तो खूप उत्साहात असतो.  पण घरी पोचल्यावर त्याचं स्वागत बंगाली भाषेत बोलणारी आंटी करते.  सोबत एक छोटं बाळ पण.  म्हणजे इथेही आपल्याला पुन्हा वाटूनच घ्यावं लागणार आभाळ !

त्याला काही कळेनासंच होतं.  इवल्याशा मनात प्रचंड उलाघाल होत असते…….कोणासोबत बोलावं मनातलं….आईसोबत…… पण तिला तर फारच दुखावून आपण आलो आहोत.  पप्पा…..आज पप्पांसोबत बोलुयाच असं ठरवतो तर पप्पाच त्याला त्यांचा निर्णय सांगतात…. बोर्डींग स्कूलमधे जायचा.  तो खूप प्रतिकार करतो.  पण त्याचा काहीच उपयोग होत नाही.  त्या क्षणी समोरुन आलेली वॉर्डन त्याला आईच वाटते.  तो तिच्या कुशीत शिरुन हमसाहमशी रडतो….तिची माफी मागतो.  पण नंतर त्याला जाणवतं की आई नाहीच.  मग तो आपलं मन पक्कं करतो……..बाबांकडे पाठ फिरवून होस्टेलच्या खोलीत येतो.  तिथे त्याच्यासारखीच कितीतरी मुलं असतात…….पण सगळी हसरी मुलं…… कोणीच त्याच्यासारखी रडत नसतात.  तो ही हसायचा कसानुसा प्रयत्न करतो.

तिथे त्याला छान मित्र मिळतो…. हळुहळु तो खुलत जातो…. फुलत जातो.  आई-पप्पांची आठवण येत असते पण इथेही मजा असते.  नवी जागा, नवे मित्रं, नवं ध्येय……. आणि अचानक एक नवं आभाळ सुद्धा !!  ह्या अचानक सापडलेल्या आपल्या हक्काच्या आभाळाखाली तो खूप खूप सुखावतो.  आईला त्याने लिहिलेल्या पत्रातच सिनेमा संपतो.  अतिशय सुंदर शेवट !! कुणालाही न दुखावता, कुणालाही न दुरावता…. त्याला त्याच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव होते.  त्याचं एवढसं आभाळ आता खूप मोठ्ठं होतं आणि त्या आभाळाखाली तो स्वत:चं “मी पण” घडवणार असतो. 

हा सिनेमा मी माझ्या १२ वर्षाच्या मुलासोबत बघितला……..प्रचंड रडले बघताना.  पिल्लाने पण अगदी मन लावून बघितला…..खूप प्रश्न विचारले….. आणि त्याला उत्तरं देताना मात्र मी फार विचार करत होते…. आई-वडीलांना पण स्वत:चं आभाळ वेगळं करताना मुलाच्या डोक्यावर काही आभाळ उरतंय का ह्याचा विचार करायलाच हवा.  नाहीतर आपलं इवलंसं आभाळ कुठे आहे हे शोधण्यात कदाचित ते मूल भलत्याच वाटेला जाऊ शकतं  आणि मग फक्त पश्चातापच हातात उरतो. 

फारसे संवाद नसूनही सुरेख अभिनयामुळे सिनेमा मनात अगदी घर करुन राहतो.  एक आवर्जून बघण्यासारखा सिनेमा !!

