Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

तू असताना

मी पाचोळा तू नसताना
मी हिंदोळा तू असताना

पोक्त विचारी तू नसताना
मी वय सोळा तू असताना

दु:खद वास्तव तू नसताना
स्वप्ने डोळा तू असताना

एकाकी मी तू नसताना
गर्दी गोळा तू असताना

डोळस वावर तू नसताना
कानाडोळा तू असताना

सावध चौकस तू नसताना
गाफिल भोळा तू असताना

जयश्री अंबासकर
२४ सप्टेंबर २०२०

सोहळे यामिनीचे

#गझलेतर वृत्तबद्ध कविता
वृत्त_मालिनी
लललल लल गागा | गालगा गालगागा

झुळ झुळ झुळ होता वाहता गार वारा
सुखद उठत होता गारव्याने शहारा
विहरत ढग होते  धुंद दाही दिशाही
नटुन थटुन येण्या यामिनी वाट पाही

दिवस सरत जाता जाग येते नभाला
विहग परत जाती आपुल्या कोटराला
हळुच मधुर  जाते साद ती चांदण्याला
अधिर अधिर होते रात्र जागावयाला

टिपुर टिपुर होते रात्र कोजागिरीची
उधळण अति होते अंबरी चांदण्यांची
धवल रुप जपावे अंतरी या शशीचे
फिरुन अनुभवावे सोहळे यामिनीचे

जयश्री अंबासकर
१९ सप्टेंबर २०२०

निर्मळ जगणे जमेल ना

जगलो कायम ऋणात मी, ऋण हे माझे फिटेल ना
आनंदाने कधी तरी, उपभोगाया मिळेल ना

धावत आलो किती पुढे, कोणी न उरले सवे अता
मागे फिरता पुन्हा मला, साथी कोणी दिसेल ना

सोडून गेली कशी मला, शोधू आई कुठे तुला
जगणे दुष्कर तिच्या विना, आई फिरुनि दिसेल ना

दु:खी व्हावे किती मना, दु:ख बघावे किती पुन्हा
पुनरावृत्ती नको नको, शेवट सुखकर असेल ना

आयुष्या रे गणित तुझे, सोडवणे मज जमेल ना
तुकडे सगळे जुळुनि तुझे, कोडे पुरते सुटेल ना

देवा सुंदर तुझ्या परी, मजला हे जग दिसेल ना
झुळझुळ पाण्या परी मला, निर्मळ जगणे जमेल ना

जयश्री अंबासकर

मध्यान्ही तप्त प्रहरी

एक गंमत…. “मध्यान्ही तप्त प्रहरी” ही एकच ओळ कडव्याच्या वेगवेगळ्या ओळीत घेऊन लिहिलेली कविता !!

मध्यान्ही तप्त प्रहरी
ओसाड पार सारे
बाहेर नाही कोणी
बंदिस्त आत सारे

सुनसान हे मोहल्ले
मध्यान्ही तप्त प्रहरी
कामास कोणत्याही
येईल कोण दारी

दिसतो कुणी बिचारा
पसरूनिया पथारी
मध्यान्ही तप्त प्रहरी
खाऊनिया शिदोरी

उष्म्यास या अघोरी
कंटाळतात सारी
किती काहिली जीवाची
मध्यान्ही तप्त प्रहरी

घामात चिंब सारे
मध्यान्ही तप्त प्रहरी
तलखी कशी शमावी
मध्यान्ही तप्त प्रहरी

मध्यान्ही तप्त प्रहरी
वाराही खूप शिणतो
मध्यान्ही तप्त प्रहरी
वारा मुकाट असतो

मध्यान्ही तप्त प्रहरी
धग सोसतात सारी
मनमानी सूर्य करतो
मध्यान्ही तप्त प्रहरी

जयश्री अंबासकर
११.९.२०२०
भग्नता

ऐलतटावर भग्न उभा मी, पैलतटी तू तृप्त किती
विरहाने उध्वस्त किती मी, मुक्तीने तू शांत किती

ओलावा जगण्याचा गेला, जगणे झाले शुष्क किती
आठवणींच्या पागोळ्यांतुन, जमवत आणू ओल किती

माहित असते श्वास मला जर, उरले या देहात किती
संपवुनी मी आलो असतो, सोपी होती भेट किती

माझे मीच मला सावरतो, बसुनि उसासत राहु किती
थांबुन एका जागी केवळ, दु:ख उगाळू तेच किती

दु:खाने या दग्ध जरी मी, आयुष्याला वेग किती
थांबायाला नाही फुरसत, जगण्याचा आवेग किती

जयश्री अंबासकर
०९.०९.२०२०

%d bloggers like this: