Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

चंदन

पोर एकलीच होती
घनदाटशा रानात
रान पाखरांच्या सवे
होती अतीव सुखात

कधी ऊन ऊबदार
कधी वारा घाले मिठी
कधी हळवा पाऊस
फिरे तिच्या पाठीपाठी

रानाबाहेर पडले
जेव्हा चुकून पाऊल
सार्‍या जगाला लागली
तिची सुगंधी चाहुल

आले हुंगत हुंगत
लांडगे शहरातले
सुख आयुष्याचे तिच्या
एका क्षणात संपले

रान कावरेबावरे
दृष्ट लागली कुणाची
चंदनाचे हे प्राक्तन
भिती सदा विळख्याची

जयश्री अंबासकर

Advertisements

लाजत नाही

आळस भारी कसरत नाही
कंबर म्हणते वाकत नाही

आभाळाशी झाली कट्टी
पाउस हट्टी बरसत नाही

पाटया सगळ्या कोर्‍या होत्या
पाढे कोणी गिरवत नाही

ओंजळ झाली इतकी छोटी
अर्घ्यच सूर्या पोचत नाही

तू तू मैं मैं होते कारण
नवरी आता लाजत नाही

फॅशन कसली ओंगळवाणी
उघडी काया झाकत नाही

फेसबुकावर वावर सारा
दोस्तच हल्ली भेटत नाही

जयश्री अंबासकर

IMG_6936

रिमझिमता पाऊस…. त्याचा अनाहत नाद… दाट धुक्यात हरवलेल्या वाटा… निथळते डोंगर ….ओघळत्या द-या …. धबधब्यांचा अथक कोसळ….! दरीतून सरळसोट वाढलेल्या उंच झाडांच्या जंगलात स्वतंत्र अस्तित्व दाखवणारे बांबूचे हिरवे गर्द पिसारे…! गर्द झाडीत रेंगाळलेलं तितकंच दाट धुकं…. सूर्यप्रकाशाला सुध्दा अजिबात दाद देत नाही.

रस्त्याच्या एका बाजूला डोंगर-कडे तर दुस-या बाजूला खोल खोल द-या…. त्यामधून खळखळणारं पाणी… सततच्या पावसाने डोंगर द-यांनी पांघरलेली हिरवाई… त्यामधून तरंगत जाणारे ढग… ढगांचा पडदा जरासा विरला की द-यांमधे डोंगरांच्या अक्षरश: कुशीत वसलेली छोटी छोटी घरं.. हळूच डोकावताना दिसतात. नागमोडी घाटातून जाताना वाटेत अचानक रंगीबेरंगी रेनकोट घातलेली आईचा हात धरुन लुटूलुटू चालणारी गोडुली नेपाळी मुलं आपल्याला अगदी कौतुकाने टाटा करतात. अचानक जशी दिसतात तशीच अचानक कुठल्यातरी पायवाटेनं तुरु तुरु कडा चढून सुध्दा जातात. आपण थक्क होऊन बघतच राहतो. अधूनमधून दिसणारी ही लोकं कुठून कुठे जातात याचा उत्तर मिळतंच नाही.

ऊन, पाऊस, धुक्याचा खेळ तर सतत चालू असतो. पेलिंगची पावलोपावली असलेली ही श्रीमंती बघताना हरखून जायला होतं.

आपण तर बुवा पेलिंगच्या प्रेमात !

श्रीमंत वावर माझीच आई
करतेय सादर माझीच आई

शाही सवारी करते स्कुटरवर
तरुणी निरंतर माझीच आई

दमुनी उन्हाचा दारात कोणी
देणार भाकर माझीच आई

दुलईत घेई सार्‍या जगाला
मायेचि पाखर, माझीच आई

पोळून आले जेव्हा कधी मी
हळुवार फुंकर माझीच आई

सार्‍या घराची तृप्ती करूनी
खाणार नंतर माझीच आई

कशिदा असो वा स्वेटर नि शाली
विणणार झरझर माझीच आई

दुखले कुणाचे थोडे तरीही
होणार कातर माझीच आई

काया तिची ना थकते कधीही
जात्याच कणखर माझीच आई

समस्या असो वा दुविधा कितीही
हमखास उत्तर माझीच आई

तेजाळ ज्योती परि भासते ती  
सगळ्यात सुंदर माझीच आई

देणेच देणे नाही अपेक्षा
साक्षात ईश्वर माझीच आई

जयश्री अंबासकर
२८.३.२०१८

तुलाही मलाही

विरक्ती जराशी तुलाही मलाही
शिसारी सुखाची तुलाही मलाही

विचारे न कोणी जराही खुशाली
भिती गुंतण्याची तुलाही मलाही

पुन्हा दंश व्हावे विषारी विखारी
चटक या नशेची तुलाही मलाही

गुन्हे पंचक्रोशीत भरपूर केले
सजेची न भीती तुलाही मलाही

बहरल्या सुखाने किती चांदराती
सवय जागण्याची तुलाही मलाही

नव्याने झगडलो पुन्हा जीवनाशी
निराळीच तृप्ती तुलाही मलाही

जुन्या वेदनांचेच जखमी किनारे
तरी ओढ त्यांची तुलाही मलाही

उभी रास केली रित्या शिंपल्यांची
गवसले न मोती तुलाही मलाही

तुझी बेफिकीरी, दिशाहीन मी ही
न चिंता जगाची तुलाही मलाही

फुले मोगरा अन्‌ फुले रातराणी
कशी नीज यावी तुलाही मलाही

कितीदा वहाव्या पखाली गुन्ह्याच्या  
नसे खंत त्याची तुलाही मलाही

नको भेटणे ते दुपारी बिपारी
सवय ना उन्हाची तुलाही मलाही

हिशेबात नव्हतेच देणे नि घेणे
कशाला उधारी तुलाही मलाही

निरपराध होतो परंतू तरीही
भिती कायद्याची तुलाही मलाही

किती जीवघेण्या किती दीर्घ रात्री
प्रतिक्षा उषेची तुलाही मलाही

जयश्री अंबासकर

 

काही मला कळेना

खरं तर मनात खूप काही साठलंय…. मोकळं व्हायला हवंय.  पण हातात कागद पेन घेऊन बसण्याचा योग काही येत नाहीये.  महिला गजलकारांचा एक छोटासा ग्रुप…त्यात होणारी गजलेची हलचल ह्यामुळे लिहिण्याची उर्मी झाली आणि ही गजल उतरली.  तरही गजल आहे. मिसरा आहे भूषण कटककर ह्यांचा.

सारेच मित्र होते, एकांत का टळेना
(माझ्याशिवाय कोणी, माझ्याकडे बघेना)

कोट्यावधी कमवला, पैसा, जमीन, जुमला
उपभोग ह्या सुखाचा, घेणे मुळी जमेना

वाटेत भेटलेले, टाळून सर्व गेले
मदतीस मात्र कोणी अजिबात सापडेना

सलगी करुन गेला, तू सूर छेडलेला
आले कशी समेला, काही मला कळेना

नजरेत ओल होती, हृदयातही उबारा
आधार का कुणाचा, होणे मुळी जमेना

जयश्री अंबासकर
२०.३.२०१८

 

download

Dadasaheb Phalke Award

शशी कपूर…… आता आपल्यात नाहीये…. अतिशय वाईट्ट बातमी  
विश्वासच ठेवावासा वाटत नाहीये.

माझा सगळ्यात आवडता अभिनेता !!

मला हा फोटोत दिसतोय ना तसा शशी कपूर जास्त आवडायचा. फार तरुण नाही तर थोडासा Matured Type !! “सिलसिला” “New Delhi Times” मधे होता ना तसा. तसा “इजाजत” मधला सुद्धा. सिनेमाच्या शेवटी रेखाचा नवरा म्हणून अगदीच थोड्या वेळासाठी येतो आणि संपूर्ण सीनमधे छा जाता है !!

पडद्यावर रोमान्स करावा तर शशी कपूरनंच ! वेगळीच स्टाईल होती त्याची !! मग तो “कभी-कभी” मधला असो किंवा “सिलसिला” मधला असो….. !!
त्याच्या प्रत्येक नायिकेला ती “स्पेशल” असल्याचा जो Feel शशी कपूर द्यायचा ना, तो मला कुठल्याच हिरो मधे जाणवला नाही. म्हणजे त्या काळातल्या.

“जब-जब फूल खिले” मधे मी त्याला सगळ्यात पहिल्यांदा बघितलं आणि तो आवडलाच. आपल्याच विश्वात असणारा “त्रिशूल” मधला शशी कपूर सुद्धा खूप आवडला. “कलयुग” “जुनून” “उत्सव” “विजेता” “३६ चौरंगी लेन” हे त्याने काढलेले सिनेमे मनापासून आवडले. रेखा, नितू सिंग, परवीन बॉबी ह्यांच्यासोबत मला तो जास्त आवडला !!

वयाने मोठा असूनही त्याने कित्येक सिनेमात अमिताभच्या छोट्या भावाचं काम केलं आणि तो छोटा भाऊ म्हणून अगदी परफेक्ट शोभला सुद्धा. त्याचा मिश्किलपणा त्याच्या प्रत्येक सिनेमात ठळकपणे जाणवायचा. खर्‍या आयुष्यात तो कसा होता माहिती नाही पण ह्या शशी कपूरने त्या काळात आम्हाला वेड लावलं होतं हे मात्र खरं !

आता शशी कपूर दिसणार नाही… खरं तर गेल्या कित्येक वर्षांपासून दिसत नव्हताच. पण तो आहे हे सुद्धा पुरेसं होतं. आज फार म्हणजे फारच वाईट वाटतंय… !

भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या आवडत्या अभिनेत्याला !!

%d bloggers like this: