Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘मराठी’ Category

जिंकण्याने सतत मी बेजार हल्ली
वाटते घ्यावी जरा माघार हल्ली

थांबले दिसते तुझे लढणेच आता
हारण्याचा थेट की स्वीकार हल्ली ?

संपली नाही लढाई जीवनाची
केवढे बोथट तुझे हत्यार हल्ली

शांतता आहे खरी की भास आहे
होत नाही कोणताही वार हल्ली

लागते रात्री सुखाची झोप आता
ना लढाई, ना चढाई फार हल्ली

मेळ झाला थांबला संहार हल्ली
जीवनाला देखणा आकार हल्ली

जयश्री अंबासकर

Read Full Post »

वृत्त – अनलज्वाला
मात्रा ८ ८ ८

वणवण फिरुनी, धावुनि दमतो संध्याकाळी
दिवस उसासे टाकत असतो संध्याकाळी

थकून वारा निपचित असतो संध्याकाळी
कधी विरक्ती घेउन फिरतो संध्याकाळी

दिवसभराची दिनकर करतो वेठबिगारी
दमून सुटका मागत असतो संध्याकाळी

निशेस येण्या अवधी असतो अजुन जरा अन्
दिवसच हातुन निसटत असतो संध्याकाळी

विचार भलता येतो कायम कातरवेळी
मनास विळखा घालुन बसतो संध्याकाळी

चुकाच केल्या आजवरी का वाटत असते
उगाच शिक्षा भोगत बसतो संध्याकाळी

भरकटलेले गलबत माझे सावरतो मी
नवा किनारा शोधत फिरतो संध्याकाळी

नव्या दमाने खेळत असतो रोज सकाळी
पुन्हा तसाच पराजित असतो संध्याकाळी

चराचराच्या नश्वरतेचा जागर होतो
तनमन सारे व्याकुळ करतो संध्याकाळी

प्रसन्न करतो देवघरातुन सांजदिवा मग
मनास उजळत तेवत असतो संध्याकाळी

जयश्री अंबासकर

खाली दिलेल्या लिंकवर तुम्हाला माझी गझल माझ्या आवाजात ऐकता येईल.

Read Full Post »

वृत्त भवानी
मात्रा – २ ८ ८ ८ ४

ही रात्र संपली आहे पण मग जाग अजुन का नाही
गात्रात पेरलेली मदहोशी ओसरली का नाही
डोळ्यात नीज पण गंधित सळसळ अजुनी चंदन देही
बेहोश धुंद चांदणे अंतरी तसेच चमकत राही

त्या निशाकराचे संमोहन सारून जरा बघ आता
किलबिलत गोड पाखरे सांगती जगी उषेची वार्ता
प्राजक्ताने बघ कूस बदलुनी सडा घातला दारी
उचलून चांदणे चंद्र बिचारा फिरला बघ माघारी

कोकीळ घालतो चराचराला मधुर बसंती हाळी
चैतन्य पालवी मोहरून सृष्टीवर चवर्‍या ढाळी
तो झेलत चंचल पहाटवारा हसतो पिंपळ गाली
जमलेली मैफिल पारावरची बघतो वाकुन खाली

रविकिरणे बघ ना किती प्रफुल्लित राजस सोनसकाळी
प्राजक्त मौक्तिके श्वेत केशरी ओघळती मखमाली
देऊन अर्घ्य तू स्वागत कर तेजस्वी नवसूर्याचे
श्वासात तजेला भरून गा तू, गीत नव्या स्वप्नांचे

जयश्री अंबासकर

#गोदातीर्थ_काव्यसाधक

ही कविता तुम्ही माझ्या आवाजात खाली दिलेल्या लिंकवर ऐकू शकता.

Read Full Post »

चंद्रवर्खी यामिनीची भूल पडते सागरा
मीलनोत्सुक ओढ दोघा यामिनी अन सागरा

चंद्रबिंदीला कपाळी लावुनी ती चंचला
घालते नाजुक कटीवर तारकांची मेखला

चांदण्यांचे माप ओलांडून येता यामिनी
स्वागताला तो किनारी उंच लाटा घेउनी

चांदणे लेवूनिया ती शिल्प सुंदर भासते
पाहता अनिमिष सख्या आरक्त होउन लाजते

सागराच्या प्रियतमेचा नूर सावळ आगळा
रंगतो अवखळ अनोखा धुंद प्रणयी सोहळा

शांत होते गाज हृदयी गोड हुरहुर राहते
प्रीतवेडे चांदणे लाटात त्या रेंगाळते

रात्र सरते, सागराचे गात्र जागत राहते
अन तटावर लाट विरही शिंपल्यातुन वाहते

जयश्री अंबासकर

Read Full Post »

सुखाला शोधताना….

तू नदी खळखळ प्रवाही, मी किनारा थांबलेला
तू तुफानी धुंद कोसळ, हुंदका मी दाटलेला
चंचला तू आसमानी, अश्म मी दुर्लक्षिलेला
तू हवीशी या जगाला, मी जगाने वगळलेला

तू बसंती बहर नाजुक, वृक्ष मी तर छाटलेला
भरजरी तू वस्त्र आणिक जीर्ण मी बघ फाटलेला
शुभ्र स्फटिकासम परी तू, मी किती डागाळलेला
मूर्त तू सुंदर अखंडित, भग्न मी अन् विखुरलेला

भिन्न जग माझे तुझे अन मार्ग देखिल भिन्न होता
अन् परीघहि वेगळा पण केंद्र बिंदू तोच होता
गाठण्याचा मग तुला तो, यत्न आटोकाट होता
गवसला प्याला सुखाचा, भरुन काठोकाठ होता

मी तुझ्या परिघात आलो, ज्या सुखाला शोधताना
तेच सुख मजला मिळाले, फक्त तुजला पाहताना
कौतुकाने पाहतो मी, तुज सुखाने विहरताना
रोखतो मग मीच अपुल्या, आसवांना वाहताना

जयश्री अंबासकर

#गोदातीर्थ_उपक्रम

ही कविता माझ्या आवाजात तुम्हाला Youtube वर ऐकता येईल.तुम्हाला कविता आवडली तर नक्की Like, Comment आणि Share करा आणि अशाच आणखी कविता ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनेल ला नक्की Subscribe करा

Read Full Post »

Older Posts »

%d bloggers like this: