काल जीवाला अजिबात चैन नव्हती…….मन कशातच लागत नव्हतं. काही वाचायला सुद्धा शांत मन नव्हतं….. जीवाची उलाघाल होत होती. अशातच “आघात” हा सिनेमा बघितला. मनाच्या अशा अवस्थेत बघितल्यामुळे का काय……..सिनेमा अक्षरश: अंगावर आला.
एक अतिशय निर्लज्ज, नीच माणूस फक्त आणि फक्त आपल्या इगोसाठी, पैशासाठी निष्पाप लोकांच्या आयुष्याशी खेळतो…… स्वत:च्या हट्टापायी अनेक लोकांची आयुष्यं उध्वस्त करतो, ते ही निगरगट्टपणे….. कुठलाही गिल्ट न ठेवता. विक्रम गोखल्यांची अशा या नराधम डॉक्टर खुरानाची भूमिका अंगावर काटा आणते. या खुरानाची इतकी चीड येते की त्याक्षणी त्या माणसाला गोळ्या घालाव्याशा वाटतात.
संगीता प्रधान…..एक गोड तरुण मुलगी, जेमतेम एका महिन्यावर आलेलं लग्न…..डोळ्यात खूप सारी स्वप्नं….स्वप्नातल्या राजकुमाराशी ठरलेलं लग्न…….आणि अचानक तिच्या आयुष्याची झालेली मोडतोड….तिच्यावर लादण्यात आलेलं वांझपण…….परिस्थिती कळल्यानंतर तिला बसलेला धक्का, होणार्या नवर्याचं जाणवलेलं खरंखुरं प्रेम….. ढळलेला मानसिक समतोल ह्या सगळ्या अवस्था अतिशय परिणामकारक मांडणारी कादंबरी कदम………….लाजवाब !!
आणि मुक्ता बर्वे…….. काय बोलावं ह्या मुलीबद्दल……!! आपण तर तिच्यावर एकदम फिदा !! कसला अभिनय करते ही…….. अभिनय कसला….. एकेक भूमिका चक्क जगते ती !! जोगवा असो की पुणे-मुंबई-पुणे असो….. की आघात…….. ही आपली त्या त्या भूमिकेत अगदी फिट्ट !! डोळे तर असले बोलके की असं वाटतं आत्ता शब्द बाहेर पडतील….डोळ्यातूनच !! संगीताशी बोलतांनाची हळवी स्मिता, आपल्या सच्च्या निर्णयाशी ठामपणे कायम राहणारी स्मिता, डॉक्टर प्रियकराला समज देणारी परखड स्मिता, आपल्या मित्र असलेल्या डॉक्टर बुधकर ने तिला समजून न घेता तिच्या विरुद्ध साक्ष दिल्यानंतरची विद्ध झालेली स्मिता….. तिच्या लढ्यात अचानक एकटं पडल्याची जाणीव झाल्यानंतरची आईशी बोलणारी व्याकुळ स्मिता……. कमाल………….फक्त कमाल केलीये मुक्ता बर्वेनी !!
डॉक्टर म्हणजे देवच………ह्या समीकरणावर मनापासून विश्वास असलेल्या लोकांचे डोळे खाडकन उघडणारी ही कथा……. कित्येक ठिकाणी प्रत्यक्षात घडतेय. अशा माणुसकीला काळिमा फासणार्या डॉक्टरांना शासन जर करायचं असेल तर एका सामान्य माणसाच्या हातात काहीच नसतं हे प्रकर्षानं जाणवलं. पण स्मिता देशमुख सारखी त्यांच्यातलीच जिवंत मन असलेली डॉक्टरच खूप काही करु शकते हे ही कळलं.
आवर्जून बघावा असा चित्रपट !
एक परिपूर्ण…..अप्रतिम कलाकॄती……..!!
निश्चित बघायला हवीये ही कलाकृती… आणि मुक्ताबद्दल बोलायचं तर अगं ’धोबीपछाड’ मधली अर्थ नसलेली भुमिका सुद्धा तिच्यासाठी म्हणुन पुन्हा पहाविशी वाटते … खरय तुझं जगते ती एकेक भुमिका अक्षरश:!!
नक्की वेळात वेळ काढून बघ !! तू मुक्ता बर्वेच्या पुन्हा प्रेमात पडशील
मीही पहिला आहे ,खूप छान आहे ,मुक्ता मलाही आवडते ! छान वाटले लेख वाचून !
धन्यवाद गीतांजली
छान परीक्षण, जयू! नक्की पाहणार चित्रपट!
मी पण मुबचा पंखा आहे!
अभिजीत…… शुक्रन
आता मुक्ता बर्वेच्या फॅन क्लब मधे नाव घालायलाच हवं