Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘सारे तुझ्यात आहे’ Category

फाऊंटन म्युझिक कंपनीने नुकत्याच काढलेल्या देवकी पंडित ह्याच्या “सदाबहार गीते” ह्या अल्बमच्या दुस-या भागात माझ्या “सारे तुझ्यात आहे” ह्या अल्बम मधली देवकी पंडितांनी गायलेली चारही गाणी आहेत.

इतर मोठमोठ्या दिग्गजांच्या गाण्यांसोबत माझ्याही गाण्यांना त्यांनी त्यांचा कौल दिल्यामुळे खूप छान वाटतंय 🙂

ही गाण्यांची झलक तुम्हाला इथे ऐकता येईल.

http://maanbindu.com/showMusic.do?field=sangeet&name=Sare-Tuzyat-Aahe

Advertisements

Read Full Post »

माझ्या “सारे तुझ्यात आहे” ह्या अल्बम मधलं टायटल सॉंग गाताना स्वप्निल बांदोडकर

“ओला वारा” गातांना वैशाली सामंत आणि स्वप्निल बांदोडकर

“हुंदका साधा तुझा” गातांना देवकी पंडित

Read Full Post »

१८ तारीख…..अवी आणि अद्वैत सकाळी ४ वाजता मुंबईत पोचले.  त्या लोकांना काय काय सांगू आणि काय नको असं झालं होतं.  मी आणि अर्चना प्रचंड एक्साईटेड आणि प्रकाश तितकेच शांतपणे सगळे प्लॅन्स समजावून सांगत होते.  दुस-या दिवशी सगळी नागपूरची मंडळी पोचणार होती.  माझी लेक अदिती, माझ्या दोघी नणंदा, त्यांचे नवरे, मुलं……. २० ला भाऊ आणि वहिनी.  अगदी लग्नघर वाटत होतं अर्चना-प्रकाशचं घर.  आम्ही बाकीही सगळी व्यवस्था अगदी चोख ठेवली होती.  सकाळच्या नाश्त्यापासून तर रात्रीच्या जेवणापर्यंत, मधलं खाणं……… सगळं आंग्रे बाईंना करायला सांगितलं होतं.  त्यामुळे किचन मधे जायची कुणालाच गरज नव्हती.  सगळे मिळून फ़क्त मज्जा करायची होती.

१९ ला सगळी मंडळी पोचली……. हास्यकल्लोळात फ़क्त छप्पर उडायचं राहिलं.  जेवणं झाल्यावर आम्ही हॉलवर जायला निघालो…. थोडीशी कामं पण बाकी होती.  हॉलच्या तयारीवर शेवटला हात फ़िरवला.  आमचं बॅनर अगदी दिमाखात झळकत होतं दादर-माटुंगा कल्चरल सेंटरवर.  आता खरंच खूप समाधान वाटत होतं. 

घरी आल्यावर पुन्हा एकदा चेक लिस्टवर नजर फ़िरवली.  सगळ्यांना कामं वाटून दिली.  प्रत्येकाला सगळं सामान दाखवून दिलं.  रात्री मात्र अजिबात डोळ्याला डोळा लागला नाही. 

२० तारीख.  The D’Day  🙂   पटापटा सगळं आटोपलं.  नाश्ता, आंघोळी, जेवणं…. दुपारी साडे-तीनला घरातून सगळे निघालो.  हॉलवर बरीचशी तयारी झालेली दिसत होती.  होता होता स्टेज सजलं.  आमचीही सजावट सुरु होती.  एकीकडे गणपतीचा फ़ोटो, समई, तेल , वाती, मेणबत्ती…….. दुसरीकडे पुष्पगुच्छ, गिफ़्ट्स, ट्रे, पाणी ही तयारी.  सभागृहात आमचे फ़ोटो, पोस्टर, सीडी विक्रीचा स्टॉल, चहा, पाणी.  मग आमची तयारी. 

हळुहळु लोक यायला सुरवात झाली.  सगळ्यात पहिले प्रसन्न शेंबेकर येऊन भेटून गेला.  नागपूरला जायच्या आधी तो अगदी आवर्जून भेटून गेला.  सुरवात तर छान झाली होती.  माझा सगळा मित्रपरिवार, अभिजीत, त्याचे आई-बाबा…. सगळ्यांचा उत्साह अगदी ऊतू जात होता.  साऊंड वाले, फ़ोटो, व्हिडिओ शूटिंगवाले आपापली जागा घेऊन सज्ज होते.  वैशाली सामंत सगळ्यात पहिले आल्या.  मग पाठोपाठ देवकी ताई पंडित, अशोक पत्की आणि स्वप्निल बांदोडकर आणि त्यांच्या पत्नी.  फ़ाऊंटन म्युझिक कंपनीचे कांतिभाई ओस्वाल अविनाश खर्शीकरांसोबत आले.  प्रशांत लळीत आमच्या विनंतीवरुन अशोक पत्कींना आणायला प्रकाश सोबत गेला होता.  संदेश, अभिजीत, प्रशांत आपापल्या पत्नीसोबत आले होते. मनिष कुळकर्णी आमच्या अल्बमचा मुख्य वादक, सत्यजीत, सौरभ… ह्यांची उपस्थिती मनाला खूप आनंद देत होती.   सगळा गोतावळा बघून अगदी भरुन येत होतं.

हेमंतने सगळ्या उपस्थितांचं स्वागत केलं.  अभिजीतने आपल्या गोड आवाजात गणेश वंदना म्हणून कार्यक्रमाला पवित्र सुरवात केली.  त्यानंतर कार्यक्रम सुरु झाला.  माझ्या एका प्रचंड मोठ्‍या, महत्वाकांक्षी स्वप्नाचं हे मूर्त स्वरुप होतं.  गप्पागोष्टींच्या स्वरुपात कार्यक्रम पुढे सरकत होता.  स्वप्निल चं “आभास चांदण्याचा” हे गाणं एक वेगळीच वातावरण निर्मिती करुन गेलं.  त्यापाठोपाठ वैशाली सामंत आणि देवकीताईंचे सूरही आपापलं साम्राज्य गाजवून गेलेत.  सीडी प्रकाशनाची वेळ झाली.  अशोकजींनी आपल्या शुभहस्ते सीडीचं प्रकाशन केलं.  त्यावेळी आईची खूप आठवण आली.  ती तिच्या तब्येतीमुळे येऊ शकली नव्हती.  आज तिला,  बाबांना किती आनंद झाला असता….!!

सीडीचं प्रकाशन झाल्यावर सगळ्या वादक, तंत्रज्ञ आणि मदतनीसांचा अशोक पत्कींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  अशोकजींनी सीडीबद्दल गौरवोद्गार काढले.  माझ्या, अभिजीत च्या कामाची प्रशंसा केली आणि शुभेच्छा दिल्यात.  वैशाली, देवकी ताई, स्वप्निल …सगळ्यांनीच संपूर्णं प्रोजेक्टची तारीफ़ केली….. अगदी धन्य धन्य वाटलं.  कांतिभाईंचे विशेष आभार मानण्यात आले.  त्यांनीही सगळीच गाणी आवडल्यामुळे ही सीडी आपल्या बॅनरखाली प्रकाशित करायचा विचार केल्याचं सांगितलं.

शेवटी माईक माझ्या हातात आला.  आभारप्रदर्शनाचं काम करायला मी उभी राहिले.  माईक हातात घेतल्यावर फ़क्त त्या दोन मिनिटात मी सगळा प्रवास मनात पुन्हा एकवार करुन आले.  मनात खूप आठवणी दाटल्या होत्या.  ह्या प्रकल्पात मला ज्या ज्या लोकांची मदत झाली…… त्या त्या लोकांचे मनापासून आभार मानले आणि कार्यक्रम संपला.  एका स्वप्नाच्या परिपूर्णतेपर्यंतच्या प्रवासाची आज सांगता  झाली होती. 

सगळे लोक भेटायला आले.  शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव आम्ही सगळे झेलत होतो……तॄप्त होत होतो.  हा प्रवासाचा अंत नक्कीच नव्हता…… आता कुठे प्रवासाला सुरवात झाली होती 🙂

Read Full Post »

रोजचा दिवस काहीतरी नवीन काम घेऊन उजाडत होता.  आता पुन्हा एकदा हॉलची चक्कर करायची होती.  काय काय कुठे कुठे आहे……..कुठे कुठे ठेवायचं….काय काय सोयी आहेत….काय करवून घ्याव्या लागणार आहेत हे सगळं ठरवायचं होतं. तिथल्या डेकोरेटरशी बोलून सगळं फ़ायनल करायचं होतं.  मी आणि अभिजीत दुपारी पोचलो.  सगळं नीट बघून पक्कं केलं.  तिथल्या लोकांनी सुद्धा फ़ारच उपयुक्त सल्ले दिले.  तिकडून आम्ही फुलमंडईत गेलो.  मनासारखं ते ही काम झालं.  तो हॉलवरच गुच्छ पोचवणार होता. 

बाकी बरीचशी बारीक सारीक खरेदी करुन आम्ही हेमंत बर्वेला भेटायल गेलो.  कार्यक्रमाबद्दल त्याच्याशी सविस्तर चर्चा केली.  कार्यक्रमाचं स्वरुप काय असावं…… कसं असावं…..त्याला त्यासाठी जी काय माहिती हवी होती ती पुरवली.  आता मन थोडं शांत झालं होतं.  बरीचशी कामं आटोपली होती.  शिवाजी पार्कच्या उद्यान गणेशाचं दर्शन घेतलं…. तिथे आमचं मोठं पोस्टर आणि आमंत्रण पत्रिका लावली नंतर  आमच्या टिव्ही वाल्या दोस्तांची भेट झाली.  ह्यात प्रणेश जाधव होता.  ही मुलं शिकता शिकता बरंच काही करतात.  त्यांनीच ईटिव्ही वाल्यांशी बोलून आमचं आमंत्रण त्यांच्यापर्यंत पोचवलं.  कितीतरी लोकांची आम्हाला मदत झाली.  सहारा चॅनेल साठी प्रकाशचा मित्र पांडा आणि त्याची बायको मदतीला आले.  झी २४ तास चं काम तुषार शेटे ने केलं.  वर्तमान पत्राचं काम श्रीकांतजी आंब्रेंनी अतिशय आपलेपणाने केलं.  त्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन पण केलं.  सगळ्यांचाच आपलेपणाचा, मोलाचा आणि प्रेमाचा वाटा होता आमच्या ह्या पूर्ण संकल्पात.

१७ तारीख उजाडली. मी आणि अभिजीतनं चार्ट पेपर्स वर आमच्या अल्बमचा जिवंत प्रवास रेखाटला.  सोबत माझ्या काव्यरचना.  सगळं सुबक रचून सजवलं.  संपूर्ण दुपार त्यातच गेली.  ते सगळे फ़ोटो बघताना आम्ही केलेल्या प्रवासातल्या गमती जमती आठवल्या….. मन पुन्हा एकदा ताजंतवानं झालं.  आज आम्हाला अजून एक महत्वाचं काम करायचं होतं.  आज वैशाली सामंत भेटणार होत्या.  पण त्यांची भेट होऊ शकली नाही.  पण त्यांचं आमंत्रण आणि सीडी मात्र आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे बझ-इन मधे पोचवली.  तिथे सत्यजीत भेटले.  पुन्हा एकदा रेकॉर्डिंगच्या सुखद आठवणींना उजाळा मिळाला.  आम्ही खरंच खूप मज्जा केली होती.  सत्यजीत आणि सौरभ सुद्धा अगदी मनापासून सगळ्यात सामील होते.  त्यांनाही हे काम करण्यात खूप मज्जा आली असं ते बोलले……. खूप छान वाटलं. 

तिकडून आम्ही माहिमला गेलो अभिजीत नार्वेकर आणि त्यांच्या पूर्ण गॅंगला आमंत्रण द्यायला.  त्यांच्याशी पण घट्ट दोस्ती जमली होती.  त्यांच्या नव्या कंपोझिशन्स आणि गप्पा करता करता  मस्त वेळ गेला.  घड्‍याळाकडे बघितल्यावर मात्र वेळेची जाणीव झाली.

Read Full Post »

प्रकाश आणि अर्चना आले होते विमानतळावर घ्यायला.  ह्या दोघांमुळेच मी इतका मोठा उपद्व्याप करु शकले.  त्यांच्या मदतीबद्दल जितकं लिहावं तितकं कमी आहे.  पोचल्यावर थोडा आराम झाल्यावर डोळ्यासमोर सगळी कामं दिसायला लागलीत.  अभिजीत शी बोलून कशी सुरवात करायची ते ठरवलं.  देवकी ताई, स्वप्निल आणि अशोक पत्कींना घरी जाऊन आमंत्रण द्यायचं होतं.  २-३ दिवसात कांतिभाई त्यांच्या मुंबईच्या ऑफ़िसमधे सीडीज, पोस्टर्स आणि आमंत्रण पत्रिका पाठवणार होते.  त्या मिळाल्याशिवाय गायक मंडळींकडे जाता येणार नव्हते.  तोपर्यंत बाकीची तयारी सुरु होती.  सगळ्या गायक, तंत्रज्ञ आणि मदतनीसांचा सत्कार करणार होतो त्यामुळे त्याची तयारी.  भरपूर याद्या तयार होत होत्या ….सामान आणलं जात होतं.  पिशव्यांवर नावं घालून तयार पिशव्या घरात एका कोप-यात साठत होत्या.

कांतिभाईंनी कबूल केल्याप्रमाणे सगळं सामान पाठवलं.  मी आणि अभिजीत सगळं सामान तिकडे जाऊन घेऊन आलो.  आमच्या इतक्या दिवसांच्या धावपळीचं सार्थक झालं होतं.  अतिशय सुरेख पॅकिंग मधे आमचं स्वप्नं समोर दिसत होतं.  आम्ही दोघांनीही देवाचे आभार मानले.  ज्यांची ज्यांची मदत झाली त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद दिले मनात.  ते गोड ओझं घरी घेऊन आलो.  आज खूप थकलो होतो तरी थकवा अजिबात जाणवत नव्हता.

दुस-या दिवशी सकाळीच आम्ही निघालो.  सगळ्यात पहिले स्वप्निल बांदोडकरांकडे.  त्यांना आमंत्रण पत्रिका आणि ट्रॅक्स असलेली त्यांची गाणी त्यांना देऊन मग आलो अशोक पत्कींकडे.  अशोकजींनी फ़ारच छान केलं स्वागत.  आम्ही त्यांनाही आमंत्रण पत्रिका आणि सीडी देऊन आलो देवकी ताईंकडे.  आतापर्यंत आम्ही खूप मोकळे झालो होतो त्यांच्याशी.  दोनदा घरीही जाऊन आलो होतो. खूपच छान बोलतात त्या.  त्यांचं बोलणं अगदी ऐकत रहावसं वाटतं.  प्रत्येक वेळी त्यांना भेटून काहीतरी अजून करायला हवं अशी भावना तीव्रतेने जाणवली.  खूप कळकळीने बोलतात त्या संगीताविषयी.  त्यांच्याकडून आम्हाला खूपच उत्तेजन मिळालं. 

वैशाली मात्र मुंबईत नव्हती.  तिची भेट थेट १७ लाच होणार होती.  आमची बाकीची तयारी सुरुच होती.  आमचं बॅनर बनवलं अभिजीतच्याच अजून एका टॅलेन्टेड मित्रानं.  प्रणव धारगळकर नं.  आतापर्यंत अभिजीतने ज्या ज्या कुणाला मला भेटवलं तो तो प्रत्येक मित्र जबरदस्त कलाकार होता आणि तरीही अतिशय साधा.  काय लाघवी गोतावळा होता अभिजीतचा.  मला पण त्यांनी त्यांच्यात लगेच सामावून घेतलं.  तर हा प्रणव सुद्धा एक उच्च कलाकार.  त्यानेसुद्धा अगदी धडपड करुन आम्हाला सुरेख, स्टेजला भारदस्तपणा आणणारं, अगदी आमच्या मनासारखं बॅनर बनवून दिलं.  ऑफ़िसमधून आल्या आल्या चक्क रात्री साडे-नऊ पर्यंत तो आमचं काम करत होता. 

जीवाला जीव देणारी माणसं जोडली आहेत ह्या अभिजीतनं.  ह्याला कारण त्याचे संस्कार.  त्याचे आई-बाबा सुद्धा इतके प्रेमळ आहेत ना…. मला तर त्यांनी अगदी स्वत:च्या मुलीसारखं प्रेम दिलं आणि मी ही मस्तपैकी हक्काने सगळे लाड करवून घेतले.  चिकन काय, फ़िश फ़्राय काय….. काकूंनी अतिशय प्रेमाने खाऊ घातलं.  काकांबद्दल काय बोलावं.  प्रचंड वाचन आहे त्यांचं.  शब्दप्रभू आहेत ते.  कायम त्यांचं काहीतरी लिखाण सुरु असतं.  अगदी मनापासून कौतुक करणारे, खूप खूप हळवे.  प्रत्येक आनंदाच्या क्षणी, टेन्शन्च्या वेळी काकू-काकूंचा आम्हाला खूपच आधार होता.  मी, अभिजीत, प्रकाश अर्चना, काका, काकू…… आम्ही सगळेच ह्या प्रोजेक्ट मधे आकंठ बुडालो होतो.

Read Full Post »

कांतिभाईंनी अल्बमचं नाव काय ठेवायचं असं विचारलं……. तेव्हा श्यामलीने सुचवलेलं नाव ओठावर आलं…”सारे तुझ्यात आहे”  ब-याच जणांना छळलं होतं मी यासाठी.  पण जेव्हा श्यामलीने सुचवलं……तेव्हा मनापासून आवडलं 🙂

कांतिभाईंशी भेट झाल्यानंतर दुस-या दिवशी पुण्यात “शाकाहारी रविवार” ह्या मायबोलीच्या गेट टू गेदर ला “वैशाली” मधे ब-याच मायबोलीकरांशी भेट झाली.  मी पहिल्यांदाच सगळ्यांना भेटत होते.  इतक्या दिवसांच्या रुजलेल्या नात्याचं असं मूर्त स्वरुप…… खूप खूप आनंद झाला.

पुणं सोडून मुंबईला जाणा-या बसमधे मनात गोड आठवणी जागवत मी प्रवास करत होते.  देवाने तुला जे काय हवं ते मिळो असं जणू काही वरदानच दिलं होतं मला !  जे जे मी इच्छित होते त्या सगळ्या मागण्या देव पुरवत होता.  आजचा दिवस अगदी परिपूर्ण वाटत होता.  अवीची खूपच आठवण येत होती.  आज त्यांच्या भरवशावरच मी इतकं सगळं करु शकले होते.  इतका चांगला नवरा दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा देवाचे आभार मानले 🙂

मुंबईत पोचले.  आता माझ्याकडे पुढच्या हालचाली करायला फ़क्त २ दिवस होते.  कांतिभाई एका महिन्यात सीडी काढणार होते.  म्हणजे साधारण १० मार्च पर्यंत सीडी हातात येणार होती.  मी २ दिवसांनी म्हणजे १५ फ़ेब्रुवारीला कुवेतला परत जाणार होते.  त्या दिवसातच हॉल वगैरे बघून सीडी प्रकाशनासाठी नक्की करावा लागणार होता.  तिकडे माझ्या अद्वैतची वार्षिक परिक्षा १६ मार्चला संपणार होती म्हणजे प्रकाशनाची तारीख त्यानंतरच ठरवावी लागणार होती.  माझे सगळे नातेवाईक मुंबईला कार्यक्रमाला येणार म्हणजे त्यांच्या सोयीनेच तारीख ठरवावी लागणार होती. 

अभिजीत होताच सोबत.  ह्या अभिजीतची पण कमालच म्हणायला हवी.  हा मुलगा……इतका मोठा संगीतकार…… माझ्या प्रत्येक कठीण वेळेला माझ्या सोबत होता.  प्रत्येक ठिकाणी अगदी जातीने बरोबर होता.  आतापर्यंत त्याला कुठल्याही गीतकाराने किंवा निर्मात्याने इतका त्रास दिला नसेल इतकं छळलं मी त्याला.  तोसुद्धा अगदी तेवढ्याच आपुलकीने माझी सोबत करत होता…. अगदी प्रत्येक ठिकाणी…..प्रत्येक कामात.  आम्ही ठरवलं की उद्या आपण सगळे हॉल बघायला जायचं. पण कसचं काय…. राज ठाकरेंच्या अटक प्रकरणामुळे मुंबईत इकडे तिकडे प्रवास करणं धोक्याचं  होतं.  तो दिवस घरीच नुस्ता चुळबुळत काढला.  दुस-या दिवशी मात्र अगदी अट्टाहासाने बाहेर पडलो.  ४-५ हॉल बघितले….. पण तारखांचा भरपूर घोळ होता.  त्यामुळे दादर-माटुंगा कल्चरल सेंटर निश्चित केला.  मी त्याच रात्री कुवेतला वापस आले.  जातांना कांतिभाईंना पुन्हा एकदा फ़ोन केला.  त्यांनी निश्चिंत रहायला सांगितले.  त्यामुळे जरा शांत मनाने कुवेतला परतले.

कुवेतला सुद्धा नुस्तं बसून रहायचं नव्हतं तर प्रकाशनाची सगळी तयारी करायची होती.  इकडे अद्वैतची वार्षिक परिक्षा पण सुरु होणार होती.  पाहुण्यांची यादी, हॉलवर न्यायच्या सामानाची यादी, निवेदक हेमंत बर्वे शी बोलणं, कार्यक्रमाची क्रमवार आखणी.  सगळ्यात महत्वाचं म्हणजे गायकांशी बोलून तारीख पक्की करणे.  ते सगळं अभिजीतनेच केलं.  एकदा गायकांच्या तारखा मिळाल्यावर प्रमुख पाहुणे अशोक पत्की ह्यांची तारीख ही पक्की केली.  सगळ्यांच्या मते २० मार्च ही तारीख ठरली.  नंतरचे दोन दिवसही सुट्ट्या असल्यामुळे हाच दिवस निश्चित केला.  तसा प्रकाश ने हॉलही बुक केला.  एक मोठ्ठं काम झालं होतं. 

मी तिकडे रेकॉर्डिंगला काढलेले फ़ोटो अभिजीत धर्माधिकारी (माझा अजून एक ऑर्कुटवरचा मित्र) ला पाठवले आणि त्याने ते चांगले सुधारुन परत पाठवले.   त्यांचे प्रिंट घेतले.  ते सगळे फ़ोटो मला प्रकाशनाच्या वेळी छानपैकी क्रमवार चार्ट पेपरवर लावायचे होते.  शिवाय माझ्या कविता सुद्धा.  त्याचे सगळे प्रिंट आऊट्स, अल्बमचं राईट-अप, टिव्ही चॅनेल्स ना पत्रं….अशी बरीच कामं होती.  माझ्या ऑर्कुटवरच्या ब-याच मित्र मैत्रिणींची फ़ार मदत झाली.  तुषार शेटे हा झी २४ तास मधला रिपोर्टर.  त्याने त्याच्या चॅनेल शी बोलून ठेवलं होतं.  कधीही न भेटलेले हे मित्र अतिशय आपुलकीने आपल्या परीने जी मदत होईल ती करत होते.

एका आठवड्‍यात कांतिभाईंची कव्हर डिझाईनची मेल आली.  त्यात काही करेक्शन्स करुन कव्हर डिझाईन फ़ायनल केलं.  अगदी मनासारखं, फ़्रेश डिझाईन झालं होतं.  आता आमंत्रण ! छानसा मजकूर तयार केला आमंत्रणाचा आणि कांतिभाईच्या आर्टीस्ट ने आमंत्रण पत्रिका ही अगदी छान बनवली.  सगळ्यांना आमंत्रणं पाठवली.  सगळ्यांच्या भरभरुन शुभेच्छा आल्या.  माझी इकडे स्वत:ची तयारीही सुरु होती.  कुठली साडी, कुठली ज्वेलरी……. 🙂  बॅगा आठवडा आधीच भरुन ठेवल्या होत्या.  मी १० मार्चला जाणार होते आणि अवी आणि अद्वैत त्याची परिक्षा संपल्यावर १८ ला सकाळी पोचणार होते.  मी तिकडे बाकीची सगळी तयारी करुन ठेवणार होते.  अगदी आठवणीने सगळं सामान, सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन मी मुंबईत पोचले.

 

Read Full Post »

आता फ़क्त देवकीताईंचं रेकॉर्डींग राहिलं होतं आणि मग मिक्सिंग.  देवकीताईंचं रेकॉर्डिंग रविवारी होतं.  देवकीताई यायच्या आधी आम्ही माझं काव्यवाचन रेकॉर्ड केलं.  लग्नाआधी केलेल्या आकाशवाणीवरच्या कार्यक्रमानंतर इतक्या दिवसांनी प्रथमच स्टुडिओत उभी होते.  मनासारखं झालं हे ही काम 🙂

पप्पा म्हणजे माझ्या बहिणीचे सासरे सुद्धा मुद्दाम आले होते रेकॉर्डिंग बघायला.  देवकीताईंचं गाणं ऐकायला मिळणं हिच फ़ार मोठी गोष्ट होती.  आम्ही सगळेच उत्सुक होतो.  अभिजीत तर फ़ारच उत्साहात होता….. त्याने कंपोझ केलेली गाणी आज देवकी पंडित गाणार होत्या.

बारा वाजता त्या आल्यात.  त्या आल्यावर वातावरण थोडंसं गंभीर होतं…..पण त्यांनीच तो तणाव दूर केला.  त्यांचं गाणं ऐकून अक्षरश: अंगावर काटा येत होता.  माझ्याही नकळत माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते.  माझ्या आयुष्यातला एक अतिशय मोलाचा क्षण होता हा.  इतकी मोठी गानसम्राज्ञी…….. आज आमच्यासमोर साक्षात गात होती…. माझे शब्द !!  या क्षणी आयुष्यात अजून काहीही नको असं वाटून गेलं….. देवाने माझी इच्छा इतक्या सुंदर त-हेने पुरी केली होती.   मी अवींना प्रचंड मिस करत होते.  आजचा हा क्षण मला फ़क्त अवीमुळेच जगायला मिळाला होता. 

 आम्हाला आपल्या स्वरमोहिनीत गुंतवून देवकीताई जेव्हा गेल्या तेव्हा आम्ही भानावर आलोत.

आता मिक्सिंग.  आम्ही ३० जानेवारीला स्टुडिओ घेतला होता मिक्सिंग साठी. 

 मला त्याच संध्याकाळच्या विमानानं नागपूरला जायचं होतं.  माझ्या नणंदेच्या नव-याचा वाढदिवस होता पन्नासाव्वा.  मी सकाळी घरातून माझी पेटी घेऊनच निघाले.  स्टुडिओत मिक्सिंग झाल्यावर तिकडूनच मी एयरपोर्ट वर  जाणार होते.  सत्यजीतनं एकेक गाणं करायला घेतलं.  प्रत्येक गाण्यासोबत त्या त्या वेळच्या आठवणी जाग्या होत होत्या.  आमची सगळी गाणी तयार झाली. थरथरत्या हाताने मी तो अनमोल ठेवा हातात घेतला.  जे काही झालं होतं त्यावर विश्वासच बसत नव्हता.  अतिशय तृप्त मनाने मी नागपूरकडे जाणा-या विमानात चढले.

सीडीचं काम तर अगदी मनासारखं झालं होतं.  पण त्याच्यापेक्षाही महत्वाचं काम होतं पुढे.  कंपन्यांना भेटणं.  वैशाली सामंतांना पुन्हा फोन केला.  त्यांनी कबूल केल्याप्रमाणे फ़ाऊंटन म्युझिकच्या कांतिभाई ओस्वालांशी बोलून अपॉईंटमेंट ठरवली होती.  मी दुस-याच दिवशी पुण्याला निघाले. 

पुण्याला सकाळी ११ ला पोचले भावाकडे.  कांतिभाईंना फ़ोन केला तेव्हा ते म्हणाले संध्याकाळी चार वाजता भेटूयात.  मनातून आनंद तर झाला होता पण प्रचंड धडधड होत होती.  पहिल्यांदाच असं काही काम करायला निघाले होते.  जाताना दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं आणि धडधडत्या अंत:करणाने फ़ाऊंटनच्या ऑफ़ीसमधे प्रवेश केला.  अतिशय हसतमुख असलेल्या कांतिभाईंनी आमचं स्वागत केलं.  छातीतली धडधड जरा कमी झाली होती.  त्यांना मी माझी डेमो सीडी दिली.  त्यांनी ती त्यांच्या ऑफ़ीसच्या म्युझिक सिस्टीमवर वाजवऊन बघितली.  त्यांच्या चेहे-यावरुन काहीच कळत नव्हतं.  पण सीडी संपल्यावर अगदी लग्गेच ते बोलले…..(माझे प्राण अगदी कंठाशी आलेले) ” मला तुमची सीडी आवडली.  आपण काढूयात तुमची सीडी” हे त्यांचे शब्द ऐकून माझा विश्वासच बसेना.  सोबत माझा भाऊ प्रसाद होता.  तो मला कंट्रोल करायचा प्रयत्न करत होता.  मी अगदी जीवाच्या आकांताने चेहेरा शांत ठेवायचा प्रयत्न करत होते.  त्यांनी दिलेली ऑफ़र ऐकून  “तुम्हाला फ़ोन करते” असं सांगून बाहेर पडले.

बाहेर पडल्यावर लग्गेच अवी आणि अभिजीतला फ़ोन केला…..वैशाली सामंतला फ़ोन केला….ह्यांनी तिकडे विवेकला फ़ोन केला…… सगळ्यांचं म्हणणं हेच होतं….. कसलाच विचार करु नका.  कॉन्ट्रॅक्ट साईन करा.  त्यादिवशी शुक्रवार होता.  भरपूर विचार करुन सोमवारी पेढे घेऊन कांतिभाईच्या ऑफ़ीसमधे गेले.  कॉन्ट्रॅक्ट साईन केला…….तोंड आधीच गोड झालं होतं…. अतिशय समाधानाने परत मुंबईला निघाले.  एका महिन्याच्या आत आपण अल्बम काढूयात असं त्यांनी आश्वासन दिलं आणि ते पूर्णही केलं.

Read Full Post »

Older Posts »

%d bloggers like this: