Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘ये दुनिया रंगरंगीली’ Category

सिक्कीमायण

ट्रिपच्या सुरवातीलाच बागडोगरा विमानतळावर आम्हाला पाऊण तास तिष्ठत ठेवणारा “प्रवेश”, दार्जिलिंग, पेलिंग आणि गंगटोक फिरवताना आमचा छान दोस्त झाला. दार्जिलिंगचा गच्च गर्दीतला, मुसळधार पावसातला अरुंद रस्ता असो की दार्जिलिंग ते पेलिंगचा आणि पुढे गंगटोक चा भयंकर खराब रस्ता असो… ह्या मुलाने फारच कौशल्याने गाडी चालवली. इकडले सगळे रस्ते अतिशय खराब आहेत. शिवाय संपूर्ण रस्ता घाटातूनच…. !! रस्ते इतके अरुंद तरीही वाहतूक मात्र दुहेरी ! इतकी खडखड की शरीरातली सगळी हाडं न् हाडं खिळखिळी होतात. आम्ही दोघेही गाडीत समोरच्या सीटला गच्च पकडून बसायचो. हात सोडले की गचके… !! अशा रस्त्यावर गाडी चालवताना सुध्दा हा मुलगा कधी पायी चालणा-या मुलांना प्रेमाने टाटा करायचा तर कधी मुसळधार पावसात मुलांना आपल्या गाडीत घ्यायचा. जाता येतांना भेटणारे सगळे लोक ह्याचे मित्र. कुठे खायला प्यायला न्यायचा… तिथेही ह्याच्या मैत्रिणी… !! बोलायला मस्त आणि डोक्याने अतिशय तल्लख ! इतक्या भयंकर रस्त्यावरुन लीलया गाडी चालवताना तो आमचा हिरो कधी झाला कळलंच नाही.

असाच पेलिंगच्या होटलचा “प्रयास’, पेलिंग दाखवणारा “संजय बहादुर”, गंगटोक फिरवणारा “दुवा” आणि आमचे कौतुकाने फोटो काढणारा आणखी एक ड्रायव्हर “नबीन”, गंगटोकच्या होटलमधला गायक अशी आपली खास छाप सोडणारी फार छान मंडळी भेटली. नथुला पासला जाताना आम्हाला प्रेमाने मोमोज खाऊ घालणा-या “Sisters Cafe” चालवणा-या दोघी बहिणीसुध्दा फार गोड होत्या.

ह्या भागातली सगळी लोकं खूप अदबशीर आणि आतिथ्यशील आहेत. आयुष्याकडून फार काही अपेक्षा नसल्याने खुशमिजाज ! कष्टकरी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना स्वत:च्या जागेचा प्रचंड अभिमान आहे. इथे चो-यामा-या अजिबात होत नाही हे ते छातीठोकपणे सांगतात.

आपल्या छोट्याशा जगात खुश राहणारी लोकं आवडून जातात. कदाचित म्हणूनच निसर्गाने त्यांना हातचं काहीही न राखता भरभरून दिलंय.

Read Full Post »

Read Full Post »

रिमझिमता पाऊस…. त्याचा अनाहत नाद… दाट धुक्यात हरवलेल्या वाटा… निथळते डोंगर ….ओघळत्या द-या …. धबधब्यांचा अथक कोसळ….! दरीतून सरळसोट वाढलेल्या उंच झाडांच्या जंगलात स्वतंत्र अस्तित्व दाखवणारे बांबूचे हिरवे गर्द पिसारे…! गर्द झाडीत रेंगाळलेलं तितकंच दाट धुकं…. सूर्यप्रकाशाला सुध्दा अजिबात दाद देत नाही.

रस्त्याच्या एका बाजूला डोंगर-कडे तर दुस-या बाजूला खोल खोल द-या…. त्यामधून खळखळणारं पाणी… सततच्या पावसाने डोंगर द-यांनी पांघरलेली हिरवाई… त्यामधून तरंगत जाणारे ढग… ढगांचा पडदा जरासा विरला की द-यांमधे डोंगरांच्या अक्षरश: कुशीत वसलेली छोटी छोटी घरं.. हळूच डोकावताना दिसतात. नागमोडी घाटातून जाताना वाटेत अचानक रंगीबेरंगी रेनकोट घातलेली आईचा हात धरुन लुटूलुटू चालणारी गोडुली नेपाळी मुलं आपल्याला अगदी कौतुकाने टाटा करतात. अचानक जशी दिसतात तशीच अचानक कुठल्यातरी पायवाटेनं तुरु तुरु कडा चढून सुध्दा जातात. आपण थक्क होऊन बघतच राहतो. अधूनमधून दिसणारी ही लोकं कुठून कुठे जातात याचा उत्तर मिळतंच नाही.
ऊन, पाऊस, धुक्याचा खेळ तर सतत चालू असतो.

पेलिंगची पावलोपावली असलेली ही श्रीमंती बघताना हरखून जायला होतं.

आपण तर बुवा पेलिंगच्या प्रेमात !

जयश्री अंबासकर

Read Full Post »

चंद्र भरात असताना….
चंद्र विझत असताना…..

Read Full Post »

निसर्ग आणि त्याचं देखणेपण ह्यावर जितकं बोलावं तितकं कमीच… !! ह्यावेळी आकाशाची आणि समुद्राची निळाई आणि त्यामधे पांढ-या शुभ्र ढगांची कशिदाकारी ह्यामधे असे काही अडकलो की बाहेर निघायला वाट सापडूच नये असं झालं.

Norwegian Escape… हे आमच्या नितांत सुंदर Cruise चं नाव आणि हे जहाज आम्हाला घेऊन निघालं Bermuda ला. पहिल्यांदाच Cruise वर आलो होतो. उत्सुकता खूपच होती. आतापर्यंत फक्त सिनेमात आणि कादंबरीतच बघितलं होतं आणि आता ते प्रत्यक्षात बघायला मिळणार होतं. आपल्या सुखविलासाच्या ज्या काही कल्पना असतात त्याच्या पलीकडे होतं हे जग. सतरा मजल्यांचा विशालकाय डोलारा ! लखलखीत, चकचकीत… ! जवळ जवळ चार हजार पर्यटक आणि जहाज चालवणारे सतराशे कर्मचारी इतक्या लोकांना सामावून घेणारं, स्वर्गसुख देणारं ते अक्षरशः एक गावंच होतं….तरंगतं गाव… जिथे कशाचीच कमतरता नाही.

अखंड बागडणारी माणसं… त्यात आज्जी आजोबा, मुलं मुली, अगदी रांगणारी बाळंसुध्दा होती. उत्साहानं ओसंडून वाहणारी… सगळा नुसता जल्लोष !!

खाण्यापिण्याची लयलूट… चोवीस तास… ! मनोरंजनाचे कार्यक्रम सुध्दा दिवसरात्र ! ठिकठिकाणी फोटोग्राफर्स फोटो काढायला सज्ज !! रुम्समधे कमालीची स्वच्छता ! दिवसातून तीनवेळा तुमची रुम नीटनेटकी होणार. शिवाय टाॅवेल्सची आकर्षक सजावट !
मिजाज तो खुश रहेंगेही 😊

सकाळी जाॅगिंग साठी ट्रॅक, स्विमिंग पूल, Water Park, Basket Ball, Table Tennis… what not…

एकेक मजला सर करता करता दिवस भराभर पळायचा. दिवस सुध्दा जवळ जवळ नऊ वाजेस्तोवर. अगदी लख्ख ऊन असताना डिनर 😊. मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा भर ओसरला की मग मस्तपैकी डेकवर सूर्यास्त बघायचा. जाम के साथ शाम… 🥂 आणि थोड्या वेळात गुडुप्प अंधार… मग फक्त समुद्राची गाज… !!

फार कुतूहल वाटतं या अगम्य निसर्गाचं… कोण आणि कशासाठी करतंय हे सगळं… इतका सुंदर सूर्योदय, सूर्यास्त…भरती, ओहोटी…हिरवळ, सागर, आकाश…. अशक्य सुंदर आहे हे सगळं…. !

फार विचार नकोच करायला… फक्त इतक्या सुंदर निसर्गाशी प्रतारणा नको करायला. जपायला हवं हे पुढच्या पिढ्यांसाठी.

मनमुराद आनंद दिला या सफरीनं.. ! खूप काही अनुभवायला मिळालं… आयुष्य खूप खूप सुंदर आहे हे परत एकदा आकळलं… !

Read Full Post »

Older Posts »

%d bloggers like this: