Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Posts Tagged ‘वाचन’

index

“सुंदर ती दुसरी दुनिया” अंबरीश मिश्र चं आणखी एक नितांत सुंदर पुस्तक !!

जेव्हा अंबरीश मिश्र ह्यांचं “शुभ्र काही जीवघेणे” हे पुस्तक वाचलं तेव्हापासूनच त्यांच्या लिखाणाच्या प्रेमात पडले. आता ह्या पुस्तकानंतर तर त्यावर शिक्कामोर्तब झालं 🙂

चंदेरी दुनिया, त्यातली माणसं, रंगेल आयुष्य, त्यांच्या आयुष्यातले चढ उतार, ह्याबद्दल सगळ्यांनाच कुतूहल असतं. खरं तर ह्याबद्दल सांगता येण्यासारखं कितीतरी असेल. त्यातलंच मोजकं पण अभ्यासपूर्ण लेखन आहे ह्या पुस्तकात.

रणजीत फिल्म कंपनी, बॉम्बे टॉकीज, अशोककुमार, काननदेवी, शमशाद बेगम, विजय आनंद. प्रत्येकाबद्दल इतकं आत्मीयतेनं लिहिलेलं वाचताना आपण त्या काळात गेल्याचं फ़ील येतं. त्या त्या व्यक्तीबद्दल, वास्तूबद्दल सखोल माहिती, त्यांच्या लकबी, त्यांच्या महत्वाकांक्षा, त्यांचे weak points, त्यांचे strong points, त्या त्या घटना…. फार सुरेख चितारल्या आहेत. पुस्तक संपूच नये असं वाटतं.

व्यक्तिचित्रण करतांना ते प्रत्येक बारकावे मांडतात. ती व्यक्ती कशीही असो… पण आपण त्यांच्या लिखाणात गुंतत जातो….. ये दिल मांगे मोअर… असं होत राहतं.

पुस्तकाचं कव्हर सुद्धा एकदम देखणं. पुस्तकाची पानं, बांधणी, पुस्तकाचा Shape सुद्धा वेधक !!

मनापासून आवडलेलं पुस्तक !!

(माझ्या वहिनीच्या खजिन्यातलं )

Advertisements

Read Full Post »

438-6693-largeimages

डेबोरा एलीस ह्या मूळ इंग्रजी लेखिकेची अपर्णा वेलणकरांनी अनुवादीत केलेली ही दोन पुस्तकं नुकतीच वाचली.

“युध्दस्य कथा रम्या: ” हे फक्त म्हणायला किंवा वाचायला बरं वाटतं.  पण लेखिकेने केलेलं वर्णन इतकं प्रत्ययकारी आहे की अंगावर काटा येतो.

अफगाणिस्तान हा देश सुद्धा कधी काळी समृद्ध आणि सुसंपन्न होता…. हे सत्य आपल्यालाच स्विकारणं इतकं कठीण वाटतं तर तिथल्या रहिवाशांना किती कठीण जात असेल !! रशिया आणि अमेरिका ह्यांच्या सत्तासंघर्षात अफगाणिस्तान कायमच जळत राहिला.  रशियाने माघार घेतल्यावर तिथल्याच स्थानिक टोळ्यांनी सत्ता मिळवण्यासाठी केलेल्या रणकंदनात “तालिबान” जन्माला आलं आणि सुरु झालं एक पाशवी पर्व.  जुनाट विचारांच्या तालिबान्यानी व्यक्तिस्वातंत्र्य गुंडाळून ठेवणारी एककल्ली, दडपशाहीची राजवट देशावर लादली.  बायका मुलींची मुस्कटदाबी करुन त्यांना चार भिंतींच्या आत कोंडलं.  कुठलंही मनोरंजन मग ते संगीत असो, टिव्ही असो किंवा पुस्तकं असोत…. सगळ्यांवर बंदी घातली.  वर्तमानपत्रांचा गळा घोटला.  विरोध करणार्‍यांची सरळ कत्तल केली.  हजारो लोकांना तुरुंगात डांबलं.  कित्येकांच्या हत्या झाल्या, कित्येकांचे हात-पाय तोडण्यात आले, डोळे फोडण्यात आले.  निर्वासितांना भीक मागून दिवस काढावे लागले.

अशाच एका कुटुंबातल्या परवानाची ही कथा.  अफगाणिस्तानातल्या तालिबानी राजवटीचा अमानुष, क्रूर चेहरा दाखवणारी थरारकथा.  तालिबानी राक्षसांची नजर चुकवण्यासाठी पुरुषी कपडे घालून काबूलच्या रस्त्यावर उतरणारी बहादूर परवाना…. आपल्या कुटुंबासाठी जीवाचं रान करणारी परवाना….. !! एका अतिशय संवेदनशील मुलीच्या सुंदर स्वप्नांची राखरांगोळी होऊन सुद्धा चिवटपणे लढणार्‍या परवानाची कहाणी मनाला चटका लावून जाते.

“द ब्रेडविनर” मधे पुरुषी कपडे घालून आपल्या कुटुंबाची गुजराण करणारी परवाना आणि “परवाना” मध्ये आपल्या कुटुंबापासून दुरावलेली, वाटेत भेटलेल्या प्रत्येकाला जीवाच्या आकांताने मदत करणारी परवाना लेखिकेनं इतकी सुरेख रेखाटली आहे की आपणही नकळत तिच्यासोबत रानाडोंगरात भटकायला लागतो.  रणगाडे, विमानांच्या आवाजाने आपणही कासाविस होतो.  तिच्या प्रत्येक हालचालींमधे आपणही सहभागी होतो.  मग तिला भेटलेला आसिफ असो, तिला भेटलेली लैला असो किंवा तिला सापडलेलं छोटं बाळ हसन असो……..आपणही त्या सगळ्यांमधे फार गुंतून जातो.  परवानाने तिच्या मैत्रिणीला, शौझियाला लिहिलेली पत्रं वाचून, तिच्या इतकं सगळं भोगून अजूनही जीवंत असलेल्या आशेला सलाम करावासा वाटतो.

अशाच कितीतरी परवाना, लैला, आसिफ अफगाणिस्तानातल्या रस्त्यांवर, डोंगरांमधे रानोमाळ भटकत असतील.  त्यांच्यातली जगण्याची चिवट जिद्दच त्यांना अजूनही जीवंत ठेवतेय.

लेखिका डेबोराने  स्वत: अशा निर्वासितांच्या कॅंप्स मधे स्वयंसेवक म्हणून काम केलेलं आहे.  तिथे भेटलेल्या स्त्रियांच्या मुलाखती घेतांना सुंदर आयुष्य जगण्यासाठी धडपड करणार्‍या अनेक परवाना लेखिकेनी बघितल्या.  ह्या मुलांना बघूनच त्यांची कहाणी  लेखिकेला जगासमोर आणाविशी  वाटली.

सत्तेपायी माणूस किती क्रूर होऊ शकतो आणि त्यामुळे किती आयुष्यं उध्वस्त करु शकतो हे दाखवणारी कथा जितकी सुन्न करते तितकीच ह्या मुलांची जगण्याची धडपड बघून थक्क करते.

नक्की वाचावीत अशी आहेत ही पुस्तकं !!

Read Full Post »

पर्व

parv

नुकताच एस.एल.भैरप्पा ह्यांच्या “पर्व” ह्या पुस्तकाचा उमा कुलकर्णींनी लिहिलेला मराठी अनुवाद वाचला.

महाभारताचा अत्यंत बारकाईने अभ्यास करुन त्याची आजच्या सामाजिक दृष्टीकोनातून नव्याने केलेली सुबक बांधणी म्हणजे “पर्व” !

महाभारत अगदी लहानपणी वाचलेलं.  त्यानंतर टिव्ही वर बघितलेलं.  अत्यंत चमत्कृतींनी भरलेलं, भारलेलं असं हे महाभारत मनात अगदी पक्कं ठसलेलं होतं.  त्यातल्या असंख्य पात्रांच्या गुंतागुंतीच्या पण अतिशय चुरस, interesting कथा….. त्यांचे पराक्रम, प्रतिज्ञा, त्यांना मिळालेल्या किंवा तपश्चर्या करुन मिळवलेल्या अनेक शक्ती, सिद्धी… हे सगळंच अफाट आहे.  जवळपास प्रत्येकानेच हे वाचलेलं आहे.  पण ह्या सगळ्या गोष्टी बाजुला ठेवून आपल्याला नव्याने विचार करायला भाग पाडणारं हे पुस्तक आहे.

महाभारत हा खरं तर सूडाचाच प्रवास आणि सूड कशासाठी…….तर स्त्रिया आणि सत्ता.  सामान्य माणसांचे जे विकार वर्णन केलेल आहेत ते महाभारतात अगदी ठासून भरलेले दिसतात.  आपण जे महाभारत वाचलंय त्यात बर्‍याच पात्रांना  देवत्व देवून मग त्यांचे चमत्कार वर्णन करण्यात आलेले आहेत.   पण ह्या पुस्तकात भैरप्पांनी प्रत्येक पात्राला एका साधारण मनुष्याच्या स्वरुपात सादर केलेलं आहे.  त्यामुळे ह्या पुस्तकात जे चमत्कार आपल्याला अपेक्षित असतात त्याचं सुरेख स्पष्टीकरण वाचायला मिळतं.  ते त्यांनी अतिशय खोलात जाऊन, अभ्यासपूर्वक मांडलेलं आहे आणि म्हणूनच ते आपल्याला मनापासून पटतं.   स्पष्टीकरण इतकं सुरेख दिलंय की आपण नकळत आपल्याला माहित असलेल्या प्रत्येक प्रसंगाच्या स्पष्टीकरणाची वाट बघत राहतो आणि त्यांनी विशद केलेलं वाचल्यानंतर त्याचा पुन्हा एकदा विचार करतो.  खरं तर हेच ह्या पुस्तकाचं यश आहे.

पुस्तक संपल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि ती म्हणजे ह्या महाभारतात स्त्रियांना फक्त आणि फक्त उपभोग्य वस्तू म्हणूनच दाखवलंय.  बाकी ना कधी त्यांचा मनाचा विचार केला जातो ना कधी त्यांचं मत ग्राह्य धरलं जातं.  ह्याचा साहजिकच प्रचंड राग येतो.

काम, क्रोध, भय, वासना, मत्सर ह्या विकारांनी ग्रासलेल्या सामान्य माणसांची “महाभारत” ही कथा एस.एल.भैरप्पांनी फारच सशक्तपणे मांडली आहे.

नक्की वाचण्यासारखं पुस्तक !!  MUST READ BOOK !!

Advertisements

Read Full Post »

%d bloggers like this: