संतूरच्या सुरांनी दरवळलेली एक संध्याकाळ ….. कुवेतच्या वाळवंटात एक सुखद, तरल, गोड झुळूक !!
संतूर हे वाद्यच मुळी अतिशय आनंदी आणि Romantic आहे आणि ते वाजवणारे जर साक्षात पंडित शिवकुमार शर्मा असतील तर……. ह्याहून जास्त कुणी काय अन् कशाची अपेक्षा करेल …. ?
मंचावर ७४ वर्षे वयाचा अतिशय देखणा तरुण ……. आपल्या सुरांनी समोर जमलेल्या प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेतो. तरुणाई अजून वेगळी काय असेल ? कमालीचं आकर्षक व्यक्तिमत्व लाभलेले शिवाकुमारजी आपल्या आदबशीर बोलण्यानं मैफिलीची सुरवात करतात. फक्त कान नाही तर डोळे सुद्धा आसुसून वाट बघायला लागतात. काय पेश करणार आहेत ते छानपैकी समजावून सांगतात. साथीला तबलजी पंडित रामकुमार मिश्रा आणि तानपुऱ्यावर जपानी शिष्य ताकाहीरो अराई !!
पहिला भाग फक्त क्लासिकल …..शास्त्रीय. राग वाचस्पती……हळूहळू संतूर बोलायला लागतो ….. गायला लागतो, दरवळायला लागतो आणि बघता बघता स्वत:चं साम्राज्य उभं करतो आणि प्रत्येकाला स्वत:च्या पाशात बांधायला लागतो. भान येतं तेव्हा मध्यांतर झालेलं असतं. शब्दात काय वर्णन करणार…… ते अनुभवायलाच हवं. मध्यांतर होता होता पंडितजी धीरगंभीर आवाजात कलेची तारीफ कशी करायची ते सांगतात. ताली बजाने के सिवा और भी तरीके होते है तारीफ करनेके !! मग मिश्कील स्वरात म्हणतात, “बहोत खूब “, “क्या बात है”, “वाहवा”…….. ऐसी भी नजाकत भरी तारीफ कर सकते हो !! दुसऱ्या भागात इसी प्रकार की तारीफ सुनना ज्यादा पसंद करुंगा….. !!
एक छोटा म्हणता म्हणता एका तासाचा झालेला ब्रेक, चहा, बिस्किटं….. गप्पा…..!!
पुन्हा एकवार तशीच बैठक…. !! आता थोडं सेमिक्लासिकल !! राग पहाडी…….!! रागातले सूर ……. सुरावट…… रागाचा विस्तार ….. हळूहळू रागाची ओळख, मग मैत्री, पुढे पुढे तर जिगरी दोस्तीच होते. सूर इतके ओळखीचे होतात की नकळत आपणही गुणगुणायला लागतो. आता संतूर अगदी रंगात आलेला असतो. बोटं जादूसारखी फिरत असतात……तबलाही मस्तीत येतो……. वेग वाढतो, श्वास वाढतो…..आवेग वाढतो…….. सूर अगदी टिपेला पोचतात…… श्वास रोखल्या जातो….. आणि तिहाई होऊन संतूर विसावतं. टाळ्यांचा गडगडाट………कितीतरी वेळ……!! पंडितजींचा भावपूर्ण सत्कार !! मंत्रमुग्ध श्रोते……. नकळत उभे राहतात……..पुन्हा एकवार टाळ्या ….. !!
संपली मैफिल ………नाही नाही…….अजूनही डोक्यात तेच सूर आहेत …. तीच नशा …. उतरायला वेळ लागणारच !!

excellent.very well said.
शुक्रिया
Wah bhai Wah..
Really treat to read as the programme itself.
Nice narration..
Congratulations..
Regards..
धन्यवाद कुमठेकर
खरंच काय मस्त संध्याकाळ होती ना ती !!
सुपर लाइक.. माझी इच्छा आहे एकदा ऐकायची. यांच्या दोन सिडी आहेत संग्रही.
पण लाइव्ह ऐकण्याची गम्मतच निराळी.
शुक्रन महेंद्र
लाईव्ह ऐकणं वेगळंच !! त्यात तबल्यावर झाकीर हुसेन असले तर आपल्यासारखे भाग्यवान आपणच