Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘मनातलं…!’ Category

मी……
कावरीबावरी
पुन्हा…. !!
किती दिवस चालणार असं !!
किती दिवस गप्प बसायचं
मनातलं वादळ मनातच लपवायचं… !
तो आसूड फिरवत राहतो शब्दांचे
अन्‌ मी फक्त झेलत राहते घाव त्याचे.
त्याचं संकुचित जगआणि तो स्वयंघोषित स्वामी.
का म्हणून स्विकारलीये मी….त्याची ही गुलामी !!
का सोसतेय हे क्लेश अतोनात
जुळवत राहते शब्द… फक्त मनातल्या मनात.
घायाळ होते मीच
त्याच्या शब्दानं आणि माझ्या मौनानं
.……
……
आता दिवस, आठवडे त्याच विचारात जाणार
जीव सारखा कासाविस होणार
घुसमट माझीच होणार.
तो…..
तो बिनधास्त……
झालेल्या पडझडीपासून अगदी अलिप्त.
स्वत:च्याच विश्वात मस्त !
कधीतरी आठवण आली की येणार,
अन्‌ पुरेशी विद्ध झालेय ह्याची खात्री करुनच जाणार…. !
आणि मी…..
मी त्या जखमेची मलमपट्टी करत
पुन्हा त्याचीच वाट पाहणार.
तो आला की तितक्याच आवेगानं
त्याच्या गळ्यात पडणार.
त्याचा अहं कुरवाळत
पुन्हा पुन्हा घायाळ होणार.
पुन्हा शब्द जिंकणार
आणि पुन्हा पुन्हा मौन हरणार
.…….
पुन्हा ???
नाही…..!!
बास झालं.
मौनानं आता बोलायलाच हवं.
शब्दांना पराभूत करायलाच हवं.
मौनाची ताकद ओळखायला हवी,
शब्दांवर कुरघोडी करायलाच हवी
.…..
येईल का तो पुन्हा आज
शब्दांची घेवून तशीच मिजास
रेंगाळतोय दाराशी शब्दांचा वावर
मौनाचा ताबा झालाय अनावर
सलामी झालीये
तुंबळ युद्धाची
आता वाट फक्त…
दार ठोठावण्याची.
कधी शब्दांची माघार, कधी मौनाची हार
द्वंद्व मनाचं मनाशी, निरंतर सुरु राहणार.
मनाच्या समराला रोज सामोरं जायचं असतं
कधी कुणाला जिंकवायचं….
तुम्हालाच ठरवायचं असतं.

जयश्री अंबासकर

Read Full Post »

Read Full Post »

वृत्त – सुमंदारमाला
लगावली – लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा

कितीदा कराव्या चुका त्याच त्या तू सुधरणार आहेस केव्हा मना
किती काळ फिरशील चक्रात दु:खी किती बोल तू लाविसी जीवना
किती वेळ गोंजारुनी दु:ख अपुले उराशी किती तेच कवटाळणे
उगाळून करतोस दु:खास ताजे किती ते उमाळे नव्याने पुन्हा

मिरवतोस भाळावरी कौतुकाने जुन्या त्याच जखमा कसा काय तू
शिळे होत आयुष्य संपून गेले जगायास बाकी विसरलास तू
तुझा तूच दोषी अशा वागण्याला शिव्याशाप दैवास देतोस का
असे दु:खकोषात जगणे स्वत:चे स्वत: मान्य केलेस का सांग तू

तुझ्यावर विखारी किती घाव झाले किती दंश झालेत जहरी तुला
किती तू बिचारा किती भाबडा तू किती या जगानेच छळले तुला
हिशेबात इतका रमलास दु:खी मना शून्य झाल्या तुझ्या जाणिवा
दिल्या कैक हाका सुखाच्या ऋतूंनी कशा बघ जराही न कळल्या तुला

अता दार उघडून बाहेर ये तू जरा मोकळा श्वास घे रे मना
तुझ्याभोवतीचे जुने पाश दु:खी करू दे कितीही नव्या वल्गना
नवा श्वास घे तू नवी आस हो तू नव्यानेच कर तू नवी कामना
तुझे मोकळे पंख पसरून घे रे तुझ्या अंबरी तू भरारी पुन्हा

जयश्री अंबासकर

#गोदातीर्थ_उपक्रम

Read Full Post »

वृत्त – अनलज्वाला
मात्रा – ८ ८ ८

कणाकणाला व्यापुन उरते तुझी आठवण
आई मजला व्याकुळ करते तुझी आठवण

आयुष्याला कवेत घेते तुझी आठवण
भिजल्या डोळ्यातुन पाझरते तुझी आठवण

चुकते जेव्हा रागे भरते तुझी आठवण
प्रेमाचेही शिंपण करते तुझी आठवण

अधिकाराने विचारतेही तुझी आठवण
कर्तव्याची जाणिव करते तुझी आठवण

पळापळीने दमून करते तुझी आठवण
श्रांत मनाला मग सावरते तुझी आठवण

संयम, शांती रोज शिकवते तुझी आठवण
सदा यशाचे कौतुक करते तुझी आठवण

आई झाले आता अधिकच तुझी आठवण
लेक होउनी कुशीत शिरते तुझी आठवण

जयश्री अंबासकर

Read Full Post »

असं आजकाल वारंवार व्हायला लागलंय
डोळ्यातलं पाणी जरा जास्तच वहायला लागलंय
दु:खाने तर येतंच येतं पण हल्ली आनंदात सुद्धा यायला लागलंय
कधी कधी तर निमित्तही लागत नाही…..
डोळे उगाच वहायला लागतात.
आधी… कुणी काही बोललं, आवाज चढवला तर यायचं
पण आता….
बाहेर खूप छान पाऊस कोसळत असला,
तर त्याच्या सरी…. डोळ्यातून सुद्धा ओघळतात.
कधी तरी सूर्यास्त बघतांना व्याकूळ होऊन,
तर कधी चांदण्या रात्री चमचमतं चांदणं पांघरुन….
कधी समुद्राच्या निशब्द लाटा
तर कधी आकाशातल्या रंगांच्या छटा
अगदी काहीही निमित्त पुरतं.
कुणाची तरी खूप आतून आठवण येते….
आणि डोळे पाझरायला लागतात.
संध्याकाळी देवापुढच्या दिव्यासमोर परवचा म्हणताना
आणि तिरंग्यापुढे राष्ट्रगीत म्हणताना तर भरुन येतातच येतात.
मुलांच्या Achievements असोत की त्यांच्या आठवणी असोत
डोळे कायम डबडबलेलेच.
टिव्हीवर कुणी छान गात असलं तरी भरुन येतात
कुणी छान बोलत असलं तरी पाणावतात
कधी काही छानसं वाचलं, ऐकलं, बघितलं की…
सगळंच धूसर होऊन जातं…..
काय होतंय माहिती नाही
पण अताशा असं होतंय खरं !!
……
हल्ली मी ना…. त्यांच्याशी एक Deal केलंय
आता मनातले सगळे उचंबळ मी त्यांच्या स्वाधीन करते
मग पुढे काय करायचं …
हे त्यांचं तेच ठरवतात.
ओलावतात…
पाझरतात….
बरसतात….
आणि मी….
आणि मग मी मात्र दिसते…. कायम हसरी !!!!!!!!!!!

जयश्री अंबासकर

Read Full Post »

Older Posts »

%d bloggers like this: