Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for मे, 2021

वृत्त – पृथ्वी
लगालललगा लगालललगा लगागालगा

कधी तिमिर दाटतो गडद होउनी अंतरी
उगाच हळव्या मना विकल होउनी पोखरी
हताश हरल्या मनास नसते उभारी मुळी
मना बिलगती निराश ढग साचते काजळी

जुन्याच जखमा करून उघड्या रडावे किती
उगाच खपल्या पुन्हा उकरुनी बघाव्या किती
तसेच कवटाळणे परत त्याच दु:खास का  
अशाच परिघातुनी सतत तू फिरावेच का

जरा उघड कोष तू विहर या नभी मोकळ्या
जरा उमलू दे, पुन्हा बहरु दे तुझ्याही कळ्या
असेल जपला कधी कवडसा पहा शोधुनी
दिसेल हसरी तुझीच प्रतिमा तुला दर्पणी

जयश्री अंबासकर

खाली दिलेल्या लिंकवर ही कविता माझ्या आवाजात ऐकता येईल

Read Full Post »

वनहरिणी वृत्त

मात्रा- ८+८+८+८

राजाबाई

बेल वाजली दारावरची, एके दिवशी व्यस्त सकाळी
दार उघडता उभी समोरी, देहाची अवघडुनी मोळी
बांधा नाजुक वर्ण गव्हाळी, अंगावरती साडी चोळी
केविलवाणी, तरी हासरी, नजर विलक्षण सात्विक भोळी

वात्सल्याची मूर्ती आम्हा, देवाने पाठवली होती
सेवाभावी राजाबाई, आईसाठी आली होती
शांत संयमी वावरतांना, प्रसन्न मुद्रा कायम होती
मृदू बोलुनी, गोड हासुनी, मन आईचे जिंकत होती

जरी वयाने लहान होती, काळजात पण माया होती
जीव लावुनी घरास साऱ्या, घरातली ती झाली होती
अति मायेने न्हाऊ माखू, आईला ती घालत होती  
पुरवुन आईचे डोहाळे, माय जणू ती झाली होती

सहज अचानक एके दिवशी, कथा तिची ती सांगत गेली
मूल होइना म्हणुन खुशीने, केली सवतीला घरवाली
सवत, शेज अन नवरा सोडुन, चूल मूल अन घर सांभाळी
आभाळासम कवेत घेई, सारे घरटे पंखाखाली

गतजन्मीचे तर नव्हते ना, बंध रेशमी हे जुळलेले
ऋण कोणाचे कोणावरती, ना कोणाला ते आकळले
सहवासाने तिच्या लाघवी, दुखणे सारे सुसह्य झाले
गोड आणखी लेक मिळाली, सूर तिच्याशी सुंदर जुळले

समाधान अन तृप्ती घेउन, एके दिवशी आई गेली 
होउन व्याकुळ आईसाठी, हमसाहमशी ती ही रडली
कोण, कोठुनी घरात आली, आपुलकीने अमुची झाली
मनीमानसी सन्मानाने, राजाबाई आम्ही जपली

जयश्री अंबासकर

ही कविता खाली दिलेल्या लिंकवर माझ्या आवाजात ऐकता येईल.

Read Full Post »

3.1 K Views……….. !!!

Excited to share yet another Beautiful song with My Favorite Singer, Composer Nikhil Iyer

English Lyrics written by Nikhil.

Hindi Lyrics written by Me Jayashree Kulkarni Ambaskar

Everytime Nikhil comes out with something new.

So…here we go… !!

पल यही खास है…

Read Full Post »

वृत्त भवानी
मात्रा – २ ८ ८ ८ ४

ही रात्र संपली आहे पण मग जाग अजुन का नाही
गात्रात पेरलेली मदहोशी ओसरली का नाही
डोळ्यात नीज पण गंधित सळसळ अजुनी चंदन देही
बेहोश धुंद चांदणे अंतरी तसेच चमकत राही

त्या निशाकराचे संमोहन सारून जरा बघ आता
किलबिलत गोड पाखरे सांगती जगी उषेची वार्ता
प्राजक्ताने बघ कूस बदलुनी सडा घातला दारी
उचलून चांदणे चंद्र बिचारा फिरला बघ माघारी

कोकीळ घालतो चराचराला मधुर बसंती हाळी
चैतन्य पालवी मोहरून सृष्टीवर चवर्‍या ढाळी
तो झेलत चंचल पहाटवारा हसतो पिंपळ गाली
जमलेली मैफिल पारावरची बघतो वाकुन खाली

रविकिरणे बघ ना किती प्रफुल्लित राजस सोनसकाळी
प्राजक्त मौक्तिके श्वेत केशरी ओघळती मखमाली
देऊन अर्घ्य तू स्वागत कर तेजस्वी नवसूर्याचे
श्वासात तजेला भरून गा तू, गीत नव्या स्वप्नांचे

जयश्री अंबासकर

#गोदातीर्थ_काव्यसाधक

ही कविता तुम्ही माझ्या आवाजात खाली दिलेल्या लिंकवर ऐकू शकता.

Read Full Post »

सिक्कीमायण

ट्रिपच्या सुरवातीलाच बागडोगरा विमानतळावर आम्हाला पाऊण तास तिष्ठत ठेवणारा “प्रवेश”, दार्जिलिंग, पेलिंग आणि गंगटोक फिरवताना आमचा छान दोस्त झाला. दार्जिलिंगचा गच्च गर्दीतला, मुसळधार पावसातला अरुंद रस्ता असो की दार्जिलिंग ते पेलिंगचा आणि पुढे गंगटोक चा भयंकर खराब रस्ता असो… ह्या मुलाने फारच कौशल्याने गाडी चालवली. इकडले सगळे रस्ते अतिशय खराब आहेत. शिवाय संपूर्ण रस्ता घाटातूनच…. !! रस्ते इतके अरुंद तरीही वाहतूक मात्र दुहेरी ! इतकी खडखड की शरीरातली सगळी हाडं न् हाडं खिळखिळी होतात. आम्ही दोघेही गाडीत समोरच्या सीटला गच्च पकडून बसायचो. हात सोडले की गचके… !! अशा रस्त्यावर गाडी चालवताना सुध्दा हा मुलगा कधी पायी चालणा-या मुलांना प्रेमाने टाटा करायचा तर कधी मुसळधार पावसात मुलांना आपल्या गाडीत घ्यायचा. जाता येतांना भेटणारे सगळे लोक ह्याचे मित्र. कुठे खायला प्यायला न्यायचा… तिथेही ह्याच्या मैत्रिणी… !! बोलायला मस्त आणि डोक्याने अतिशय तल्लख ! इतक्या भयंकर रस्त्यावरुन लीलया गाडी चालवताना तो आमचा हिरो कधी झाला कळलंच नाही.

असाच पेलिंगच्या होटलचा “प्रयास’, पेलिंग दाखवणारा “संजय बहादुर”, गंगटोक फिरवणारा “दुवा” आणि आमचे कौतुकाने फोटो काढणारा आणखी एक ड्रायव्हर “नबीन”, गंगटोकच्या होटलमधला गायक अशी आपली खास छाप सोडणारी फार छान मंडळी भेटली. नथुला पासला जाताना आम्हाला प्रेमाने मोमोज खाऊ घालणा-या “Sisters Cafe” चालवणा-या दोघी बहिणीसुध्दा फार गोड होत्या.

ह्या भागातली सगळी लोकं खूप अदबशीर आणि आतिथ्यशील आहेत. आयुष्याकडून फार काही अपेक्षा नसल्याने खुशमिजाज ! कष्टकरी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना स्वत:च्या जागेचा प्रचंड अभिमान आहे. इथे चो-यामा-या अजिबात होत नाही हे ते छातीठोकपणे सांगतात.

आपल्या छोट्याशा जगात खुश राहणारी लोकं आवडून जातात. कदाचित म्हणूनच निसर्गाने त्यांना हातचं काहीही न राखता भरभरून दिलंय.

Read Full Post »

Older Posts »

%d bloggers like this: