Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘माझी आई’ Category

वृत्त – अनलज्वाला
मात्रा – ८ ८ ८

कणाकणाला व्यापुन उरते तुझी आठवण
आई मजला व्याकुळ करते तुझी आठवण

आयुष्याला कवेत घेते तुझी आठवण
भिजल्या डोळ्यातुन पाझरते तुझी आठवण

चुकते जेव्हा रागे भरते तुझी आठवण
प्रेमाचेही शिंपण करते तुझी आठवण

अधिकाराने विचारतेही तुझी आठवण
कर्तव्याची जाणिव करते तुझी आठवण

पळापळीने दमून करते तुझी आठवण
श्रांत मनाला मग सावरते तुझी आठवण

संयम, शांती रोज शिकवते तुझी आठवण
सदा यशाचे कौतुक करते तुझी आठवण

आई झाले आता अधिकच तुझी आठवण
लेक होउनी कुशीत शिरते तुझी आठवण

जयश्री अंबासकर

Read Full Post »

श्रीमंत वावर माझीच आई
करतेय सादर माझीच आई

शाही सवारी करते स्कुटरवर
तरुणी निरंतर माझीच आई

दमुनी उन्हाचा दारात कोणी
देणार भाकर माझीच आई

दुलईत घेई सार्‍या जगाला
मायेचि पाखर, माझीच आई

पोळून आले जेव्हा कधी मी
हळुवार फुंकर माझीच आई

सार्‍या घराची तृप्ती करूनी
खाणार नंतर माझीच आई

कशिदा असो वा स्वेटर नि शाली
विणणार झरझर माझीच आई

दुखले कुणाचे थोडे तरीही
होणार कातर माझीच आई

काया तिची ना थकते कधीही
जात्याच कणखर माझीच आई

समस्या असो वा दुविधा कितीही
हमखास उत्तर माझीच आई

तेजाळ ज्योती परि भासते ती  
सगळ्यात सुंदर माझीच आई

देणेच देणे नाही अपेक्षा
साक्षात ईश्वर माझीच आई

जयश्री अंबासकर
२८.३.२०१८

Read Full Post »

आज आईला जाऊन एक महिना झाला…….. !!   जेव्हा हे जाणवतं की आता आई फक्त आठवणीतच राहणार त्यावेळी मात्र जीव कासावीस होतो….काही काही सुचेनासं होतं.  सगळी सुखं असूनही फार एकटं आणि भकास वाटतं.  तिचा कौतुकाने पाठीवर फिरणारा हात, काळजीने डोक्यावरुन फिरलेला हात….सगळं सगळं अगदी तसंच जाणवतं… अंग शहारतं.  मग तिच्या आजारपणात तिच्या डोक्यावरुन हात फिरवतांना झालेला तिच्या रुपेरी केसांचा उबदार स्पर्श आठवतो….. सरणावर जातांना तोच स्पर्श किती थंड असतो ….. !!

आई……..
………

…..
यापेक्षाही जास्त दु:ख असू शकतं ???

पावसाळा आला, पाऊस मात्र नाही

आभाळ भरुन आलं पण कोसळलंच नाही


पावसाचा देव म्हणे रुसला होता

माझं गाव सोडून, बाकी बरसला होता


वेशीपल्याड सारं काही भिजवत होता

मला मात्र मुद्दाम विसरत  होता


देवाकडे जेव्हा मी गार्‍हाणं केलं

तेव्हा त्याने त्याचं भांडार… खुलं केलं


खेळी मात्र पावसाने अशी काही केली

आई माझी आभाळात उचलून नेली


केलं पार पोरकं त्याने भर पावसात

विश्व केलं उध्वस्त फक्त काही क्षणात


बांध फुटला डोळ्यांचा, आवरेना पाऊस

तेव्हा मात्र माझ्या सोबत रडला पाऊस


आता फक्त पावसाळा, दुसरा ऋतू नाही

भिजलं अंग पुसायला आई मात्र नाही


पावसाच्या देवा, पुन्हा असं नको करुस

बदल्यात पावसाच्या कुणाची आई नको नेऊस


जयश्री

Read Full Post »

हो हो सुपर मॉम हेच नाव अगदी योग्य आहे.  माझी आई जगातली सगळ्यात आगळी-वेगळी आई आहे. तसं म्हटलं तर प्रत्येकालाच असं वाटायचा हक्क आहे पण तरीसुद्धा माझ्या आईचा एक गुण नक्कीच जास्त असणार सगळ्या आयांपेक्षा 🙂

तिचं लग्न थोडं उशीरानेच झालं आणि त्यात अस्मादिकांनी ह्या जगात यायला चक्क १२ वर्ष घेतली.  म्हणूनच आई मला तिची आणि बाबांची “तपश्चर्या” म्हणते.  माझ्यानंतर चार वर्षाने राजू आणि मग २ वर्षाने प्रसाद.  म्हणजे आमच्या पंचकोनी कुटूंबाला पूर्ण व्हायला तब्बल १८ वर्ष लागली.  आई आणि बाबा दोघेही प्राध्यापक.  आई तिच्या आवडत्या क्षेत्रात म्हणजे खेळाच्या क्षेत्रात आणि बाबा व्हेटरनरी डॉक्टर.

आईचं माहेर अमरावतीचं.  खूप मोठा परिवार…घरी दूधदुभत्याचा व्यवसाय.  लहानपण अगदी चैनीत नाही तरी सुस्थितीत गेलं.  मनासारखा जोडीदार मिळाला.  लग्नानंतर बी.ए., एम. ए. आणि नंतर बी.पी.एड. केलं….. आम्हा तिघांनाही सांभाळून.  अर्थात बाबांचा पूर्ण पाठिंबा होताच.  पण घरचं सगळं सांभाळून हे सगळं करणं म्हणजे गंमत नव्हती.  ही तारेवरची कसरत तिने अगदी लीलया केली.

आईला पहिल्यापासून स्वच्छता, नीटनेटकेपणाची आवड.  त्यामुळे इतक्या धावपळीत सुद्धा आमचं घर अगदी लख्ख असायचं आणि ते ही त्यात आमचा काहीही सहभाग नसताना.  खरं तर मी घरात सगळ्यात मोठी पण कायम आपल्याच विश्वात.  भरपूर activities मधे कायम बुडालेली….अर्थात आईच्याच हौशीमुळे.  घरात मात्र काडीचीही मदत नव्हते करत.  आईच आपली डोकं वगैरे दुखत असलं तरी डोक्याला पट्टी वगैरे बांधून सैपाक घरात.  मला चांगलंच माहीत होत की आईला खुश कसं करायचं.  मी छान काहीतरी विणायला किंवा पेंटींग वगैरे करायला घेतलं की आई एकदम खुश 🙂 मग तिची डोकेदुखी वगैरे पळून जायची.

लहानपणापासूनच तिला विणकाम, भरतकाम, शिवणकाम मनापासून आवडायचं.  त्यातल्या त्यात कच-यातून कला हा तर तिचा आवडता विषय.  टाकावू वस्तू तिने कधीच फेकू दिल्या नाहीत.  त्या वस्तूंचा अतिशय कलात्मक वापर करुन ती इतक्या सुरेख  वस्तू बनवायची ना….!! त्यामुळे तिला जर खुश करायचं असेल तर काय करायचं हे आम्हा दोघी बहिणींना चांगलंच माहित होतं.

आईचं प्रत्येक काम इतकं व्यवस्थित असायचं ना….!! कुठलंही काम इतकं मन लावून करणार की बघणा-याने दाद द्यायलाच हवी.  पूजेची तयारी करावी तर आईनेच.  घरी गणपती, महालक्ष्म्या असायच्या.  आम्ही किडूक-मिडूक मदत करायचो तिला.  पण बाकी सगळी तयारी  म्हणजे पेट्यांमधून मुखवटे, धडं वगैरे काढून,  त्याला ऊन दाखवायचं, फुलोरा करायचा, बाकी सगळी सैपाकाची तयारी, कोथळे भरणं, महालक्ष्म्यांना सजवणं, सभोवतीची आरास, लाईटींग,  मागे तिनेच विणलेला पडदा लावणं….. ही सगळी कामं अगदी सहज करायची !!

हाताला प्रचंड उरक.  कुठे सांडलवंड नाही, पसारा नाही की बोभाटा नाही.  भल्या पहाटे उठून सडा, रांगोळी करणार….. आमची खाणी करुन ग्राऊंडवर कॉलेजच्या मुलींची प्रॅक्टीस घेणार.  आल्यावर सैपाक, आमची शाळेची तयारी, आम्ही गेल्यावर बाबांचं जेवण, डबा……बाबांना जातांना अगदी दरवाज्यापर्यंत सोडणार……अगदी न चुकता !! एखाद्यावेळी जर ती आत कामात असेल तर बाबांची पण आतबाहेर  होणार 🙂 बाबा गेले की मग आई जेवण उरकून स्वत: स्कूटरवरुन कॉलेजमधे जाणार.  हो….. माझी आई स्कूटर चालवायची….आम्हा भावंडांना त्याचा प्रचंड अभिमान होता 🙂

दिवसभर कॉलेजमधे टीम्स तयार करणं, लेक्चर्स घेणं….. त्यातही एखादा पिरीयड मोकळा मिळाला की आर्ट्सच्या मुलींना वीणकाम, भरतकाम शिकवणार.  तिच्या कॉलेजच्या जिमखान्यात चक्क मेळा असायचा मुलींचा तिच्याभोवती.  मुलींकडून पण काही नवीन शिकायला तयार…… आजतागायत.  चक्क पंच्याहत्तरीची झालीये….. तरी कुठलीही नवी गोष्ट दिसली की ती कशी केली असेल ह्याची उत्सुकता तिच्या डोळ्यात अगदी तश्शीच !!  तेवढ्याच उत्साहात ती नमुना करुन घेणार…..!! इतका उत्साह कसा आणि कुठून आणते….देवच जाणे.

घरी आल्यावरही तिला कधीच स्वस्थ बसलेलं आम्ही बघितलं नाही.  आल्यावर घराची आवरासावरी, बाबांचा चहा….सोबत दिवसभरातल्या घडामोडींची देवाणघेवाण.  मग सैपाक करता करता आम्हा तिघांचाही अभ्यास.  मला अगदी लख्ख आठवतंय……! आमच्या बरोबरीनं ती पण अभ्यास करायची.  पाढे पाठ करताना…ती आमच्याशी शर्यत लावायची…..कोणाचं आधी होतं…… ती मुद्दाम हरायची आम्हाला जिंकवण्यासाठी.  जास्तीचा अभ्यास करता यावा म्हणून कितीतरी पुस्तकं विकत आणायची.  शिवाय इतर वाचनासाठी तर चिक्कार मासिकं लावली होती.  चांदोबा, किशोर, कुमार, चंपक, मुलांचं मासिक, बालविहार….. कितीतरी !  सकाळी पेपरसोबत ती मासिकं यायची.  जो आधी उठेल त्यालाच ती मिळायची.  मग काय … आधी वाचायसाठी केलेली ती भांडणं…. काय धम्माल होती ती !!

शाळेत आमच्या बाई आणि सरांना अगदी नियमितपणे भेटायला यायची.  हे सगळं ती कसं करायची देवच जाणे !! आणि आई हे सगळं करते म्हणून बाबा पण एकदम रिलॅक्स्ड असायचे.  त्यांना पण माहित होती आपल्या बायकोची सुपर पॉवर 🙂

मला अजूनही माझ्या दहावी आणि बारावीच्या परिक्षा आठवतात.  परिक्षेला जाताना त्यावेळी रिक्षा लावली होती.  पण आईचं काही समाधान व्हायचं नाही.  ती रिक्षाच्या मागे मागे तिच्या स्कूटरने यायची. अगदी प्रत्येक पेपरला.  मी वर्गात जाऊन बसले की मानेनेच मला “ठीक आहेस ना?” असं विचारुन…. मगच तिचं पाऊल निघायचं.  इतका त्रास कोणी घेतला असेल आपल्या मुलांसाठी ??  आणि हे जे काय करायची ना…..ते सगळं इतकं सहज करायची….. की आम्हाला तशी सवयच झाली.  कुठल्याही समस्येचं निराकरण आईकडे असणारच असा ठाम विश्वास होता आमचा आणि तो तिने नेहेमीच सार्थ ठरवला.

परिक्षा संपल्यावर ती आमचं अगदी कडक वेळापत्रक ठरवणार.  सकाळी सहा वाजता ती स्वत: स्विमिंगला घेऊन जायची.  तेव्हा हडस हायस्कूल मधे असायचा स्विमिंगचा कँप.  मग तिकडूनच मला ती रामनगरला पेंटिंग क्लासला घेऊन जायची.  तिथे २ तास काहीतरी स्वेटर , शाल वगैरे विणत बसायची.  मग १० वाजता आम्ही घरी आलो की स्वैपाक, जेवणं उरकायची.  मग आम्हाला काही तरी शिकवायची.  चादरींवर भरतकाम, साड्‌यावर पेंटींग, कधी टॅटिंग….. आमच्या घरी माझ्या मैत्रिणीही यायच्या आईकडून शिकायला.  मग शिकवता शिकवता आमच्यासाठी मस्त खायला पण करायची.  कच्चा चिवडा, लस्सी, मिल्कशेक……काहीतरी नवीन ! संध्याकाळी मग गाण्याचा क्लास असायचा.  संध्याकाळी आम्हा सगळ्या मुलांना व्हॉलीबॉल, लगोरी, खोखो वगैरे शिकवायची.  कुठून इतका स्टॅमिना आणायची फक्त तीच जाणे.  संध्याकाळी तिच्यासोबत रामरक्षा वगैरे म्हणायची आणि तो अंगारा सगळ्यांना लावायचा.  मग सैपाक, जेवणं….. झोप ! रात्री मात्र फार लवकर झोपायची.  इतकी दगदग झाल्यावर झोप येणारच लवकर ! सकाळ उगवायची पहाटे चार वाजता…..की पुन्हा रहाटगाडगं सुरु !!

बाबा फार लवकर आम्हाला सोडून गेले.  त्यावेळी मी B.Sc.II ला होते. राजू दहावीत, प्रसाद तर फक्त सातवीत.  आईला तर रडायला पण वेळ नव्हता.  बाबांचं पण काम तिलाच करायचं होतं.  आम्ही तिघेही लहान आणि करणारी ती फक्त एकटी ! पण तिने अजिबात हिंमत हारली नाही.  डोळ्यात येणारं पाणी तसंच लपवत आम्हाला मोठं केलं.  आम्हाला इतके छान जोडीदार शोधून दिलेत.  सगळ्यांचे सुखी संसार उभे झाल्यावर मात्र तिला तिच्या थकण्याची जाणीव झाली.  इतके दिवस आणलेलं बळ अचानक ओसरल्यासारखं झालं.  आतापर्यंत हिंमतीने संसाराची झुंज एकटीने लढल्यावर आता तिला एकाकी असल्याची जाणीव तीव्रतेने व्हायला लागली.  इतके दिवस समोर एक ध्येय होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी ती जीवाचं रान करत होती.  मुलं आता आपापल्या संसारात खुश होती….रमली होती.  ह्याच साठी केला होता अट्टाहास तिने…… !!

पण आता एकटेपणा खूपच जाणवायला लागला.  बाबांची खूपच आठवण यायला लागली.  त्या आठवणींनी ती खूपच हळवी झाली.  छोट्या छोट्या गोष्टींनी डोळे भरुन यायला लागले.  अजिबात चैन पडेनासं झालं !  मग तिच्या छंदानेच तिला सावरलं.  निटींगच्या मशिन्स घरी होत्याच.  वेळ घालवण्यासाठी ती स्वेटर, शालींच्या ऑर्डर्स घ्यायला लागली.  कामात सुबकपणा आणि सफाई जात्याच असल्यामुळे तिने केलेल्या वस्तूंना फार मागणी वाढली.  मग ती पंजाब मधून लोकर मागवायला लागली आणि शाली करुन देऊ लागली.  बघता बघता तिचा हा वेळ घालवण्यासाठी म्हणून सुरु केलेला छंद…..चक्क व्यवसाय झाला.  तिला शाळेच्या, हॉस्पिटलच्या वगैरे मागण्या यायला लागल्या.  शिवाय ती मुलींना शिकवायला सुद्धा लागली.  आता वेळ मजेत जायला लागला.

ब-याच दुकानात तिने तयार केलेल्या वस्तू मिळायला लागल्या.  आता आई एक बिझीनेस वुमन झाली होती.  हिवाळा म्हणजे तिचा अगदी Peak सिझन !! व्याप वाढला….. पण एकटेपणा हळुच डोकं वर काढायचाच ! किती वेळ गुंतवून घेणार स्वत:ला ! तिन्ही सांजेची वेळ जीवाला हुरहुर लावायचीच ! त्यावेळी राजूने तिला अमेरिकेत बोलवून घेतलं.  थोडा चेंज हवा होताच तिलाही.  अमेरिकेत राजेशच्या काकूंसोबत तिने खूप मज्जा करुन घेतली.  लेक, जावई, नातू ह्यांच्या सहवासात ती आनंदून गेली.  लेकीचं वैभव पाहून सुखावली.  आता कुणाचीच काळजी नव्हती… सगळे आपापल्या संसारात सुखी आणि समाधानी होते.

आता स्वेटर्सचा मात्र कंटाळा आला होता.  मग लक्ष गेलं शिवणकामाकडे.  आधीची मशीन होतीच घरी.  मग नवी फॅशनमेकर घेतली आणि पुन्हा तडाखा सुरु झाला शिवणकामाचा.  आता ती प्रदर्शन पण भरवायला लागली.  अनाथ आश्रमात जाऊन तिथल्या मुलींना शिकवणं, त्यांच्याकडून वस्तू बनवून घेणं, त्यांना त्यांच्या पायवर उभं रहायला मदत करणं…..! हे सुरु झालं.  एकदा एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की त्यात स्वत:ला अगदी झोकूनच द्यायचा हा स्वभाव आणि त्यामुळे कामाचा व्यापही वाढला.  पुन्हा एकदा तीच धुंदी !

पण आताशा शरीर थकायला लागलेलं.  एकटेपणामुळे मन तर आधीच थकलेलं ! त्यातच डायबेटीज, ब्लड प्रेशर, आर्थ्रायटीस ह्यासारखे नव्याने झालेले सोबती….!! एकटं रहाणं नकोसं व्हायला लागलं…पण घर सोडून दुसरीकडे जायची कल्पनाही जीवघेणी वाटायची.  पण इतकी दगदग , तडतड सोसलेलं शरीर कधीतरी तक्रार करणारच ना….!! अचानक हिमोग्लोबिन घसरलं आणि आई आजारी झाली.  आयुष्यात पहिल्यांदा आई आजारी पडली.  कायमच चिरतरुण वाटणारी आई अंथरुणावर बघणं खूपच कठीण होतं.  पण तिची इच्छाशक्ती मात्र तिच्यासारखीच जबरदस्त ! म्हणून पुन्हा ती सावरली………आमची आई पुन्हा आम्हाला मिळाली !!  देवाला हात जोडून धन्यवाद दिलेत.

तिच्या आजारपणात तिच्या सोबत घालवलेला प्रत्येक दिवस अगदी आत जपून ठेवलाय.  तिच्यासोबत खूप खूप गप्पा मारल्या……..तिला तिच्या आवडीचं गरम गरम जेवण खाऊ घातलं…. तिच्याकडून लाडावूनही घेतलं…..पुन्हा एकदा लहानपण उपभोगलं. आज आईचा पंच्याहत्तरावा वाढदिवस….!! आई…… आम्हाला हे जे इतकं सुखी आणि समाधानी आयुष्य मिळालंय ते फक्त तुझ्यामुळे आणि बाबांच्या आशीर्वादामुळे ! आमच्या आयुष्याला तुझ्यामुळेच इतका सुबक आकार आलाय ! असाच तुझा आशीर्वाद सदैव आमच्यासोबत असू दे ! तुझा असाच अखंड सहवास आम्हाला लाभू दे !!

Read Full Post »

माझी आई

मी नागपूरची…..हो हो..तेच ते संत्र्यांचं नागपूर.  माझी आई सुशीला आणि बाबा वसंत कुळकर्णी, दोघंही कॉलेजमधे प्रोफेसर होते आणि घरात अगदी मोकळं वातावरण.काहीही नवीन करायला कायम प्रोत्साहन आणि म्हणूनच प्रत्येक गोष्टीत काहीतरी नवीन शोधायचं आणि दाखवायचं हा अट्टाहास जो आजतागायत सुरु आहे.  आपल्या मुलीला सर्वसामान्यांपेक्षा काहीतरी वेगळी कला यावी असं आईला खूप वाटायचं आणि म्हणूनच तिच्या मदतीनं बरंच काही शिकले. माझी आई ही पण तिच्या generation पेक्षा खूप खूप पुढे होती म्हणजे अजूनही ती तशीच आहे.

“माझी आई” हा एखाद्या कादंबरीचा विषय होऊ शकेल.  मला आणि माझ्या बहिण भावाला घडवण्यात तिचाच पूर्ण वाटा आहे.  तसा सगळ्याच आई आणि वडीलांचा असतो …… पण माझी आई स्पेशल आहे.  She is a superwoman. खरंच.

ती माझी आई

पदर कसून ती स्वार स्कूटरवर
पाठी तिच्या मी मजेत निर्भीड
काय कशाची कसली चिंता
सोबत माझी आई असता

चाकोरीच्या पुढती जाऊनी
शिकवी आम्हा छंद नवे
खेळ नवे अन काम नवे हे
यापरी अजूनी काय हवे

सळसळता उत्साह तिचा हा
देई आम्हा स्फूर्ती नवी
नाही दिसली कधीच थकली
आई माझी सदा नवी

थोरांमधे नाही रमली
बालांमधे बाल मात्र ती
बालजनांचा मेळावा हा
वागवीत ती सदा भोवती

मऊ भातावर धार तुपाची
खमंग पिठले, चटणी जराशी
अजब तृप्त ती करुन आम्हा
देई तिची ऊबदार कुशी

देणारा हा हात तिचा तो
कधी न पसरला कुणापुढे
प्रत्येकाला हात मदतीचा
देण्या ती हो सदा धडपडे

थकली आता जरी जराशी
चाल मंदही झाली खाशी
तरुणाईला लाजवणारी
हीच असे आई माझी

मुलांवरी या उधळूनी जीवन
विसरुन जाऊन दु:ख उरातून
जीवनसाथी नसतासोबत
तयार केले आम्हा घडवून

सदा हसतमुख असणारी ती
उतारवयी हळवी होई
बांधलेल्या वास्तूचा हा
कळस पाहूनी तॄप्त होई

घाव उराचे झाकून ठेवून
जीवन पुढती चाले जी
स्वयंसिद्धा अन आत्माभिमानी
हिच असे माझी आई
हिच असे माझी आई

माझ्या आईवर लिहिलेली ही माझी कविता.  पण ह्याच्या पेक्षाही खूप मोठीये माझी आई.

Read Full Post »

%d bloggers like this: