Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘माझी थोडीशी मुंबई’ Category

तब्बल वर्षभर लोकलचा प्रवास केल्यानंतर मला चेंबूरलाच जॉब मिळाला तेव्हा मात्र आधीच्या चौकोनी प्रवासाऐवजी माझा प्रवास अगदी सरळ रेषेत व्हायला लागला.  तसा तो ही प्रवास  Adventurous होता….पण लोकांसाठी !  कारण मी माझ्या चेतकवर स्वार होऊन जायचे.  चेतक प्रवास पण खूप Enjoy केला.  एकतर geared two wheelers चं लायसेन्स मिळालं होतं आणि माझी हक्काची चेतक !

एकदा अशीच गंमत झाली.  मी भरपूर भाज्या,  किराणासामान वगैरे घेऊन चेतकवर स्वार होऊन घरी यायला निघाले होते.  घरी जाताना आर.सी.एफ़ चं पोलीस स्टेशन लागायचं.  आता लायसन्स असल्यामुळे मी मस्तपैकी बिनधास्त चालवायची.  आमच्या वासी नाक्याचा ट्रॅफ़िक इतका खतरनाक असायचा ना की लोक म्हणतात जो वासी नाक्याला गाडी चालवू शकतो तो जगात कुठेही गाडी चालवू शकेल.  तर अशा  त्या खतरा गर्दीतून मी छानपैकी चेतकने मार्ग काढत होते.  तेवढ्यात बस-स्टॉपवर मला माझी एक मैत्रिण भेटली.  मी एकदम स्टाईलमधे गाडी थांबवून तिला लिफ़्ट दिली.  खरं म्हणजे माझ्या जवळ इतकं सामान होतं ना……. लेकिन impression मारनेका कोई भी chance छोडनेका नही ना….!  थोडी सर्कसच करत आम्ही निघालो. 

मला नेहेमी वाटायचं की एकदातरी ट्रॅफ़िक हवालदारानी मला लायसन्स बद्दल विचारावं आणि मग मी झोकात त्याला लायसन्स दाखवून त्याच्या चेहेर्‍यावरची मजा बघावी.  आणि त्या दिवशी नेमका तो क्षण आला…. पण विचित्र तर्‍हेने!  आमची सर्कस पोलीस स्टेशन पार करुन पुढे निघाली.  मला मागून पोलीसच्या शिट्टीचा आवाज आला.  पण मला ती शिट्टी माझ्यासाठी असेल असं काही वाटलं नाही.  म्हणून मी आपली आपल्याच धुंदीत.  तसंही सामान, मी, माझी मैत्रिण, चेतक हे सगळं सांभाळत जायचं म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती !!  और अपुन जब गड्डी चलाता है ना……. तो एकदम स्टाईल मे…..क्या…..!!

मी ऐकत नाही हे पाहून त्या पोलीसालाही जोर चढला.  पण स्कूटरच्या मागे धावता येईना म्हणून त्याने चक्क एका माणसाची लिफ़्ट घेतली आणि माझ्या मागे आला शिट्ट्या वाजवत.  हे सगळं माझ्या मागे घडत असल्यामुळे मला ह्याची काहीच कल्पना नव्हती.  मी आपल्याच नादात…! शेवटी त्यांनी मला ओव्हरटेक करुन माझी गाडी थांबवली……..तेव्हा मला कळलं की हा सगळा खटाटोप अस्मादिकांसाठी आहे. 

अखेर तो क्षण आला…….!   पण तोपर्यंत त्या पोलीसाला इतक्या जोरजोरात शिट्ट्या वाजवताना बघून गर्दी जमा झाली होती.  मला थांबवल्यावर माझी मैत्रिण जाम घाबरली.  मी पण थोडीशी गांगरलेच होते.   पण जेव्हा त्याने मला लायसन्स विचारलं तेव्हा मी मनातल्या मनात excite झाले …..अहो ह्याच साठी केला होता अट्टाहास…..  🙂   तरी हे साधं साधं विचारणं झालं नव्हतं ना……. जरा जास्तच गाजावाजा झाला होता.  लायसन्स  तर होतंच .   पण  मनातला आनंद मनातच   ठेवून   वरुन   मात्र   एकदम   cooool    भाव   दाखवत   म्हटलं………. “बाऽऽऽऽस…….इतकंच………….हे घ्या !”  त्याला जरा आश्चर्यच वाटलं…….. जरा जास्तच निरखून सगळ्या तारखा बघितल्यावर त्याला कळलं की सगळं काही ठीक ठाक आहे.  मग तो जरा वरमला.  पण सगळ्या लोकांसमोर त्याची फ़जिती झाली म्हणून तो नाही म्हटलं तरी थोडा खट्टू झाला.     माझ्यातली सहृदयता लगेच जागी झाली. मनात म्हटलं………. आपली इच्छा अगदी वाजत गाजत पूर्ण झाली…….. आणि ज्यानी पूर्ण केली त्याला कशाला नाराज करा……… म्हणून त्याला म्हणाले,” सॉरी हं…..मला कळलंच नाही की तुम्ही मला थांबवता आहात.  I am really sorry! ” मी असं म्हटल्यानंतर कुठे त्याला जरा बरं वाटलं.  मग तो पण……. “जरा लक्ष ठेवून गाडी चालवत जा मॅडम” असं म्हणून निघाला. 

इतकं सगळं रामायण घडल्यामुळे त्या दिवसापासून मला कोणीच कधीसुद्धा अडवलं नाही.  मी आणि माझी चेतक अगदी दिमाखात प्रवास करायचो.  त्यानंतर सुद्धा २-३ वेगवेगळे टू व्हीलर्स चालवले….चक्क मोटरसायकलसुद्धा! लेकिन मेरी चेतक की बात कुछ और ही थी !

बुलंद भारत की बुलंद तसवीर………हमारा बजाज……हमारी चेतक….  🙂

Read Full Post »

आता लोकलची चांगलीच सवय झाली होती.  पण ह्यांना मात्र अजिबातच सवय नव्हती राहिली.  कारण घर चेंबूरला आणि ऑफ़ीसही चेंबूरलाच.  पण जेव्हा हे सौदीला जायला निघाले तेव्हा सगळी कामं नरिमन पॉईंटलाच असायची.   मला आणि ह्यांना दोघांनाही शनिवारी सुट्टी असायची त्यामुळे सगळी कामं आम्ही शनिवारीच आटोपायचो.  

एकदा आम्ही असेच आमची कामं आटोपून हार्बर लाईनने चेंबूरला येत होतो.  शनिवारी तशीही लोकल्सना गर्दी कमी असते.   आम्ही साधारण ७ वाजता चेंबूरला पोचलो….. अगदी उतरता उतरताच ह्यांना जाणवलं की त्यांचं पाकीट कोणीतरी काढतंय.   हे जोरात म्हणाले,” जयू, माझं पाकीट मारलं……..!” मी पण तेव्हा उतरच होते.  अवीचे हे शब्द ऐकून मी एका क्षणासाठी गोंधळले,  कारण फ़क्त दोन दिवसातच हे सौदीला जायला निघणार होते आणि पाकीटात सगळी कार्ड्‌स होती……. आणि माझ्या नवर्‍याचा घामाचा पैसा असा कसा कोणी लुबाडू शकतो……. हे सगळे विचार त्यावेळी माझ्या मनात झर्रकन आले.  पण दुसर्‍याच क्षणी मी सावरले आणि उतरणार्‍या  लोकांकडे बघायला लागले.  आम्हा दोघांना तसं बघताना पाहून त्या गर्दीतला एक जण जरा संशयास्पद तर्‍हेने जोरात चालायला लागला……त्याला तसं चालताना बघून  मी त्याच्या मागे जोरात धावले.  मला आपल्या मागे तसं धावताना बघून तो हातातलं पाकीट तिथेच टाकून पळायला लागला आणि मी वेड्यासारखी त्याच्या मागे ! 

 बरं….. इकडे अवी पाकीट मिळालं म्हणून “जयू, पाकीट मिळालं…” असं म्हणत माझ्या मागे.  पण मला काहीच डोक्यात जात नव्हतं.  माझ्या नवर्‍याचं पाकीट पळवतो म्हणजे काय…..!  मी चक्क त्याच्या मागे शंभर फ़ूट धावले.  शनिवार संध्याकाळ असल्यामुळे गर्दी नव्हती त्यामुळे मला तो दिसत होता.  बहुतेक मी त्याच्या मागे इतकी धावेन ह्याची त्याला कल्पना नव्हती त्यामुळे त्याने त्याचा वेग थोडा हळू केला…….. की मी जीव खाऊन त्याच्या मागे पळत होती म्हणून….. देव जाणे,  पण मी मागून त्याच्या शर्टाची कॉलर पकडली आणि त्याचा हात मागूनच पकडून पिरगाळला.  तो कळवळला आणि थांबला.  तोपर्यंत सगळी गर्दी जमा झाली.  मग सगळ्या लोकांनी त्याला आपल्या ताब्यात घेतला.  आणि मुंबईत जेव्हा एखादा खिसेकापू असा लोकांच्या तावडीत सापडतो, तेव्हा त्याची काय हालत होते……. हे तर सगळ्यांना माहीतच आहे.   तोपर्यंत हे सुद्धा माझ्यापर्यंत पोचले होते.  पाकीट सापडल्यामुळे  आम्ही त्या माणसाला तसंच सोडून स्टेशन बाहेर पडलो.  एक वेगळीच वीरश्री संचारली होती माझ्यात.

 जाताना सगळे माझ्याकडे आदराने बघत होते……त्यांच्या त्या नजरेतलं कौतुक झेलत झेलतच आम्ही निघालो.  त्यादिवशी हे म्हणाले,” बाप रे…… तुझं हे नवीन रुप एकदम खतरनाक होतं हं…..!  ”  म्हटलं,” जनाब………जरा संभालके……..! अब पाला अपुनके साथ है !”  

माझी ती दादागिरी……. बिचारे अजूनही झेलताहेत 🙂

Read Full Post »

आम्ही मुंबईत चेंबूरला रहायचो, तेव्हा मी नरिमन पॉईंटला जॉब करायचे.  आमच्या कॉलनीतून खाली वासी नाक्याला शटलने……… मग कुर्ल्यापर्यंत बस, मग व्हिटी पर्यंत ट्रेन आणि मग नरिमन पॉईंटला पुन्हा बस…….. असा चौकोनी प्रवास असायचा माझा.  थोडी जरी वेळेची गफ़लत झाली तर भरपूर वाट बघावी लागायची  म्हणून रोजचं वेळपत्रक अगदी काटेकोर असायचं.  आता ती सगळी धावपळ आठवली की अजूनही मज्जा वाटते.  धावपळ असली तरी सुद्धा त्यात एक लय होती आणि सुरेख संतुलन होतं. 

रोज सकाळी ९.०३ ची लोकल गाठायची म्हणजे घरातून ८.१५ ला निघावं लागायचं. शटल मिळाली तर नशीब नाहीतर चरणसेवक असायचा सोबत.  ४६१ ही बस कुर्ल्याला जायला लागायची.  मग तो पूल ओलांडून धावत पळत जायचं.  रोजचेच चेहेरे असायचे गर्दीत.  कधी अनोळखी कावऱ्या बावऱ्या नजराही दिसायच्या……. तेव्हा लगेच ओळखू यायचं……… कुण्या गावाचं आलं पाखरु…….!!  अशा बावरल्या नजरा बघून गंमत वाटायची.  सुरवातीला माझंसुद्धा असंच व्हायचं…. ! पण जेव्हा दुसरा पर्यायच उरला नाही तेव्हा………आलीया भोगासी…….दुसरं काय!

हळुहळु सगळी धावपळ, गर्दी आपलीच वाटायला लागली.  आपली हुकमी जागा जेव्हा मिळायला लागली……. तेव्हा मात्र हा लोकलचा प्रवास पण मनापासून एंजॉय करायला लागली.  तसाही मुंबई शहराचा वेग आम्हा नागपूरकरांना सुरवातीला जरा जडच जातो.  पण एकदा सवय झाली की मग एकदम बिनधास्त !!

व्हिटीवर   पोचल्यानंतरची   गर्दी !!   त्यात   जाणवलेलं   आपलं   एका    छोट्याश्या   मुंगीएवढं अस्तित्व …….. ती जाणीव मी कधीच विसरु शकणार नाही.  एकीकडून गाड्‌यांच्या लांबच लांब रांगा……..पण त्याही मधेच थांबवून लोकांचा कळप मोठ्‌या चपळाईनं पुढे सरकायचा……… आणि मग त्या गाड्‌यांनासुद्धा माघार घ्यावी लागायची…………. मजा यायची.

मला एका गोष्टीचं कायम आश्चर्य आणि कौतुक वाटतं.  मुंबईचे लोक हे कायम आनंदी असतात, उत्साही असतात.  सकाळी ऑफ़िसात जाताना असो किंवा येताना असो……..कोणी कधीच मरगळलेला, थकलेला दिसत नाही.  सगळे जण नेहेमी उत्साही.  गाडीत जागा मिळो किंवा न मिळो………….मिळेल तेवढ्या जागेत त्यांचे कितीतरी कार्यक्रम होत असतात.  संक्रातीचं हळदी कुंकू, डोहाळजेवण असे बरेचसे सोहळे मी बघितले आहेत ह्या प्रवासात.  बायका तर ऑफ़िसमधून येता येता आणलेल्या भाज्या सुद्धा निवडून ठेवतात. 

येताना मी ६.१७ ची लोकल घ्यायचे. लोकलमधे जागा पकडणे ही सुद्धा कला आहे हं! सुरवातीला पटकन जागा पकडता यायची नाही.   पण हळुहळु  खिडकीजवळची जागा सुद्धा मिळायला लागली.  अहा………. अक्षरश: जग जिंकल्याचा आनंद व्हायचा.  शेवटी शेवटी तर त्याची नशा चढायला लागली.  मग मस्तपैकी  भेळ खात खात प्रवास……..! सही मे…….क्या दिन थे वो!

Read Full Post »

%d bloggers like this: