Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘गूढ माझ्या मनीचे’ Category

आज  चांदणे  भरात आहे  तुझ्यामुळे
आज पौर्णिमा  मनात आहे तुझ्यामुळे

मंद गारवा हवेत आहे जराजरा
रात्र वाटते खुशीत आहे तुझ्यामुळे

आज सावरु नकोच ना रे सख्या मला
आसमंत हा नशेत आहे तुझ्यामुळे

रंग तू मला दिलेस इतके नवेनवे
इंद्रधनुष ही कवेत आहे तुझ्यामुळे

श्वास बावरा, उरात धडधड पुन्हा पुन्हा
कैफ केवढा जिण्यात आहे तुझ्यामुळे                  

 जयश्री अंबासकर

Advertisements

Read Full Post »

तो आला अन्‌ दारी माझ्या बरसुन गेला
गोड गुलाबी संमोहन तो पसरुन गेला

माझा होता, केवळ माझा होता जेव्हा
बाकी नाती होता तेव्हा विसरुन गेला

रमले होते संसाराच्या खेळामध्ये
नाही कळले डाव कधी तो उधळुन गेला

नाते ताजे उरले नाही बाकी आता
आठव का मग श्वासांनाही उसवुन गेला

काळोखाची ओळख गहरी झाली होती
कां तो येवुन अंतर माझे उजळुन गेला

दरवळ सरला, सुकल्या होत्या माझ्या बागा
हलका शिडकावा का मजला फुलवुन गेला

जयश्री अंबासकर

साहित्य संस्कृतीच्या “अनाहत” ह्या डिसेंबर २०१४ च्या “गझल विशेषांक” मधे प्रकाशित झालेली माझी गझल !

Read Full Post »

सांज उतरती ओली
का लावुन हुरहुर जाते
मन गाभार्‍यात कशाचे
काहूर पेटवुन जाते

अर्घ्यातुन पागोळ्यांच्या
सुखसर्वस्वाचे दान
चुकविती बापुडी कौले
कुठल्या जन्मीचे ऋण

संन्यस्त घरांच्या भिंती
निथळती, गळती संथ
गतवैभव स्मरुनी सारे
ढाळती आसवे मंद

काळोखाचा विळखा मग
अधिकच काळा होतो
वाटते निसटले सारे
अन्‌ जीव घाबरा होतो

उदरातुन काळोखाच्या
उमलावा प्रेमपिसारा
स्पर्शातुन उमजत जावा
जगण्याचा अर्थ निराळा

जयश्री अंबासकर

Advertisements

Read Full Post »

खूप दिवसांनी हातात वही, पेन घेतलं आणि मनात येईल ते लिहून काढलं.  पूर्ण झाल्यावर जेव्हा वाचलं तेव्हा जाणवलं….. आजकाल आपल्या लेखणीतून काहीतरी वेगळंच उतरतंय……very unlike me.  मला वाटतं ही सुद्धा आयुष्याची एक phase असावी.  प्रेमकवितांपासून जी गाडी सुरु झाली ती अधून मधून आपले रुळ बदलत बदलत इथवर आलीये.    हातात पेन घेतल्यावर काहीसुद्धा माहित नसतं की काय उतरणार आहे.  पण मला surprises खूप आवडतात.  त्यामुळे   खरं सांगायचं तर हे सुद्धा मनापासून enjoy करतेय.

तो पेश-ए-खिदमत है मेरी नई नवेली गझल 🙂

थैमान 

बाहेर पावसाने, थैमान घातलेले
हृदयात आठवांचे काहूर पेटलेले

झड लागली कधीची, थांबेचना कशाने
आक्रोश हा घनांचा, आभाळ फाटलेले

अश्रूस पूर येता, दु:खास कोंब आले
बहरेल दु:ख माझे, अश्रूत पोसलेले

वैराण भावनांच्या, होळीत खाक झाले
डोळ्यात आटलेल्या, नवस्वप्न पोळलेले

दु:खात वेढलेल्या, या झोपडीत माझ्या
परतेल का पुन्हा सुख, दारात थांबलेले

जयश्री अंबासकर

Advertisements

Read Full Post »

कायदा गुन्ह्यासवे जुंपणार आजही

काल वाकला तसा, मोडणार आजही


मारणार तोच अन्‌, तोच तारणारही

का पणास द्रौपदी, लागणार आजही


भरभरुन सौख्य तू कैकदा दिले मला

जीर्ण पोतडी पुन्हा फाटणार आजही


वायदा करुन तू, तूच तोडणार तो

कायदा तुझा पुन्हा चालणार आजही


जाहला भल्याभल्या पुत्रमोह कालही

इंद्र कवचकुंडला मागणार आजही


जयश्री अंबासकर

 

Advertisements

Read Full Post »

dilemma (1)

मी……

कावरीबावरी

पुन्हा…. !!

किती दिवस चालणार असं !!

किती दिवस गप्प बसायचं

मनातलं वादळ मनातच लपवायचं… !

तो आसूड फिरवत राहतो शब्दांचे.

अन्‌ मी फक्त झेलत राहते घाव त्याचे.

त्याचं संकुचित जग

आणि तो स्वयंघोषित स्वामी.

का म्हणून स्विकारलीये मी….त्याची ही गुलामी !!

का सोसतेय हे क्लेश अतोनात

जुळवत राहते शब्द… फक्त मनातल्या मनात.

घायाळ होते मीच

त्याच्या शब्दानं आणि माझ्या मौनानं.

………

आता दिवस, आठवडे त्याच विचारात जाणार

जीव सारखा कासाविस होणार

घुसमट माझीच होणार.

तो…..

तो बिनधास्त……

झालेल्या पडझडीपासून अगदी अलिप्त.

स्वत:च्याच विश्वात मस्त !

कधीतरी आठवण आली की येणार,

अन्‌ पुरेशी विद्ध झालेय ह्याची खात्री करुनच जाणार…. !

आणि मी…..

मी त्या जखमेची मलमपट्टी करत

पुन्हा त्याचीच वाट पाहणार.

तो आला की तितक्याच आवेगानं

त्याच्या गळ्यात पडणार.

त्याचा अहं कुरवाळत

पुन्हा पुन्हा घायाळ होणार.

पुन्हा शब्द जिंकणार

आणि पुन्हा पुन्हा मौन हरणार.

…….

पुन्हा ???

नाही…..!!

बास झालं.

मौनानं आता बोलायलाच हवं.

शब्दांना पराभूत करायलाच हवं.

मौनाची ताकद ओळखायला हवी,

शब्दांवर कुरघोडी करायलाच हवी.

…..

येईल का तो  पुन्हा आज

शब्दांची घेवून तशीच मिजास

रेंगाळतोय दाराशी शब्दांचा वावर

मौनाचा ताबा झालाय अनावर

सलामी झालीये

तुंबळ युद्धाची

आता वाट फक्त…

दार ठोठावण्याची.

कधी शब्दांची माघार, कधी मौनाची हार

द्वंद्व मनाचं मनाशी, निरंतर सुरु राहणार.

मनाच्या समराला रोज सामोरं जायचं असतं

कधी कुणाला जिंकवायचं…. तुम्हालाच ठरवायचं असतं.

जयश्री अंबासकर

Advertisements

Read Full Post »

marathi-poet-suresh-bhat

सुरेश भटांना त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त माझी मानवंदना…….. माझ्या गझलेच्या रुपाने !!

सावरावे जरा

वेदनेने नवे रुप ल्यावे जरा
सोसणे मोरपंखी दिसावे जरा

गुंतले फार मी, पार नादावले
आवरूनी मना, सावरावे जरा

बंडखोरी नको भावनांची सदा
चेहर्‍याने लपविणे शिकावे जरा

आणभाका स्मरूनी गुलाबी जुन्या
आठवांनी पुन्हा मोहरावे जरा

हात सोडूनिया दूर झालो जिथे
पावलांनी तिथे अडखळावे जरा

पापण्यांनो पहारे करा मोकळे
आसवांना मुक्या वाहु द्यावे जरा

 जयश्री अंबासकर

Advertisements

Read Full Post »

Older Posts »

%d bloggers like this: