Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘कुवेत’ Category

इथे आखातात दिवस थोडे आळशी आणि सुस्तावलेलेच असतात.  मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा थोडी फार तरी धावपळ असते.  पण ती फक्त शाळेची वेळ गाठेस्तोवरच.  पुढचा दिवस सरपटतच असतो.  मग दुपारी मुलं घरी आल्यावर दिवसाला जरा जाग आणि उभारी येते.  ही उभारी मात्र रात्री बराच वेळ राहते.   मग अभ्यास, जेवण, टिव्ही यात वेळ भुर्रकन जातो.  पण दिवस मात्र जरा रेंगाळतोच !!

मुलं जसजशी मोठी व्हायला लागतात तसतसं हे वेळाचं गणित बदलायला लागतं.  बारावी झाल्यानंतर मुलं भारतात किंवा परदेशात शिकायला जातात.  मग मागे उरतात फक्त नवरा-बायको.  “आई-बाबा”पण असतंच पण ते फोनवरुन, स्काईपवरुन.   तिकडे मुलं आपल्या विश्वात रमायला लागतात….त्यांचं विश्व सुद्धा विस्तारायला लागतं.  मग आई-बाबांचा हक्काचा वेळ नाही म्हटलं तरी थोडा कमीच होतो.  सुरवातीला ह्याचा खूपच त्रास होतो…पण मग सवय होते.

“मुलं गेली शिकायला….आता काय….तुम्ही दोघं राजा-राणी….. !!”  आधी बर्‍याच जणांना ऐकवलेलं हे वाक्य आपल्यावरच येऊन आदळतं आणि त्यातला फोलपणा जाणवतो.  ह्यापेक्षा मोठी शिक्षा नसावी कुठली.   आपण मुलांमधे किती गुंतलेलो आहोत हे  तेव्हा कळतं.

आतापर्यंत काय होतं की मुलांच्या रुटीनमधे आपण स्वत:ला खूप जास्त गुंतवून घेतलेलं असतं.   त्यांना उठवणं, त्यांचं खाणं पिणं…. त्यांचा अभ्यास, त्यांचे क्लासेस…. त्यांचे छंद ह्यात आपण स्वत:हूनच स्वत:ला गुरफटून घेतलेलं असतं.  त्यांना काय हवं… नको ह्याचाच विचार कायम डोक्यात असतो.  त्यामुळे मुलं गेल्यावर रिकामा वेळ अक्षरश: अंगावर यायला लागतो.   पण हळूहळू त्याचीही सवय होत जाते.

लग्नाच्या आधी किंवा नवीन नवीन लग्न झाल्यावर जसा आपण मुद्दाम वेळ काढतो एकमेकांसाठी, तसा वेळ आता आपसूकच मिळायला लागतो.  पण तेव्हा काय करायचं हा विचारच डोक्यात येत नाही…..सगळं आपसूकच होत असतं अगदी ठरवल्यासारखं.  फक्त एकांत हवा असतो आणि आता ……..  आता इतका जास्त एकांत मिळतो की त्या वेळात करायचं काय …. हा प्रश्न पडतो.

सहवासाची ओढ असतेच पण त्याचे अर्थ फार वेगळे झालेले असतात.   इतक्या वर्षात एकमेकांबद्दल आतून बाहेरुन सगळं लख्खं दिसत असतं…माहित असतं.  त्यात काही आवडणार्‍या तर काही नावडणार्‍या सुद्धा गोष्टी असतात….  सवयी असतात.   पण एकदा माणूस आपलं म्हटल्यावर त्याचं सगळं आपण स्विकारलेलं असतं.   मुलं मोठी होत असताना त्याकडे मुद्दाम लक्ष द्यायला वेळच नसतो.  पण आता जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मात्र त्या सवयी खटकायला  लागतात.  करायला फार काही नसतं दोघांनाही… मग खटकलेल्या सवयी दोघांना त्रास द्यायला लागतात…..वादाला कारणं मिळायला लागतात.  निरर्थक वादही व्हायला लागतात. मुलांशी फोनवर बोलताना ते वाद त्यांनासुद्धा जाणवायला लागतात आणि मग मुलांचे सल्ले यायला लागतात.   “तुम्ही इकडे आमच्याकडे या…….तुम्हाला बदल हवाय”… !! तेवढ्यापुरतं “हो, हो” होतं.  तोच विषय फोन झाल्यावर आणखी तीव्रतेने धुमसत राहतो.    मग मुलं म्हणतात त्याप्रमाणे थोडा बदल म्हणून फिरुन येणं सुद्धा होतं.  काही दिवस जातात आणि रिकामा वेळ पुन्हा खायला उठतो.  सतत तुम्हाला कोण entertain करणार ? शेवटी तुमची करमणूक तुम्हालाच शोधून काढायला हवी असते.

मग अशातच कधीतरी शाळेत, कॉलेजमधल्या मित्र मैत्रिणींची हाक येते whats app वर.  अचानक पुन्हा लहान होऊन बागडायला लागतो आपण.  गेटटुगेदर्स होतात….  भटकणं होतं आणि असं भिरभिरतांना हातून राहून गेलेलं… अर्धवट सुटलेलं…. पुन्हा खुणवायला लागतं.  वेळ तर हवा तेवढा असतो.  मग काय…. कुणाच्या हातात लेखणी येते तर कुणाच्या गळ्यात कॅमेरा…. कुणाच्या हातात कुंचला तर कुणाच्या गळ्यात गाणं.  आपल्या आवडत्या गोष्टीत मन रमायला लागतं… नवे छंदही  जडतात.  त्यात मन गुंतायला लागतं आणि मग अशी वेळ येते की वेळ अपुरा पडायला लागतो.  दोघांना स्वत:ची स्पेस मिळाली की रागावणं, वाद हे पण सगळं आपोआपच बंद होतं.  आता चिंता अशी कशाचीच नसते.  मनाला आनंद मिळेल ते करायचं असतं.  राहिलेलं मनसोक्त जगून घ्यायचं असतं. एकमेकांना सांभाळायचं असतं…..जपायचं असतं.  लाड करायचे असतात…..करवूनही घ्यायचे असतात.

आता खरी आयुष्याची मैफिल रंगायला लागते….! सुरात Positivity असली तर तो कधी बेसूर होत नाही  आणि एकमेकांची लय सांभाळली तर आयुष्याचं गाणं कधीही बेताल होत नाही.  हीच तर गंमत असते पन्नाशीनंतरच्या  एकांताची.  हा  पन्नाशीनंतरचा एकांत विशेष  असतो आणि आपल्यालाच तो तसा विशेष बनवायचा असतो !!

 

जयश्री अंबासकर

 

 

 

Advertisements

Read Full Post »

IMG-20151028-WA0004

आजची सकाळ काही वेगळीच होती. जरा कुठे उजाडायला सुरवात झाली होती. तर अचानक सगळीकडून धूळ उडायला सुरवात झाली. बघता बघता अंधारुन आलं. पुन्हा एकदा गडद काळोख अगदी रात्रीसारखा आणि अचानक आभाळ बदाबदा कोसळायला लागलं. मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट…. ! हातातली सगळी कामं (म्हणजे नवर्‍याचा डबा वगैरे) टाकून बाल्कनीत जाऊन उभी राहिले. समुद्रात लाटा मस्त पाणी उडवत होत्या. नेहेमीचा शांत पडून राहणारा समुद्र आपल्या खट्याळ लाटांची मज्जा मनापासून एन्जॉय करत होता. उजवीकडून पाऊस हलके हलके सरकत सगळीकडे पसरला आणि पूर्ण रितं होईस्तोवर आभाळ बरसत राहिलं. जेमतेम दहा मिनिटं झाली तोच सगळं काही शांत.

ढगांचं कोसळून झालं पण हा आवेग इकडच्या धरतीला झेपणं थोडं अवघड झालं. अवचित येणारा, कधीतरी दोन चार सरी उधळून जाणारा पाऊस …. आज इतका आसुसून…. !! पाण्याचे लोटच्या लोट सगळीकडे !! कुठे कुठे साठवू असं झालं तिला 🙂

शाळेत जाणारी मुलं, ऑफिसला जाणारी मंडळी जरा गोंधळलीच. पाऊस आला, सगळीकडे पाणीच पाणी करुन निघूनही गेला.

पण आता वातावरण इतकं सुरेख झालंय. घरात बसवेचना. निघालो फिरायला. नुकताच पडून गेलेला पाऊस…… सगळं चिंब चिंब, स्वच्छ, नितळ आसमंत, गार गार वारा… अहाहा मजा आ गया 🙂

अचानक आलेल्या अश्विन सरींनी आज मस्त माहोल बनवला 🙂

दिल फिर एक प्यारीसी धुन गुनगुनाने लगा है 🙂

Read Full Post »

IMG_5735

Read Full Post »

IMG_5735

Read Full Post »

महाराष्ट्र मंडळ, कुवेत ने “जागतिक मराठी भाषा दिवस” एका नेटक्या, आटोपशीर पण देखण्या कार्यक्रमाने सादर केला.

खरं तर ऐन परीक्षेच्या दिवसात येणार्‍या, आपल्या मराठी भाषिकांसाठी अतिशय महत्वाच्या असणार्‍या ह्या दिवसाकडे आपण थोडं दुर्लक्षच करतो. पण जेवढे सभासद येतील तेवढे येतील …. आपण हा दिवस साजरा तर नक्कीच करायचा…. ह्या प्रेरणेने समितीने हा दिवस प्रत्यक्षात साजरा करुन दाखवला आणि तो सुद्धा दिमाखात….. !! ह्याबद्दल समितीचं मनापासून अभिनंदन आणि खूप खूप कौतुक !!

ज्ञानेश्वरांनी विश्वशांतीसाठी लिहिलेल्या पसायदानाने सुरेल सुरवात आणि नंतर अनेक हौशी सभासदांनी सादर केलेल्या त्यांच्या आणि प्रसिद्ध साहित्यिकांच्या रचना ह्यामुळे एक मस्त मराठमोळं वातावरण तयार झालं होतं. अनेक नवीन कलाकारांची ह्या निमित्ताने ओळख झाली. आपलं मराठीपण जपण्याच्या ह्या समितीच्या प्रयत्नाचं पुन्हा एकवार कौतुक !!

जय मराठी…. जय महाराष्ट्र !!!

Read Full Post »

शुक्रवारची संध्याकाळ…. महाराष्ट्र मंडळ, कुवेत ने आयोजित केलेला “कवितांच्या गावा जावे” हा कार्यक्रम …. नव्या वर्षाची सुरवात यापेक्षा चांगली असूच शकत नाही. 

अरुण म्हात्रे, महेश केळुस्कर आणि प्रमोद पवार या दिग्गजांनी कवितेच्या गावाला इतक्या सुरेख वळणांवरुन नेलं ना…. की सफर कधी संपली ते कळलं देखील नाही. शेवटचं वळण आहे हे जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा अजूनही काही वळणांवर थांबायला हवं होतं असं वाटून गेलं.

1653282_264779023687220_1313087554_n

1653412_264779050353884_264895579_n

1901546_264776953687427_1971851193_n

अरुण म्हात्रेंचं सादरीकरण जाम आवडलं. त्याचा गाता गळा असल्यामुळे शब्द आणि सुरांनी हातात हात घालून माहौल तयार केला. त्यांना भेटलेल्या रसिकांच्या आगळ्या वेगळ्या प्रतिक्रिया त्यांनी अशा काही पेश केल्यात की ज्याचं नाव ते  फक्त स्वत:च्याच नाही तर अनेक नवीन कवींच्या कविता सुद्धा त्यांनी कवीचं आवर्जून नाव सांगून सादर केल्या. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा भावला. काही सुप्रसिद्ध कवींची कविता म्हणण्याची स्टाईल पण खूप दाद मिळवून गेली. 

कार्यक्रमाचं निवेदन मेधा पिंगळे आणि योगेश नाफडे यांनी फार सुरेख केलं.

चारोळी स्पर्धेचं आयोजन, हळदी-कुंकू, वाण, तिळगुळ …. सारं काही उत्कॄष्ठ होतं.

चारोळी स्पर्धेत आमच्या “अहों”ना (अविनाश अंबासकर) पहिलं आणि मला तिसरं बक्षिस मिळालं 🙂

1904001_264771693687953_1758228717_n

1897893_264771477021308_2118915318_n

“स्नेहरंग” चं प्रकाशन, एक वेगळं पाऊल….. आवडलं.

समितीच्या कल्पकतेचं कौतुक 🙂

कवितांच्या कार्यक्रमासारखं धाडसी पाऊल टाकलं ह्यासाठी मनापासून अभिनंदन !!
पुढच्या कार्यक्रमाबद्दल उत्सुकता जागवणारा हा पहिला कार्यक्रम खूप खूप आवडेश 🙂  

Read Full Post »

Sankrant 2014

Read Full Post »

Older Posts »

%d bloggers like this: