मुलखावेगळी माणसं

फेब्रुवारी 23, 2009 at 3:19 pm | In कुवेत, मराठी | 1 Comment

महाराष्ट्र मंडळाची मेल आली की फार उत्सुकता असते.  आता काय नवीन बघायला आणि अनुभवायला मिळणार….. ह्याचं कुतूहल कायम असंच राहणार…..नेहेमीसाठी.  कारण प्रत्येक वर्षी नवी कमिटी, नवा उत्साह, नवा जोश, नवी संकल्पना….. असं समीकरणच झालंय.  यावर्षीची कमिटी तर जुन्या, नव्या लोकांचा सुंदर मिलाफ आहे.  त्यामुळे सुरवात नक्कीच जबरदस्त असणार हे नक्कीच होतं.  झालंही अगदी तस्संच !!

दूरदर्शनच्या माध्यमातून जनमानसावर आपल्या शब्दप्रभूत्वाची छाप पाडणारे सुधीर गाडगीळ येणार असं एका सुरेख पत्रकानं सांगितलं.   त्यांना भेटलेली “मुलखावेगळी माणसं” ते आमच्यापुढे रंगवणार होते.  सूर्याच्या नव्या प्रवासासोबत आमचा ही २००९ चा प्रवास तीळाच्या स्नेहानं, गुळाच्या गोडीनं आणि सुधीर गाडगीळांच्या साथीनं अगदी जोशात होणार होता.

ती सुरेख सकाळ उजाडली.  सकाळी ९ वाजल्यापासून शाब पार्कच्या परिसरात रेशमी, हसरी सळसळ सुरु झाली आणि वाळवंटात मराठमोळा सुगंध पसरला.  पार्कच्या प्रवेशद्वारी सगळ्याचं अगत्याने स्वागत झालं.  हॉलमधे गेल्यावर हळदीकुंकू, तीळगुळाने गोड सुरवात झाली. ब-याच दिवसांनी एकमेकांना भेटत असल्यामुळे वातावरण चांगलंच गप्पिष्ट झालं होतं.  एकीकडे साड्‍या, दागिन्याची कौतुकं, तर दुसरीकडे रेशमी झब्ब्यांची गंभीर चर्चा !  त्यात सुधीर गाडगीळ कधी सामील झाले कळलंच नाही.  अतिशय साधं, लाघवी व्यक्तिमत्व, डोळ्यातली मिश्कीली मात्र अगदी तीच….!! इतक्या वर्षानंतरही हसूही तितकंच ताजं !  सगळ्यांशी अगदी आपुलकीनं बोलणं…. ! ३००० असामान्य लोकांना सामान्य लोकांपुढे बोलकं करणारा हा शब्दप्रभू इतका साधा असू शकतो ह्यावर विश्वासच बसला नाही.  कित्येकांनी त्या आठवणींना फोटोत बंदिस्त करुन घेतलं.

कार्यक्रमाला सुरवात झाली.  सांस्कृतिक सचिव प्रांजली ने नव्या कमिटीतर्फे सगळ्यांचं स्वागत केलं आणि नव्या कमिटीची सगळ्यांना ओळख करुन दिली.  अध्यक्ष सुरेश मराठेंच्या दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरवात झाली.  पाहुण्याचं स्वागत आणि त्यांची ओळख.  अश्विनी नं अतिशय सुरेख शब्दात गाडगीळांची ओळख करुन दिली आणि प्रेक्षकांना गाडगीळांच्या हातात सोपवलं.  त्यांनीही पुढचे दोन तास सगळ्यांना आपल्या भाषाकौशल्यानं अगदी गुंग करुन टाकलं.  अगदी पहिल्या वाक्यापासून त्यांनी जी पकड घेतली ती अगदी शेवटपर्यंत अजिबात सैल झाली नाही. 

ओघवती भाषा, प्रचंड आत्मविश्वास, समोरच्या प्रत्येक मनाचा ठाव घेणारी नजर…… सगळे मंत्रमुग्ध होणारच !! ह्या माणसाच्या स्मरणशक्तीचं मात्र फार कौतुक वाटलं.  किंबहुना ह्या विलक्षण शक्तीच्या जोरावरच त्यांनी इतक्या लोकांच्या ओळखी स्वत:जवळ बांधून ठेवल्या आहेत.  हजरजवाबी असणं हे मुलाखतकाराचं वैशिष्ट्‍य गाडगीळांमधेही आहेच पण त्याच्या हजरजबाबीपणात त्यांचा जबरदस्त अभ्यासही दिसतो.  इतक्या मोठ्‍या लोकांना बोलकं करायचं….. सगळं काढून तर घ्यायचं पण अगदी खेळकर वातावरणात.  राजकारणपटू, अभिनेते, गायक, कलाकार…..सगळेच लोकांवर अधिराज्य गाजवणारे.  सामान्य माणसांना त्याबद्दल कुतूहल असणारच.  ते कुतूहल शमवावं तर गाडगीळांनीच.  मुलाखतकार कसा असावा ह्याचं सुधीर गाडगीळ मूर्तीमंत उदाहरण आहेत.  

त्यांना भेटलेली मुलखावेगळी  माणसं फ़क्त उच्च वर्गातली नाहीयेत.  आजूबाजूची माणसं बघतांनाची त्यांची नजरच वेगळी आहे आणि त्यामुळेच सामान्यातला असामान्य पैलू ते बघू शकतात आणि शब्दसामर्थ्यामुळे लोकांपुढे तितक्याच ताकदीने मांडू ही शकतात.  त्यांनी सांगितलेले खुसखुशीत  किस्से सगळ्यांनी अगदी तस्सेच अनुभवले त्यांच्या शब्दातून.  बाकीचं कुतूहल पण प्रश्न विचारुन लोकांनी शमवून घेतलं.  ही शब्दांची मैफल एक आगळाच अनुभव आणि आनंद देऊन गेली.

दीर्घकाळ स्मरणात राहिल असा कार्यक्रम अनुभवायला दिल्याबद्दल महाराष्ट्र मंडळाचे शतश: धन्यवाद !

१ प्रतिक्रिया »

RSS feed for comments on this post. TrackBack URI

  1. EK NUMBER


यावर आपले मत नोंदवा

XHTML: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <pre> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>

Blog at WordPress.com. | Theme: Pool by Borja Fernandez.
Entries and comments feeds.