खरं तर एक वेगळंच पुस्तक वाचत होते पण कधी कधी एखादं पुस्तक हातात येतं आणि आपण तेच आधी वाचून संपवतो किंबहुना त्या पुस्तकाची जादू आपल्याला तसं करायला भाग पाडते.
कुमठेकरांनी “झुळूक अमेरिकन तोऱ्याची ” हे शरद वर्दे ह्यांचं पुस्तक दिलं आणि फक्त मनोगत आधी वाचूया असं ठरवलं. पण छे….. पुस्तक पूर्ण होईस्तोवर खाली ठेवंवलंच नाही.
खुमासदार शैलीत अमेरिकेचा तोरा वाचतांना मज्जा वाटली. कितीही नाकारलं तरी अमेरिकेबद्दल मनात कायम असूया असतेच. पूर्ण जगावर असलेला त्यांचा पगडा, त्यांची दादागिरी, त्यांचा डॉलर, त्याची वाढणारी किंमत…..अशी आणि आणखी कितीतरी कारणं आहेत. असं असलं तरी आयुष्यात एकदा तरी अमेरिकेत जाऊन यायलाच हवं हे मनातून सगळ्यांनाच वाटत असतं आणि ह्या वाटण्यातून जेव्हा अमेरिकेत जायला मिळतं…… तेव्हा तिकडल्या सोयी, गैरसोयी त्यामुळे उडालेली तारांबळ ह्याची गंमत लिखाणातून वाचतांना मजा येते. त्यातून शरद वर्दे ह्यांच्यासारखा प्रतिभासंपन्न लेखक असेल तर विचारायलाच नको.
अमेरिकेत बोलली जाणारी भाषा, त्याचं खाण-पिणं, त्यांचे कपडे, त्यांच्या गाड्या, त्यांचं वागणं, त्यांचे नियम ह्यांचं वर्णन तर जबरी आहेच पण त्यात भरडले जाणारे पर्यटक, त्यांची फजिती…… ह्याचं वर्णनही फार रंजक आहे. पुढे काय, पुढे काय….. असं करत करत पुस्तक संपतं सुद्धा
लेखक खरं तर ऑफिसच्या कामासाठी अमेरिकेच्या वाऱ्या करतो. ऑफिसची कामं करतांना आणि त्याव्यतिरिक्त उरलेल्या वेळात त्यांना जे काही अनुभव आलेत ते त्यांनी फारच खुसखुशीत करून सांगितले आहेत. तिथे स्थायिक झालेले त्यांचे नातेवाईक, मित्र…… ह्यांच्या अमेरिकेच्या संस्कृतीमुळे प्रयत्नपूर्वक बदललेल्या सवयी, वागणं, बोलणं आणि त्यामुळे लेखकाची उडालेली त्रेधातिरपीट….. आपल्याला गालातल्या गालात हसवते.
पुस्तकातली रेखाटनंही अप्रतिम !! त्याने गंमत अजून वाढलीये.
काहीही असो…….. अमेरिकेची क्रेझ अजूनतरी आहेच. त्यामुळे लिखाण अतिशय ताजं वाटतं. एकदातरी वाचावं असं पुस्तक.
आवर्जून पुस्तक वाचायला दिल्याबद्दल कुमठेकरांचे खूप खूप आभार
नमस्कार..!!
तुम्हाला जर असे वाटत असेल कि जर तुम्ही काहीतरी लिहु शकता उदा- एखादा लेख अथवा विनोद अथवा एखादी कविता किवा एकदा विनोदी फोटो काढू शकत असाल म्हणजेच कोणतेही कलागुण तुमच्यामध्ये असतील तर आम्ही तुमच्याच शोधात आहोत. तुम्ही आपले कलागुण डिजिटल मराठी वाचनालयाच्या पटलावर मांडू शकता तेही अगदी मोफत.
अधिक माहितीसाठी हे पहा
http://dyankosh.blogspot.com/p/blog-page_9730.html
पुस्तकाच्या लेखकाचे नाव “शरद” वर्दे आहे. याच लेखकाचे “फिरंगढंग” हे युरोपिअन लोकांवरील पुस्तकही वाचून बघा. तेही तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे.
ओह…… तुझं बरोबर आहे अपूर्व ……. लिहिण्याच्या नादात चुकलेच(जीभ चावलेली बाहुली)
आता हे “फिरंग ढंग” वाचावंच लागणार