आनंदोत्सव

सप्टेंबर 28, 2008 at 9:37 सकाळी | In मनातलं...!, मराठी | 3 Comments

कधी कधी मन खूप आनंदात असतं.  अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मनासारख्या घडतात.   म्हणजे सकाळी अलार्म कर्कश्श न वाजता….. नाजूक किणकिणतो….. रात्रीच तयारी करुन ठेवल्यामुळे सकाळी अजिबात धावपळ न होता नवरा, मुलं व्यवस्थित ऑफीसात आणि शाळेत जातात.  मनासारखा व्यायाम होतो.  आरशातली छबी सुद्धा बरीचशी बारीक दिसते.  तसं हे एकुलतं एक कारणही ब्रम्हानंद द्यायला पुरेसं असतं ती गोष्ट वेगळी ;) आवडत्या मैत्रिणीचा फ़ोन चांगला तासभर चालतो.  “सेल” ची बातमी कळते.  झक्कपैकी स्वयंपाक होतो.  मनसोक्त आंघोळ होते.  टिव्हीवरही आवडते कलाकार मनोरंजन करतात.  इतकंच काय तर नव-याचा ऑफिसमधून खास फोनही येतो.  खरं म्हणजे असा योग म्हणजे “कपिलाषष्ठी योग” असतो.  कारण इतर वेळी नवरा हापिसात प्रचंड बिझी असतो. 

एखादा दिवस फ़क्त सुखद धक्क्यांचाच असतो.  मग हसायला अगदी  कुठलंही कारण पुरतं :)   असं वाटतं… सारी दुनियाच आपल्यासोबत आनंदोत्सव साजरा करतेय.   असे दिवस मनाच्या कप्प्यात अगदी जपून ठेवायचे असतात आणि तसेच वारंवार जगायचे असतात. 

काही अंशी हे आपल्याच हातात असतं.  घडणा-या प्रत्येक गोष्टीत फ़क्त चांगल्याच बाजू बघायच्या.  थोडंसं कठीण जातं सुरवातीला……पण एकदा का सवय झाली ना…. की मनाला दु:ख  फ़ार तीव्रतेने जाणवतच नाही.  जगाकडे फ़क्त चांगल्याच नजरेनं बघता येतं.  समोरच्या व्यक्तीने कितीही दु:ख दिलं तरी तिला अगदी सहज माफ करता येतं आणि तिला त्यामुळे तितक्याच सहजतेने जिंकताही येतं. 

तुमचा हसरा चेहरा सुद्धा खूप काही जिंकून देतो.  कुठलाही द्वेष, राग, दु:ख ह्या स्मितात अगदी साखरेसारखे विरघळतात.  तुमच्या हास्यातून आजूबाजूला सुद्धा आनंद पसरतो आणि असा आपल्या हास्यातून पसरलेला आनंद उपभोगायला मिळण्यासारखं कुठलंच सुख नसतं.  या सुखाची तुलना जगातल्या दुस-या कुठल्याच सुखाशी होऊ शकत नाही.  “तुम हसो..तो ये दुनिया भी तुम्हारे साथ हसेगी”!!

कधी कधी राग येतोच.  आपली काहीही चूक नसताना…..आपल्यालाच जबाबदार ठरवण्यात येतं…. आपल्यावर अन्याय होतो.  मनाला दु:ख देणा-या गोष्टी तर घडणारच.  पण त्यामुळे आपला मूड किती खराब करायचा आणि आजूबाजूला किती निगेटिव्ह व्हायब्रेशन्स पसरवायची हे तर नक्कीच आपण ठरवू शकतो.  कधी कधी ज्या व्यक्तीमुळे त्रास होतो…..ती व्यक्ती सुद्धा कुठल्यातरी विचारात असते…. टेन्शन मधे असते….किंवा दु:खात असते…. त्यामुळे कुठेतरी तिचा राग निघतो….आणि समोर आपण असल्यामुळे अर्थात आपल्यावरच निघतो.  अशावेळी जरा संयम दाखवला तर सगळाच त्रास कमी होऊ शकतो आणि त्या व्यक्तीलाही त्याची जाणीव करुन देऊ शकतो.  नेहेमी तर ती अशी वागत नाही ना….. मग आजच ती अशी का वागतेय…. तिलाही दुखावणा-या गोष्टी कदाचित घडल्या असतील.  असा विचार जर प्रत्येकाने केला तर हे जग किती सुखी होईल !! 

आपल्यासोबत घडणा-या प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टीला आपण फ़क्त चांगल्या बाजूनेच बघितलं तर किती सोपं होईल जगणं.  ह्या अतिरेकी, दुष्टप्रवृत्ती सगळ्या एकदम दुबळ्याच होऊन जातील.  एकदा शांतपणे बसून नक्की विचार करायला हवा.  इतकं छोटंसं आयुष्य आहे आपलं.  एकमेकांचा राग, द्वेष करण्यात घालवायचं…..की सगळीकडे आनंद पसरवून त्या आनंदात सगळ्यांना सहभागी करायचं…… सगळं आपल्याच हातात असतं…. फ़क्त आपल्याच हातात असतं.  एकदा असा शुद्ध आनंद अनुभवून तर बघूयात…. पुन्हा राग, दु:ख आपल्याकडे फिरकणार सुद्धा नाहीत. 

तर या दीपोत्सवापासून करुया का सुरवात आपल्या आनंदोत्सवाची …… !!

निळ्या जळावर…माझा कवितेचा खो !!

सप्टेंबर 24, 2008 at 9:38 सकाळी | In गंमत जंमत, मराठी | 2 Comments

श्यामली….. तुझा खो घ्यायला बघ इतका वेळ लागला…… :)

मला बा.भ.बोरकरांची ही कविता इतकी आवडते ना…. निसर्गाची श्रीमंती तितक्याच श्रीमंती शब्दात रेखाटलीये त्यांनी ह्या कवितेत.

निळ्या जळावर कमान काळी
कुठे दुधावर आली शेते
थंडाव्याची कारंजीशी
कुठे गर्द बांबूची बेटे

जिकडे तिकडे गवत बागडे
कुठे भिंतीच्या चढे कडेवर
ती म्हातारी थरथर कापे
सुखांसवे होऊनी अनावर

तारांमधला पतंग कोठे
भुलूनी गेला गगनमंडला
फणा डोलवित झोंबू पाहे
अस्तरवीच्या कवचकुंडला

उंचवट्यावर म्हशी गोठल्या
तसेच कोठे कातळ काळे
वर्ख तृप्तीचा पानोपानी
बघून झाले ओलेओले

कुठे तुटल्या लाल कड्यावर
चपळ धीट बकरीची पोरे
एक त्यातले लुचे आईला
सटीन कांती गोरे गोरे

फूलपंखरी फूलथव्यांवर
कुठे सांडली कुंकुमटिंबे
आरस्पानी पाण्यावरती
तरत्या बगळ्यांची प्रतिबिंबे

कुठे आवळीवरी कावळा
मावळतीचा शकून सांगे
पूर्वेला इंद्राचे राऊळ
कोरीव संगमरवरी रंगे

घाटामध्ये शिरली गाडी
अन रात्रीचा पडला पडदा
पण चित्रांची विचित्रवीणा
अजून करते दिडदा दिडदा

बा.भ.बोरकर

सारंग…….तुला खो देतेय रे  http://praajakta.blogspot.com/

इडली, ऑर्किड आणि मी

सप्टेंबर 23, 2008 at 5:03 pm | In नुकतंच वाचलेलं, मराठी | 1 Comment

थोडंसं विचित्र नाव असलेल्या ह्या पुस्तकाबद्दल बरंच ऐकून होते. नावावरुन काहीच अंदाज येत नाही. पण हॉटेलवाल्या कामतांचं पुस्तक म्हणजे काहीतरी हॉटेलबद्दलच असावं असा अंदाज होता. लायब्ररीत शोधून पुस्तक घेतलं आणि वाचायला सुरवात केल्यावर पुस्तक हातातून ठेववेच ना…. अगदी एका बैठकीत वाचून संपवलं.

खूप सच्चाई, निरागसता आहे लिखाणात. सगळं अगदी आतून आलेलं आहे……जीवनातले सगळॆ उतार, चढाव अतिशय प्रामाणिकपणे लिहिले आहेत. लिहिण्याची शैली इतकी साधी, सोपी आहे ना……. की असं वाटतं की जणू ते मनमोकळ्या गप्पा मारताहेत आपल्याशी. वडिलांकडून वारश्याने आलेला हॉटेलचा व्यवसाय त्यांना काय काय देऊन गेला आणि काय काय ओरबाडून घेऊन गेला ह्याचं फ़ार सुरेख कथन केलंय त्यांनी. आनंदाचे, दु:खाचे प्रसंग, आई-वडीलांचे संस्कार आणि प्रेम, भाऊबंदकी, मैत्री, संसार, पत्नी, मुलं….. असा त्यांचा प्रवास सुरेख चितारलाय. आपण जणू त्यांच्या आयुष्यात घडलेल्या या सगळ्या प्रसंगात त्यांच्या सोबत आहोत असं वाटत रहातं. संपूर्ण लिखाणात त्यांचा “ऑर्किड” बद्दलचा अभिमान सतत जाणवतो. निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. ज्या कठिण प्रसंगातून त्यांनी आपला हा “ऑर्किड” घडवला….. आणि त्यानंतर जेव्हा त्यांना आंतरराष्ट्रीय पारितोषिकाने गौरवल्या गेलं……सगळंच कौतुकास्पद आहे. पुरस्कार सोहळ्याच्या आदल्या दिवशीची त्यांची ती रंगीत तालीम…… मानना पडेगा……इतका आत्मविश्वास……!! तो प्रसंग वाचतना अक्षरश: अंगावर रोमांच उभे राहतात !

पुस्तक वाचून संपलं की विठ्ठल कामतांशी काही तरी नातं नक्कीच निर्माण होतं.

आमच्या कुवेतच्या घरचा गणपती बाप्पा २००८

सप्टेंबर 7, 2008 at 1:22 pm | In कुवेत, मराठी | 1 Comment

श्रावण सुरु झाल्यापासूनच सणांची मज्जा सुरु होते.   ऊन-पावसाच्या खेळासोबतच श्रावण सोमवार, नागपंचमी, जन्माष्टमी, राखी…… कितीतरी सण आपण साजरे करतो.  श्रावण संपता संपताच बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु होते.   आम्ही लोक तर भारतवारी संपवून कुवेतच्या प्रवासाची तयारी सुरु करत असतो.  पण एकीकडे गणपतीसाठी काय काय करायचं ह्याचं विचारचक्रही सुरु झालेलं असतं.

ह्यावर्षीचा गणपती सुद्धा खूप सारा आनंद घेऊन आला.  ह्या बाप्पाच्या येण्याचा आनंदच काही और असतो.  काय काय सजावट करायची, काय काय प्रसाद करायचा, कुणाकुणाला बोलवायचं….. सगळं सगळं ठरवायचं असतं.  प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन काय करता येईल याचा विचार तर कायम सुरु असतो.

कुवेतला सुद्धा गणपतीची खूप धूम असते.  महाराष्ट्र मंडळाचा गणपती तर धडाक्यात साजरा होतोच पण घरोघरीही बाप्पाचं अगदी थाटात आगमन होतं.  मग काय दहा दिवस आरत्या, प्रसाद, भजनं……… नुसता जल्लोष असतो. 

आमच्या घरी बाप्पा पूर्ण दहा दिवस असतात.  कुणीतरी पाहुणा म्हणून येतो आणि अगदी घरचाच होऊन जातो.  पण दहाच दिवसांचा हा पाहुणा जाताना अगदी चुटपूट लावून जातो.  डोळ्यात पाणी आणतो प्रत्येकाच्या …..  अर्थात पुढच्या वर्षी येण्याच्या बोलीवरच सगळे त्याला निरोप देतात.

गणपती बाप्पाचं आगमन, तो आनंद, आणि निरोपाची ती हुरहुर… हे सगळं काव्यातून मांडायचा प्रयत्न केलाय मी…… !! मायबोलीच्या गणेशोत्सवात सुद्धा सामील झालो आहोत.  शब्दातून आणि गाण्यातून गणेशाचं आगमन इथे ऐका.

http://www.maayboli.com/node/3302

Blog at WordPress.com. | Theme: Pool by Borja Fernandez.
Entries and comments feeds.