Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for फेब्रुवारी 15th, 2012

टॅटिंग

“ए, ते बघ, ती बाई काय करतेय……. काय सही आहे यार……… ” टॅटिंग करतांना पहिल्यांदाच एका बाईला बघितलं तेव्हा तिच्या बोटांच्या लयबद्ध हालचाली बघून नकळत निघालेले उद्गार. आम्हीच काय…… आजूबाजूचे सगळेच लोक अगदी कौतुकाने ते बघत होते आणि ती बाई ते कौतुक मस्त झेलत होती. तिलाही कळत होतं लोकांच्या नजरेतलं कुतूहल. सुखावत होती ती. तेव्हापासूनच ह्या टॅटिंग बद्दल आकर्षण वाटायला लागलं होतं 😉

कुठे शिकायला मिळेल ……हाच मोठा प्रश्न होता. आपल्याला जमेल की नाही हा प्रश्न मनात कधीच आला नाही. कारण एकदा मनात आणलं तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही ह्यावर माझा ठाम विश्वास अजूनही आहे तेव्हाही होताच. तर शेजारच्या घरी एक बंगाली कुटुंब रहायला आलं. दोघं नवीन लग्न झालेले नवरा बायको आणि सासू. हळूहळू ओळख झाली. गप्पा व्हायला लागल्या. मी कॉलेजमध्ये जायचे तेव्हा. मी तिला दिदी म्हणायला लागले.

एकदा लेक्चर्स नव्हती म्हणून मी लवकर घरी आले. नेमकी तेव्हाच दिदी कामं आटोपून बाल्कनीत आली. मी घरी आलेली बघून तिने आवाज दिला. मी पण थोडा वेळ गप्पा मारूया म्हणून तिच्याकडे गेले. गप्पा करता करता तिने हळूच एक पुडक्यातून शटल आणि दोरा काढला आणि ती चक्क टॅटिंग करायला लागली. अतिशय सफाईने तिची बोटं फिरत होती. तो शटल चा टट टट आवाज……. मी तर बघतंच राहिले. मला जे शिकायचं होतं ते माझ्या इतक्या जवळ होतं. मी दिदीला मिठीच मारली. “दिदी…….. प्लीज प्लीज………मुझे भी सिखाइये ना…….. मै कबसे ये सिखना चाहती थी ” माझा आवेश बघून ती जरा सटपटलीच. “हां…..हां …..बिलकुल सिखाउंगी” तिच्या मागे लागून तिच्यासोबत दुकानात जाऊन जेव्हा शटल आणि दोरा घेऊन आले तेव्हाच शांती झाली. मग रोज जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तिच्याकडे जाऊन बसायचे. सुरवातीला ती गाठ शिकायलाच २-३ दिवस लागले. जेव्हा गाठ पक्की न बसता हलायला लागली तेव्हाचा आनंद शब्दात वर्णन करताच येणार नाही. मग Ring, Chain, Picots……. जोडणं ……. हळूहळू दिदीने सगळं शिकवलं. आता स्टाईलने मस्त शटल फिरवता पण यायला लागलं. बघता बघता एक छोटीशी Doily तयारही झाली. तोपर्यंत आत्मविश्वासही वाढला होता. वाढत जाणारं वेड बघून आईने वाढदिवसाला एक सुरेख टॅटिंगचं पुस्तक गिफ्ट दिलं. सोबत वेगवेगळ्या रंगांचे दोरे……. हरखून गेले अगदी. दिदीकडे जाऊन पुस्तक वाचून कसं विणायचं ते शिकले. कारण हे पुस्तक जपानी किंवा चिनी कुठल्यातरी अगम्य भाषेत होतं. नवं डिझाईन घातलं……. ते पूर्ण केलं. दिदीकडून कौतुक झाल्यावर खूप आनंद झाला. मग काय……… एक नवा खजिनाच हातात आला. माझ्यासोबत मग आणखी मैत्रिणीही शिकल्या. उन्हाळ्याच्या सुट्टीत तर आमची दुपारी मैफिलच जमायची.

एक नाशाच होती. खूप खूप विणलं. अगदी मान मोडून ४-४ तास एका जागी बसून विणायचे. फक्त फारच वेळखाऊ प्रकरण आहे हे. क्रोशेसारखं पटापट वाढत नाही अजिबात. शिवाय जर रंग असे गोड वापरले की सुरवात करायच्या आधी हात, बोटं अगदी स्वच्छ धुवावी लागतात. नाहीतर पाकळ्या करताना हाताच्या मळाने काळपट होतात. उन्हाळ्यात मी करायचे तेव्हा (नागपूरचा कडक उन्हाळा) हाताला घाम यायचा. मग थोड्या थोड्या वेळाने हात पुन्हा धुवून करायचे. आईने माझ्या रुखवतामध्ये सगळं मोठ्या हौशीने ठेवलं होतं 🙂

हा एक छोटासा व्हिडियो …… थोडासा अंदाज यायला

आता इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा शटल हातात आलं. जुनं प्रेम उफाळून आलं 🙂 नुकतीच तयार झालेली माझी एक Doily. अगदी स्टेप बाय स्टेप फोटो काढले आहेत.

Read Full Post »