Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for मार्च 18th, 2010

काल टीव्ही वर सर्फिंग करतांना एक सुरेख चित्रपट बघायला मिळाला.  मूळ बंगाली भाषेतला सिनेमा हिंदीत डब केलेला.  राहुल बोस, रितुपर्णा सेन, आणि रिमा सेन. “अनुरानन” हे नाव त्या सिनेमाचं.  मला ते नाव खूपच आवडलं.  सुरवातीला अर्थ माहित नव्हता.  पण सिनेमातच राहुल बोस त्याचा अर्थ सांगतो. बंगालीत तो इतकं छान उच्चारतो…ऑनुरॉनॉन.  “अनुरानन” म्हणजे एकमेकांच्या सुरात सूर मिसळणे.  “अनुरानन” ह्या शब्दातच इतकी गोड लय आहे ना….!!  अर्थ कळल्यावर तर हा शब्द आणखीनच आवडला.

एकमेकांच्या सुरात सूर मिसळायचा…ही कल्पनाच किती छान आहे !! हे असं सूर मिसळणं कितीजणांना शक्य होतं ?  प्रत्येक नात्याचाच एक सूर असतो.  तो सूर जर दुस-याच्या सुरात मिसळला तर जगण्याची गंमत अजूनच वाढते.  सहजीवनाचा दुसरा अर्थच “अनुरानन” असावा असं वाटून गेलं.    ज्यांना असे सूर जुळवता येत नाहीत त्यांचा साथीदार त्याच्याही नकळत अनुरानन करणारा दुसरा कुणीतरी शोधायला लागतो. तिकडे सूर जुळायला लागले की पहिल्या नात्याचे सूर बेसूर व्हायला लागतात.  हे टाळणं खरं तर सहज शक्य असतं.  प्रयत्न केला की आपल्या जोडीदाराच्या सुरात नक्कीच गाता येतं.  त्याचे सूर कुठले हे फक्त समजून घ्यायला हवेत.  त्याला कुठले स्वर वर्ज्य आहेत हे कळल्यावर ते सूर आपल्या सरगम मधे येणार नाहीत ही काळजी घेतली की बास.  संसाराचं गाणं सुरेल होणारच :).

सध्याच्या परिस्थितीत जर सगळ्यांनी एकमेकांचे सूर सांभाळले तर किती सुंदर होईल हे जग!  दहशतवादाच्या मूळालाच सुरुंग लागेल.  प्रत्येकाने प्रयत्न केला तर नक्कीच होईल हे जग सुरेल!  म्हणूनच म्हणतात ना……मिले सूर “मेरा”, “तुम्हारा”….तो सूर बने “हमारा” ….. 🙂

Read Full Post »