माझा परीघ
एप्रिल 22, 2009 at 4:50 pm | In अशी मी | 1 Commentमनातलं..खूप खूप आतलं…….!!
माझा परीघ
इतक्या वर्षानंतर सुद्धा तश्शीच आहे नव्हाळी
तशीच कोवळी
काही फांद्या झाल्या असतील थोड्याशा जुन्या…
पण आतली ओल मात्र अगदी तश्शीच
भळाभळा वाहणारी !
एक छोटंसं मोग-याचं फुल सतत आसपास असावं…
तसा तुझा सहवास
हवाहवासा, ताजा, गंधाळलेला
इतकी सवय झालीये ना त्याची !!
कधी हेच मोग-याचं फुल अबोली बनतं ना…
तेव्हा मात्र मन कावरंबावरं व्हायला लागतं
अबोलीच्या मनातलं काढून घेणं फार फार कठीण !
पण एकदा का ही अबोली बहरुन गुलाबाची टप्पोरी कळी झाली ना……
की सगळं जगच गुलाबी होऊन जातं माझं !
…..
…
आता हा गुलाब… आणखीनच डौलदार झालाय
डोळ्यांवर सोनेरी काड्यांचा चष्मा आलाय
केसातली ती चंदेरी वळणं…
कानावरचे थोडेसे रुपेरी केस…
जास्तच रुबाबदार दिसतो आहेस !
गालांवरच्या त्या दोन खोल खळ्यांमधे तर मी कोसळतेच आहे कित्येक वर्षापासून !
तुझ्या डोळ्यातली मिश्किली…. माझा श्वास आहे
माझं जगणं, मरणं त्यावर अवलंबून आहे
कायमच एक सखा होऊन राहिलास
माझं बालपण टिकवलंस
वेडेपण गोंजारलंस…
तारुण्य जपलंस….!!
अतिशय समृद्ध आणि तृप्त आयुष्य दिलंस मला
तुझ्या परिघातच आहे माझं जग सारं
ते असंच राहू दे.
तुझी सखी
कुणास्तव कुणीतरी
मार्च 9, 2009 at 12:19 pm | In नुकतंच वाचलेलं, मराठी | 2 Comments
मंगेश पाडगावकर ह्यांच्या पत्नी यशोदा पाडगावकर ह्यांनी लिहिलेलं आत्मचरित्र “कुणास्तव कुणीतरी”.
कलावंताचा संसार सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरत असं कोणीसं म्हटलंय ते काही खोटं नाही. समाजात अतिशय प्रतिष्ठा मिळवणारा, लोकांच्या गळ्यातला ताईत असलेला नवरा असणं…… हे जरी अप्रूप असलं तरी……. त्याचा संसार सांभळणं तितकंच कठीण. ह्याचा प्रत्यय प्रत्येक यशस्वी नव-याच्या बायकोने लिहिलेल्या पुस्तकातून दिसतो. तसंच या ही पुस्तकातून जाणवतं.
कवितेच्या दुनियेत रमलेल्या, वास्तवाची अगदीच जाणीव नसलेल्या आपल्या नव-याचा, त्याच्या सगळ्या सवयींचा होणारा जाच अगदी प्रेमाने सहन करणारी यशोदा……..!! वेगळ्याच धर्मातून आल्यामुळे लग्नाला माहेरचाच प्रचंड विरोध…… आणि सासरी आपला स्वीकार अगदी सहज झाल्यामुळे आलेलं उपकाराचं ओझं सांभाळता सांभाळता तिची अगदी ससेहोलपट होते. कायम पैशाची ओढाताण, नाजुक तब्येत, त्यामुळे होणारी ससेहोलपट….. सगळं जिवंत लिखाण. एका सर्वसामान्य संसारी स्त्री ची, संसाराची गाडी रुळावर ठेवण्यासाठी एकटीची होणारी तगमग, धडपड….. अगदी मनाला भिडते.
त्यांचं लिखाण फार प्रामाणिक वाटतं. त्यांना त्यांच्या मर्यादांची असलेली जाणीव, काहीतरी करुन दाखवायची जिद्द, एकटीच्या हिंमतीवर सगळे कठीण प्रसंग निभावून नेणारी विचारसरणी…….सगळंच कौतुकास्पद वाटतं.
पुन्हा एकदा…….प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे उभ्या असण्या-या प्रचंड स्त्री शक्तीची जाणीव करुन देणारं पुस्तक !!
मुलखावेगळी माणसं
फेब्रुवारी 23, 2009 at 3:19 pm | In कुवेत, मराठी | 1 Commentमहाराष्ट्र मंडळाची मेल आली की फार उत्सुकता असते. आता काय नवीन बघायला आणि अनुभवायला मिळणार….. ह्याचं कुतूहल कायम असंच राहणार…..नेहेमीसाठी. कारण प्रत्येक वर्षी नवी कमिटी, नवा उत्साह, नवा जोश, नवी संकल्पना….. असं समीकरणच झालंय. यावर्षीची कमिटी तर जुन्या, नव्या लोकांचा सुंदर मिलाफ आहे. त्यामुळे सुरवात नक्कीच जबरदस्त असणार हे नक्कीच होतं. झालंही अगदी तस्संच !!
दूरदर्शनच्या माध्यमातून जनमानसावर आपल्या शब्दप्रभूत्वाची छाप पाडणारे सुधीर गाडगीळ येणार असं एका सुरेख पत्रकानं सांगितलं. त्यांना भेटलेली “मुलखावेगळी माणसं” ते आमच्यापुढे रंगवणार होते. सूर्याच्या नव्या प्रवासासोबत आमचा ही २००९ चा प्रवास तीळाच्या स्नेहानं, गुळाच्या गोडीनं आणि सुधीर गाडगीळांच्या साथीनं अगदी जोशात होणार होता.
ती सुरेख सकाळ उजाडली. सकाळी ९ वाजल्यापासून शाब पार्कच्या परिसरात रेशमी, हसरी सळसळ सुरु झाली आणि वाळवंटात मराठमोळा सुगंध पसरला. पार्कच्या प्रवेशद्वारी सगळ्याचं अगत्याने स्वागत झालं. हॉलमधे गेल्यावर हळदीकुंकू, तीळगुळाने गोड सुरवात झाली. ब-याच दिवसांनी एकमेकांना भेटत असल्यामुळे वातावरण चांगलंच गप्पिष्ट झालं होतं. एकीकडे साड्या, दागिन्याची कौतुकं, तर दुसरीकडे रेशमी झब्ब्यांची गंभीर चर्चा ! त्यात सुधीर गाडगीळ कधी सामील झाले कळलंच नाही. अतिशय साधं, लाघवी व्यक्तिमत्व, डोळ्यातली मिश्कीली मात्र अगदी तीच….!! इतक्या वर्षानंतरही हसूही तितकंच ताजं ! सगळ्यांशी अगदी आपुलकीनं बोलणं…. ! ३००० असामान्य लोकांना सामान्य लोकांपुढे बोलकं करणारा हा शब्दप्रभू इतका साधा असू शकतो ह्यावर विश्वासच बसला नाही. कित्येकांनी त्या आठवणींना फोटोत बंदिस्त करुन घेतलं.
कार्यक्रमाला सुरवात झाली. सांस्कृतिक सचिव प्रांजली ने नव्या कमिटीतर्फे सगळ्यांचं स्वागत केलं आणि नव्या कमिटीची सगळ्यांना ओळख करुन दिली. अध्यक्ष सुरेश मराठेंच्या दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. पाहुण्याचं स्वागत आणि त्यांची ओळख. अश्विनी नं अतिशय सुरेख शब्दात गाडगीळांची ओळख करुन दिली आणि प्रेक्षकांना गाडगीळांच्या हातात सोपवलं. त्यांनीही पुढचे दोन तास सगळ्यांना आपल्या भाषाकौशल्यानं अगदी गुंग करुन टाकलं. अगदी पहिल्या वाक्यापासून त्यांनी जी पकड घेतली ती अगदी शेवटपर्यंत अजिबात सैल झाली नाही.
ओघवती भाषा, प्रचंड आत्मविश्वास, समोरच्या प्रत्येक मनाचा ठाव घेणारी नजर…… सगळे मंत्रमुग्ध होणारच !! ह्या माणसाच्या स्मरणशक्तीचं मात्र फार कौतुक वाटलं. किंबहुना ह्या विलक्षण शक्तीच्या जोरावरच त्यांनी इतक्या लोकांच्या ओळखी स्वत:जवळ बांधून ठेवल्या आहेत. हजरजवाबी असणं हे मुलाखतकाराचं वैशिष्ट्य गाडगीळांमधेही आहेच पण त्याच्या हजरजबाबीपणात त्यांचा जबरदस्त अभ्यासही दिसतो. इतक्या मोठ्या लोकांना बोलकं करायचं….. सगळं काढून तर घ्यायचं पण अगदी खेळकर वातावरणात. राजकारणपटू, अभिनेते, गायक, कलाकार…..सगळेच लोकांवर अधिराज्य गाजवणारे. सामान्य माणसांना त्याबद्दल कुतूहल असणारच. ते कुतूहल शमवावं तर गाडगीळांनीच. मुलाखतकार कसा असावा ह्याचं सुधीर गाडगीळ मूर्तीमंत उदाहरण आहेत.
त्यांना भेटलेली मुलखावेगळी माणसं फ़क्त उच्च वर्गातली नाहीयेत. आजूबाजूची माणसं बघतांनाची त्यांची नजरच वेगळी आहे आणि त्यामुळेच सामान्यातला असामान्य पैलू ते बघू शकतात आणि शब्दसामर्थ्यामुळे लोकांपुढे तितक्याच ताकदीने मांडू ही शकतात. त्यांनी सांगितलेले खुसखुशीत किस्से सगळ्यांनी अगदी तस्सेच अनुभवले त्यांच्या शब्दातून. बाकीचं कुतूहल पण प्रश्न विचारुन लोकांनी शमवून घेतलं. ही शब्दांची मैफल एक आगळाच अनुभव आणि आनंद देऊन गेली.
दीर्घकाळ स्मरणात राहिल असा कार्यक्रम अनुभवायला दिल्याबद्दल महाराष्ट्र मंडळाचे शतश: धन्यवाद !
एका रानवेड्याची शोधयात्रा
जानेवारी 29, 2009 at 5:52 pm | In नुकतंच वाचलेलं, मराठी | 4 Commentsकृष्णमेघ कुंटे या एका रानवेड्याची जंगलातली मुशाफ़िरी…..! ख-याखु-या जंगलपुत्रासारखं राहून…. जे अनुभवलं ते सहजसुंदर शैलीत लेखकानं रेखाटलंय.
“काही पुस्तकं वाचायची नसतात, तर अनुभवायची असतात” असं म्हणतात ते अगदी खरंय. मिलिंदनं हे पुस्तक जरुर वाच असं सुचवलं तेव्हा ह्या पुस्तकात काहीतरी जबरी असणार ह्याची खात्री होती…. आणि झालंही तसंच
ह्या पुस्तकासोबत आपण अक्षरश: जंगलात वावरतो. जंगल, निसर्ग ह्यावर मनापासून प्रेम करणा-या ह्या “कृ्ष्णमेघा”ची लेखन शैली इतकी ओघवती आहे ना…की आपण कधी त्याच्या सोबत जंगलात निघतो ते कळतंच नाही.
अतिशय मधुर आणि अलंकारिक भाषा ! आता हे बघा…..
पण फक्त त्या पळसाकडेच इतरांच्या नजरेला वेड लावायचा मक्ता नव्हता. पिवळ्या मोहरात आंधळं करणारं सोनं घेऊन झुकलेला बहावा, टपो-या लाल फुलांचे मधुरसाचे कुंभ घेऊन उभ्या ठाकलेल्या काटेसावरी, ठिणगीलाही फिक्कं पाडेल अशा रक्त-लालीच्या फुलांचे शिरपेच ल्यालेले पांगारे.. हे सारेच खांद्याला खांदे लावून उभे होते. मोयार गॉर्जच्या कपाळावर गर्दी केलेल्या बांबूची पानं सोनपिवळी पडली होती. वा-याच्या हळूच स्पर्शाबरोबर ती थरारून कापायची. सकाळी सूर्याच्या कोवळ्या किरणांनी डोंगरामागून बांबूच्या बेटाशी सलगी केली की मागच्या काळ्याशार कातळाच्या पार्श्वभूमीवर ही पानं कशी लकाकायची ! काय तो उठाव !
जागोजागी ही अशी शब्दालंकारांची उधळण….!! आपण इतकं तॄप्त होतो ना हे सगळं वाचताना….अनुभवताना…..!! प्रेमात पडल्याशिवाय शब्दांची अशी कशिदाकारी होऊच शकत नाही. लेखक सबंध एक ऋतूचक्र जंगलात उपभोगून आलेला आहे. त्यामुळे प्रत्येक ऋतूमधला जंगलाचा साज अतिशय कलात्मकतेनी आणि आत्मियतेनी चितारलाय. त्यांच्या अनुभवात प्रचंड थरार आहे, जो वाचक अनुभवू शकतो. हे त्यांचं कथन म्हणजे, जंगलरसात न्हाऊन निघालेलं आणि वाचकांनाही रानवेडाची दीक्षा देणारं “मदुमलाई सूक्त” ! जे हातून निसटलं त्याची हुरहुर लेखकाला होते..तश्शीच वाचकालाही जाणवते.
पुस्तक उघडल्याबरोबर जाणवतं ते पुस्तकाचं देखणेपण !! गुळगुळीत, चकचकीत वेष्टनात गुंडाळलेलं गिफ़्ट उघडताना जसं वाटतं ना….तसं वाटतं हे पुस्तक उघडताना ! जिवंत चित्रं, मखमली पानं आणि जंगलातला थरार….. नितळ पारदर्शी लिखाण…….. अहा….. मजा आ गया !!
अगदी वाचून अनुभवायलाच हवं असं पुस्तक !!
तीळगुळ घ्या….
जानेवारी 13, 2009 at 4:33 pm | In मनातलं...! | 4 Comments
हा माझा तीळगुळ आणि चिक्की. अगदी ताजा ताजा आहे हं…. पण गोड बोलायला मात्र विसरु नका
Blog at WordPress.com. | Theme: Pool by Borja Fernandez.
Entries and comments feeds.


