With Every Separation……

ऑक्टोबर 3, 2008 at 1:39 pm | In मनातलं...!, मराठी | Leave a Comment

कालच कुठेसं ऐकलं….. टाटांचं एक वाक्य….. ”With every Separation, we die a little“  वाक्य मनात अगदी घर करुन राहिलं.  माझ्या डायरीत उतरवून घेतलं. 

खरंच नातं इतकं खोलवर रुजल्यावर जर कोणी ते मुळापासून उपटून टाकलं तर ते मरणारच.  आयुष्यात आपण कितीतरी नाती जोडत असतो….आपल्याही नकळत…. आणि ती जोपासतही असतो.  काही नाती वंशपरंपरागत चालत आलेली तर काही अगदी जाणीवपूर्वक निर्माण केलेली. जबरदस्तीने लादल्या गेलेल्या नात्यांच्या संदर्भात बोलायचं झालं तर ही नाती सुद्धा आपण निभावत असतोच …..फक्त त्या नात्यांबद्दल फारशा आशा, अपेक्षा नसतात.  केवळ कर्तव्यपूर्ती ह्या एकाच कारणाने आपण त्या नात्यासाठी बांधील असतो.

पण जेव्हा अगदी मनापासून जोपासलेली नाती मुळासकट बाहेर येतात…. त्यावेळी मात्र नक्कीच आतून काही तरी तुटत जातं….. कुठेतरी खोलवर……!!  हे नक्कीच थोडंसं मरणंच !!  अर्थात त्याचा होणारा त्रास त्या नात्याच्या  intensity वर अवलंबून असतो.  ही intensity सुद्धा स्वभावाप्रमाणे  बदलत जाते.  कोणी फारच गुंततो…. तर कोणी गुंतून सुद्धा ब-यापैकी कोरडा राहू शकतो.  पण नात्यातली फारकत म्हणजे कणाकणाने मरण हे नक्कीच.  आत काहीतरी उलथापालथ होतेच…….ते मान्य करा अथवा नाही. 

कधी कधी मृत्यु सुद्धा जबाबदार असतो अशा दुराव्याला.  आपल्या जीवलगाचा मृत्यु मुळापासून हलवतो.  इथे तर काळजाचा लचकाच तुटतो. 

कधी कधी परिस्थितीमुळे एकमेकांपासून दूर जावं लागतं.  विरहाचं दु:ख काहीतरी कुरतडत असणारंच……. त्याशिवाय का विरहातली कवनं हृदयाला भिडतात.  आतून काहीतरी तुटल्याशिवाय वेदना अशी शब्दातून बाहेर येऊच शकत नाही.  

नात्याच्या मरण्यानं पर्यायानं जर आपण सुद्धा  मरणाच्या जवळ जात असू……..तर का अशी नाती अकाली मारायची…… का स्वत:ला आणि दुस-यालाही या अकाली मरणाच्या जवळ नेत रहायचं.  याउलट आपल्याजवळचा आनंद, सुख, वेळ  देऊन ते नातं आणखी मजबूत केलं तर आपणच नाही का आपल्यासोबत जुळलेल्या प्रत्येक व्यक्तीला मरणापासून दूर नेऊ शकू.  शेवटी सुंदर जगण्याची व्याख्या काय…… आपलं सुख इतरांना देऊन…… त्यांच्या सुखात आपणही आनंद मिळवायचा.  प्रत्येक दोन व्यक्तीमधलं नातं जर इतकं सुरेख झालं……तर कशाला हवं ते तीळतीळ मरण… किती मधुर होईल हे जीवन !!

मनामनातील नाती फुलवू
हवे कशाला इतुके अंतर
प्रेम सिंचुनी जपू नात्यांना
जगणे होईल सुखी निरंतर

***********************************

Blog at WordPress.com. | Theme: Pool by Borja Fernandez.
Entries and comments feeds.