Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘नुकतंच वाचलेलं’ Category

index

“सुंदर ती दुसरी दुनिया” अंबरीश मिश्र चं आणखी एक नितांत सुंदर पुस्तक !!

जेव्हा अंबरीश मिश्र ह्यांचं “शुभ्र काही जीवघेणे” हे पुस्तक वाचलं तेव्हापासूनच त्यांच्या लिखाणाच्या प्रेमात पडले. आता ह्या पुस्तकानंतर तर त्यावर शिक्कामोर्तब झालं 🙂

चंदेरी दुनिया, त्यातली माणसं, रंगेल आयुष्य, त्यांच्या आयुष्यातले चढ उतार, ह्याबद्दल सगळ्यांनाच कुतूहल असतं. खरं तर ह्याबद्दल सांगता येण्यासारखं कितीतरी असेल. त्यातलंच मोजकं पण अभ्यासपूर्ण लेखन आहे ह्या पुस्तकात.

रणजीत फिल्म कंपनी, बॉम्बे टॉकीज, अशोककुमार, काननदेवी, शमशाद बेगम, विजय आनंद. प्रत्येकाबद्दल इतकं आत्मीयतेनं लिहिलेलं वाचताना आपण त्या काळात गेल्याचं फ़ील येतं. त्या त्या व्यक्तीबद्दल, वास्तूबद्दल सखोल माहिती, त्यांच्या लकबी, त्यांच्या महत्वाकांक्षा, त्यांचे weak points, त्यांचे strong points, त्या त्या घटना…. फार सुरेख चितारल्या आहेत. पुस्तक संपूच नये असं वाटतं.

व्यक्तिचित्रण करतांना ते प्रत्येक बारकावे मांडतात. ती व्यक्ती कशीही असो… पण आपण त्यांच्या लिखाणात गुंतत जातो….. ये दिल मांगे मोअर… असं होत राहतं.

पुस्तकाचं कव्हर सुद्धा एकदम देखणं. पुस्तकाची पानं, बांधणी, पुस्तकाचा Shape सुद्धा वेधक !!

मनापासून आवडलेलं पुस्तक !!

(माझ्या वहिनीच्या खजिन्यातलं )

Advertisements

Read Full Post »

438-6693-largeimages

डेबोरा एलीस ह्या मूळ इंग्रजी लेखिकेची अपर्णा वेलणकरांनी अनुवादीत केलेली ही दोन पुस्तकं नुकतीच वाचली.

“युध्दस्य कथा रम्या: ” हे फक्त म्हणायला किंवा वाचायला बरं वाटतं.  पण लेखिकेने केलेलं वर्णन इतकं प्रत्ययकारी आहे की अंगावर काटा येतो.

अफगाणिस्तान हा देश सुद्धा कधी काळी समृद्ध आणि सुसंपन्न होता…. हे सत्य आपल्यालाच स्विकारणं इतकं कठीण वाटतं तर तिथल्या रहिवाशांना किती कठीण जात असेल !! रशिया आणि अमेरिका ह्यांच्या सत्तासंघर्षात अफगाणिस्तान कायमच जळत राहिला.  रशियाने माघार घेतल्यावर तिथल्याच स्थानिक टोळ्यांनी सत्ता मिळवण्यासाठी केलेल्या रणकंदनात “तालिबान” जन्माला आलं आणि सुरु झालं एक पाशवी पर्व.  जुनाट विचारांच्या तालिबान्यानी व्यक्तिस्वातंत्र्य गुंडाळून ठेवणारी एककल्ली, दडपशाहीची राजवट देशावर लादली.  बायका मुलींची मुस्कटदाबी करुन त्यांना चार भिंतींच्या आत कोंडलं.  कुठलंही मनोरंजन मग ते संगीत असो, टिव्ही असो किंवा पुस्तकं असोत…. सगळ्यांवर बंदी घातली.  वर्तमानपत्रांचा गळा घोटला.  विरोध करणार्‍यांची सरळ कत्तल केली.  हजारो लोकांना तुरुंगात डांबलं.  कित्येकांच्या हत्या झाल्या, कित्येकांचे हात-पाय तोडण्यात आले, डोळे फोडण्यात आले.  निर्वासितांना भीक मागून दिवस काढावे लागले.

अशाच एका कुटुंबातल्या परवानाची ही कथा.  अफगाणिस्तानातल्या तालिबानी राजवटीचा अमानुष, क्रूर चेहरा दाखवणारी थरारकथा.  तालिबानी राक्षसांची नजर चुकवण्यासाठी पुरुषी कपडे घालून काबूलच्या रस्त्यावर उतरणारी बहादूर परवाना…. आपल्या कुटुंबासाठी जीवाचं रान करणारी परवाना….. !! एका अतिशय संवेदनशील मुलीच्या सुंदर स्वप्नांची राखरांगोळी होऊन सुद्धा चिवटपणे लढणार्‍या परवानाची कहाणी मनाला चटका लावून जाते.

“द ब्रेडविनर” मधे पुरुषी कपडे घालून आपल्या कुटुंबाची गुजराण करणारी परवाना आणि “परवाना” मध्ये आपल्या कुटुंबापासून दुरावलेली, वाटेत भेटलेल्या प्रत्येकाला जीवाच्या आकांताने मदत करणारी परवाना लेखिकेनं इतकी सुरेख रेखाटली आहे की आपणही नकळत तिच्यासोबत रानाडोंगरात भटकायला लागतो.  रणगाडे, विमानांच्या आवाजाने आपणही कासाविस होतो.  तिच्या प्रत्येक हालचालींमधे आपणही सहभागी होतो.  मग तिला भेटलेला आसिफ असो, तिला भेटलेली लैला असो किंवा तिला सापडलेलं छोटं बाळ हसन असो……..आपणही त्या सगळ्यांमधे फार गुंतून जातो.  परवानाने तिच्या मैत्रिणीला, शौझियाला लिहिलेली पत्रं वाचून, तिच्या इतकं सगळं भोगून अजूनही जीवंत असलेल्या आशेला सलाम करावासा वाटतो.

अशाच कितीतरी परवाना, लैला, आसिफ अफगाणिस्तानातल्या रस्त्यांवर, डोंगरांमधे रानोमाळ भटकत असतील.  त्यांच्यातली जगण्याची चिवट जिद्दच त्यांना अजूनही जीवंत ठेवतेय.

लेखिका डेबोराने  स्वत: अशा निर्वासितांच्या कॅंप्स मधे स्वयंसेवक म्हणून काम केलेलं आहे.  तिथे भेटलेल्या स्त्रियांच्या मुलाखती घेतांना सुंदर आयुष्य जगण्यासाठी धडपड करणार्‍या अनेक परवाना लेखिकेनी बघितल्या.  ह्या मुलांना बघूनच त्यांची कहाणी  लेखिकेला जगासमोर आणाविशी  वाटली.

सत्तेपायी माणूस किती क्रूर होऊ शकतो आणि त्यामुळे किती आयुष्यं उध्वस्त करु शकतो हे दाखवणारी कथा जितकी सुन्न करते तितकीच ह्या मुलांची जगण्याची धडपड बघून थक्क करते.

नक्की वाचावीत अशी आहेत ही पुस्तकं !!

Read Full Post »

पर्व

parv

नुकताच एस.एल.भैरप्पा ह्यांच्या “पर्व” ह्या पुस्तकाचा उमा कुलकर्णींनी लिहिलेला मराठी अनुवाद वाचला.

महाभारताचा अत्यंत बारकाईने अभ्यास करुन त्याची आजच्या सामाजिक दृष्टीकोनातून नव्याने केलेली सुबक बांधणी म्हणजे “पर्व” !

महाभारत अगदी लहानपणी वाचलेलं.  त्यानंतर टिव्ही वर बघितलेलं.  अत्यंत चमत्कृतींनी भरलेलं, भारलेलं असं हे महाभारत मनात अगदी पक्कं ठसलेलं होतं.  त्यातल्या असंख्य पात्रांच्या गुंतागुंतीच्या पण अतिशय चुरस, interesting कथा….. त्यांचे पराक्रम, प्रतिज्ञा, त्यांना मिळालेल्या किंवा तपश्चर्या करुन मिळवलेल्या अनेक शक्ती, सिद्धी… हे सगळंच अफाट आहे.  जवळपास प्रत्येकानेच हे वाचलेलं आहे.  पण ह्या सगळ्या गोष्टी बाजुला ठेवून आपल्याला नव्याने विचार करायला भाग पाडणारं हे पुस्तक आहे.

महाभारत हा खरं तर सूडाचाच प्रवास आणि सूड कशासाठी…….तर स्त्रिया आणि सत्ता.  सामान्य माणसांचे जे विकार वर्णन केलेल आहेत ते महाभारतात अगदी ठासून भरलेले दिसतात.  आपण जे महाभारत वाचलंय त्यात बर्‍याच पात्रांना  देवत्व देवून मग त्यांचे चमत्कार वर्णन करण्यात आलेले आहेत.   पण ह्या पुस्तकात भैरप्पांनी प्रत्येक पात्राला एका साधारण मनुष्याच्या स्वरुपात सादर केलेलं आहे.  त्यामुळे ह्या पुस्तकात जे चमत्कार आपल्याला अपेक्षित असतात त्याचं सुरेख स्पष्टीकरण वाचायला मिळतं.  ते त्यांनी अतिशय खोलात जाऊन, अभ्यासपूर्वक मांडलेलं आहे आणि म्हणूनच ते आपल्याला मनापासून पटतं.   स्पष्टीकरण इतकं सुरेख दिलंय की आपण नकळत आपल्याला माहित असलेल्या प्रत्येक प्रसंगाच्या स्पष्टीकरणाची वाट बघत राहतो आणि त्यांनी विशद केलेलं वाचल्यानंतर त्याचा पुन्हा एकदा विचार करतो.  खरं तर हेच ह्या पुस्तकाचं यश आहे.

पुस्तक संपल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि ती म्हणजे ह्या महाभारतात स्त्रियांना फक्त आणि फक्त उपभोग्य वस्तू म्हणूनच दाखवलंय.  बाकी ना कधी त्यांचा मनाचा विचार केला जातो ना कधी त्यांचं मत ग्राह्य धरलं जातं.  ह्याचा साहजिकच प्रचंड राग येतो.

काम, क्रोध, भय, वासना, मत्सर ह्या विकारांनी ग्रासलेल्या सामान्य माणसांची “महाभारत” ही कथा एस.एल.भैरप्पांनी फारच सशक्तपणे मांडली आहे.

नक्की वाचण्यासारखं पुस्तक !!  MUST READ BOOK !!

Advertisements

Read Full Post »

नुकताच शोभा डे ह्यांच्या “सिलेक्टिव्ह मेमरी” या पुस्तकाचा अपर्णा वेलणकर ह्यांनी लिहिलेला मराठी अनुवाद वाचला.

खरं तर जुनं पुस्तक.  जवळ जवळ १३-१४ वर्षांपूर्वी लिहिलेलं.  पण ते वाचण्याचा योग आता आला.  इंग्रजी पुस्तकं वाचायचा मला प्रचंड कंटाळा येतो.  अगदीच पर्याय नसला तरच मी इंग्रजी पुस्तक वाचते.  त्यामुळे “सिलेक्टिव्ह मेमरी” ह्या गाजलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद दिसल्याबरोबर पुस्तक उचललं.  वाचायला घेतलं आणि लगोलग संपवलं.

मुखपृष्ठावर लेखिकेचं देखणं छायाचित्र आहे.  शिवाय पुस्तकात लेखिकेच्या आयुष्यातल्या काही अविस्मरणीय प्रसंगांची छायाचित्रं सुद्धा आहेत.

लिखाणात सच्चाई आहे, अतिशय जास्त प्रामाणिकपणा आहे.  बरीचशी कन्फेशन्स आहेत.

स्वत:बद्दल लिहिताना लेखिकेनं किती मनस्वी आयुष्य जगलं ह्याचं जे वर्णन केलंय ते वाचताना त्यात दर्पोक्ती न वाटता “जे आहे ते असं आहे” हेच सांगण्याचा प्रयत्न दिसतो.

लहानपणापासूनच त्यांच्या स्वभावातला बिनधास्तपणा अनेक प्रसंगातून डोकावत राहतो.  आपलं वेगळेपण त्यांनी मुद्दाम जोपासलं असं वाटतं.  मी चारचौघींसारखी नाही हे त्या अभिमानानं सांगतात.  तसं असण्याची त्यांना किंमतही चुकवावी लागली आहे.  पण म्हणून त्यांनी आपला स्वभाव काही बदलला नाही.  एक उत्तम खेळाडू म्हणून शाळेत मिळालेली बक्षिसं असो, एक ग्लॅमरस मॉडेल म्हणून मिळालेली प्रसिद्धी असो किंवा एक उत्तम लेखिका म्हणून मिळालेला नावलौकिक असो …… सगळं त्यांनी इतक्या सहजपणे स्वीकारलं की जणू हे सगळं त्यांच्यासाठीच राखून ठेवलं होतं.

त्यांचं लिखाणावर असलेलं प्रेम मात्र त्यांच्या प्रत्येक लेखात दिसतं.  “लिहिल्याशिवाय मी जगूच शकणार नाही”, असंही त्या म्हणतात.  त्यामुळे त्यांचं मुलांकडे दुर्लक्ष झालं हे सुद्धा त्या मान्य करतात.  आपल्या कुटुंबाबद्दल भरभरून बोलताना मुलांनी प्रत्येक वेळी केलेली परखड टीका त्या आवर्जून सांगतात.  त्यामुळेच अजूनही माझे पाय जमिनीवर आहेत हे सुद्धा मान्य करतात.

सिनेमासिकापासून लिखाणाची केलेली सुरवात…… त्यानंतर लिखाणाची हळूहळू चढत गेलेली नशा……. आणि आता श्वासाइतकंच महत्वाचं झालेलं लिखाण…..हा प्रवास त्यांनी फार सुंदर रीतीने शब्दबद्ध केलाय.

त्यांचं बंडखोर लहानपण तर त्या सांगतातच पण जेव्हा त्यांची मुलं बंडखोरी करतात तेव्हा त्यांची झालेली चिडचिड सुद्धा त्या अगदी प्रांजळपणे कबूल करतात.

त्यांच्या ह्या स्मरणयात्रेत बरीच मोठमोठी मंडळी सामील होतात.  अनेक सेलिब्रेटीज, कलाकार, नेते ह्यांचं  स्वभाववर्णन त्यांनी परखडपणे केलंय.  ह्यात बरचसं हात राखूनही ठेवलंय हे सुद्धा त्या स्वत:च सांगतात.

त्यांनी केलेलं दुसरं लग्न, दुसरा संसार, सहा मुलाचं संगोपन, ते करत असताना झालेली धावपळ, दमछाक आणि ह्या सगळ्यातून मिळालेले उत्कट क्षण……. ह्याबद्दल त्या अगदी मोकळेपणाने सांगतात.

मला त्यांनी सांगितलेला एक प्रसंग खूप आवडला.  एका मुलाखतीत त्यांना “तुमच्या पश्चात कोण म्हणून तुमची आठवण रहावी असं तुम्हाला वाटतं” ह्या प्रश्नाला त्या उत्तर देतात “अ‍ॅज समवन हू डेअर्ड”  पण हाच प्रश्न जेव्हा त्या आपल्या मुलीला विचारतात की “हाऊ डु यू डिस्क्राइब युअर मदर? तेव्हा मुलगी म्हणते, ”ट्रेडीशनल, जुनाट, कर्मठ”  ह्या विरोधाभासातली गंमत त्या दिलखुलासपणे एन्जॉय करतात.

शेवटी मी कशी जगले हे सांगतांना त्या म्हणतात, “मी माझ्या पद्धतीने जगले”.

शोभा डे ह्या मनस्वी लेखिकेचं आणखी एक वाचनीय पुस्तक 🙂

Advertisements

Read Full Post »

आज सकाळी सकाळी क्रांतिची उत्कृष्ठ गझल वाचली.  वाचल्यानंतर ह्या माझ्या सखीला कुठली विशेषणं लावावी हेच कळेना.  अशक्य लिहिते ही …!!

क्रांति…..तुझी ही गझल मुद्दाम माझ्या ब्लॉगवर टाकतेय.  माझी अत्यंत आवडती गझल म्हणून…. 🙂

 उत्तरे 

गुंतून मीच जाते कोशात उत्तरांच्या
जेव्हा नव्या समस्या होतात उत्तरांच्या

बिनमोल तेच सारे अनमोल होत गेले,
दे प्रश्न जीवघेणे मोलात उत्तरांच्या !

काही विचारण्याची प्राज्ञा कुठे कुणाची?
वाहून प्रश्न गेले ओघात उत्तरांच्या

का उत्तरे मुकी ते प्रश्नांस आकळेना
की शब्द कैद झाले ओठात उत्तरांच्या ?

ती उत्तरे अशी की अस्वस्थ प्रश्न झाले,
चक्रावले, बुडाले डोहात उत्तरांच्या !

उलटून प्रश्नचिन्हे गळ टाकुनी बसावे,
का जन्म घालवावा शोधात उत्तरांच्या ?

त्याला तमा न होती या प्रश्न-उत्तरांची,
माझेच प्रश्न होते मोहात उत्तरांच्या

वाचून उत्तरांना मी प्रश्नचिन्ह व्हावे,
दडलेत प्रश्न इतके पोटात उत्तरांच्या ! 

क्रांति

Advertisements

Read Full Post »

खरं तर एक वेगळंच पुस्तक वाचत होते पण कधी कधी एखादं पुस्तक हातात येतं आणि आपण तेच आधी वाचून संपवतो किंबहुना त्या पुस्तकाची जादू आपल्याला तसं करायला भाग पाडते.

कुमठेकरांनी “झुळूक अमेरिकन तोऱ्याची ” हे शरद वर्दे ह्यांचं पुस्तक दिलं आणि फक्त मनोगत आधी वाचूया असं ठरवलं. पण छे….. पुस्तक पूर्ण होईस्तोवर खाली ठेवंवलंच नाही.

खुमासदार शैलीत अमेरिकेचा तोरा  वाचतांना मज्जा वाटली.  कितीही नाकारलं तरी अमेरिकेबद्दल मनात कायम असूया असतेच.  पूर्ण जगावर असलेला त्यांचा पगडा, त्यांची दादागिरी, त्यांचा डॉलर, त्याची वाढणारी किंमत…..अशी आणि आणखी कितीतरी कारणं आहेत.  असं असलं तरी आयुष्यात एकदा तरी अमेरिकेत जाऊन यायलाच हवं हे मनातून सगळ्यांनाच वाटत असतं आणि ह्या वाटण्यातून जेव्हा अमेरिकेत जायला मिळतं…… तेव्हा तिकडल्या सोयी, गैरसोयी त्यामुळे उडालेली तारांबळ ह्याची गंमत लिखाणातून वाचतांना मजा येते.  त्यातून शरद वर्दे ह्यांच्यासारखा प्रतिभासंपन्न लेखक असेल तर विचारायलाच नको.

अमेरिकेत बोलली जाणारी भाषा, त्याचं खाण-पिणं, त्यांचे कपडे, त्यांच्या गाड्या, त्यांचं वागणं, त्यांचे नियम ह्यांचं वर्णन तर जबरी आहेच पण त्यात भरडले जाणारे पर्यटक, त्यांची फजिती…… ह्याचं वर्णनही  फार रंजक आहे.  पुढे काय, पुढे काय….. असं करत करत पुस्तक संपतं सुद्धा 🙂

लेखक खरं तर ऑफिसच्या कामासाठी अमेरिकेच्या वाऱ्या करतो.  ऑफिसची कामं करतांना आणि त्याव्यतिरिक्त उरलेल्या वेळात त्यांना जे काही अनुभव आलेत ते त्यांनी फारच खुसखुशीत करून सांगितले आहेत.  तिथे स्थायिक झालेले त्यांचे नातेवाईक, मित्र…… ह्यांच्या अमेरिकेच्या संस्कृतीमुळे  प्रयत्नपूर्वक बदललेल्या सवयी, वागणं, बोलणं  आणि त्यामुळे लेखकाची उडालेली त्रेधातिरपीट….. आपल्याला गालातल्या गालात हसवते.

पुस्तकातली रेखाटनंही अप्रतिम !! त्याने गंमत अजून वाढलीये.

काहीही असो…….. अमेरिकेची क्रेझ अजूनतरी आहेच.  त्यामुळे  लिखाण अतिशय ताजं वाटतं.  एकदातरी वाचावं असं पुस्तक.

आवर्जून पुस्तक वाचायला दिल्याबद्दल कुमठेकरांचे खूप खूप आभार 🙂

Advertisements

Read Full Post »

सुधीर फडकेंचं अपुरं आत्मचरित्र !  सुधीर फडके हे संगीतकार म्हणून लोकप्रिय होण्याअगोदर त्यांनी जिवंत राहण्यासाठी म्हणा किंवा काहीतरी बनण्यासाठी नियतीशी केलेला संघर्ष….असं ह्या पुस्तकाचं वर्णन करता येईल. हे पुस्तक वाचेपर्यंत मला अजिबातच माहिती नव्हतं की सुधीर फडके ह्या व्यक्तीनी हे सगळं यश मिळवण्यासाठी लहरी नियतीशी इतका जबरदस्त मुकाबला केलाय.

बाबूजी….. म्हणजे मराठी संगीतातलं एक मोठं विद्यालय !! यशाच्या शिखरावर पोचण्याचा रस्ता इतका खडतर असू शकतो…… !! संगीताचं तर सोडून द्या पण साधं जीवंत राहण्यासाठी सुद्धा त्यांना खूपच वणवण करावी लागली.  त्यांचं हे अपुरं आत्मचरित्र अतिशय हुरहुर जागवून जातं.  दैन्य म्हणजे काय ह्याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतलाय.  त्यांच्या ओघवत्या शैलीत त्याची विदारकता आपल्याला अक्षरश: हादरवून सोडते.  अतिशय प्रामाणिक लेखन, स्पष्ट विचार, सुसंस्कारित मन, जिद्द, माणुसकीवर विश्वास, स्वाभिमान असे त्यांचे अनेक पैलू ह्या पुस्तकातून आपल्या समोर येतात.

त्यांच्या गाण्याच्या शिक्षणाबद्दल तर ते आसुसून सांगतातच पण त्यांना आलेल्या चांगल्या वाईट अनुभवांचं वर्णनसुद्धा ते तितक्याच आत्मीयतेने करतात.  अगदी आठवण ठेवून त्यांना मदत केलेल्या व्यक्तींचे त्यांनी आभार मानले आहेत.  भयंकर अनुभव येऊन सुद्धा त्यांचा माणुसकीवरचा विश्वास अजिबात ढळला नाही.  संगीतकार म्हणून मान्यता मिळण्याआधीचा त्यांचा प्रवास वाचतांना अचानक पुस्तक संपतं.  आता पुढे काय….. हा विचार करता करताच हे कथन संपतं……मनात एक हुरहुर जागवून.  त्यांचा पुढचा प्रवास कसा झाला असेल, ह्या टप्प्यावर कसे पोचले असतील……. अशी अनेक प्रश्नचिन्हं वाचकांच्या मनात जागतात.  कदाचित त्यांच्या लेखन शैलीचा हा प्रभाव असेल.  फार वेगवान कथानक आहे त्यांच्या आयुष्याचं.  सगळं वर्णन अगदी जिवंत !  पुस्तक कधी संपतं ते कळतही नाही आपल्याला.

खरं तर गीतरामायण कसं तयार झालं….ह्याची कथा त्यांच्या या लेखनशैलीत वाचायला सगळ्यांना नक्कीच आवडली असती.  पण ते राहूनच गेलं…..अशी हळहळ श्रीधर फडक्यांनी त्यांच्या मनोगतात व्यक्त केलीये.  पुस्तकाच्या शेवटी या गानतपस्व्याची पत्नी, ललिता फडक्यांच्या लेखणीतून उतरलेले अनुभव पण आहेत.  ते वाचून सुधीर फडके ह्या व्यक्तीबद्दलचा आदर दुणावतो.

आपण छोट्या छोट्या गोष्टींमुळे हताश होतो, हात-पाय गाळून बसतो.  पण वेड लागण्यासारखी परिस्थिती ओढवून सुद्धा, आत्महत्येच्या विचारापासून मनाला कसं परावृत्त केलं हे फक्त “जगाच्या पाठीवर” हे पुस्तक वाचूनच कळेल.  पुढे त्यांच्या हातून इतकी महान निर्मिती व्हायची होती आणि म्हणून त्यांना कणखर बनवण्यासाठीच कदाचित नियती त्यांच्यासोबत इतकी कठोर वागली असावी.

एक स्वच्छ मनाचा गानसम्राट कसा घडला हे कळण्यासाठी हे पुस्तक नक्कीच वाचावं.

 

Advertisements

Read Full Post »

Older Posts »

%d bloggers like this: