Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for एप्रिल 2nd, 2021

गोदातीर्थ समूहाच्या वारीत सहभागी असल्याचं समाधान आणि सार्थ अभिमान !!

रसिकजनहो नमस्कार,वृत्तबद्ध कवितेसाठी वाहून घेतलेल्या *’गोदातीर्थ’* या समुहाच्या औपचारिक स्थापनेस दोन वर्षे पूर्ण होत आहेत. हा काळ केवळ दिवस, महिने आणि वर्ष यात मोजला जाणारा नाही, हा प्रवास लघु-गुरूंची ओळख ते वृत्तबद्ध कवितेचे उपक्रम असा नाही, ही वाट कोण्या एकासाठी सुरू झालेले नाही, हा कोणताही ‘कोर्स’ नाही किंवा एका पाठोपाठ विद्यार्थ्यांना ‘तयार’ करणारा झटपट अभ्यासक्रम नाही. ही साधना आहे. हा अभ्यास, ध्यास, सायास आणि गुणवत्तेचा किचिंतमात्र अट्टहाससुद्धा आहे. अनेकांच्या मेहनतीचा, कष्टाचा आणि सातत्याचा परिपाक आहे. ‘गोदातीर्थ’ची ही वाटचाल तुम्हा सर्व रसिकांसमोर उलगडावी आणि आम्हाला आमचा प्रवास या वळणावर पुन्हा एकदा पाहता यावा, त्याचा अदमास घेऊन नव्या दमाने पुढे जाता यावं, यासाठी सानंद सादर करीत आहोत… *गोदांश… ओंजळ वृत्तबद्ध काव्याची* काही मिनिटांच्या या माहितीपटात आम्ही समुहाची माहिती थोडक्यात देण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपण आवर्जून हा माहितीपट पाहावा… आपले अभिप्राय, दाद आणि सूचना नेहमीप्रमाणे स्वागतार्ह आहेतच. – *’गोदांश’ टीम* *(गोदातीर्थ समूह*)

Read Full Post »

पाहिले मी तुला, तू मला पाहिले
प्रीतिचे कोवळे, बीज अंकूरले
आणभाका दिल्या, जीव आसूसले
आर्जवी बोलणे, लाघवी भासले

सोबती राहणे, गोड जे वाटले
सोबती राहता, ते कडू जाहले
प्रेम जे वाटले, ओसरू लागले
प्रेम होते कसे, आकळू लागले

पाशवी पाश ते, आवळू लागले
रंग स्वप्नातले, काजळू लागले
संयमी बांध ते, कोसळू लागले
दु:ख डोळ्यातुनी, पाझरू लागले

खेळ होता तुझा, मी तुझे खेळणे
हार माझी सदा, नी तुझे जिंकणे
रोजची भांडणे, तेच संतापणे
रोज खंतावणे, रोज कोमेजणे

संशयी कोष तू, भोवती आखले
श्वास मी ना कधी, मोकळे घेतले
हाय मी पोळले, हाय आक्रंदिले
भोग माझे जणू, सोसले, भोगले

दूषणे, टोमणे, मी किती ऐकले
मी बिचारी कशी, एवढी जाहले
बंध मी कोरडे, तोडुनी टाकले
मोडला डाव मी, मोकळी जाहले

एकटी मी अता, एकटे चालणे
एकटीने नवे, डावही मांडणे
भासले ना कधी, कोणतेही उणे
होय स्वीकारले, एकटे मी जिणे

जयश्री अंबासकर

ही कविता माझ्या आवाजात तुम्हाला Youtube वर ऐकता येईल.तुम्हाला कविता आवडली तर नक्की Like, Comment आणि Share करा आणि अशाच आणखी कविता ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनेल ला नक्की Subscribe करा.

Read Full Post »

%d bloggers like this: