Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘मायबोली’ Category

मायबोली.कॉम ही नेटवरची अतिशय जिव्हाळ्याची जागा !!  ह्या मायबोलीनं इतकं काही दिलंय ना……..की तिचं ऋण काही फिटायचं नाही.

मायबोलीच्या शिर्षक गीतानंतर आता हे “मायबोली बुकमार्क्स” !! आगळीवेगळी कल्पना !!  ह्यात मायबोलीतले ६ कवी निवडून त्यांच्या कवितेच्या काही ओळी घेऊन  त्याचे बुकमार्क्स बनवले आहेत.  ह्या ६ कवींमध्ये माझाही समावेश आहे ह्याचा मला खूप आनंद झाला.   मायबोलीनं माझ्यातली मी शोधून दिली मला.  मी लिहू शकते ह्याची जाणीव मायबोलीमुळेच झाली.  आयुष्यातला अविभाज्य घटक झालेल्या मायबोलीला मानाचा मुजरा.

ही लिंक बघा ……

 http://www.maayboli.com/node/34053

हेच ते बुकमार्क्स !!  ह्यातली “जयवी” म्हणजे मी 🙂

मायबोलीच्या खरेदी विभागातून पुस्तकं खरेदी केल्यावर हे बुकमार्क्स भेट देण्यात येतील.

ही माझी मायबोली………ही माझी मायबोली……….. 🙂

Read Full Post »

मायबोलीने शिर्षक गीत स्पर्धा आयोजित केली तेव्हा मला “मी आणि माझी मायबोली” ह्या स्पर्धेची आठवण झाली. ह्या स्पर्धेत मला मिळालेलं पहिलं बक्षिस आठवलं 🙂

http://www.maayboli.com/hitguj/messages/118369/118058.html

http://www.maayboli.com/hitguj/messages/118369/marathi_audio_maayboli.html

उल्हास भिडेंना बक्षिस जाहीर झालं तेव्हा वाटलं……..मायबोलीची दुसरी पिढी आपलं मनोगत व्यक्त करतेय. भावना त्याच…. फक्त शब्द थोडेसे वेगळे. मायबोली तीच फक्त तिचे चाहते वेगळे, व्यक्त होण्याची पद्धत वेगळी आणि आता तर ह्या शब्दांना सूर, तालही मिळालाय. खूप खूप छान वाटलं.

योगची पहिली मेल आली तेव्हाच जाणवलं की काही तरी भन्नाट घडणार आहे आणि अगदी तस्संच घडलं. संपूर्ण जगभरातले मायबोलीकर आपल्या मायबोलीसाठी एकत्र आले आणि तिच्या प्रेमापोटी शब्द आणि सूरांच्या बंधनात कायमचे बांधल्या गेले आणि जन्माला आलं आपल्या मायबोलीचं शिर्षक गीत.

ह्या Global Project मधे सहभागी व्हावं असं मनापासून वाटलं आणि भाग घेताही आला. योगच्या अखंड आणि अथक परिश्रमामुळेच हे घडू शकलं असं माझं मत आहे. अर्थात अनेक जणांचा सहभाग त्यात आहे त्यामुळे प्रत्येकाचा वाटा त्यात आहेच. पण गाणं compose करणं, Music Arrangement करवून घेणं, प्रत्येकाला मेल टाकून उत्साही लोक गोळा करणं, त्यांच्या rehearsals घेणं, त्यांच्याकडून जे काय अपेक्षित होतं ते करवून घेणं हे सगळं योग ने जीवाच्या आकांताने केलंय. प्रत्येकाच्या rehearsal ची वेगळी Story असणार हे नक्की.

आता माझाच अध्याय सांगते……..हो हो अध्यायच म्हणायला हवा !! एकतर यंदा मी कुवेतच्या महाराष्ट्र मंडळाची जनरल सेक्रेटरी असल्यामुळे प्रचंड बिझी होते. जेव्हा मायबोली गीत करायचं असं ठरलं तेव्हाच आमच्या वार्षिक संमेलनाची तयारी जोरात सुरु होती त्यामुळे मोकळा वेळ अजिबात नव्हता. दुबईत जाऊन रेकॉर्डींग करावं असं जेव्हा योग ने सुचवलं तेव्हा अक्षरश: पंख लावून दुबईत जाऊन यावं असं वाटलं. रेकॉर्डींग तर दूरच पण rehearsals करायला सुद्धा वेळ मिळत नव्हता. शेवटी कशीबशी एकदा आमची दोघांचीही वेळ जुळून आली आणि rehearsal झाली… अर्थातच स्काइपवर. मला स्वतःलाच गंमत वाटली. सगळंच आजकाल किती हायटेक झालंय ना……. !! गाण्याची प्रॅक्टीस….. मी कुवेतमधे आणि योग दुबईत. स्काईपवर योग मला शिकवतोय आणि माझ्याकडून गाऊन घेतोय…… मज्जा ना……. !! सगळंच वेगळं…….धम्माल !! प्रचंड एक्साईटमेंट होती. पहिल्या दिवशी योग ने त्याला अपेक्षित असलेल्या जागा, timing आणि बरंच काही सांगितलं आणि शिकवलं. मग एक आठवडा तयारी करुन रेकॉर्डींग कर असं सुचवलं. पुढच्या आठवड्यात जेव्हा स्काईप वर भेट ठरली नेमकी तेव्हापासून माझ्या फोनने जी मान टाकली ती आजतागायत वर उचललीच नाहीये. मग कसलं स्काईप आणि कसली practice ? खरं म्हणजे असं कुवेतमधे कधीच होत नाही. पण अजूनही भोग सुरुच आहेत. शेवटी मित्राकडून internet उधार घेतलं आणि योग शी संपर्क साधला. त्याने सुचवलेले बदल बर्‍यापैकी गळ्यावर चढले असावेत कारण त्याने रेकॉर्डींगची परवानगी दिली. Audacity मधे रेकॉर्डींग करायचं असं ठरलं. पण जाम घोळ झाला. माझ्या computer ने जी काही मनमानी केली त्याला तोड नाही. रेकॉर्डिंग करतांना फक्त आवाज न येता music सकटच रेकॉर्डींग होत होतं. तिकडे योग फोनवर ज्या काही सूचना करत होता त्याचं मी अगदी प्रामाणिकपणे पालन करत होते तरी काही केल्या रेकॉर्डींग होईना. असं करता करता दिवस संपत आला. तिकडे योगही थकला…… आता नवरा आणि लेक आल्यावर त्यांना विचारुन काही होतं का बघूया असं ठरलं. संध्याकाळी घरी आल्यावर नवरा आणि पिल्लु पण लागले कामाला……पण सेटींग काही जमलंच नाही. शेवटी योग ने सुचवल्याप्रमाणे iPod वर ट्रॅक ऐकून audacity वर रेकॉर्डींग करुन योगला Audio Clips पाठवल्या. त्यातल्या काही त्याने ओके केल्या. दुसर्‍या दिवशी त्याची मेल आली की त्यातल्या काही जरा बर्‍या आहेत. तेव्हा कुठे हुश्श झालं. इकडे आमच्या कार्यक्रमाचं सुद्धा बरंच रेकॉर्डींग करायचं होतं. त्यामुळे जर त्या दिवशी मी पाठवलेल्या Audio clips जर योगला आवडल्या नसत्या तर मात्र आणखी रेकॉर्डींग करणं फार कठीण होतं. पण “मायबोली-योग” बळकट होता म्हणायचा 🙂 .

असेच प्रत्येकाची किस्से असतील. ते वाचायलाही आवडतील. खरं तर सगळ्यांसोबत स्टुडियो मधे रेकॉर्डिंग करायला मला पण आवडलं असतं. ती मज्जा मी मिसली. पुढच्या वेळी मात्र जातीने हजर राहण्याचा नक्की प्रयत्न करेन.

आता उत्सुकता आहे ती पूर्ण झालेलं मायबोलीगीत ऐकण्याची. इतक्या लोकांची मेहनत नक्कीच सफल होणार ह्याची मनापासून खात्री आहे. मायबोली एक मोठा परिवार आहे हे पुन्हा एकदा निश्चितपणे सिद्ध झालंय एवढं मात्र खरं.

योगची मात्र कमाल आहे. एक कडक सल्यूट बॉस 🙂

मायबोलीच्या पुढच्या अशाच अनेक प्रकल्पात भाग घ्यायला मनापासून आवडेल 🙂

ही माझी मायबोली ……….ही माझी मायबोली ……….!!

मायबोली शिर्षक गीत

ह्या लिंक वर तुम्ही हे गाणं ऐकू शकता.

वरील गीतातील गायक क्रमः (मूळ गीत ईथे आहे.)
[मायबोली…..] (भुंगा)
भाषा मराठमोळी, हर अंतरी फुलावी
घेऊन ध्यास आली उदयास मायबोली (अनिताताई, योग)
भाषा मराठमोळी, हर अंतरी फुलावी
घेउन ध्यास आली उदयास मायबोली ║धृ║ (समूह- मुंबई, पुणे, दुबई)

मिटवून अंतराला, जोडून अंतरांना
ही स्नेहजाल विणते, विश्वात मायबोली (अगो व पेशवा)
[विश्वात मायबोली] (भुंगा) ||१||

सदरांच्या पदरांनी, प्रत्यंगी नटलेली (अनिलभाई)
सदरांच्या पदरांनी, प्रत्यंगी नटलेली (अंबर व जयवी)
साहित्य वाङ्मयाची, ही खाण मायबोली (सई) ||२||

[युडलिंग (योग) आणि कोरस (अनिताताई, रैना)]

सार्‍या कलागुणांना, दे वाव मायबोली (प्रमोद देव व रैना)
सार्‍या नवोदितांची, ही माय मायबोली (प्रमोद देव, व रैना)
सार्‍या नवोदितांची, ही माय मायबोली (देविका, कौशल, सृजन व समूह- विवेक देसाई, भुंगा, प्रमोद देव)
ही माय मायबोली (सृजन)
भाषा मराठमोळी, हर अंतरी फुलावी (दिया व समूह)
घेउन ध्यास आली उदयास मायबोली (दिया व समूह) ||३||

चर्चा, मतांतरांची, अन् वादविवादांची (वर्षा व अनिताताई)
[मधले संवाद- भुंगा, रैना व योग]
चर्चा, मतांतरांची, अन् वादविवादांची (मिहीर)
परिणती सुसंवादी, घडविते मायबोली (मिहीर व समूह- विवेक देसाई, भुंगा, प्रमोद देव)
परिणती सुसंवादी, घडविते मायबोली (अनिताताई, सई, स्मिता, पद्मजा) ||४||

सहजीच जीवनाचा, अविभाज्य भाग झाली (योग व सारिका)
[हार्मनी समूह-भुंगा, प्रमोद देव, विवेक देसाई, पद्मजा, सई, स्मिता]
अमुच्या मनी विराजे, अभिजात मायबोली (योग, सारिका व सर्व गायक)
अमुच्या मनी विराजे, अभिजात मायबोली (पुरूष व स्त्री गायक)
अभिजात मायबोली (सर्व) ║५║

मायबोली.. (सर्व गायक)

संपूर्ण श्रेयनामावली:
गीतकारः ऊल्हास भिडे
संगीतकारः योग (योगेश जोशी)
गायकः
मुंबई: रैना (मुग्धा कारंजेकर), अनिताताई(अनिता आठवले), प्रमोद देव, भुंगा (मिलींद पाध्ये), सृजन (सृजन पळसकर- मायबोलीकर युगंधर व भानू यांचा मुलगा)
पुणे: विवेक देसाई, सई (सई कोडोलीकर), पद्मजा_जो (पद्मजा जोशी), स्मिता गद्रे, अंबर (अंबर कर्वे), सायबर मिहीर (मिहीर देशपांडे)
दुबई (सं. अरब अमिराती): देविका आणि कौशल केंभावी (मायबोलीकर श्यामली ची मुले), सारिका टेंबे (सौ. योग), दिया जोशी (योग व सारिका ची मुलगी), योग (योगेश जोशी), वर्षा नायर
कुवेतः जयवी-जयश्री अंबासकर
इंग्लंडः अगो (अश्विनी गोरे)
अमेरिका: पेशवा (जयवंत काकडे), अनिलभाई (अनिल सांगोडकर)
वाद्यवृंदः प्रशांत लळीत, विजू तांबे, ऊमाशंकर शुक्ल, जगदीश मयेकर, योग
संगीत संयोजकः प्रशांत लळीत
ध्वनिमुद्रण तंत्रज्ञः 

    • नदीम- ईंम्पॅक्ट स्टुडीयो, सांताक्रुझ, मुंबई.
    • जयदेव- साऊंड आइयडीयाझ, एरंडवणे, पुणे.
    • संजय- नेहा ऑडीयो ईफेक्टस, दत्तवाडी, पुणे.
    • मेरशाद- अल शिबाक मुझिक सेंटर, दुबई.

मायबोली विभाग समन्वयकः दक्षिणा (पुणे), प्रमोद देव (मुंबई), अनिलभाई (अमेरिका)
झलक ऑडियो व्हिज्युअल टीम – आरती खोपकर (अवल), नंदन कुलकर्णी (नंद्या), हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) आणि आरती रानडे (RAR) निर्मिती: maayboli.inc

योगने त्याचं मनोगत व्यक्त करतांना सगळ्या कलाकारांचं त्याच्या शब्दात कौतुक केलंय.  ते त्याच्याच शब्दात वाचा 🙂

काय गायलात लेको.. तुमच्या गाण्यातला सच्चेपणा या गीताला एका वेगळ्या ऊंचीवर घेवून गेलाय. कोण म्हणेल यातील “मिटवून अंतराला” किंवा “सदरांच्या पदरांनी” ओळी जोडीने वा एकत्रीत गाणारे गायक जगाच्या दोन टोकांवर राहतात? यातील एकत्रीपणे गायलेली काही बाल गोपाळ मंडळी अजूनही एकमेकांना प्रत्यक्ष भेटलेली नाहीत यावर विश्वास कसा ठेवायचा? कुठलेही हितसंबंध वा गरजा अडलेल्या नसताना जगाच्या कानाकोपर्‍यातील हे कलाकार एका ध्येयासाठी एका गीतासाठी आपले सर्वस्व देतात याचे दुसरे ऊदाहरण कुठे सापडेल?
खरे तर सर्वांचेच आवाज हे ज्याच्या त्याच्या परिने विशेष, वेगळे आहेत. ईतके बहुगुणी, बहुढंगी आवाज एकाच गाण्यात वापरायला मिळणे हे निव्वळ एक संगीतकार म्हणून अक्षरशः स्वप्न आहे. प्रत्येकाच्या आवाजातून त्याचे व्यक्तीमत्व डोकावते जणू आणि त्यामूळे गाण्यालाही एक स्वताचे व्यक्तीमत्व प्राप्त झाले आहे. तरिही मोडक्या शब्दात गायकांच्या आवाजाची विशेषणे (गोड मानून घ्या मंडळी) 🙂

अनिताताई: खणखणीत नाणे
प्रमोद देवः यत्र तत्र सर्वत्र!
भुंगा: गूंज…..
रैना: मध
सृजनः आत्मविश्वास!
सई: मायेचा ओलावा..
स्मिता, पद्मजा, विवेकः सर्व मोत्यांना एकत्रीत ठेवणारी “सुरेल” विण (कोरस).
मिहीरः मुलायम
अंबरः भक्कम
अगो: १००% अचूक
पेशवा: काळजाच्या आरपार
अनिलभाई: कणखर
जयवी (जयश्री): आर्जवी
कौशल व देविका: जमके
वर्षा: स्पष्ट
सारिका: माया
दिया: मधुमेह स्मित

या कलाकारांनी मायबोलीच्या वटवृक्षावर एक सुरेल घरटे बांधले आहे- शेवटी परत फिरून याच घरट्यात यायला, हक्काने, आनंदाने!

योग ……..तहे दिल से शुक्रिया !!!!!

मिले सूर मेरा तुम्हारा, सारखं २१ मायबोलीकरांनी वेगवेगळ्या देशांमध्ये गाऊन तयार केलेलं हे एकमेव गीत असावं.  ह्यात माझा खारीचा वाटा आहे ह्याचा मला प्रचंड अभिमान आहे.

मायबोली चिरायु होवो 🙂

Read Full Post »

मायबोलीवर वैभव जोशीने सुरु केलेली गझल कार्यशाळा फ़ारच गाजतेय 🙂 इतका स्तुत्य उपक्रम, इतका वेळ खर्च करुन आमच्या सारख्या अनाडी लोकांना न कंटाळता, न चिडता शिकवायचं म्हणजे काही सोपं काम नाहीये.  Hats off to वैभव जोशी, स्वाती आंबोळे, प्रसाद शिरगावकर.   तसे अजून बरेच लोक सुद्धा होते मार्गदर्शनासाठी….सारंग, मानस, चक्रपाणि…!

तर सांगायचा मुद्दा हा की…. ह्या कार्यशाळेत गझलेबद्दल जी भिती होती ना…….त्याची जागा आता एका कुतूहलानं घेतलीये.  आता पर्यंत गझल म्हणजे काहीतरी भयंकर कठीण गोष्ट आहे……. नको तिच्या वाटेला जायला…. असंच वाटायचं.  आता वैभवने ती फ़ार सोप्या पद्धतीने समजावल्यामुळे आता गझलेजवळ जाता येईल इतपत धैर्य आलंय येवढं नक्की 🙂

एकदा लघु आणि गुरु हे कळायला लागलं…..की मीटर कळतं आणि एकदा मीटर मधे आपले शब्द बसवता आलेत की गझल जमलीच….. इतक्या प्रोत्साहनाच्या बळावर आम्ही सगळे नवशिके बाहु सरसावून तयार झालो.  म्हणजे आमच्या सेनापतीने इतपत आमच्या मनाची तयारी करवून घेतली होती. 

मग “ऋतू येत होते, ऋतू जात होते” ही एक ओळ आम्हाला मिळाली.  आता ही एक ओळ घेऊन गझल सुरु करायची होती.  कमीत कमी पाच शेर तरी असायला हवे होते.  आमच्या सगळ्यांची वैभवने इतकी मानसिक तयारी केली होती की “आक्रमण” म्हटल्यावर आम्ही सगळे त्याच्या त्या ऋतूंवर तुटून पडलो 🙂  आणि हा होता माझा प्रयत्न….. (अर्थात ह्यातही वैभवचं मार्गदर्शन होतंच)

ऋतू येत होते ऋतू जात होते
परी मी सख्याच्याच ध्यासात होते

सखा आज येणार माहीत होते
नजारे तसे आसमंतात होते

तिन्ही सांज आली उन्हे पेटवूनी
धुमारे तिच्या मंद श्वासात होते

कसा गंध वाहे पुन्हा तो फिरुनी
निराळेच अंदाज वा-यात होते

कशाला हवी पौर्णिमेची मुजोरी
इथे चांदणे बाहुपाशात होते

कसा रंग येईल त्या मैफ़लीला
तुझे सूर सारेच मौनात होते

Read Full Post »

लिहीन लिहीन म्हणता म्हणता बरेच दिवस झालेत.  शेवटी आज मुहूर्त लागला.  माझी लाडकी मायबोली ही साईट दरवर्षी दिवाळी अंक काढते.  तिथे वावरणार्‍या गुणी लोकांना एक मुक्त व्यासपीठ  देणारी ही माझी मायबोली प्रत्येक वेळी काहीतरी  कल्पक योजना राबवत असते.  दिवाळी अंक ही त्यातलीच एक योजना.  आपलं लिखाण मायबोलीच्या दिवाळी अंकात छापून यावं असं प्रत्येक मायबोलीकराला वाटत असतं.  ह्यावर्षी मायबोलीला १० वर्ष पूर्ण झालीत म्हणून एक खास स्पर्धा घेण्यात आली.    मायबोलीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुमच्या शब्दात लिहायचं.  

 मायबोलीबद्दल खरं तर इतकं काही लिहिण्यालायक आहे ना…….. आता ते कशा प्रकारे शब्दात बांधायचं त्यावर विचार करायचा होता.   मग शब्द आणि सूर ह्या दोन्हीचा मेळ घालून मी माझं मनोगत तयार केलं आणि पाठवलं.    मग दिवाळी अंकाची अगदी आतुरतेनी वाट बघणं सुरु झालं.  लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सगळं आटोपून उत्सुकतेनं रात्री मायबोलीवर आले.  बघते तर काय……. अतिशय सुरेख सजलेला देखणा दिवाळी अंक तय्यार होता.  आणि दुग्धशर्करायोग का काय म्हणतात ना…… तसंच झालं जेव्हा मला कळलं की माझ्या मायबोलीच्या मनोगताला पहिलं बक्षिस मिळालंय 🙂

 आता तेच मनोगत तुमच्यासोबत शेअर करतेय.  मायबोलीवर मी ‘जयावी’ ह्या नावानं वावरते.

तर…….. ही अश्शी आहे माझी मायबोली 🙂

तुम्हाला हे माझं मनोगत ऐकता सुद्धा येईल

 इथे टिचकी मारा 🙂

तू माझी मायबोली
तू माझी मायबोली
कधी गवसली, कशी भेटली
माझी मायबोली
तू माझी मायबोली
प्रीती जुळली, मनात रुजली
माझी मायबोली
तू माझी मायबोली

खरंच, कुठे बरं भेटलीस तू मला…….? हं आठवलं, माझ्या पतीराजांनीच तर घडवली आपली भेट.  जेव्हा तुझी पहिली भेट झाली ना, अगदी तेव्हाच तू खूप खूप आपलीशी वाटली.  पहिल्या नजरेतलं प्रेम म्हणतात ना ….. तसंच काहीसं 🙂

त्या पहिल्या भेटीनंतर मात्र मी अगदी तुझीच होऊन बसली.

सहवास तुझा उबदार असा
आईचा सहवास जसा
सखी कधी तू, कधी अबोली
माझी मायबोली
तू माझी मायबोली

का गं इतकं गुंतवून ठेवतेस मला……. रोज एकदा तरी तुझ्या कुशीत शिरुन मनातलं सगळं तुझ्याकडे बोलून टाकल्याशिवाय चैनच पडत नाही.  कधी खूप खूप बोलायचं असतं तर कधी नुसतंच तुझं बोलणं ऐकायचं असतं. जेव्हा मी मूक होते ना…… नेमकी तेव्हा तू बोलकी होतेस.  मला खुलवायचा प्रयत्न करतेस.  कधी कवितेच्या दुनियेत तर कधी कथांच्या सागरात.  कधी  कुणाच्या घरात तर कधी चक्क सैपाकघरात.

स्वाद तूच आस्वादही तू
भान तूच, आव्हानही तू
तप्त कधी तू, कधी सावली
माझी मायबोली
तू माझी मायबोली

इतकं पण लाघवी असू नये हं कोणी! इतका जीव लावायचा कशाला की मग जगणंही कठीण होऊन बसावं.  आता परगावी जाताना सुद्धा अगदी चुटपुट लागून रहाते मनाला. तुझी भेट होईल की नाही…. होईल की नाही.  इतकं झोकून द्यावं का गं दुसऱ्यांसाठी स्वत:ला……की स्वत:चं अस्तित्व विसरुन जाऊन दुसऱ्यांची नवी अस्तित्वं घडवावी…. त्यांना नवी ओळख द्यावी.  दुसऱ्यांना इतकं मोठं करुन स्वत: मात्र अगदी तश्शीच नामानिराळी राहतेस…….. कसं जमतं गं तुला…?

दिशा तूच अन मार्गही तू
शिखराचे सोपानही तू
सकला दावी नवी वाटुली
माझी मायबोली
तू माझी मायबोली

आईचे कधी आभार मानायचे नसतात असं म्हणतात.  तिच्याकडून अगदी हक्काने सगळे लाड करवून घ्यायचे असतात……. अगदी तस्सेच लाड पुरवतेस गं तू सगळ्यांचे.  प्रत्येकाला वाटतं की मीच तुझी लाडकी.  इतकं प्रेम देतेस तू…… अगदी निस्वार्थी, निरपेक्ष………सात्विक.  माझी माय……अशीच राहीन ना गं मी तुझी लाडकी………?

देणारा हा हात तुझा गं
कधी न पसरे कुणापुढे
दिलेस सारे भरभरुन तू
होऊ कशी उतराई
गं माझी मायबोली
तू माझी मायबोली

जयश्री
१७.९.२००६

Read Full Post »

%d bloggers like this: