Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘गंमत जंमत’ Category

हल्ली जास्तच हळवी झालेय कां मी…. !!
डोळे  भरुन येतात …उगाचंच !!

कोणी जरा प्रेमानं, आपुलकीनं बोललं की डोळ्यात पाणी ! मनाविरुद्ध काही झालं तर पाणी, काही दुखलं की पाणी, काही खुपलं तरी पाणी !  हसतांना पाणी, कांदे चिरतांना, फोडणी घालतांना,काजळ लावतांना….. पाणीच पाणी.  आईची आठवण आली की मग तर धाराच !!

टिव्ही वर छोट्या मुलांचे कार्यक्रम बघतांना तर सगळं धूसरच दिसतं.  फक्त कौतुकानेही डोळ्यात इतकं पाणी जमावं… !! काय होतंय हल्ली !! Emotional सिनेमा असला तर विचारायलाच नको.  अगदी हुंदके देऊन तब्येतीने रडते मी.

लेकाने “आई, तू जेवलीस कां ?” असं विचारलं तरीसुद्धा डोळ्यात पाणी तयार ! अरे चाललंय काय ?? नवरा तर जाम चिडवतो.  तुझ्या टाकीचा नळ कायम चालूच असतो म्हणतो आणि मग रडता रडता खुदकन हसू येतं 🙂  

मग कधीतरी जाणवलं की काही खातांना सुद्धा डोळ्यातून पाणी येतंय.  मग नाश्त्याचे पोहे असोत नाहीतर वांग्याची भाजी भाकरी असो.  बरं फक्त तिखट पदार्थच नाही तर चक्क श्रीखंड पुरी खातांना सुद्धा पाणी.  हे म्हणजे जरा अतीच झालं ना !! अगदी सुगरण नाहीतरी बर्‍यापैकी सैपाक करते मी.  म्हणजे इतकं बेचव तर नक्कीच नाही की ते खातांना डोळ्यातून घळाघळा पाणी यावं. तसं असतं तर नवरा आणि मुलांच्या डोळ्यांनाही धारा लागल्या असत्या. बरं…..माझ्या हातचंच नाही तर मैत्रिणींनी अगदी प्रेमाने खाऊ घातलेले पदार्थ असोत …खातांना डोळ्यात पाणी आलंच पाहिजे.   अर्थात  इतक्या प्रेमाने कोणी काही खाऊ घातलं तर गहिवरुन येऊ शकतंच की !!  पण हॉटेल मधे गेलं तरी तेच.  आता तिथे कोण कशाला प्रेमानं खायला घालणार… !! पण नाही…. म्हणजे हो ….. म्हणजे पाणी तिथेही येतंच. काहीही खातांना हातात टिश्यु नसला तर अस्वस्थ होते मी !!  आजकाल तर लेक मी काहीही खायला सुरवात केली की लगेच टिश्यु आणून देतो. त्याने न मागता टिश्यु आणून दिला म्हणून सुद्धा डोळे पाणावतात.  आता कायच करावं !!

डॉक्टर कडे जाणं अगदी नको वाटतं.  भारतवारीत आवर्जून भेट घेतेच सगळ्या डॉक्टरांची.  मग बाकीचं वर्ष दवाखान्याचं नाव सुद्धा काढायला नको वाटतं.  नवरा म्हणाला तुझ्या Tear Glands जरा जास्तच active असाव्यात.  शिवाय नाकात काहीतरी opening असतं म्हणे ते तुझं बंद असावं म्हणून सगळं पाणी डोळ्यातूनच बाहेर येत असावं.  आता खरं, खोटं देव जाणे…. आणि तो डॉक्टर.  त्यांच्या भेटीचा योग यायला अजून जरा वेळ आहे तोपर्यंत माझे मोत्यांसारखे अश्रू वाहतंच राहणार….. !!

शेवटी इतकंच म्हणेन… मेरे आसूओं पे मत जाना…… ये तो खुशीके है 🙂 

Advertisements

Read Full Post »

स्टार माझा नं घेतलेल्या “ब्लॉग माझा ३” ह्या स्पर्धेत माझ्या ह्या ब्लॉगला उत्तेजनार्थ बक्षिस जाहीर झालंय…… खूप खूप आनंद झालाय 🙂

 

जगभरातले सगळे मराठी ब्लॉगर्स ह्या स्पर्धेत भाग घेतात.  अनेक विषयांवरचे ब्लॉग्स असतात.  यंदाही भरपूर लोकांनी भाग घेतला होता.  ह्या वर्षी परिक्षक होते, लीना मेहेंदळे (प्रसिद्ध मराठी ब्लॉगर आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी), विनोद शिरसाठ (कार्यकारी संपादक, सा.साधना), माधव शिरवळकर( आय टी तज्ञ).

खरं तर हा ब्लॉग फक्त स्वत:च्या आनंदासाठी सुरु केला होता.  हळुहळु लिखाण जमतंय असं लोकांच्या आलेल्या प्रतिक्रियांवरुन समजायला लागलं आणि आता तर ब्लॉग लिहिणं ही गरजच झालीये.  ह्या ब्लॉगने मला खूप काही दिलंय.  माझी Identity मिळाली असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही.  बक्षिस मिळावं ह्यासाठी हा अट्टाहास कधीच नव्हता पण बक्षिस मिळालं असं कळल्यावर अगदी मनापासून आनंद झाला एवढं मात्र खरं 🙂

सगळ्या विजेत्यांचं मनापासून अभिनंदन 🙂

Read Full Post »

सुमेधाचा साखळी हायकू पुढे नेतांना  शैलेशने  खो दिला….. आणि अगदी पहिल्यांदाच मी सुद्धा हायकू रचण्याचा प्रयत्न केला.

शैलेशचा हायकू होता

दाटल्या सयी
किरणांचा पहारा
भिरभिरला

………यापुढे माझा हायकू 🙂

कोकीळ गाई
सुरमयी सुगंध 
दरवळला

माझा खो श्यामलीला…..  http://kavadasaa.blogspot.com/

साखळीचे नियम (सुमेधाच्या अनुदिनीवरून साभार) –
१) वर दिलेल्या हायकू प्रमाणे दोन किंवा तीनच ओळींचा (की ओळींची?) हायकू रचायचा.
२) त्यातील मात्रा, ताल, ध्वनीरुप तसंच्या तसं आलं तर उत्तम, शक्य तितकं साम्य राखायचा प्रयत्न करायचा.
३) सर्वात महत्त्वाचे, ही साखळी असल्यामुळे तुम्ही जी कडी गुंफणार आहात तिची आधीच्या कडीशी काहीतरी जोडणी असावी : त्यातील लपलेल्या किंवा स्पष्ट दिसणार्‍या अर्थानुसार, त्यातील वापरलेल्या प्रतिमेनुसार, सुचित केलेल्या कल्पनेनुसार किंवा व्यक्‍त होणार्‍या भावनेनुसार किंवा अजून काही असेल!
४) कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त ३ जणांना खो द्यायचा. त्यांच्या ब्लॉगवर त्यांना प्रतिक्रिया देऊन तसं कळवायचं आणि शक्य असल्यास सुमेधाच्या ब्लॉगवर कळवायचं. मला कळवायचा हेतू इतकाच की मी सगळ्या कड्या एकत्र करू शकीन.
५) तुमच्या नोंदीच्या सुरुवातीला हे नियम डकवा, तुम्ही ज्या कडीच्या पुढे लिहीताय ती कडी उतरवा, आणि शक्यतो तुम्ही ज्यांना खो देताय त्यांच्या ब्लॉगचा दुवा द्या.

Read Full Post »

श्यामली….. तुझा खो घ्यायला बघ इतका वेळ लागला…… 🙂

मला बा.भ.बोरकरांची ही कविता इतकी आवडते ना…. निसर्गाची श्रीमंती तितक्याच श्रीमंती शब्दात रेखाटलीये त्यांनी ह्या कवितेत.

निळ्या जळावर कमान काळी
कुठे दुधावर आली शेते
थंडाव्याची कारंजीशी
कुठे गर्द बांबूची बेटे

जिकडे तिकडे गवत बागडे
कुठे भिंतीच्या चढे कडेवर
ती म्हातारी थरथर कापे
सुखांसवे होऊनी अनावर

तारांमधला पतंग कोठे
भुलूनी गेला गगनमंडला
फणा डोलवित झोंबू पाहे
अस्तरवीच्या कवचकुंडला

उंचवट्यावर म्हशी गोठल्या
तसेच कोठे कातळ काळे
वर्ख तृप्तीचा पानोपानी
बघून झाले ओलेओले

कुठे तुटल्या लाल कड्यावर
चपळ धीट बकरीची पोरे
एक त्यातले लुचे आईला
सटीन कांती गोरे गोरे

फूलपंखरी फूलथव्यांवर
कुठे सांडली कुंकुमटिंबे
आरस्पानी पाण्यावरती
तरत्या बगळ्यांची प्रतिबिंबे

कुठे आवळीवरी कावळा
मावळतीचा शकून सांगे
पूर्वेला इंद्राचे राऊळ
कोरीव संगमरवरी रंगे

घाटामध्ये शिरली गाडी
अन रात्रीचा पडला पडदा
पण चित्रांची विचित्रवीणा
अजून करते दिडदा दिडदा

बा.भ.बोरकर

सारंग…….तुला खो देतेय रे  http://praajakta.blogspot.com/

Read Full Post »

%d bloggers like this: