Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘कथेचं गाव’ Category

ती उठून बाहेर आली.  लख्ख उजेडामुळे तिचे डोळे दिपले…….पण मग त्या प्रकाशाचं महत्व कळलं.  कित्येक दिवसांपासून ती अंधाराच्या साम्राज्यात वावरत होती. अंधाराच्या लाटांमधे गुदमरत होती.  तिने मनातले सगळे काळेकुट्ट विचार झटकले आणि तिला एकदम मोकळं मोकळं वाटलं.  कित्येक दिवसांची मनावर जमलेली कानाकोपर्‍यातली जळमटं निघाल्यामुळे तिचं तिलाच उत्साही वाटायला लागलं. किती दिवस साठवून ठेवलं होतं आपण हे सगळं…..!!  कोंदटलेल्या मनाला जरा ऊन दाखवल्याबरोबर  पुन्हा एकदा सगळं टवटवीत झालं. आजूबाजूचा कचरा साफ केल्यावर परत तीच झळाळी दिसायला लागली आणि नव्याने सगळं सुंदर दिसायला लागलं.

नकोच आता तो कोंडमारा….. आतापर्यंत झालं तितकं पुरं झालं…आपल्यालाही स्वतंत्र अस्तित्व आहेच की ! नव्या जगण्याचा तिला पुन्हा एकवार मोह झाला.  सगळं नव्याने सुरु करुया.  नवी विटी, नवं राज्य !!  पुन्हा एकदा आपलं नवं अस्तित्व तयार करायचं.  पण मग त्यासाठी हे गाव कशाला…. करुया एखाद्या छोट्याशा अनोळखी गावापासून सुरवात !  जिथे आपल्याला कोणीच ओळखत नाही त्या गावात नक्कीच जास्त सुरक्षित वाटेल.  तिने जुजबी सामान सोबत घेतलं आणि निघालीसुद्धा.

बसस्टेशनवर आज काही फार गर्दी नव्हती.  तिने माहित नसलेलं गाव निवडलं, तिकीट काढलं आणि बसची वाट बघत बसली.  मन अगदी कोरं करकरीत झालंय असं तिला वाटलं.  पण नाही….असं कधी शक्य असतं का ….!! अशी मनाची पाटी पुसून कोरी करकरीत करता येते……??  बस आल्यावर ती बसमधे चढली मनासारखी खिडकीतली जागा मिळाली आणि सुरु झाला प्रवास एका अगदी अनोळखी वाटेनं !

गार वारा चेहेर्‍यावर घेत ती खिडकीतून बाहेर पाहू लागली.  मागे पळणारी झाडं बघून ती अस्वस्थ झाली.  प्रत्येकाचा प्रवास पुढच्या दिशेने सुरु असतो पण आपण मात्र फक्त त्याच्यासाठी असा उलट प्रवास स्विकारला.  त्याच्या गतीशी जुळवण्यासाठी आपला वेग कमी केला.  वाटलं…. आता सगळं ठीक होईल पण नाही….. त्याने चालणंच थांबवलं.  त्यामुळे तिलाही थांबावं लागलं.  थोडी विश्रांती घेतल्यावर पुन्हा चालूया….ह्या आशेनं तीही त्याच्यासोबत रेंगाळली.  काही दिवस असेच आंजारण्या-गोंजारण्यात गेले.  पण हा ढिम्म….!! हात –पाय हलवायलाच तयार नाही.  अपयशाने इतकं खचून जाण्यालायक काहीच घडलं नव्हतं.  त्याच्या लायकीप्रमाणे त्याला काम मिळत नव्हतं आणि लायकी पेक्षा खालचं काम करायची त्याची तयारी नव्हती आणि मग शेवटी जो काय मार्ग निवडला तो बघून तिला त्याची किळस वाटायला लागली. त्याच्यासोबत रहाण्याचा विचारही नकोसा झाला.  त्याच्या मनाचा विचार करुन ती प्रत्येक वेळी त्याला समजून घ्यायची.  त्याला वाईट वाटेल म्हणून तिने तिच्या स्वत:च्या achievements चा आनंद कधी उपभोगलाच नाही.  कायम त्याच्याच मनाचा विचार केला.  खरं तर ती सुद्धा एका मोठ्या कंपनीतAdministrative Manager म्हणून काम करत होती.  तिला भरपूर पगाराची नोकरी होती…..मान होता.  तिच्या कामाने, तिच्या मेहनतीने, तिच्या नवीन कल्पनांमुळे तिने कंपनीत स्वत:साठी एक खास जागा बनवली होती.  पण तिच्या कर्तृत्वाचं त्याला कधीच सोयरसुतक नव्हतं.  खरं तर तिचंही……हे तिला फार उशीरा कळलं.

बस थांबली.  कुठल्याशा छोट्या गावात.  तिने मोठ्या प्रयासाने मनातली आवर्तनं थोपवली. नको……आता नकोच त्या आठवणी.  खिडकीतून बाहेर बघितलं.  भरपूर गलका, गोंधळ !  ह्या गलक्यातही तिला शांत शांत वाटलं.  खिडकीतून जितक्या दूर नजर जाईल तितक्या दूर बघितलं….अगदी त्रयस्थपणे.  आभाळ भरुन आलं होतं……सगळीकडे अंधारुन आलं होतं.  कुठेतरी टाचणी लागणार आणि आभाळ कुठल्याही क्षणी कोसळू लागणार.  अनोळखी वाटेवर कां कोण जाणे…..तिला खूप सुरक्षित वाटलं…..तिचं तिलाच आश्चर्य वाटलं.  आजपर्यंत त्याच्या वागण्यामुळे कोणी ओळखीचं शक्यतोवर भेटूच नये असं तिला वाटायचं कारण सगळ्या ओळखीच्या नजरा गढुळल्या होत्या.  त्या नजरांमधे तिच्या विषयी कीव दिसायची आणि काही नजरांमधे चक्क घृणा !  तिने सगळं कितीही झाकायचा प्रयत्न केला तरी कुठे तरी काही तरी उघडं पडायचंच !  बघता बघता तिच्या मनातही भरुन आलं…… आणि डोळे झरायला लागले ! समोरच्या आभाळालाही सहानुभूतीचा पाझर फुटला……. हळुहळु म्हणता म्हणता ते ही कोसळायला लागलं.  सगळं पुन्हा एकदा अनावर होऊन ती ओक्साबोक्शी रडायला लागली.  शेजारची आजी काहीशी बावरुन तिच्याकडे बघायला लागली. मोठ्या प्रेमाने तिने तिच्या पाठीवरुन हात फिरवला. त्या स्पर्शातल्या मायेनं तिला आणखीनच भरुन आलं ! आजीने  तिला मनसोक्त रडू दिलं.  काहीही चौकशा न करता. हळुहळु शांत झाली ती.  तिचं तिलाच आश्चर्य वाटलं तिच्या रडण्याचं…..! आयुष्यात त्याने तिला इतके वेळा रडायला लावलं होतं की आपल्या डोळ्यातलं पाणीच आटलं असं तिला वाटलं होतं.  पण सहानुभूतीचा स्पर्श होताच अश्रू सुद्धा फितुर झाले होते.  जवळचं असं कुणीच उरलं नव्हतं.  जी काय नाती होती ती फक्त त्याच्या एका नात्यासाठी तिने स्वत:च तोडून टाकली होती. तेव्हा तिला माहित नव्हतं की ज्याच्यासाठी आपण हे सगळं करतोय ते नातंच किती तकलादू आहे.

तो पहिल्यांदा भेटला तेव्हा मात्र त्याने आपल्याला कशी भूल पाडली ह्याचाच ती विचार करायची.  तो एक क्षण सोडला तर त्याने तिची कधीच म्हणावी तशी दखल घेतली नाही.  कायम स्वत:च्याच कौतुकात मग्न ! एकाच नाटकामुळे तो प्रसिद्धीच्या शिखरावर पोचला होता.  पण ते मोठेपण त्याला झेपलं नव्हतं…सांभाळता आलं नव्हतं.  इतक्या लवकर मिळालेल्या यशामुळे तो स्वत:ला फार मोठा समजायला लागला होता.  त्याच्या वागण्यात झालेल्या बदलामुळे त्याचे सोबती त्याच्यापासून दूर झाले.  तेव्हाच ती त्याच्या आयुष्यात आली होती. तिला त्याचं किती कौतुक ! इतका मोठा कलाकार आपल्यावर प्रेम करतो ह्या विचारानेच ती भारावून गेली होती.  खरं तर त्याने त्याचं प्रेम कधी फारसं व्यक्तच केलं नव्हतं.  आपल्या अनेक चाहत्यांसारखंच तिचं जवळ येणं त्याने आपल्या व्यक्तिमत्वाचा, आपल्या अभिनयाचा विजय म्हणूनच बघितलं होतं. त्यात तिच्याबद्दल फार काही भावना नव्हत्याच. पण जसजसे त्याचे जवळचे लोक त्याला दूर करायला लागले तेव्हा त्याची चिडचिड, त्रागा झेलायला हक्काची कुणीतरी त्याला हवी होती.  तेव्हा तीच त्याच्या कचाट्यात सापडली.

त्याच्या नैराश्यात तिची मात्र फरफट व्हायला लागली.  त्याची मनस्थिती सांभाळता सांभाळता तिला तिचं काम झेपेनासं व्हायला लागलं. ऑफीसला जायला उशीर,  कामात चुका व्हायला लागल्या.  बॉसला खरं तर तिचं केवढं कौतुक …..पण तिच्या चुका, तिचं दुर्लक्ष, तिचं मिटिंगमधे असूनही नसणं…. हे तो तरी किती दिवस माफ करणार होता. पुढे पुढे तर हा चक्क ऑफिसात येऊन पैशासाठी तमाशे करायला लागला.  सगळं हाताबाहेर जायला लागलं.  काही दिवस सुट्टी घेऊन तिने सगळं सावरायचा खूप प्रयत्न केला.   त्याला घेऊन ती महाबळेश्वरला गेली.  तिथे त्याला चुचकारुन, समजावून सांगितलं.  ’तू काहीतरी नवीन सुरु कर, मी तुला पैसे देते.’ ’पण ’तुझ्या पैशावर जगायला मी काही तुझा मिंधा नाही…. मी जे काही करायचं ते माझ्या भरवशावर करेन…..तू तुझं बघ ’…..अशा भाषेत तिला झिडकारलं.  आता मात्र तिची सहनशक्ती संपली.  संतापाच्या भरात ती त्याला खूप बोलली. “तुझा तू हवा तसा जग…….पण माझी सुटका कर” म्हणाली.  मग मात्र तो भानावर आला.  तो माफी मागायला लागला.  काहीही झालं तरी फक्त तीच होती त्याची हक्काची, जवळची.  आता तीच जाते बोलल्यावर त्याला भांबावल्यासारखं झालं.  ती गेल्यावर कुणाच्या जीवावर जगणार…..! तो गयावया करायला लागल्यावर ही पुन्हा विरघळली. त्याला मोठ्या मनाने माफ करुन पुन्हा घेऊन आली. आता शहाण्यासारखा काम शोधेन, तुला त्रास देणार नाही वगैरे वगैरे बोलून तिचा विश्वास मिळवला. तीही थोडीशी निर्धास्त झाली.  आता हा नक्की सुधारणार असं समजून पुन्हा ऑफिसात जायला लागली.

काही दिवस अगदी छान गेले.  एक दिवस घरी येतांना तिला तिच्या घरातून बर्‍याचशा मुली, मुलं जाताना दिसली.  तिने त्याला विचारलं……तर बोलला….मी एक नाटक बसवतोय त्याची ऑडीशन घेतोय.  तिला बरं वाटलं की चला काहीतरी सुरवात झाली.  काही दिवस त्या स्वप्नरंजनात बरे गेले. त्याचाही मूड चांगला होता……जास्तच रोमॅंटिक होता.  तिला वाटलं जे झालं ते एक वाईट स्वप्नं होतं.  आता जे काही होणार ते नक्कीच छान होणार……. पण तिचं हे वाटणंही एक स्वप्नंच ठरलं.

एक दिवस ती ऑफीसला जाताना शेजारच्या काकूंनी ती दिसताच काहीतरी पुटपुटत दाणकन्‌ तिच्या तोंडावरच दार लावलं.  तिला आश्चर्यच वाटलं. ऑफिसमधे गेल्यावर सुद्धा थोडी कुजबूज होतीच आणि ती गेल्यावर आपोआपच बोलणं बंद.  तिला कळेचना.  ह्याचा उलगडा तिला बॉसच्या केबिनमधे गेल्यावर झाला.  बॉसने तिला तिच्या नवर्‍याच्या नव्या उद्योगाबद्दल माहिती विचारली.  तिला थोडंसं नवलंच वाटलं कारण बॉस कधीच घरगुती गोष्टी बद्दल बोलत नसे.  पण त्याला तिच्याविषयी आदर, जिव्हाळा मात्र नक्कीच होता.  नवीन नाटक बसवतोय म्हणून सांगितल्यावर त्याचा सहजासहजी विश्वास बसेना ! तो म्हणाला, ’तू खात्री करुन घे कारण माझ्या कानावर भलतंसलतं येतंय आणि आता तर सगळ्या स्टाफमधेही त्याचबद्दल चर्चा आहे .  तो काहीतरी गैर करतोय एवढं नक्की.  बाकी सगळंच मी उघडून सांगू शकत नाही. ’  तिला धक्काच बसला.  ’मी बघते काय ते’ असं मोघम बोलून ती घरीच जायला निघाली.  बॉसनेही ती जातेय म्हटल्यावर काहीच आक्षेप न घेता तिला परवानगी दिली.

घरी पोचली तेव्हा काही लोक जिथून जागा मिळेल तिथून घरात डोकावण्याचा प्रयत्न करताना दिसले.  ती जरा घाबरलीच.  तिने लॅच उघडून दार उघडलं. समोरचं दृश्य बघून तिच्या जीवाचं पाणी पाणी झालं.  असं काही बघायला मिळेल ह्याची कल्पनाच नसल्यामुळे तिला भोवळच आली.  शुद्धीवर आल्यावर तिने बघितलं तर आजूबाजूला कोणीच नव्हतं आणि हा अगदी साळसूद भाव चेहेर्‍यावर आणून तिच्याकडे बघत होता.  स्वत:ला सावरल्यावर तिने त्याला जाब विचारला तर त्याने अगदी निर्ढावलेल्या सुरात, थंडपणे सांगितलं, ’झटपट पैसा कमवायचा सोप्पा उपाय.  आजकाल पैशाशिवाय काही नाही.  गरजू मुलामुलींना मी काम करायला शिकवतोय…. व्यवसायप्रशिक्षण म्हण हवं तर ! अभिनय शिकवतोय त्यांना.’  ती हतबुद्ध झाली. झाल्या प्रकाराला हा किती सहजतेने वेगळं रुप देतोय.  तिचं मनच उतरलं.   आता मात्र ती मनातून खचली.  इतके प्रयत्न करुनही सुधारण्याचं तो नावही घेत नव्हता.  स्वत:च्या कृत्याबद्दल त्याला किंचितही पश्चाताप नव्हता.  आपण एका फालतू माणसासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं हे जाणवून ती अगदी निराश झाली.  पण त्याचवेळी तिने ठरवलं…….की अशा नालायक माणसासाठी आपण आपलं पुढचं आयुष्य अजिबात वाया घालवायचं नाही.  नक्की काय करायचं ते मात्र कळत नव्हतं.   पण इथून शक्य तितक्या लवकर निघायचं हे मात्र मनोमन ठरवलं.

दुसर्‍याच दिवशी त्याला न सांगता मोठ्या निर्धारानं ती निघाली.  तो, ऑफिस, शेजारी…… आता कुणाचीच पर्वा  नव्हती.  शक्यतोवर ह्या सगळ्यातून बाहेर पडायचं ही एकच जाणीव होती.

पाऊस थांबला…..सगळं आकाश मोकळं झालं. कुठल्याशा गावात बस थांबली.  ती अगदी गळून गेल्यासारखी खिडकीतून बाहेर बघत राहिली.  पाऊस पडून गेल्यामुळे सगळीकडे तजेला आला होता. ओला परिसर आनंदी दिसत होता.  तिच्या मनालाही थोडी उभारी आली. तेवढ्यात  शेजारच्या आजी म्हणाल्या, ’पोरी येतेस माझ्या घरी… थोडे दिवस रहा.’  वाट बघत असल्यासारखी ती पटकन ’हो’ म्हणाली.    तिचं तिलाच आश्चर्य वाटलं.  कोण कुठली आजी…..आपल्याला बोलावते काय आणि आपण हो म्हणतोय काय!  आता खरं तर तिची वाट तिलाच शोधायची होती.  पण सध्यातरी ही नवी सापडलेली आजीच तिची वाट तिला दाखवत होती. कदाचित पुढे ह्याच वाटेने आपली वाटही सापडेल आपल्याला असा विचार करुन ती आजी पाठोपाठ चालू लागली.

आजूबाजूला तिने बघितलं.  शेताच्या बांधावरुन छोटी छोटी मुलं मस्तपैकी उड्या मारत खेळत होती. आपल्याच दुनियेत मग्न…..!  किती छान, निर्व्याज आहेत ही मुलं.  बाहेरच्या दुष्ट दुनियेशी ह्यांचा काहीच संबंध नाही.  इथे ह्यांचंच एक हसरं आणि गोड जग आहे.  त्यांच्या दुनियेत तिलाही सामावून जावंसं वाटलं.  ती उत्साहाने आजीसोबत चालू लागली.  त्या छोट्याशा पाऊलवाटेवरुन जाताना एक अनामिक ओढ तिला जाणवायला लागली.  आतापर्यंत तिने नात्याचा फक्त काळाच रंग अनुभवला होता.  आता इथे तर पूर्ण इंद्रधनुष्य समोर दिसतंय.  तिने मनाशी पक्कं ठरवलं……आपण इथेच रहायचं.   नवं आयुष्य इथेच सुरु करायचं.  आता पैसा, घर ह्याबद्दल अजिबात आसक्ती राहिली नव्हती.  फक्त आपल्या आयुष्याचा काहीतरी चांगला उपयोग करायचा होता. आपल्या शिक्षणाने, आपल्या मेहेनतीने, आपल्या बुद्धीने काहीतरी घडवायचं होतं.

तिला खुदकन हसू आलं….! प्रत्येकाच्या मनात एक गुलमोहर असतो आणि कुठे बहरायचं हे फक्त त्यालाच माहित असतं.  तिच्याही मनातला गुलमोहर तिला खुणवायला लागला.  तिला आतून जाणीव झाली…. आपल्या गुलमोहराचा बहर आपल्याला इथेच मिळणार !

 

Read Full Post »

त्यादिवशीनंतर सगळं वातावरणच बदललं.  लग्नाची तयारी सुरु झाली.  खरेदी, पत्रिका ह्या सगळ्याच बाबतीत उन्मेष निशीचं मत घ्यायचा.  पत्रिकेतले शब्द सुद्धा निशीचेच असायला हवेत हा त्याचा आग्रह.  संसाराच्या स्वप्नामधे रमलेली शर्वरी पण सगळं मनातलं किल्मिष काढून मोकळी हसायला लागली होती.  अगदी धडाक्यात लग्न झालं.  निशीच्या डोळ्यातल्या अश्रूंना मात्र खंड नव्हता.  निशांत गेल्या नंतर शर्वरीच तिच्या आयुष्याचा आधार होती…..जगण्याला कारण होती. आता तीच सासरी निघाली होती.  पण उन्मेष सारखा इतका समंजस जोडीदार तिला मिळाला होता म्हणून  समाधान सुद्धा  होतं.

लग्न झाल्यावर फ़िरायला जायचा बेत जेव्हा ठरवला गेला तेव्हा उन्मेष म्हणाला…..
आपण आईला पण घेऊन जाऊया‘.
झालं……. शर्वरीच्या सगळ्या आनंदावर विरजण पडलं.
उन्मेष…..अरे हनीमूनला निघालोय ना आपण……….तिथे आई कशाला…?’
अगं…. आता ती अगदीच एकटी पडली असेल गं…. तुझे पप्पा गेल्यानंतर आईनं तुलाच आपलं सर्वस्व मानलं……. आता तुला जेव्हा तिच्या एकटेपणात थोडी साथ करायची वेळ आलीये…..तेव्हा तू नाही का म्हणते आहेस ? आपण दोघं तर आयुष्यभर एकत्र आहोतच.  आपण पुन्हा कितीतरी वेळा असे फ़िरायला जाऊ शकू….. पण आईला सध्या एकटं सोडणं मला तरी बरोबर वाटत नाहीये
ठीक आहे…तुझ्या मनात जे असेल तेच तू करणार…..!
शर्वरी अगं उगाच कशाला इश्यू करतेस…….ती तुझीच आई आहे ना…..? मला असं वाटतं की आज तू आईकडे जा…….सामान बांधायला तिला सुद्धा मदत होईल.  मी संध्याकाळी आईकडेच येतो.  आपण उद्या तिकडूनच निघूया.

शर्वरी आईकडे आली तेव्हा बघितलं तर आईला थोडं बरं नव्हतं.  पण शर्वरीला आलेलं बघून आईला काय करु आणि काय नको असं झालं.  पण तिचा उतरलेला चेहरा बघून मात्र निशीला काळजी वाटली.

अगं…तुझा चेहरा असा काय दिसतो आहे…..? नवी नवरी ना गं तू….. मग अशी काय…..? शिवाय आता काय बाई…….एक जोडी मस्तपैकी फ़िरायला जाणार……. मजा आहे बुवा…..!!शर्वरीचा मूड थोडा खुलवायचा प्रयत्न करत निशी बोलली.

इतका वेळ धुमसत असलेली सगळी आग एकदम बाहेर पडली…..सगळी साठलेली मळमळ बाहेर पडली.  शर्वरी आईला नाही नाही ते बोलली, आरोप केले. 
आपल्या मुलीच्या संसारात नको तितकी लुडबूड करतेस…. उन्मेषचं लक्ष वेधून घ्यायला काय वाटेल ते करतेस……. कधी मोकळा श्वास घेऊ देणार आहेस आम्हा दोघांना ………….?’

शर्वरीचं एकेक वाक्य निशीचं काळीज चिरत होतं.  आपल्या लेकीचं आपल्या बद्दलचं इतकं भयंकर असलेलं मत ऐकून तिला धक्काच बसला.  ती आतून कोसळली.  पण शर्वरीचं तिकडे लक्षच नव्हतं.  तिची बडबड सुरुच होती.  इतके दिवसाचा राग अतिशय विचित्र तर्‍हेने बाहेर पडला होता.  निशीला हा धक्का सहनच झाला नाही.  आपल्या लाडक्या कोकराला आपण इतके नकोसे झालो आहोत…….. इतका द्वेष आपल्याबद्दल…..! नाही….. नाही….. हे ऐकण्याच्या आधीच माझे डोळे बंद का झाले नाहीत?  आता आयुष्याला अर्थच काय….. 

तिकडे कोण दिसतोय तो…..निशांत……. आपल्याला जवळ बोलावतोय…….!

शर्वरीला जेव्हा दिसलं की आई कोसळतेय…तेव्हा मात्र ती घाबरली…..आपण हे काय करुन बसलो…..आई…..आई….बोल ना गं……..मी चुकले गं…. माझ्या चुकीची मला येवढी मोठी शिक्षा देऊ नकोस गं….. आईऽऽऽऽऽऽऽ !

आईचा काहीच प्रतिसाद येत नाही हे बघून ती रडायला लागली……..रडत रडतच तिनं उन्मेषला फ़ोन केला….! धावत पळत उन्मेष पोचला.  ऍम्ब्युलन्स धडाडत आली….. शर्वरीला काय होतंय काहीच कळत नव्हतं…….ती सारखी रडत होती…. तिला पश्चाताप होत होता…. आता प्रायश्चित्त घ्यायलाही वेळ नव्हता.  ती देवाकडे एकच प्रार्थना करत होती………..देवा मला आईची क्षमा तरी मागायला मिळू दे !  पण नाही…….. देवाला तिचा गुन्हा अजिबात मान्य नव्हता.  त्यानं शर्वरीला माफ़ी मागायची संधीच मिळू दिली नाही.  आता आयुष्यभर ती आपल्या चुकीचं प्रायश्चित्त भोगणार होती.

आपल्या गुन्ह्याचं  ओझं जेव्हा तिला पेलवेनासं झालं तेव्हा  उन्मेषजवळ जेव्हा तिनं आपल्या चुकीची कबुली दिली.
अगं हे काय करुन बसलीस तू शर्वरी…….? अगं मला सांगायचंस तरी तुझ्या मनात काय चाललंय ते…..!  आई वडीलांचं महत्व  तू माझ्यासारख्या अनाथ मुलाला विचार.  मला जे सुख मिळालं नाही ते मी तुझ्या आईमधे शोधत होतो आणि तिनं सुद्धा मला अगदी भरभरुन  आईचं प्रेम दिलं.  पण आता मात्र आपण दोघंही अनाथ झालोत गं !  आता कितीही पश्चाताप करुनही आई परत येणार नाहीये……. !  आता आपल्या दोघांना एकच शिक्षा…. पूर्ण आयुष्यभर तडफ़डायचं…..!’

शर्वरीला बोलायला काही शब्दच उरले नाहीत.  तिच्या मनात एकच आवाज टाहो फ़ोडत होता, ‘आई कुणा म्हणू मी………आई कुणा म्हणू मी…….? ‘

 

 

समाप्त.

 

Read Full Post »

उन्मेष आणि शर्वरी सुद्धा एकमेकांच्या जवळ येत होते.  उन्मेषला नाटकं, काव्यवाचन, गाण्याचे कार्यक्रम खूप आवडायचे.  तो अशा कार्यक्रमाची तिकिटं अगदी जातीनं घेऊन यायचा.  शर्वरी सुद्धा आवडायचं ते.  निशीचा तर तोच प्रांत होता.  निशीला वाटायचं….. की अशा कार्यक्रमांना त्या दोघांनी जावं…त्यांच्यामधे उगाच आपण कशाला…..! म्हणून ती काही ना काही कारणं सांगून जाणं टाळायची.  पण उन्मेष मात्र हट्ट धरायचा……. की निशीनं यायलाच हवं म्हणून.  शर्वरीला सुद्धा मनातून बरं वाटायचं की आपल्या आईचा तो इतका विचार करतो म्हणून.  पण पुढे पुढे सगळीकडे आईला नेण्याचा उन्मेषचा हट्ट तिला नको वाटायला लागला.  कारण प्रत्येक कार्यक्रम झाल्यानंतर तो निशीसोबत त्यावर चर्चा करायचा.  सुरवातीला ती सुद्धा अगदी हिरीरीनं त्यात भाग घ्यायची.  पण नंतर तिला ते टॉपिक्स बोअर व्हायला लागले.  तिला वाटायचं उन्मेषसोबत आपण मस्तपैकी बागडावं…. बाईकवर दोघांनीच लॉंग ड्राइव्हला जावं.  मस्त पावसात भिजावं…. फक्त दोघांनी !   

पण प्रत्येक वेळी बाहेर कुठे जायचा कार्यक्रम ठरला की उन्मेष निशीला पण यायचा आग्रह करायचा.  सुरवातीला आई नाही म्हणायची….. पण आजकाल तिलाही आवडायला लागलंय हे!  का आम्हाला ती मोकळं फ़िरु देत नाही….! आईबद्दलचे तिचे हे विचार मनात नाही म्हटलं तरी डोकवायला लागले होते.  आई तिची अगदी जवळची मैत्रिण होती.  पण इथे मात्र आईची जवळीक आता तिला नकोशी वाटायला लागली.  उन्मेषनी कुठला कार्यक्रम ठरवला तर ती परस्परच आईचं जमणार नाही असं सांगायला लागली.  पण मग घरी आल्यावर उन्मेष पूर्ण वेळ निशीसोबतच घालवायचा.  शर्वरी मनातून खट्टू व्हायची. 

उन्मेष आणि आपल्यामधला आईचा वावर तिला जाचक व्हायला लागला.  मग आईवर विनाकारण  तिची चिडचिड वाढायला लागली.  छोट्या छोट्या गोष्टींवरुन तिचे आईशी खटके उडायला लागले.  निशीला मात्र कळतंच नव्हतं…….ही अशी का वागतेय…..!  उन्मेष आल्यानंतरचा तिचा खुललेला चेहरा……..आपण तिथे गेल्यावर बदलतो…….हे तिच्याही लक्षात यायला लागलं.  मग ती ही दोघांसोबत जाणं शक्यतोवर टाळायला लागली.  दोघींमधला संवाद मात्र आता पहिलेसारखा मोकळा राहिला नव्हता.  शिवाय उन्मेषचा विषय शर्वरीनं काढणंच बंद केलं होतं.  उन्मेष आला की आईशी त्याची भेट व्हायला नको म्हणून तिची चाललेली धडपड बघून निशीला खूप वाईट वाटायचं.  उन्मेष मात्र ह्या सगळ्यात अनभिज्ञ होता.  त्याला शर्वरीच्या मनातल्या वादळाची काहीच कल्पना नव्हती. 

एक दिवस उन्मेष आला तो एका वेगळ्याच मूडमधे….! आल्या आल्या त्यानं शर्वरीला फ़र्मान सोडलं….. शर्वरी……..आईला लग्गेच बोलाव!अरे तिला कशाला…..ती तिच्या कामात असेल रे…..काम बगैरे सगळं सोड…….आधी आईला बोलाव…….. नाहीतर मी जातो तिला बोलवायला आत…….नको…..मी बोलावते आईला आई……. तुला उन्मेष बोलावतोय….बाहेर ये  लेकीच्या आवाजातली नाराजी निशीला लगेच कळली.  पण उन्मेषला नाराज करायला नको म्हणून ती बाहेर आली.अरे काय गोंधळ घातला आहेस……. कशासाठी बोलावणं हे…..?’आई……. मी तुमच्या लेकीला मागणी घालायला आलोयउन्मेषच्या त्या वाक्यानं शर्वरीचा चेहरा एकदम फ़ुलला….. तिच्या गालावरचे फ़ुललेले गुलाब बघून निशी सुद्धा खूप खुष झाली.काय…….उन्मेष अरे मी किती दिवसांपासून ह्या शब्दांची वाट बघतेय रे….! खूप वाट बघायला लावलीस हं तू…..काय शर्वरी….तुझी तयारी आहे ना…….?’

आईच्या त्या वाक्याने शर्वरी लाजली…….काय गं तू…असं म्हणत ती आईच्या कुशीत शिरली.  इतक्या दिवसांचा दुरावा अगदी क्षणात नाहीसा झाला.  इतके दिवस खुपत असलेलं आईचं अस्तित्व तिला अचानक हवंहवंसं वाटायला लागलं.

क्रमश:

Read Full Post »

पण हा दुरावा आता दूर होणार होता…..! पाच वर्ष संपवून निशांत पुढच्याच आठवड्‍यात येणार होता.  सगळे जण खूप खूप आनंदात होते.  पण …….!!! निशांतला घेऊन येणारं विमान अपघात होऊन कोसळल्याची बातमी कळताच त्या दोघी अगदी वेड्‍यापिशा झाल्या.  इतके दिवस वाट पाहून…….जेव्हा आपल्या जीवलगाला भेटायची वेळ आली नेमका तेव्हाच दैवानं घाला घातला होता.  पाच वर्ष फ़क्त दोघीच होत्या सोबत एकमेकींना.  पण आता तर उभा जन्म काढायचा होता निशांतशिवाय.   

दिवस जसे पुढे सरकत होते…तशी दु:खाची धारही बोथट होत होती.  निशांतशिवाय जगण्याची सवय व्हायला लागली होती.  त्यातही शर्वरीच्या achievements मुळे मनाला थोडी उभारीही येत होती.  शर्वरीच्या आयुष्यात सुद्धा गुलाबी किरणं डोकवायला लागली होती.  मॅनेजमेंट करताना काही लेक्चर्स द्यायला आलेला उन्मेष तिला तिच्याही नकळत आवडला होता.  हळुहळु तिच्या स्वप्नातही तो अगदी हक्कानं यायला लागला होता.   ह्या नव्या जाणीवेनी ती मोहरली होती.  मनाशीच हसणं,  कारण विचारल्यावर गोरंमोरं होणं…. हे आपसूकच सुरु झालं.  निशीच्या पण लक्षात यायला लागलं होतं……. पोरगी कुणावर तरी जीव लावून बसलीये वाटतं.  मग एक दिवस तिनंच मुद्दाम विषय काढला.
शर्वरी, तुझ्या गालावरची लाली जरा जास्तच वाढलीये हं…..
आईऽऽऽऽ तू चिडवू नकोस हं!
शर्वरी, आपल्या मैत्रिणीपासून लपवणार मनातलं…..?’
आई…. अगं कुठं काय….. मी काय लपवतेय तुझ्याकडून….
तू ही जी नजर चुकवते आहेस ना….. त्यावरुनच कळतंय… काहीतरी नक्कीच आहे.  कोण आहे तो …..?’
आई, अगं खरंच सांगतेय…….कोणी नाहीये गं….
जाऊ दे….. नको सांगूस…..
ए आई, अशी रागवू नकोस ना गं…….! तुला सगळं सांगते.  अगं आमच्या क्लासला ते उन्मेष सर आले होते ना…..(मोठ्ठा पॉझ)
हं तर मग त्यांचं काय…….!
आईऽऽऽऽ आता सगळंच सांगायचं का गं…..?’
अच्छा…..म्हणजे त्या उन्मेषनं लेक्चर घेता घेता माझ्या शर्वरीचं काळीज पण हिरावून घेतलेलं दिसतंय
आई प्लीज थट्टा नको हं.  अगं त्यांना तर मी कोण हे ही माहीत नाहीये.  पण आई….. मला मात्र तो खूपच आवडलाय.
हं……. म्हणजे तुझं उगाचंच झुरणं सुरु आहे तर….!
आई… तू एकदा बघ त्याला आणि मग सांग मी चुकतेय का.  आज येतेस का मला घ्यायला…….आज उन्मेषचं लेक्चर आहे शेवटचं.
आज…… बरं….. पण शर्वरी, तुला एक सांगते…..फ़क्त दिसण्यावरुन तू कोणाची परिक्षा करु नकोस.  अगदी लगेच निर्णय घेऊन मोकळी होऊ नकोस.  नाहीतर पुढे पश्चातापाची वेळ येईल.  मलाही सगळी माहिती काढायला वेळ दे.
पण आज तर तू येणार आहेस ना….?’ 

आईकडून होकार मिळाल्यावर तर शर्वरी फ़ारच खूष झाली.  दिवस फ़ारच लांबतोय असं वाटत होतं.  शेवटी उन्मेष सरांच्या (नको….सर नको…..नुसतं उन्मेष जास्त चांगलं वाटतंय 🙂 ) लेक्चरची वेळ झाली.  पण आज मात्र त्यात तिचं अजिबात लक्ष नव्हतं.  कधी एकदा लेक्चर संपतं आणि आई उन्मेषला बघते असं तिला झालं होतं.  यथावकाश लेक्चर संपलं.  सगळे जण सोबतच बाहेर पडले.  शर्वरी मात्र आईला शोधत होती.  आई दिसल्याबरोबर लगेचच ती आईकडे धावली.  निशीची नजर सुद्धा कोण असेल तो उन्मेषहेच शोधत होती.  पण तिला शोधायची जरुरच पडली नाही.  शर्वरी तिच्या जवळ पोचणार एवढ्यात एक छानसा देखणा मुलगा तिच्याजवळ आला आणि म्हणाला,
सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री…….. निशिगंधा….?’निशी हसली.  म्हणाली,
सुप्रसिद्ध नाही हं….. !
पण आपण इकडे कुठे……. इतक्या अरसिक जागी…..?’तेवढ्यात शर्वरी तिथे पोचलीच.  आई…….हे…..हा….हे उन्मेष सर !
शर्वरी, अगं हे काय……. सर वगैरे फ़क्त लेक्चरला…….इथे मी फ़क्त उन्मेष
म्हणजे…….. ह्याला माझं नावही माहित आहे…….! शर्वरीला अगदी मनातून आनंद झाला.
तर तू आहेस तो उन्मेष…….हं…..! मी शर्वरीची आई 🙂
अरे वा…..!  म्हणजे    शर्वरी तुझ्यामुळे   मला   माझ्या   आवडत्या लेखिकेला भेटायला मिळालं.  निशी जी….. मला तुमचं सगळंच लिखाण खूप आवडतं.  मी तुमचा सगळ्यात मोठा फ़ॅन आहे असं म्हटलं तरी चालेल 🙂
अरे फ़ॅन वगैरे असण्याइतकी मी मोठी नाहीये रे
हा मात्र तुमचा विनय आहे हं…..! शर्वरी, निशीजी तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला कॉफ़ी ऑफ़र करु शकतो का?’
हे मात्र अतीच होतंय….आज आई उन्मेषला बघायला येते काय……..आणि उन्मेष तिचा फ़ॅन निघतो काय…….. आणि आता चक्क कॉफ़ीची ऑफ़र…..! सगळंच स्वप्नवत ! आता आई काय म्हणते ह्याची ती वाट बघायला लागली.
अरे…..तू पण कमालच करतोस…..! ह्याची काहीच गरज नाही
प्लीज निशीजी……..नाही म्हणू नका…..आपल्या चाहत्याचा हट्ट समजा हवं तर…….शर्वरी, तू तरी सांग ना तुझ्या आईला…
ओके ओके…….! चल जाऊया कॉफ़ी घ्यायला…. 

कॉफ़ी शॉपमधे गप्पा मस्तच रंगल्या.  हळुहळु भेटी वाढायला लागल्या……. गप्पांचे रंगही घरगुती आणि अनौपचारिक व्हायला लागले.  उन्मेष हा एक अनाथ मुलगा होता.  स्वत:च्या हुशारीच्या जोरावर तो इथपर्यंत पोचला होता.  आता तो इंडस्ट्रीयल कन्सल्टन्ट म्हणून काम करत होता.  फ़ारच लाघवी व्यक्तिमत्व होतं त्याचं.  निशीला सुद्धा उन्मेष अगदी मनापासून आवडला आपला जावई म्हणून.   मनातल्या मनात तिला आपल्या लेकीच्या आवडीवर तिनं शिक्कामोर्तबही करुन टाकलं.

क्रमश:

 

Read Full Post »

अचानक आभाळ भरुन येतं आणि इतके दिवस साचलेलं सगळं झडझडून कोसळतं.  तसंच झालं काहीसं.  शर्वरीच्या मनात इतक्या दिवसापासून साठून राहिलेलं मळभ आज मोकळं झालं.  आपल्या आईबद्दल तिला नितांत आदर आणि अभिमान होता पण एकेक गोष्ट अशी काही घडत गेली की तिच्या मनातला आईच्या आदराचा कोपरा हळुहळु लहान लहान होत गेला आणि त्याऐवजी आईबद्दलची चीड त्याची जागा घ्यायला लागली.

खरं म्हणजे आई म्हणजे शर्वरीचा जीव की प्राण.  तिला आईबद्दल असलेला अभिमान सगळ्यांनाच माहित होता.  तिच्या सगळ्या मैत्रिणीनासुद्धा  शर्वरीची आई म्हणजे आपली जीवाभावाची मैत्रिण वाटायची.  त्यांची कितीतरी गोड गुपितं शर्वरीच्या आईला माहित असायची.

शर्वरीची आई, निशीगंधा सुद्धा छान रमायची आपल्या लेकीच्या ह्या गोतावळ्यात.  निशीचं लग्न  तसं लवकरच झालं.  अवघी वीस वर्षाची निशी नवरी बनून निशांतच्या आयुष्यात आली.  खूपशी बावरलेली, बरीचशी गोंधळलेली पण मनातून आनंदलेली निशी बघून निशांत हरखला होता.  निशीचा बालिशपणा, अल्लडपणा त्याने अगदी तसाच जपला होता.  मुंडावळ्या बांधून जेव्हा निशी बोहोल्यावर चढली तेव्हाच ती त्याच्या मनात अगदी खोल खोल उतरली होती. 

दोघांच्या त्या गुलाबी विश्वात शर्वरी नावाचं गोंडस बाळ जेव्हा आलं ना….. तेव्हा त्यांचं सगळं विश्वच शर्वरीमय झालं.  दोघांच्या प्रेमाचं इतकं गोड प्रतिक समोर असताना दुसरं काही सुचेलंच कसं….?

शर्वरी जसजशी मोठी होऊ लागली तशी तिची दुनिया सुद्धा मोठी व्हायला लागली.  घरच्या इतकीच ती तिच्या बाहेरच्या विश्वातही रमायला लागली.  शर्वरी मधे गुंतलेली निशी सुद्धा आता थोडी मोकळी झाली.  आतापर्यंत तिचं वेळापत्रक फ़क्त शर्वरीसोबतच होतं.  आता मात्र तिला स्वत:साठी सुद्धा वेळ मिळायला लागला.

अंगभूत कलांना बाहेर यायला काही वेळ लागला नाही.  निशी सुरेख लिहायची.  वाचनाचंही विलक्षण वेड होतंच.  तशी लायब्ररी सुरु होतीच म्हणा पण वेळ काढून लिहायला झालंच नाही इतक्या दिवसात.  जेव्हा थोडा निवांतपणा मिळायला लागला तेव्हा निशीनं मनातलं सगळं कागदावर उतरवायला सुरवात केली.  निशांतचा मनापासून पाठिंबा होताच.  तसाही आपल्या गोड आणि हुशार, हळव्या मनाच्या बायकोवर निशांत अगदी फ़िदा होता.

हळुहळु शर्वरीचं जसं जग वाढत होतं, तसंच निशीचंही वाढायला लागलं.  तिचे लेख, कथा, कविता….. वर्तमानपत्र, मासिकांमधून यायला लागल्या.  तिची पुस्तकं सुद्धा प्रकाशित झाली.   आता निशीला एक साहित्यिक म्हणून मान्यता मिळाली.  तिला कार्यक्रमांची आमंत्रणं यायला लागली.   निशीच्या लिखाणात एक प्रकारची तॄप्ती होती.  संसारातली तॄप्तीच कदाचित डोकावत असणार लिखाणात सुद्धा…..!

शर्वरीपण आपल्या आईच्या या नव्या यशामुळे अगदी मनापासून खुष होती….तिचं होणारं कौतुक  ती अगदी  मनापासून enjoy करत होती.  तिच्या मैत्रिणींमधे आता तिच्या आईची एक वेगळीच इमेज तयार झाली होती.

सगळं इतकं मस्त सुरु होतं ना……..! शर्वरी कॉलेजात जायला लागली.  आणखी नवे मित्रं,  नवे विषय…….!   बाहेर घडणारं सगळं ती आईसोबत शेअर करायची.  रोज कॉलेजमधून घरी आली की आईच्या हातचं गरम गरम जेवताना तिची टकळी सुरु असायची.  दिवसभरात जे काही घडलं त्याचा  पूर्ण फ़्लॅशबॅक  आईसमोर दिसायलाच हवा.  शर्वरीचा तो अगदी हक्काचा वेळ असायचा. 

त्यादिवशी निशांत घरी आला ती एक आनंदाची बातमी घेऊनच.  त्याला प्रमोशन मिळालं होतं आणि अमेरिकेत ५ वर्षांचं वास्तव्य ! सगळे जण फ़ारच आनंदात होते.  शर्वरी आणि निशीनं मस्तपैकी पार्टी उकळली निशांतकडून.  पंधरा दिवसातच निशांत अमेरिकेला गेला.  आता मात्र दोघी मायलेकी जरा जास्तच जवळ आल्या.    एकमेकींच्या अगदी पक्क्या मैत्रिणी झाल्या. शर्वरीसुद्धा आता समंजस झाली होती.  चांगल्या वाईटाची समजही तिला यायला लागली होती.  निशीनंही स्वत:ला मस्तपैकी गुंतवून घेतलं होतं.  परिसंवाद, चर्चासत्र, समिक्षा ह्यात तिनंही  स्वत:ला बिझी ठेवलं होतं.    पण निशांतची उणीव मात्र फ़ारच जाणवायची.  अशा तीव्र आठवणीतूनच जन्मायची एखादी आर्त कविता !

क्रमश:

Read Full Post »

Older Posts »

%d bloggers like this: