थोडं आश्चर्यच वाटतं ना….! वाळवंटात आणि पाऊस…..? पण पडतो होऽऽऽऽऽऽऽ वाळवंटात सुद्धा पाऊस पडतो. सौदीमधे फ़ारच कमी अनुभवला पाऊस. फ़क्त एखादी सडा शिंपल्यासारखी सर. बास….! पण इथे कुवेतला मात्र भरपूर पाऊस पडतो. पण आपल्यासारखा पावसाळ्यात नाही हं. तो आपली हजेरी चक्क हिवाळ्यात लावतो.
इथे तसे फ़क्त दोनच ऋतू असतात. कडक उन्हाळा आणि कडक हिवाळा. पण इतक्यात पाऊस पण आपलं चांगलंच अस्तित्व दाखवायला लागलाय. पण फ़ारच आगंतुकासारखा येतो. आपल्या देशातला पावसाळा कसा दिमाखात येतो ना……..! म्हणजे अगदी ७ जून पासून सगळी त्याची वाट बघतात. थोडंसं तरसवून…आपल्याच मिजासीत येणारा पाऊस कसा अगदी देखणा असतो! उगाच नाही इतक्या कवींनी त्याच्यावर इतकं कवनं रचलीत. आपल्याकडला पाऊस…..त्याच्या दिमतीला असणारा अल्लड वारा….. सौदामिनीचा चंचल पदन्यास आणि सगळ्यात मनमोहक त्यानं ताणलेलं सप्तरंगी इंद्रधनुष्य ! सगळंच कसं एकदम राजेशाही !
त्या तुलनेत इथला पाऊस अगदीच भिकार. “आला माझा माहेरचा वैद्य…..आणि कसा माझा सासरचा वैद्य” ह्या दोन्हीतला फ़रक माहीती आहे ना……! एकतर हिवाळ्याचं साम्राज्य असताना लुडबुड करायची. उगाच आपलं अस्तित्व दाखवायचा दुबळा प्रयत्न करायचा. इथल्या कडाक्याच्या थंडीतला हा पाऊस अगदीच नकोसा वाटतो. आपण कोणाला नको असतांना यायचंच कशाला…..? कशाला करायचा तो लाळघोटेपणा. म्हणूनच इथल्या पावसाचं कोणाला महत्वच नाहीये. येतो तेव्हा बोचरे वारे सुद्धा घेऊन येतो. हिवाळ्यात आधीच सगळं थंडावलेलं. त्यात हा पाऊस आणखीनच थंडावतो सगळं. खरं म्हणजे इथल्या लोकांना पावसाशिवाय राहण्याची सवय झालेली. रस्त्यांचं डिझाइनच मुळी पावसासाठी नाहीये. drainage वगैरे कशाचीच सोय नाही. त्यामुळे सगळं पाणी तुंबून राहतं. बरेचदा Vacuum नं ते पाणी काढावं लागतं.
आम्ही ह्या पाच वर्षात पावसाला खूप बदललेलं बघितलंय. आधी ह्याचं रुप अगदीच लाजिरवाणं होतं…..पण इतक्यात बरंच बाळसं घरलंय बेट्यानं. आजकाल चांगलाच कोसळतो. मागच्या वर्षी तर एक दिवस कहरच झाला. चक्क Cloud Burst !!! सकाळी ७ वाजता सुद्धा अचानक रात्रीसारखा अंधार पडला आणि पाऊस आडवा-तिडवा कोसळायला लागला. “मुसळधार” चा शब्दश: अर्थ कळला. सगळीकडे एकच गोंधळ……. रस्ते सगळे जॅम. मोबाईल्सचं नेटवर्क जॅम….. सगळीकडे सुट्टीच द्यावी लागली. घरी परत यायलाच किती वेळ लागला. तर…..अशा काही गमती जमती होतात… 🙂 एकदा तर चक्क गाराही पडल्या. संध्याकाळी अचानक भरुन आलं….. आणि लगेच ताड ताड गारा पडायला लागल्या. आम्ही सगळे खाली….गारा वेचायला 🙂
पण काहीही म्हणा….. आपल्याकडला पाऊस हा खरा पाऊस! इकडला पाऊस म्हणजे वाघाचं कातडं पांघरलेला गाढव…..उंट म्हणा हवं तर…………. 🙂
वा! मजा आली कुवेती पावसाचे वर्णन वाचून ! उपमा बाकी झकास आहेत वापरलेल्या!
nothing like rains in The Sahadries
छान वर्णन आहे. विविध प्रांतातील पावसाळे निराळे असू शकतात ही कल्पनाच नव्हती.
मी तुझ्या पेक्षा जास्त पावसाळे पाहिले आहेत असे तुला मला सांगण्याचा पूर्ण अधिकार आहे! 🙂